Login

*तिचं अस्तित्व * भाग -24

नाचणारीच्या मुलीची कथा



.        *तिचं अस्तित्व * भाग - चोविसावा


मागील भागात आपण पाहिलं की, ज्या दिवशी अनुश्रीच्या चिरा उतरवला गेला पाटलांकडून, त्याच दिवशी खेळता खेळता चुकून साई पडली. ती दोन-तीन दिवसात बरी होऊन घरी येते. इकडे अनुश्रीने सगळ्यांचं मन जिंकून घेतलं होतं. आता पाहूया पुढे...

राजनने सईला उचलून घेतलं, आणि तिला तिच्या दालनात नेलं.

पण आतमध्ये जाताच तिची पाऊले थबकली. काहीतरी वेगळं भासलं तिला तिच्याच दालनात. ती पाहतच राहिली. भिंतींना रंगरंगोटी केली होती, नीलमचा पलंग जो खिडकीपासून खूप दूर होता, तो खिडकीजवळ घेतला गेला होता. नेहमी बंद असणार्‍या खिडक्या उघडल्यामुळे स्वच्छ आणि खेळती हवा तसेच भरपूर सूर्यप्रकाश तिच्या दालनात पसरला होता.

तसेच खिडकीचे पडदे बदलले होते आणि गादीवर नवीन आकर्षित करणाऱ्या रंगांच्या चादरी अंथरल्या होत्या. एका बाजूला फुलदाणीत मन प्रसन्न करणारी तिच्या आवडीची गुलाबाची फुले सजवली होती. एकदम सुगंधी वातावरण झाले होते.

खूप सारी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी होती, तसेच लहान मुलांची पुस्तके आणि चित्रकलेचे साहित्य ठेवले होते. तिला खूप प्रसन्न वाटलं कारण त्याची रचनाच खूप छान प्रकारे केलेली होती. तिचे कपड्यांचे कपाट देखील खूप छान आवरलेले होते.

सई ही हे सारे पाहून चकित झाली होती आणि खूप आनंदली होती! तिच्यासाठी पहिल्यांदा कुणीतरी असं केलं होतं. राजन सावकारांनी त्यांना अलगद पलंगावर झोपवलं, तेव्हा खालची गादी देखील मऊ भासली तिला. ती हे सगळं हरखून पाहतच होती की तिची सोबत करणाऱ्या आजीबाई म्हणाल्या...

"ताईसाहेब, बरं वाटत ना तुमास्नी? त्या दिवशी बाई, म्या अगदीच घाबरून गेले होते हो तुमची अवस्था पाहून. तुमी येईपर्यंत जीव अगदी टांगणीला लागला व्हता. आता तुमास्नी ठीक पाहून बरं वाटतंय बगा..."

सईने फक्त मान हलवत तिला हुंकार भरला. तशी ती सईकडे पाहून म्हणाली...

"ठीक आहे, तुमी आराम करा. म्या हाय बाहेर काय लागलं तर सांगा..."

सईला तसंच आराम करायला सांगून राजनसुद्धा आराम करायला निघून गेले. ह्या आठ दिवसात त्यांची सुद्धा खूप धावपळ झाली होती. थोडा आराम करून त्यांनी सईची देखरेख करणाऱ्या आजीला तिच्या औषध देण्याच्या वेळा समजून दिल्या. तिची पथ्य पाळ सांगितली.

राजनने थोडा वेळ आराम केला आणि राहिलेला वेळ त्याने आपल्या अपुऱ्या राहिलेल्या कामात घालवला. त्यात त्याचा पूर्ण वेळ गेला. हयात त्यांना अनुश्रीबद्दल विचार करायला वेळ सुद्धा मिळाला नाही. पण रात्र झाली तशी त्यांना तिच्या बद्दल ओढ जाणवली.

पण अजून पूजा झालेली नसल्यामुळे आजही त्यांना एकट्याने रात्र काढायची होती. हा विचार त्यांच्या मनात आला; पण किमान तिच्या सोबत काही तरी संवाद साधता आला पाहिजे. किंवा तिला एकदा पाहता आले तर पहावे म्हणून ते तिच्या दालनात जायला निघाले.

इकडे अजूनही अनुश्रीला तिचे पती कोण हे माहित नव्हते. कारण तिथे एवढ्या दिवसात कुणी फिरकलं नव्हतं. त्यामुळे ती एकदम बिंदास होती. ती तिच्या दालनात एक पुस्तक वाचत बसली होती.


इकडे तिचे दालन वर असल्यामुळे जिन्यावरून चढून ते गेल्याचे राणूक्काने पाहिलं नव्हतं आणि त्या सुद्धा अनुश्रीशी बोलायचं म्हणून दुसऱ्या बाजूने आतल्या जिन्यावरून येत होत्या. तिच्या दालनात दुसरे कुणी जाण्याचा काहीही संबंध नव्हता, म्हणून त्या सुद्धा निर्धास्त गेल्या. पण इकडून राजन आणि त्यांचा येण्याचा वेळसारखा झाल्यामुळे ते दोघे एकमेकांना पटकन सामोरे गेले. त्यामुळे ते एकदम दचकले. हे असे पटकन कोणी समोर येणे त्या दोघांना पण अपेक्षित नव्हते. आता राजन रावांचा एकदम गोंधळ उडाला. पण राणूक्का मात्र त्यांना तिथे पाहून एकदम खुश झाल्या. खरेतर त्या वाड्यात आल्यापासून त्यांना त्यांच्याशी निवांतपणे बोलायलाच मिळाले नव्हते..! ह्या दोघांचं एकमेकांशी खूप जास्त पटायचं......! त्यामुळे त्यांनी त्यांचा गोंधळ जाणला आणि त्या म्हणाल्या.....,

"कसे आहात राजन......? आपल्याला बोलायला वेळच नाही भेटला ह्या काही दिवसात.....! त्यात तुमची मागील आठ दिवसात सईसाठी फार धावपळ झाली. झोपवले आताच तिला मी .. दोन दिवस शांत बसलं पाहिजे आता तिने नाहीतर पुन्हा मस्ती सुरु होईल .."

"हो ना....! पण मी तिला बजावून आलो आहे, करेल आराम .. हो तर म्हंटल तिने."

राजन म्हणाले.

"त्या खोलीचा झालेला कायापालट पाहून सई खुश झाली असेल ना? म्हणून होकार दिला लगेच."


राजनचा अंदाज घेत आत्याबाई बोलल्या.


"असू शकत.....खरं सांगू आत्या, आम्हाला सुद्धा तिथे खूप प्रसन्न वाटले.....!"

राजन हसत म्हणाले, पण खरं तर त्या वेळेस मनात काही निराळेच विचार चालू होते आणि तेवढ्यात एकदम राणूक्का समोर आल्या..! एकतर नव्या पत्नीस भेटायची ओढ त्यांना थांबू देत नव्हती. त्यात त्यांनी तिला देण्यासाठी हार आणला होता.तो कुठे लपवायचा हा प्रश्नही त्यांना पडला. मनात उचंबळून आलेले भाव एकत्रितपणे लपवून ठेवत, त्यांना राणूक्का सोबत बोलणे फारच अवघड आणि कसरतीचे वाटत होते त्याक्षणी त्यांना!


पण त्यांना डावलून ते जाऊही शकत नव्हते, आता काय करायचं ह्या विचारात ते असताना...... राणूक्काच्या लक्षात आले की ते वरती काय करीत आहेत?

खरं तर त्यांची खोली तरी अजूनही खालीच आहे.. वर तर घरातले मोठे आणि अनुश्रीच राहते..... अनुश्रीच नाव डोक्यात आलं तस त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला..! तस त्यांना हसायला आलं पण ते अडवत त्या परत म्हणाल्या...,


" सईच्या खोलीचा कायापालट तुम्हाला आवडला ना...? हे सगळं उत्साहाने नव्या सूनबाईने केलं आहे हो...... ही सारी रचना..त्यांचीच..... तुम्हाला समजेलच पण मी सांगते.... त्या. नुसत्या दिसायला सुंदर नाहीत हा.... तर विचारांनी देखील परिपूर्ण आहेत.., विचारी आहेत, समंजस आहेत, सुगरण आहेत, आवड निवड जपतील सगळ्यांची, गरज पूर्ण करतील ह्या वाड्याची..... त्या एकदम परिपूर्ण आहेत... तुम्हाला साजेश्या....!"


राणूक्का कौतुकाने सांगत होत्या आणि इकडे राजनची अजूनच अधीरता वाढत होती... त्या पुढे म्हणाल्या,

"अहो, अवघ्या चार दिवसात पोरीने आम्हास आपलेसे केले, आता वाड्याची आणि तुम्हा सर्वांची काळजी घेतली जाईल असे वाटते आम्हाला मनोमन.. म्हणजे खात्रीच आहे तशी.... उत्तम आई होतील त्या सईच्या .. बरं मला सांगा आता तुम्ही वर कसे...... तुम्ही त्यांनाच भेटायला चालला असाल ना? आणि मी मध्येच भेटली म्हणून अडकलात ना??"

त्यांना बोलण्यात अडकवून बोलता बोलता पटकन बोलून गेल्या राणूक्का, तसे तंद्रित असलेले राजनराव पटकन हो बोलून गेले. पण लक्षात येताच त्यांनी पटकन आपली जीभ चावली आणि त्यांना खूपच अवघडल्यासारखं झालं....

तसे लक्षात येताच राणूक्का पुढे बोलल्या की,

"काळजी नसावी हा......! आत्ताच बोलणे झाले आहे आमचे भटजी बरोबर...... भटजींनी उद्याचा दिवस फार शुभ आहे पूजेसाठी, असे सांगितले आहे. त्यामुळे तयारी सुरू केली आहे आम्ही .... तेव्हा आजची रात्रच काय ती तुम्हाला काढावी लागणार......! थोडासा धीर धरा...... मग उद्या पासून तुम्ही सुद्धा ह्या खोलीत!"


असे म्हणत हसत हसत आपल्या दालनात निघूनही गेल्या...!


पण त्यांचे हे असे चिडवणे राजनरावांना चांगलेच रोमांचित करून गेले होते. त्यांना तिच्या बद्दल अजूनच ओढ निर्माण झाली....

त्याच विचारात ते अनुश्रीच्या खोलीत गेले! ती तिच्या वाचनात मग्न झाली होती...... आणि ते एकदम तिच्या पुढ्यात येऊन उभे ठाकले ..आणि तिच्याकडे पाहतच राहिले.......


सई आणि अनुचे बंध जुळणार का?

अनुश्रीला सुद्धा ओढ वाटेल का राजनबद्दल???