भाग- 57
"पण दीपा मॅडम, तुम्ही तर सत्काराचा कार्यक्रम आज आहे असं म्हणाला होतात ना." हरीश म्हणाला.
"हो अरे, घाईत मी तुला परवा म्हणण्याऐवजी उद्याच म्हणाले. सॉरी, पण कार्यक्रम उद्या आहे." दीपा म्हणाली.
"मग परवा माझं कॉलेज असल्यामुळे मला नाही थांबता येणार. उद्याचा कार्यक्रम झाला की मी निघेन." हरीश म्हणाला.
"हो अगं दीपा, आता नकोच जाऊया कुठे. राणीची एक्झाम झाली की, लांब कुठेतरी फिरायला जाऊ." मॅडम म्हणाल्या.
"हो दीपा मलाही तुझा सत्कार झाला की, लगेच निघावं लागेल." आक्का म्हणाली.
शार्दुल मात्र हिरमुसला. मॅडमनी त्याला छान समजून सांगितल्यावर "बरं मॅडम आजी, पण माझ्यासोबत आजचा दिवस रोहनदादाने क्रिकेट खेळायला पाहिजे." अशी शार्दुलने अट घातली.
रोहनलाही क्रिकेटमध्ये विशेष रस होता. त्यामुळे त्यानेही शार्दुलची ही अट मान्य केली.
सर्वांचे जेवण झाल्यावर सर्वजण दारासमोरील बागेत येऊन बसले होते. संतोषने हरीशला आणि आबांना दुकानात नेले होते. शार्दुल आणि रोहनची क्रिकेट मॅच चांगलीच रंगली होती. राणीला मात्र जरा बोर होत होते म्हणून तिने मोबाईल हातात घेतला. आणि ती सर्वांपासून दूर जाऊन बसली. तिने मोबाईल काढताच तिला हरीशचा स्टेटस दिसला. तो पाहून तिला खूप राग आला. कालच्या कार्यक्रमातील विद्यार्थिनीसोबतचे फोटो हरीशने स्टेटसला ठेवले होते.
इकडे मॅडमनी दीपाला, "एक विचारू का?" म्हणून विचारले.
"मॅडम, तुम्ही अशी परमिशन घेतलेली मला बिलकुल आवडत नाही. विचारा ना मॅडम प्लीज. आई आहात तुम्ही माझ्या." दीपा म्हणाली.
"म्हणजे बघ ना, मला माहितीय मी जरा स्वार्थीच होतेय. पण नाती गमावल्यावर, माणसाला आहे ती नाती दूर जाऊ नये हीच इच्छा असते." मॅडमचे डोळे अश्रूंनी डबडबले होते.
दीपा मॅडमच्याजवळ खुर्ची घेऊन गेली. मॅडमचे हात हातात घेत म्हणाली, "माझं काही चुकलं का मॅडम ? कोण दूर गेलं तुमच्यापासून? काय झालेय प्लीज सांगाल का मला?" दीपा भावनिक होऊन म्हणाली.
"तसं नाही गं दीपा. या जगात तू आणि हरीशशिवाय जवळचं असं मला कोणीच नाही. तुम्ही दोघं माझ्यापासून कधीच दूर होऊ नये म्हणून मला असं वाटतं की हरीश आणि राणीचं लग्न करून द्यावं. आणि लग्न झालं म्हणून काही मी तिच्या शिक्षणात खंड पडून देणार नाही. आहे ना तुझा माझ्यावर विश्वास आणि अगं दोघांच्याही डोळ्यात एकमेकांबद्दलच प्रेम दिसतेय मला." मॅडम म्हणाल्या.
'मॅडम, मला हे जे काही तुम्ही बोलताय त्यात काहीच चुकीचं नाही वाटत, पण कसं सांगू मी तुम्हाला ? राणीचं एका मुलावर प्रेम होतं आणि ती घर सोडून निघून गेली होती.' दीपा मनात विचार करत होती.
"कसला विचार करतेय दीपा ? काय कमी आहे का हरीशमध्ये? अगं मी जन्म दिला नसला तरी, माझा मुलगा असण्याची सर्व कर्तव्य त्याने पार पाडली. एक माणूस म्हणून असलेली माणुसकी त्याच्याकडे ओतप्रोत भरलेली आहे आणि अगं शिकलेला नसता तर नसता मागितला मी राणीचा हात त्याच्यासाठी. पण तो ही अगदी राणीच्या योग्यतेचा आहे. शेवटी तुम्ही सगळेजण मिळून काय तो निर्णय घ्या." म्हणून मॅडम भरल्या डोळ्यांनी आत गेल्या.
छोट्या शार्दुलला, 'मॅडम आजी, डोळे पुसत का आत गेली? हा मनात प्रश्न पडला.' आणि हातातली बॅट खाली टाकून शार्दुल मॅडम आजीच्या मागे धावत गेला.
"दीपा, तू का गप्प बसली गं ? व्हय म्हणायचं होतंस की. उगाच मॅडमच मन दुखावलं बघ तू." असं म्हणून दीपाची आईही आत गेली.
दीपाला आक्का म्हणाली," दीपा, तू का काही बोलली नाहीस हे आलं माझ्या लक्षात. राणीबद्दल मॅडमना कसं सांगावं असंच वाटलं ना तुला?"
"हो गं आक्का, राणीच्या भूतकाळाबद्दल काही न सांगताच लग्नाला होकार देणं मला नाही योग्य वाटत. आणि हरीशलाही हे सर्व जाणून घ्यायचा पूर्ण अधिकार आहेच ना की राणीच्या भूतकाळात काय घडलंय ते. त्याला किंवा मॅडमना अस अंधारात ठेवणं मला नाही योग्य वाटत." दीपा नाराज होऊन म्हणाली.
"पण दीपा, तुझ्यासाठी मॅडमनी खूप केलंय. अगं, तेव्हा तू गप्प का बसलीस ? यामध्ये हरीश योग्य नाही किंवा मॅडम चुकीचं बोलत होत्या हा अर्थ नसून राणीचा भूतकाळ जबाबदार आहे. हे तुला मॅडमना खरं सांगावच लागेल. म्हणजे मॅडम ना खरं काय ते कळेल आणि त्यांची नाराजी दूर होईल बघ." आक्का आपल्या बहिणीला आधार देत म्हणाली.
"आक्का, तू खरंच खूप चांगली आहेस. मोठी बहीण आईचे दुसरे रूप असते असं म्हणतात ते अगदी खरंय." दीपाने आक्काला मिठी मारली.
"ऊठ दीपा, जा आणि मॅडमना खरं काय ते कारण सांग." आक्का म्हणाली.
"हो." म्हणून दीपा आत गेली.
सगळेच असे का उठून गेले? हे विचारण्यासाठी राणी आपल्या आईजवळ येऊन बसली.
राणीची आई राणीला म्हणाली, " राणी, तुला त्या मयुरेशचा फोन वगैरे येतो का गं आता ? नाही म्हणजे मी आपलं सहजच विचारतेय." आई म्हणाली.
"नाव सुद्धा काढू नकोस आई त्याचं. त्याच्यामुळे माझ्या आई-वडिलांना मी खूप दुखावलं. पण त्याने मात्र मला एकटं पाडलं. त्यादिवशी दीपा मावशी आली नसती तर मला त्या लोकांनी खूप सुनावलं असतं. सुनेचा दर्जा तर मिळालाच नसता बघ मला तिथे. पण ते म्हणतात ना, "जे होतं ते चांगल्यासाठीच होतं." अगं, ह्या चांगल्या लोकांचा सहवास मला मिळणार होता म्हणूनच तशी विपरीत बुद्धी सुचली असेल. नाहीतर आपल्या गावाजवळ तालुका असताना एवढ्या लांब आले असते का मी?" राणी म्हणाली.
'खरंच आज माझी राणी लाखात एक गोष्ट बोलली. राणीला आता चांगलं-वाईट कळायला लागलंय.' राणीची आई मनात विचार करत होती.
"राणी, आईआबा तर तुझे आजी-आजोबा आहेत. पण मॅडम आणि डॉ. कसे आहेत गं?" आक्का हळूच लेकीच्या मनाचा ठाव घेत होती.
"अगं आई, मॅडम म्हणजे तर माणसाच्या रूपात देवांनं अवतार घ्यावा आणि सगळ्यांच्या भल्यासाठी प्रयत्न करावा अशाच आहेत बघ. आणि डॉ. हरीशचं विचारशील तर, माझ्या आयुष्यात बाबानंतर मला भेटलेला पुरूष जो सगळ्यात जास्त काळजी घेणारा कोण असेल? तो हरीश आहे असं मला वाटतं. मी इथे आल्यापासून सतत मला खुश ठेवण्यासाठी तो किती प्रयत्न करतोय ? याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. डॉक्टर असूनही गर्व नाही गं त्याला. तो कोणालाच तुच्छ नाही समजत. म्हणजे बघ ना, काल मी सहज त्याला मला तुझ्या हातची ठेचा आणि भाकरी खावीशी वाटते असं सांगितलं आणि माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी चक्क तो तुला घ्यायला गावी आला. आणि मला पूर्ण खात्री आहे की, त्याने ती ठेचा आणि भाकरी फक्त मला वाईट वाटू नये म्हणूनच खाल्ली." राणी अगदी मनमोकळेपणाने बोलत होती. राणीच्या आईला आता मॅडम जे बोलल्या ते अगदी खरं होतं. याची पूर्ण खात्री झाली. राणीलाही हरीश आवडतोय हे राणीच्या डोळ्यात आईला स्पष्ट दिसलं.
"राणी तुला एक विचारू का ?" राणीची आई म्हणाली.
"हं. विचार आई, तुला काय विचारायचे ते." राणी म्हणाली.
"म्हणजे तुला लग्नासाठी कसे वाटतात डॉ.हरीश ?" आईच्या या प्रश्नावर मात्र राणी आश्चर्याने म्हणाली,"काय!" "हो मॅडम विचारत होत्या. त्यांना तू सून म्हणून हरीशची बायको म्हणून खूप आवडलीस." राणीची आई पुढे म्हणाली.
"पण आई ,मॅडमला माझं चुकीचं पडलेलं पाऊल कुठे माहीत आहे? ते जेव्हा त्यांना कळेल, तेव्हा त्या मला सून म्हणून स्वीकारतील का ? मला नाही वाटत, हरीश डॉक्टर असूनही माझ्याशी लग्न करेल. " राणी स्पष्टपणे म्हणाली.
"अगं राणी, लग्नगाठी स्वर्गात बनतात. त्यामुळे तू टेन्शन नको घेऊ. मला फक्त एवढंच सांग, तुला डॉक्टर हरीश आवडतात का ?" राणीची आई म्हणाली.
"हो आई, मला हरीश खूप आवडायला लागलाय. पण मग लग्न झाल्यावर, माझ्या डॉक्टर व्हायच्या स्वप्नाचं काय?" राणी म्हणाली.
"अगं राणी, मॅडम पुढे शिकवते म्हणाल्या म्हणूनच मलाही आनंद वाटला आणि तुझं लग्न झाल्यावर आमचा जीव भांड्यात पडेल गं. कारण गावात तुझ्याबद्दलच्या चर्चांना आलेलं उधाण कायमचं बंद होईल." आई बोललेली राणीला मनापासून पटलं होतं.
दीपा मॅडमच्या खोलीत गेली. दीपाची आई, मॅडम आणि शार्दुल छान गप्पा मारत बसले होते. दीपा गेल्यावर सगळेजण शांत बसले.
दीपा शार्दुलला म्हणाली, शार्दुल बाहेर जातोस का खेळायला ? मला मॅडम आजीशी जरा महत्वाचं बोलायचंय."
"काय गं आई, मघाशी मॅडम आजी बाहेर होती, तेव्हा ती रडत घरात आली. आता घरातून रडत बाहेर जाईल, असं काही ऐकवू नकोस तिला प्लीज. " शार्दुल म्हणाला.
तेवढ्यात मॅडम म्हणाल्या, "शार्दुल, सांगितलं ना मी तुला. माझ्या डोळ्यात कचरा गेला होता. कोणी नव्हतं रडवलं अरे मला. आणि मोठ्या माणसांना असं बोलतात का? नाही ना. सॉरी म्हण बघू आईला. " मॅडम म्हणाल्या.
"सॉरी आई. मी जातो खेळायला." म्हणून शार्दुल खेळायला निघून गेला.
दीपा सांगू शकेल ना मॅडमना ?
पाहूया पुढील भागात क्रमश:
सौ. प्राजक्ता पाटील.
#साहित्यचोरी करणे हा गुन्हा आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा