Login

तिचा संघर्ष भाग-59

Every Woman Wants Love, Respect And Support.

भाग- 59



"दीपा मावशी, तू नसतीस तर माझ्या आयुष्याला काहीच अर्थ उरला नसता गं ! किती केलसं तू माझ्यासाठी. " राणी दीपाला म्हणाली.


"अगं राणी माणूस केवळ निमित्त मात्र असतो. त्या विधात्याने सर्वांच्या भविष्याचा प्लॅन आधीच तयार केलेला असतो. फक्त परिस्थितीतून मार्ग काढता यायला हवा. हताश होऊन चुकीचा मार्ग न अवलंबता योग्य मार्गावर राहून थोडी वाट पाहिली की यश हमखास मिळते." दीपा म्हणाली.


उद्या श्री.व सौ. डॉ. हरीश आणि राणी यांच्या भव्यदिव्य हॉस्पिटलचे उद्घाटन होणार होते. त्यासाठी सर्व पाहुणेमंडळी जमली होती. हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी प्रतिष्ठित मंडळी बोलवण्यात आली होती. राणीच्या माहेरची मंडळीही येणार होती. गावातील सरपंच, स्वातंत्र्यसैनिक तसेच निवृत्त शिक्षक यांनाही निमंत्रण पत्रिका पोहचल्या होत्या. आज खरंच भाग्याचा दिवस होता. कारण राणीच्या आई नेहमी म्हणत होत्या की, "राणी, कोणत्या घरात जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नसलं तरी आपल्या कर्तृत्ववाने कोणतं स्थान मिळवायचं हे आपल्या नक्कीच हातात असतं." आणि अगदी सामान्य कुटुंबात जन्मलेली राणी  स्वकर्तृत्वाने चार वर्षाच्या अथक परिश्रमानंतर एमबीबीएस पास झाली होती आणि म्हणूनच या दोघांच्या हातून रुग्णांची सेवा घडावी म्हणून मॅडमनी हरीश आणि राणीसाठी स्वतःचा मल्टी स्पेशालिस्ट, सर्व सुविधांनी युक्त असा सुंदर दवाखाना उभारला होता. विशेष म्हणजे  दवाखान्याचे नाव काय होते माहितीय ? "शार्दुल हॉस्पिटल" दीपा आणि मॅडम दोघींसाठी या नावाची व्यक्ती "जीव की प्राण " होती. दीपाच्या ननंद तसेच सासूबाईही आल्या होत्या. 


रात्र झाली होती. सगळेजण उद्याच्या मंगल दिवसाची वाट पाहत झोपी गेले. राणी आणि हरीश आपल्या खोलीत गेले. मागच्या पाच वर्षापूर्वीचा भूतकाळ झरझर करत दोघांच्या डोळ्यासमोरून सरकत गेला. 


राणीच्या मांडीवर डोके ठेवून हरीश म्हणाला, "मी किती लकी आहे ना! मला तुझ्यासारखी पत्नी मिळाली. नाहीतर त्या प्रकारणानंतर माझा चांगुलपणावरचा विश्वास उडाला होता. माझी काहीच चूक नसताना झालेले ते बिनबुडाचे आरोप. मलाही आणि घरच्या सर्वांनाही झालेला मानसिक त्रास मी कधीच विसरू शकत नाही." 


"हरीश, जे झालं ते बदलता येत नसलं तरी यापुढे जे होईल ते नक्कीच चांगले असेल हा सकारात्मक विचार करून आपण समाधानी आयुष्य जगू शकतो त्यामुळे परत हा विषय नको." राणी म्हणाली.


पण राणीला अजूनही तो प्रसंग आठवला की, अंगावर काटा उभा राहायचा. एकतर्फी प्रेमात असंही घडतं हे राणीने प्रत्यक्ष पाहिलं होतं. हरीश ज्या मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरर होता, तिथेच प्रणिती नावाची अत्यंत देखणी मुलगी जी अभ्यासातही स्मार्ट होती. पण कशी काय माहित? ती हरीशवर एकतर्फी प्रेम करू लागली होती. हरीशने तिला तो राणीवर प्रेम करतो हे अगदी स्पष्टपणे सांगितले होते पण तिला ते मान्यच नव्हते. म्हणूनच हरीशने प्रणितीच्या आई-वडिलांची प्रत्यक्ष भेट घेऊन, "त्यांनी प्रणितीला समजवावे" अशी हात जोडून विनंती केली होती. त्यांनीही प्रणितीला समजून सांगण्यासाठी खूप प्रयत्न केले पण प्रणितीने सतत फोनकॉल करून हरीशला वैतागून सोडले होते. मग हरीशने कठोर मनाने लेक्चररचा जॉब सोडण्याचा निर्णय घेतला. हे प्रणितीला सहन झाले नाही म्हणून ती चक्क हरीशला भेटायला घरी आली. मॅडम आणि घरच्या सगळ्यांनीच तिला खूप समजावलं पण हट्टाला पेटलेल्या प्रणितीने अखेर आत्महत्या केली आणि आपल्या आत्महत्येस सर्वस्वी हरीश जबाबदार आहे असं चिठ्ठीत नमूद केलं.


पुराव्यावर विश्वास ठेवून पोलीस हरीशला पकडून घेऊन गेले. याकाळात घरातील सगळ्यांना सांभाळत राणीने हरीश आणि प्रणितीच्या कॉलरेकॉर्ड ऑडिओ क्लिप गोळा केल्या. ज्यात हरीश कितीतरी वेळा प्रणितीला समजावत होता की, त्याचं प्रणितीवर प्रेम नाही आणि तो तिचा कधीच होऊ शकत नाही. याकाळात राणीला समजले की, एकुलती एक लाडाची लेक आपल्याला सोडून गेली हा धक्का प्रणितीच्या आईबाबांना सहन झाला नाही. आणि त्यांनी अंथरुण धरले आहे. राणी त्यांना जाऊन भेटली. "पण जगासमोर येण्याची आपली हिंमत नाही" हे प्रणितीच्या बाबांनी स्पष्ट सांगितल्यावर राणीने त्यांना फोर्स केला नाही. उलट ओळखीतल्या डॉक्टरांना फोन करून दोघांनाही ट्रिटमेंट दिली. प्रणितीच्या आईबाबांना रोज डबा घेऊन जाऊन, त्यांना स्वतःच्या हाताने औषध आणि गोळया ती द्यायची. थोड्याच दिवसात दोघांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसू लागली होती. आणि आता राणी कोर्टातून हरीशला न्याय मिळावा म्हणून धडपडत होती. अर्थातच या सगळ्या प्रकरणात राणीला दीपाचे मोलाचे सहकार्य लाभले होते.


आणि आज सर्व पुराव्यानिशी राणी कोर्टात हजर होती. ती हरीशची सावली बनून त्याची साथ देत होती. हरीशलाही राणीच्या आपल्यावरील प्रेमाची जाणीव झाली होती. कोर्ट सुरू होण्याआधी अर्धा तास प्रणितीचे आईबाबा कोर्टात हरीशच्या बाजूने साक्ष द्यायला तयार झाले. प्रणितीच्या आईबाबांना पाहून राणी,मॅडम आणि उपस्थितांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता. 


"काका-काकू तुम्ही इथे?" राणीने आश्चर्याने विचारले.


"हो बाळा, आम्हीच. हिंम्मत बांधून डॉ. हरीश निर्दोष आहेत हेच सांगायला इथे आलोय." काका डोळे पुसत म्हणाले.


"एक मुलगी गमावल्यावर आता दुसरी मुलगी आम्हांला गमावायची नाहीये." हुंदका देत प्रणितीची आई राणीला म्हणाली.


राणीने काकूंना मिठी मारली. आणि राणी म्हणाली," काका-काकू आज तुम्ही इथे आलात, ही फक्त थॅंक्स म्हणण्याइतकी छोटी मदत नाही. मी आयुष्यभर तुमच्या ऋणात राहीन." 


"चल आम्हाला आत घेऊन निष्पाप असलेल्या डॉ. हरीशला आम्हांला न्याय मिळवून द्यायचा आहे." काका राणीला म्हणाले.


"चला ना या काका-काकू." म्हणून राणीने काकूंचा हात पकडला.


सर्वजण कोर्टात पोहोचले. थोड्याच वेळात कोर्ट सुरू झाले. आरोपीच्या पिंजर्‍यात डॉ. हरीश केविलवाणा चेहरा करून उभे होते. त्यांचे लक्ष प्रणितीच्या आईबाबांकडे गेल्यावर मात्र त्यांना आशेचा किरण दिसला आणि मनापासून त्यांनी देवाचे आभार मानले. राणीने डोळ्यांनी हरीशला धीर दिला. न्यायाधीश असलेल्या दीपा मॅडम खटला कौटुंबिक असूनदेखील न्यायदानाच्या तराजूत तोलून जे पारडे जड असेल, न्याय त्याच्याच बाजूने देणार होत्या. राणीने भरपूर पुरावेही गोळा केले होते. तरीही वकील काहीही चुका दाखवून देत होते. तितक्यात स्वतः प्रणितीच्या आईबाबांनी डॉ. हरीश निर्दोष आहेत आणि माझी मुलगीच अति लाडाने जरा जास्तच बिघडली होती. एखाद्या गोष्टीचा नकार ऐकण्याची तिला लहानपणापासून सवय नसल्यानेच ती डॉ. हरीश यांचा नकार पचवू शकली नाही म्हणूनच तिने स्वतःहून हे पाऊल उचलले. हे सांगून आई-बाबा धायमोकलून रडू लागले.


आईनेही प्रणितीची रोजनिशी लिहीलेली डायरी सोबत आणली होती. ती पुरावा म्हणून सादर केली. आणि त्यात प्रणितीने ती पुढे काय करणार आहे? हे लिहीले होते. त्यामुळे सर्व पुरावे हरीशला निर्दोष सिद्ध करत होते, म्हणूनच अंतिम निर्णय दीपाने, सन्मानपूर्वक डॉ. हरीश निर्दोष आहेत हे सांगितल्यावर कोर्टाचे काम तिथेच थांबले.


निर्णय ऐकल्यानंतर हरीशने राणीला कोणताच विचार न करता प्रेमाने मिठी मारली. दोघेही एकमेकांसाठीच बनले आहेत असे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला वाटत होते. थोड्या वेळाने दीपाने हळूच खोकल्याचा आवाज काढून,  दोघांना जगाचे भान करून दिले. लाजतच दोघे दूर झाले. हरीशने मॅडम आणि उपस्थित घरातील सगळ्यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला. मॅडमनी आपल्या लेकाला प्रेमाने जवळ घेतले. भरभरून आशीर्वाद दिले. सर्वजण घरी परतले. पण राणी मात्र आपल्याला का टाळतेय ? हे हरीशच्या लक्षात येत नव्हते. 


हिंम्मतीने हरीश राणीला म्हणाला, "माझी नोकरी गेलीय मग मी कसा जगेल ?आणि तुझ्याशी लग्न झाल्यावर तुला कसा सांभाळेन ? असा तुझा गैरसमज झाला असेल तर तो आत्ताच दूर कर. कारण मी आता तुझ्याशिवाय राहूच शकत नाही." 


"नाही हरीश, तुझी नोकरी गेलीय म्हणून नव्हे तर मी तुझ्याशी लग्न करण्यास योग्य नाही म्हणून मी तुला टाळतेय." राणी डोळे पुसत म्हणाली.


"काय झालंय राणी? आधीच किती टेन्शनमधून गेलोय मी माहिती आहे ना तुला? मग असं कोड्यात बोलून मला टेन्शन देऊ नकोस." हरीश म्हणाला.


"हरीश प्रेम आंधळ असतं, हे तुला माहित असेल.असंच एका गावातल्या मुलावर मी आंधळ प्रेम केलं. मी गावातून बारावीत पहिला क्रमांक पटकावला होता. तसाच पाच वर्षांपूर्वी मुलांमधून त्याने गावातून पहिला क्रमांक पटकावला होता.  त्याला मेडिकल न करता इंजिनियरिंग करायचं होतं पण घरातल्यांच्या आग्रहाखातर तो मेडिकलच्या सीईटी तयारी करत होता. पुढे आमची मैत्री जुळली. बारावीत जनरल विषय असल्यामुळे त्याला इंजिनिअरिंग तसेच मेडिकल दोन्ही क्षेत्रात पदार्पण करता येत होतं. म्हणूनच मी त्याला इंजीनियरींगची सीईटी दे असा सल्ला दिला आणि पहिल्याच वर्षी पहिल्याच प्रयत्नात त्याचा इंजीनियरिंगला नंबर लागला. पण घरच्यांनी मात्र आम्हाला न सांगता निर्णय घेतला म्हणून नात्यातला मुलीशी त्याचा विवाह जुळवला. तेव्हा त्याने माझी मदत मागितली, तो मला माझ्याशी लग्न कर म्हणाला.मी ही तयार झाले. लग्न तर सोड पण जेव्हा मी त्याच्या घरी गेले तेव्हा घरच्यांच्या दबावामुळे तो एकही गोष्ट माझ्या बाजूने बोलला नाही. वाटलं होतं एवढा हुशार आहे तर जीवनातील निर्णयही ठामपणे घेत असेल पण त्याने माझ्या आईबाबांचीही कमी किंमत केली. आणि मी माझा मार्ग बदलला. मग तूच सांग,असली मुलगी आवडेल का कोणाला तरी आपली पत्नी म्हणून?" राणी रडत रडत म्हणाली.


हरीश तिथून निघून गेला. 


राणीला वाटले खरं काय ते कळल्यामुळेच हरीश तिच्या आयुष्यातून कायमचा निघून गेलाय. पण थोड्यावेळात हरीश मॅडमना घेऊन राणीजवळ आला होता. मॅडमच्या हातात बांगड्या होत्या. त्या हरीशच्या आईच्या बांगड्या होत्या.  ज्या आजीने हरीशजवळ दिल्या होत्या. आपल्या नातसुनेला हा आमचा आशिर्वाद म्हणून दे. असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणूनच हरीशने त्या बांगड्या आपल्या मॅडम आईच्या हातात दिल्या. राणीला हे कळल्यावर तिला आकाश ठेंगणे झाले होते. तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. घरातील सगळेचजण खूप खुश होते.


लग्न तर ठरलं पण एमबीबीएस पूर्ण करून राणी डॉक्टर कशी झाली? पाहूया पुढील भागात क्रमशः


सौ. प्राजक्ता पाटील 





🎭 Series Post

View all