भाग-60
अंतिम भाग
हरीशच्या डोक्यावरून हात फिरवत राणी विचार करत होती. \" हरीश, माझ्या आयुष्यातील तुझं स्थान लोखमोलाचं आहे. मी नुसती वात होते. पण दीवा बनून तू मला आधार दिलाय. माझ्या अस्तित्वाला नवा अर्थ तुझ्यामुळेच आलाय. सगळ्यांनी मला डॉक्टर होण्यासाठी प्रोत्साहन दिले पण तू तर लग्नानंतर डोळ्यात तेल घालून माझ्यासोबत जागरण केलेस. इतकेच काय मी डॉक्टर झाल्याशिवाय तू मला स्पर्शही केला नाहीस. तुझ्या संयमाची आणि माझ्यावरच्या विश्वासाची शिदोरी माझ्या सोबत होती म्हणून मला यश मिळाले. तुझी साथ कायम अशीच सोबत राहणार असेल तर मोठमोठ्या संकटानाही सामोरे जाताना भिती वाटत नाही. माझा गुरू, मित्र आणि सातजन्माचा सोबतीही तूच आहेस. मला आजही आठवतो तो प्रसंग- मी परीक्षा हॉलमध्ये पोहोचले. तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, मी हॉलतिकीट घरीच विसरले आणि म्हणून मी किती बेचैन झाले होते. पण तू हसत-हसत तुझ्या खिशातलं हॉलतिकीट काढून दिलेस. आणि क्षणात माझ्या चेहऱ्यावरचं टेन्शन घालवलास. आपण दोघेही खरंच नशीबवान आहोत, कारण सोन्यासारखी माणसे आपल्या आयुष्यात आहेत. त्यांच प्रेम आणि आशिर्वाद अशक्य गोष्टीही शक्य करते.\" राणीचे विचारचक्र थांबले होते तिचे लक्ष हरीशच्या तेजस्वी चेहऱ्याकडे गेले.
\"सर्वच बाबतीत इतका तेजस्वी तू कसा असू शकतोस ? असा राणीने मोठ्याने प्रश्न विचारला.पण गाढ झोपेत असलेला हरीश काहीच बोलला नाही म्हणून त्याच्याच भाषेत राणीने उत्तर दिले. राणी म्हणाली," नावच हरी आहे म्हटल्यावर काहीच अशक्य नाही." असं म्हणून तिने हरीशचे डोके हळूच उशीवर ठेवले आणि गोड हसून राणी झोपी गेली.
सकाळ झाली. सगळ्यांची धावपळ सुरू झाली. प्रत्येकालाच आज आकाशाला गवसणी घातल्याचा आनंद होत होता. कारण हरीश आणि राणी समाजसेवेचा मॅडमचा वारसा पुढे चालणार होते म्हणून मॅडम खुश होत्या. राणीच्या चुकीची चर्चा गावभर रंगली होती. आणि आज त्या निष्फळ चर्चांचे उधाण पूर्णपणे थांबणार होते. गावातील लोकांच्या साक्षीने आपली लेक डॉक्टर बनून लोकांची सेवा करणार आहे म्हणून राणीच्या आईबाबांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. दीपाच्या हाताला यश आलं म्हणून आईबाबाही खूश होते. सगळ्यांच्या आनंदात आनंद मानणारी दीपाही आज खूप खुश होती. छोटा शार्दुलही हॉस्पीटलला माझेच नाव दिले आहे म्हणून दिमाखात मिरवत होता. हळूहळू पाहूणे मंडळी तसेच मान्यवर जमत होते. हॉस्पीटल अत्यंत प्रशस्त होते. तालुक्यातील एकमेव असं शार्दुल हॉस्पीटल पाहण्यासाठी लोक जमले होते. मॅडमच्या, हरीशच्या आईबाबांच्या इतकच काय प्रणितीच्या आईबाबांच्या मदतीमुळेच हे भव्यदिव्य हॉस्पीटल उभे राहिले होते. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांच्या जेवणाची सोय हॉस्पीटलच्या शेजारीच असलेल्या एका फंक्शन हॉलमध्ये केली होती.
दीपा, राणी आणि जोशना नुकत्याच पार्लरमधे जाऊन आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी केलेला मेकअप आणि हेअरस्टाइल पाहून स्वर्गातील अप्सरा जणू पृथ्वीवर अवतरल्या की काय ! असेच वाटत होते. दीपाने आणि संतोषने मॅचिंग मॅचिंग केले होते. दीपाने काळ्या रंगाचे काठ असलेली, लाल रंगाची साडी घातली होती. तर संतोष लाल रंगाचा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातली होती. दोघांचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा दिसत होता. प्रत्येकालाच दीपाचा हेवा वाटत होता. स्वतः संघर्षाच्या अंगारातून तावून सुलाखून निघून सुद्धा दीपाने शक्य तितक्या लोकांच्या जीवनातील संघर्ष दूर केला होता. खरंच "शिकलेली आई घराला पुढे नेई." ही उक्ती दीपाने खरी करून दाखवली होती. आता दीपाचा संघर्ष थोडासा कमी झाला होता. पण पुन्हा नवा संघर्ष म्हणजे एक नवीन आव्हान समजून दीपा पुढेच पाऊल टाकत होती. कारण तिच्या संघर्षात तिचा जोडीदार संतोष प्रत्येक गोष्टीत पाठीशी उभा नसून सोबत उभा होता. आज कधी नव्हे ते दीपाच्या सासूबाई पुढे झाल्या आणि त्यांनी आपल्या सुनेची आणि लेकाची दृष्ट काढली.
"काळी बांगडी, काळा पदर लेवून उभी मी दारी
जा गं दृष्ट परत आपल्या घरी." दीपाला आज खरंच खूप छान वाटत होतं. सासू-सून ही दरी मी माझ्या चांगुलपणावर मिटवू शकले. सासरी सून म्हणून मान मिळवू शकले याचा दीपाला जास्त आनंद वाटत होता. जोशनाची प्रकृती आता एकदम छान झाली होती. ती तिच्या रिंकीची काळजी घेत होती. हे पाहून दीपा म्हणाली, "किती काळजी करताय जोशना ताई ? खेळू द्या रिंकीला मोकळेपणाने. आणि आहे ना शार्दुल सोबत, मग कसली काळजी ?"
"तुम्ही किती चांगल्या आहात (थोडा पॉज घेऊन) मामी!" ती निरागस रिंकी पुन्हा एकदा दीपाकडे पाहून म्हणाली. आणि लगेचच शार्दुलसोबत बाजूच्या हॉलमधील गार्डनमध्ये जाऊन खेळू लागली.
"खूप गोड आहे हो रिंकी !" मॅडम म्हणाल्या.
"आणि जोशना, ती तुझी लाडाची लेक असली तरी थोडेच दिवस तुझ्याजवळ असणार आहे हे लक्षात ठेव." या संतोषच्या वाक्यामुळे सगळेजण आश्चर्याने संतोषकडे पाहू लागले.
पुढे संतोष म्हणाला, "म्हणजे रिंकी सून बणून आमच्या घरी येईल ना परत, असं म्हणतोय मी."
या संतोषच्या वाक्याने सगळ्यांना खूप भारी वाटले. विशेष म्हणजे राकेशला. \"कारण दीपा आणि संतोषसारखे सासू-सासरे मिळाल्यावर नक्कीच माझी रिंकी सुखात असेल सासरी.\" हा मनात विचार करून राकेशच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
तेवढ्यात हरीश आणि राणी मॅडमजवळ आले. इतका वेळ ते दोघे राणीचे क्लासचे टिचर्स तसेच एमबीबीएसला शिकवणारे प्रोफेसर यांनी वेळात वेळ काढला आणि आले म्हणून त्यांचे आभार मानत होते. मॅडमनीही मग हरीश आणि राणीला काळा तीट लावला आणि त्या म्हणाल्या, "दृष्ट काढण्याच्या बाबतीत मी जरा आडाणी आहे. संतोषच्या आईसारखे मला ते काही म्हणता येत नाही. पण माझे प्रेम आणि आशिर्वाद आयुष्यभर तुमच्या सोबत असतील." सर्वांच्या पाया पडून राणी आणि हरीशने आशिर्वाद घेतला.
आता मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन ज्यांच्या हस्ते होणार होते ते प्रणितीचे आई-बाबा गाडीतून खाली उतरले. धावत जाऊन हरीश आणि राणी त्यांना घेऊन आले. फीत कापण्यासाठी कात्री असलेला ट्रे प्रणितीच्या आई-बाबासमोर धरल्यावर त्यांनी फीत कापली. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. हॉस्पीटलच्या आतमध्ये जाण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता. आणि एकदाचे सर्वजण आत आले. एवढं सर्व सोयींनी सुसज्ज हॉस्पीटल पाहून लोकांनी तोंडात बोट घातलं. आईसीयू सेंटरमध्येही एका वेळेस शंभर पेशंटचे बेड तयार होते. शिवाय ऍडमिट पेशंटनाही स्पेशल रूम, जनरल वॉर्ड उपलब्ध होते. स्पेशल रूमचे चार्जेस अगदी माफक होते. अगदी सर्वांच्या खिशाला परवडणारे असे होते. पण सुविधा मात्र पुष्कळ होत्या. स्पेशल रूममध्ये टी.व्ही बसवण्यात आले होते शिवाय अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय करण्यात आली होती. आणि प्रत्येक अवयव स्पेशालिस्ट डॉक्टर दवाखान्यात होता. हॉस्पीटलमध्ये आठवड्यातून एक व्हिजिट इतर डॉक्टरांची होणार होती. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हॉस्पीटलमध्ये लिफ्टची सोय करण्यात आली होती. खेळती हवा आणि लख्ख प्रकाशाची सोय हे हॉस्पिटलचे प्रमुख वैशिष्ट्य होते. बाहेरही खूप मोठी खुली जागा होती. तिथे सुंदर बाग तसेच लॉन लावले होते. वातावरण खूपच प्रसन्न होते. बागेतच दीपाच्या सांगण्यावरून आई जगदंबेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. सर्वजण जेवण करायला बाजूच्या हॉलकडे गेले. आश्रमातील राणीच्या सर्व मैत्रिणी सर्वांच्या जेवणाची व्यवस्था पाहत होत्या. घरातील मंडळी उशीरा आलेल्या पाहुण्याचं स्वागत करायला हॉस्पीटलजवळच उभी होती. तेवढ्यात कॅमेरामन असलेल्या राकेशला फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. त्याने सर्व जोड्यांना उभे राहायला सांगितले. प्रथम आई आणि आबा उभारले. त्यानंतर संतोषचे आईबाबा. नंतर आक्का आणि दीपाचे भावजी. मॅडम "फोटो नको" म्हणत होत्या तेव्हा हरीश आणि राणीने मॅडमच्या खांद्यावर डोके ठेवत एक छान पोज दिली आणि तो ही फोटो कॅमेर्यात कैद झाला. आता संतोष, दीपा आणि शार्दुलचा फोटो काढणार इतक्यात संतोषने दीपाला "हॅपी होली" म्हणत रंग लावला.
"काय रे संतोष, किती छान मेकअप केला होता मी. रंगामुळे तो दिसणार नाही आणि आपला फोटो आता खराब निघणार." दीपा नाराज होऊन म्हणाली.
"अगं दीपा, रंग हे जीवनात आनंद घेऊन येतात. खूप सुंदर दिसतेय तू रंग लावल्यावर. असेच तुझे जीवन सदैव वेगवेगळ्या रंगांनी बहरत जावो." मॅडम हसून म्हणाल्या.
मग दीपाच्याही चेहऱ्यावर हास्य खुललं. कार्यक्रमाच्या धावपळीत आज रंगपंचमी आहे हे सर्वजण विसरले होते. पण संतोषने सगळ्यांच्या जीवनात रंग भरणाऱ्या आपल्या बायकोच्या आयुष्यात रंग भरण्याचा घेतलेला वसा अखंडपणे चालू ठेवण्याचा चंग बांधला होता.
थोड्यावेळात गाडीत बसून, क्विक वॉशकरून राकेश दीपाचा आणि संतोषचा फोटो दाखवायला घेऊन आला.
"वॉव! किती सुंदर निघालाय ना हा फोटो! आतापर्यंतचे सगळे फोटो एकीकडे आणि हा फोटो एकीकडे. " दीपा आनंदाने म्हणाली.
"मग प्रेमाचा रंग आहे तो. मनात तर उतरणारच." संतोष रोमॅण्टिक मूडमध्ये म्हणाला.
अखेर संतोषने राकेश, जोशना आणि रिंकी यांचा झकास फॅमिली फोटो काढला.
अशाप्रकारे रंगांची उधळण करणाऱ्या होळीच्या सणाने दीपाच्या तसेच राणीच्या आयुष्यातील दुःख, संघर्ष आणि कटू आठवणी नष्ट करून दीपाच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात आनंद, चैतन्य आणि समृद्धी आणली तशीच सर्व लेखक आणि वाचकांच्या आयुष्यात येवो ही ईश्वर चरणी प्रार्थना करते.
सर्वांना होळीच्या शुभेच्छा देऊन आज माझी कथा "तिचा संघर्ष " इथेच संपवते. आणि आपली रजा घेते. लवकरच भेटूया नवीन कथेसह…
सौ. प्राजक्ता पाटील
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा