Login

तिचा संघर्ष भाग-54

Every Woman Wants Love, Respect And Support.

भाग-54



राणीने सर्व मार्कलिस्ट चेक केल्यावर तिच्या लक्षात आले की हरी म्हणजेच हरीश आहे आणि तो डॉक्टर आहे. 'बापरे! एवढा हुशार असूनही गर्व नावाचा शब्दही नाही त्याच्या डिक्शनरीत. खरचं ते म्हणतात ना, दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं. पण तो का आलाय मॅडमकडे ? का बिचाऱ्याला अनाथ असल्यामुळे मॅडमनी मदत केली असेल ? आणि आता मॅडमला गरज असेल म्हणून तो इथेच राहत असेल का ?' राणीच्या मनात विचार चालू होता. 

"बस्स राणी किती विचार करशील ? नोट्स उतरून घे पटापट. उद्या परत करायच्या आहेत ना?" राणी स्वगत पुटपुटली. तितक्यात राणीच्या आजी राणीच्या खोलीत आल्या आणि राणीला म्हणाल्या, "अगं राणी असं एकटीनेच बोलायला काय झालंय?" 

"आजी, अगं मी एकटी कुठं बोलतेय ? माझ्यासोबत ही इतकी सारी पुस्तक आहेत ना, मी त्यांच्यासोबत बोलतेय. आणि तू आज इथे कशी? म्हणजे दररोज तू आणि मॅडम आश्रमात जातात ना ह्या वेळेला म्हणून विचारलं. " राणी म्हणाली.

"अगं व्हय, पण आज मॅडम डॉक्टरकडे गेल्या आहेत. घरीच डॉक्टर असून सुद्धा बाहेर कशाला जायचं? असं मी त्यांना विचारल्यावर मॅडम हसून म्हणाल्या,  तसं नसतं दीपाच्या आई. आपल्या प्रत्येक अवयवाचा स्पेशल डॉक्टर असतो. आणि आज माझे डोळे चेक करण्यासाठी मी डॉक्टरकडे जातेय. मलाही चला म्हणत होत्या, पण तू घरी आहेस म्हणून नको बी म्हणाल्या. लय चांगल्या आहेत बघ मॅडम." राणीला आजी सांगत होती.

"आजी म्हणजे तुला ही माहीत होतं हरी डॉक्टर आहे ते?" राणी म्हणाली.

"अगं मलाच काय घरात कोणालाच नव्हतं माहीत पण आज तो मॅडमना सांगत होता तेंव्हा ऐकलं. पण तुला कसं ठाऊक त्यो डॉक्टर आहे म्हणून. त्यानं सांगितलं ?" आजी म्हणाली.

"नाही गं आजी. स्वतः चा मोठेपणा मिरवणारा नाही अगं हरी. तो खूप चांगला आहे गं. हे बघ, त्याने चुकून गाडीत ठेवलेली ही त्याची डॉक्युमेंट फाईल. मी माझ्या नोट्स सोबत उचलून घेऊन माझ्या खोलीत आले आणि आता पाहते तर काय ! मी ज्या हरीला ड्रायव्हर समजत होते तो चक्क डॉक्टर आहे असे मला समजले. आणि तसही त्याच्या राहणीमानावरून तो मॅडमनी कामासाठी ठेवलेला मुलगा असेल असं नव्हतं वाटत मला." राणी म्हणाली.

"अगं काहीही काय बोलतेस. मुलगा आहे तो मॅडमचा." आजी रागाने म्हणाली.

"काय ! मुलगा." राणी आश्चर्याने म्हणाली.

"हो. मुलगा आहे तो मॅडमचा. ती खूप मोठी गोष्ट आहे सांगेन पुन्हा केव्हातरी. आता तू तुझा अभ्यास कर बघू." आजी म्हणाली.

"आजी तुला खरं सांगू का ? माझ्या मनात काही विचार चालू असेल तर माझं अभ्यासात मनच लागत नाही बघ. आणि आता माझ्या मनात हाच विचार सुरू आहे की, हरी मॅडमचा मुलगा कसा काय आहे? प्लीज सांग ना मला. आज मी त्याचं खूप मन दुखावलं आहे मला माफी मागायची आहे त्याची. त्यासाठीच त्याच्याबद्दल माहिती हवीय." राणी म्हणाली.

आजी म्हणाली,"म्हणजे? काय म्हणालीस तू त्या गुणाच्या पोराला?"

"अगं म्हणजे ? अनाथ म्हणाले मी त्याला. आणि म्हणूनच तो खूप दुखावला गेलाय." राणी उदास होऊन म्हणाली.

"एक लक्षात ठेव राणी, आयुष्यात कितीही मोठी झालीस तरी कोणाचंच मन दुखावलं जाईल असं काही कधीच बोलू नकोस. बघितलंस तुझ्या दीपा मावशीला इतकी हुशार असूनही किती नम्र आहे ती. आणि अगं उगाचच कोणालाही घरी घेऊन येऊन त्यांची काळजी कोण घेतं का? आपल्यातही तसे गुण असावे लागतात. जे दीपा मावशीत होते आणि तेच मॅडमनी हेरले. तू इथं शिक्षण घ्यायला आली आहेस. फक्त अभ्यासावर लक्ष दे." डोळे पुसत राणीच्या आजी बाहेर निघून गेल्या.

त्यांना हरीला राणीने अनाथ म्हटलेले फारच मनाला लागले होते. 

राणीने सर्व विचारांना पूर्णविराम दिला. आणि मनाशीच प्रॉमिस केलं, 'आता यापुढे हरीचच काय कोणाचं मन माझ्यामुळे दुखावलं जाणार नाही.' राणीने नोट्स लिहायला घेतल्या पण मन लागेना आणि नोट्सही भरपूर होत्या. आणल्या होत्या खऱ्या तिने त्या नोट्स पण एका दिवसात पूर्ण होणं तिला अशक्य वाटू लागलं. राणी नोट्स घेऊन आजीजवळ हॉलमध्ये आली आणि चक्क रडू लागली. आजीने राणीला जवळ घेऊन तिची समजूत काढली. 

"राणी मी बोलले म्हणून तू रडत असशील तर मला माफ कर. पण अगं मॅडमचे खूप उपकार आहेत आपल्यावर. आज हरीमुळेच मॅडम त्यांच्या पोटच्या गोळयाचं दुःख थोडाफार का असेना विसरल्या आहेत. आणि त्या लेकरानं मॅडमला आधार दिलाय. मरणाच्या दारातून परत आणलयं आपल्या आईला. अन् त्याला तू अनाथ म्हणतेस ? अनाथ हा शब्द उच्चारणाऱ्याला नसेल वाटत काही, पण नात्यांची ओढ काय असते ? हे ज्याला कोणी नसतं त्यालाच कळते." आजी म्हणाल्या.

राणी म्हणाली, "सॉरी आजी, पण रागवलीस त्यामुळे नाही मला रडू येत."

"मग काय झालंय तुला रडायला ? काही दुखतंय का तुझं? आजी काळजीने म्हणाली.

"नाही गं आजी. हे बघ ह्या एवढ्या नोट्स नाहीत लिहून होणार एक दिवसात. मला वाटलं थोडं असेल लिखाण. पण हे खूप जास्त आहे. आणि इथे जवळपास झेरॉक्स सेन्टर पण नाही ना. आणि उद्या सकाळी सात वाजता लवकर जायचंय मला क्लासला. उद्या एवढ्या लवकर सकाळी दुकानं बंद असतील अगं." राणी हताश होऊन म्हणाली.

"अगं थांब, आबा आलेत का बाहेर ? आले असतील तर मग तू आणि आबा जावा रिक्षात बसून." आजी म्हणाली.

"हो, हे बरोबर आहे. आलेच मी." म्हणून राणी आबांना पाहायला बाहेर गेली. आबा दूध घेऊन आश्रमात चालले होते. "आबा" म्हणून राणीने आवाज दिला. तसे आबा जागच्या जागी थांबले.

"बोल गं पोरी,  काय झालंय?" आबा आपल्या शांत आवाजात म्हणाले.

राणीने आपले काय काम आहे हे सांगितल्यावर आबा म्हणाले, "तू तुझं आवर. मी आलोच, लगेच निघू आपण."

राणीने बॅगेत नोट्स भरल्या आणि आवरून ती आबांची वाट पाहत दारात उभी होती. तितक्यात मॅडम आणि हरीची गाडी दारात आली. मॅडम खाली उतरल्या आणि राणीला घाबरून म्हणाल्या, "काय झालंय राणी तुला ? कुठे चाललीस?"

"काही झालं नाही मॅडम." म्हणत राणीने बाहेर जाण्याचे कारण सांगितले. 

"अगं मग हरी सोबत जा." हे वाक्य मॅडमच्या तोंडातून बाहेर पडते न पडते तोच राणीने बसण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला. 

पण यावेळी हरी मॅडमना म्हणाला, "आई, मी एकटा जाऊ शकतो. झेरॉक्स तर आणायच्या आहेत ना?"

"अरे हो, राणी अगं तू फक्त सांग जाईल तो एकटा." मॅडम म्हणाल्या.

"बरं." म्हणून राणीने नाराज होऊन गाडीचा दरवाजा बंद केला.

हरीने नोट्स घेण्यासाठी हात पुढे केला. राणीने हरीला नोट्स दिल्या. नोट्स घेऊन हरी गाडीत बसला. आणि निघून गेला. राणी मॅडमसोबत आत गेली. 

"राणी तू जेवण करून घे. आम्ही हरी आला की जेवू. उशीरा जेवण झालं की, झोप येते अभ्यास करताना." मॅडम म्हणाल्या.

राणीने ताट वाढून घेतलं आणि जेवण करून खोलीत जाऊन वाचत बसली. 

हरी नोट्स घेऊन आला. मॅडमनी हरीला "नोट्स हॉलमध्येच ठेव. उद्या राणी लवकर जाणार आहे क्लासला." म्हणून सांगितले.

"लवकर किती वाजता?" हरी म्हणाला.

"सात वाजता जायचयं म्हणली. दुपारी काय तर कार्यक्रम आहे वाटतं." राणीच्या आजी म्हणाल्या.

"तुला आराम करायचा असेल तर तू कर. उद्या परत तुलाही कॉलेजमध्ये दिवसभर लेक्चर्स असतील. सकाळी आबा सोडतील राणीला रिक्षास्टॅन्डपर्यंत. लवकरात लवकर जुनी गाडीही दुरूस्त करून घेऊया म्हणजे दररोज ड्रायव्हर सोडेल राणीला. " मॅडम म्हणाल्या.

"हो." म्हणून हरीने मान हलवली. 

बोलत-बोलत मॅडम आणि आजीनी डायनिंग टेबलवर जेवणासाठी ताटं तयार केली. छान गप्पा मारत सर्वांची जेवणं आटोपली. आणि सर्वजण आपापल्या खोलीत झोपायला गेले. 

हरी जाईल का राणीला सोडायला ?


पाहूया पुढील भागात क्रमशः

सौ. प्राजक्ता पाटील 

कथा आवडल्यास लाईक करा,कमेंट करा आणि नावासकट शेअर करा.

कथा मनापासून वाचणाऱ्या वाचक वर्गाचे मनापासून आभार. 

कथा प्रकाशित करण्याचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

# साहित्यचोरी हा गुन्हा आहे.





🎭 Series Post

View all