Login

तिचा संघर्ष भाग-52

Every Woman Wants Love, Respect And Support.
भाग-52


राणी "हो" म्हणाली. "पण मी दोन मिनिटांत आलेच." म्हणून मॅडमच्या पाया पडून, त्यांचा आशिर्वाद घेऊन थेट आश्रमात गेली. हरीही मॅडमच्या पाया पडला. "अरे, राणी पाया पडली ते ठीक आहे. पण तू का माझ्या पाया पडतोय?" मॅडम म्हणाल्या.

"सुंदर दिवसाची चांगली सुरूवात व्हावी यासाठी." हरी म्हणाला.

"बरं, तुझा दिवस खूप आनंदात जाऊ देत!" मॅडम म्हणाल्या.

"आता नक्कीच जाणार." हरी म्हणाला.

"बाय!" म्हणून हरीही राणीच्या मागोमाग घराबाहेर पडला. आणि गाडीत जाऊन बसला. राणी आली की, लगेच निघायच्या तयारीत होता. हरीचे सहज लक्ष गाडीच्या आरशाकडे गेले. राणी देवीच्या मंदिरात गेली. जाताना तिने पायरीचे मनोभावे दर्शन घेतले. बाहेर आल्यावर आबा आणि आजीचेही दर्शन घेतले. हे सर्व त्याला आरशात स्पष्ट दिसत होते.

'नम्र तर आहे, पण आल्यापासून मलाच का इग्नोर करतेय देव जाणे.' हरी मनात विचार करत होता. तितक्यात राणी गाडीत येऊन बसली. गाडी स्टार्ट झाली. हरीने भक्तीगीते सुरू केली. राणीने मोठ्याने वाचायला सुरूवात केली. मग आपण लावलेली भक्तीगीते बंद करत हरी म्हणाला,"गाडीत बसून वाचणाऱ्या लोकांना हमखास चष्मा लागत असतो." 

राणीने मात्र एकही शब्द न बोलता आपले वाचन सुरूच ठेवले. आणि त्या वाचनाला क्लासजवळ गाडी थांबल्या वरच पूर्णविराम दिला. गाडीतून उतरून राणी तरातरा निघून गेली. 

हरीला मात्र राणीचा फार राग आला. साधं थॅन्क्स सुद्धा बोलली नाही. 'किती शहाणी समजते ही स्वतःला. असो दुसऱ्यांचा विचार करून आपला दिवस का खराब करायचा?' हरीने आपली बॅगमधली फाईल हातात घेतली आणि हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला. आधीच इंटरव्ह्यूसाठी अपॉइंटमेंट घेतल्यामुळे हरीला लगेच आत सोडण्यात आले. डीनना हरीचा इंटरव्ह्यू आवडला आणि त्यांनी हरीला मेडिकल स्टुडंट्सला शिकवण्यासाठी जॉइन व्हायला सांगितले. हरी अगदी आनंदाने बाहेर आला. 

हरी घरी आला. मॅडम आरामखुर्चीत बसल्या होत्या. हरीने वाकून पुन्हा मॅडमचा आशीर्वाद घेतला. 

"अरे हरी, आज असा सारखा सारखा पाया काय पडतोयस माझ्या?" मॅडम म्हणाल्या.

" आधी मी तुम्हाला एक विचारू का ते सांगा?" हरी म्हणाला.

"हो विचार, काय विचारायचे आहे तुला ?" मॅडम म्हणाल्या.

"मी आजपासून आई म्हटलं,  तर चालेल तुम्हांला?" हरी म्हणाला.

"आजपासून का ? (थोडा वेळ थांबून मॅडम म्हणाल्या.) आतापासून म्हणालास तरी चालेल अरे. " तेव्हा मात्र दोघांच्या चेहर्‍यावरून आनंद ओसांडून वाहत होता. मॅडमचा हात हातात घेऊन हरी म्हणाला, "आई तुम्हांला माझ्याविषयी काहीच माहिती नाही ना. आज तो दिवस आलाय. आज मी तुम्हांला सगळं खरं खरं सांगणार आहे."

"आईला एकेरी हाक चालेल हरी. आणि तू आधी ऊठ बरं आणि या सोफ्यावर बस." हरीला आपल्या हाताने सोफ्यावर बसवत मॅडम म्हणाल्या.

हरी सोफ्यावर बसला. हरी म्हणाला, "आई माझं शिक्षण किंवा आई-वडील यांच्याविषयी आपले फारसे बोलणे झालेच नाही. कारण शिक्षणाचा विषय निघाल्यावर जो प्रसंग विसरण्याचा मी प्रयत्न करतोय, तोच प्रसंग मला आठवावा लागेल ज्याचा मला खूप त्रास होतो. म्हणून मी काहीच बोललो नाही. हरीच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. 

"हरी तू असा कोड्यात बोलू नकोस रे. काय असेल ते स्पष्ट सांग बरं." मॅडमही भावूक होऊन म्हणाल्या.

"हो आज काहीही झालं तरी खरं काय ते मी सांगणार, हा निश्चय केलाय. म्हणजे माझे आई-वडील त्याच देशात राहत होते जिथे शार्दुलही होता. लहानपणापासून मला दम लागणे, जड वस्तू उचलताना छातीत धडधड होणे यासारख्या गोष्टी होणे ठरलेले असायचे त्यामुळे मैदानी खेळ माझ्यापासून लांबच होते. परदेशात नोकरी करणारे आई-बाबा माझ्या या त्रासाला कंटाळले होते. म्हणूनच त्यांनी मला भारतात माझ्या आजी-आजोबाजवळ आणून सोडले. आजी-आजोबांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. पण हार न मानता त्यांनी मला डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली दिवस रात्र जागून एमबीबीएसला पाठवले. जेंव्हा केंव्हा त्रास होईल तेंव्हा सर्व डॉक्टरांनी माझी जमेल तितकी काळजी घेतली. पण काही काळाने आजी-आजोबा ही मला सोडून गेले. होस्टेलमध्ये राहताना सर्व सहकारी मित्रांनी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला. एक दिवस डॉक्टरांनी सांगितले की, "आता हृदय प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नाही." आणि त्यासाठीच शोधाशोध सुरू झाली. आई-बाबांना माझ्या सहकारी मित्राने फोन करून सांगितल्यावर तेही शार्दुलच्याच फ्लाईटने मला भेटण्यासाठी भारतात येत होते. आणि माझ्या गंभीर आजारामुळे लहानपणी मला भारतात सोडून गेलेले माझे आई-वडील यावेळी मात्र मला कायमचे पोरके करून गेले. शार्दुलने जेंव्हा अवयव दान करण्याच्या फॉर्मवर सह्या केल्या, त्यावेळी मी ही त्याच हॉस्पिटलमध्ये आधीपासून ऍडमिट होतो. आणि मग योगायोगाने आमच्या सर्व टेस्ट जुळल्या आणि माझ्या बॉडीनेही शार्दुलचे हृदय स्वीकारले. मी चांगला बरा झाल्यावर आजीआजोबांनचं स्वप्न करण्यासाठी मी एमडीची एक्झाम दिली. आणि तोच आनंद साजरा करण्यासाठी सर्व हॉस्पीटल स्टाफ एकत्र जमला असताना "शार्दुल, फॉर्मवर सही केल्यावर आई आणि आजी हेच नाव उच्चारत होता." हे मला तिथे जमलेल्या तज्ज्ञांकडून समजलं. बहुतेक शार्दुलला बाबा नसावेत हा विचार माझ्या मनात आला. आई आणि आजीला काय त्रास होत असेल याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो. शार्दुलचा पत्ता विचारल्यावर सरांनी मला शार्दुलची डायरी उघडून पाहायला सांगितलं. त्याने ती डायरी मलाच द्या म्हणून सांगितलं होतं. आणि मी त्याच्या डायरीत लिहून ठेवलेल्या माहितीनुसार इथे पोहोचलो. आणि मी डॉक्टर आहे हे विसरून गेलो. तुमचे प्रेम, आपुलकी माझ्यासारख्या मुलाला लाखमोलाची आहे.

पण मागच्या आठवड्यात पेपरमध्ये मेडिकल स्टुडंटसाठी लेक्चररची ऍड दिसली. आणि मी फॉर्म भरला आज माझा इंटरव्यू होता. मला याच शहरातील मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून नोकरी मिळाली आहे." हरी मोठ्या आनंदाने म्हणाला.

हरीच्या गालावरून मॅडमनी हात फिरवला."खूप छान झालं! तुझ्या जिद्दीला माझाही सलाम. आज खरंच माझ्या शार्दुलने त्याच्या मनातलं मला सगळं सांगितल असच वाटतय." मॅडम रडत- रडत म्हणाल्या.

दीपाच्या आई स्वयंपाक घरातून मायलेकाच बोलणं ऐकत होत्या. स्वयंपाक घरातून मीठाचे खडे घेऊन त्यांनी नको म्हणत असतानाही मॅडमची आणि हरीची दृष्ट काढली.

"चला फ्रेश होऊन आलोच." हरी म्हणाला.

"कुठे बाहेर जाणार आहेस का?" मॅडम म्हणाल्या.

"हो. आता ड्रायव्हर नाही का मी राणी मॅडमचा. त्यांना आणायला जावे लागेल." हरी म्हणाला.

"ऐक ना हरी, जर तुला आता कॉलेजमध्ये काम असेल तर जुनी गाडी दुरूस्त करून ड्रायव्हर ठेवायचा का राणीसाठी?" मॅडम म्हणाल्या.

"नाही आई आवडेल मला राणीचा ड्रायव्हर व्हायला." हरी सहजच बोलून गेला. मॅडमना प्रकर्षाने शार्दुल आठवला. तोही असाच स्पष्ट बोलून दाखवायचा. 

दीपाच्या आई मॅडमना म्हणाल्या, असे का बोलले हरीदादा?" 

"मनात काही नसतं. जे पोटी ते ओठी आणलं बस. अगदी शार्दुलसारखं. तुम्ही नका जास्त विचार करू. मॅडम दीपाच्या आईला म्हणाल्या.

हरी अगदी मनावरचा भार हलका झाल्यासारखा वावरत होता. मॅडमनी केलेला गरमागरम चहा घेऊन, मस्त परफ्यूम मारून तो राणीला क्लासमधून आणायला निघाला होता.

राणी क्लासमधून आपल्याच विचारात बाहेर आली. आता मात्र ती थोडीशी उदास वाटत होती. तिने ना पुस्तक उघडले, ना वर पाहिले. डोळे मिटून ती शांत बसली होती.

हरीला मात्र फारच वाईट वाटत होते. हरीने मनात विचार केला, 'अरे ही त्यादिवशी हॉटेलमध्ये पडता- पडता माझ्यामुळे वाचली तरी साधं थँक्यूही म्हणाली नाही आणि आजही गाडीतून अशी काही उतरून गेली जशी माझ्यावरच उपकार करतेय गाडीत बसून. पण तरीही मला तिचं उदास असणं का खटकतयं.' गाडीतल्या काचेतून राणीला पाहात हरीने अखेर गाडी थांबवली. गाडी थांबली म्हणजे घर आले या आवेशाने इकडे तिकडे न पाहता राणी आपली बॅग अडकवून खाली उतरली. समोर पाहते तर काय आश्चर्य! 

"वॉव ! किती सुंदर वॉटरफॉल आहे हा !" राणी आनंदाने म्हणाली.

"हो का ? पण आपण तो वॉटरफॉल बघायला नाही थांबलोय. गाडी बंद पडलीय म्हणून थांबलोय आपण." हरी म्हणाला.

राणीच्या चेहऱ्यावरील आनंद पुन्हा लुप्त झालेला पाहून हरी  म्हणाला, " हा पण गाडी दुरूस्त होईपर्यंत आपण या पार्कमध्ये जाऊन येऊ शकतो."

"नाही, नको. मी इथे गार्डनमध्ये फिरायला नाही आलेय." राणी म्हणाली.

हरीने गार्डनबाहेरील स्टॉलवर पाणीपुरीची ऑर्डर दिली आणि तो खुर्चीवर ऐटीत बसला. राणीलाही हातानेच बसायला सांगितले. पण राणी अगदी पाहून न पाहिल्यासारखे करून ती तिथेच उभी राहिली. पाणीपुरीच्या प्लेट पाहून राणीच्या तोंडाला पाणी सुटलं ती स्वतःच्या मनाला प्रश्न विचारत म्हणाली, ' का नसेल गेले मी तो बोलवत होता तरी. आई म्हणतेच खाल्ल्यावरच ताकद येते आणि मगच अभ्यासात लक्ष लागते. जाऊ का मी?' हा विचार करून तिने हरीकडे पाहिले तर चक्क हरी तिच्यासाठी पाणीपुरीची प्लेट हातात घेऊन उभा होता. 

"अगं जास्त विचार नको करू. ये पटकन. नाही आलीस तर मला पाप लागेल म्हणून थांबलोय." हरी हसत म्हणाला.

"काय करेल राणी ?"

पाहूया पुढील भागात क्रमशः

सौ. प्राजक्ता पाटील 

कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा. आणि हो मला फॉलो करायला विसरू नका.

कथा मनापासून वाचणाऱ्या वाचकांचे खूप आभार.

कथा प्रकाशित करण्याचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

# साहित्य चोरी करणे हा गुन्हा आहे.