भाग-34
संतोष सकाळी अंघोळ करायला शेतातून घरी आला होता. पण आईच्या कालच्या वक्तव्याने तो खूपच दुखावला असल्यामुळे आईकडे पूर्णतः दुर्लक्ष करत होता.
हे पाहून आई संतोष ला म्हणाली, "काल जे मी बोलले ते लय चुकीचे बोलले बघ पण आता राग सोड बरं. आरं, दोन- चार दिवसात राकेश च्या घरची माणसं जोशना ला बघायला यायची हायती. तवा मी फोन करून सांगितलंय शालिनीताईनला, स्वयंपाक करू लागायला या म्हणून. अन् तसं बी त्यानला आजीचा पाय मोडल्यावर दवाखान्यात उभाउभी भेटायला आल्यापासून येणंच झालं नव्हतं म्हणून म्हणलं त्या निमित्तानं राहतील त्या बी दोन दिवस अन् सोबत जयाला बी आणा म्हणून सांगितलेय.
"तिला कशाला?" संतोष रागाने म्हणाला.
"आरं जरा जोशना च आवरायचं बघंल ती. अन् जोशनाला बी जरा घाबरल्यावनी व्हायचं नाही म्हणून मनलं." आई म्हणाली. "अशी काय परदेशात चाललीय होय जोशना नांदायला. अन् घाबरण्यासारखी हाय का आता ती ? किती मोठी झालीय! मनानंच नवरा पसंत केलाय म्हणल्यावर लागंल का तिला कुणी सोबत ?" संतोष म्हणाला.
"आता काय तू सारखं तीच बोलणार हायंस का तिला ? हयोक, हयो कागद घे. बाजार आणि माळवं काय काय आणायचं ते जोशनानं लिहलंय तेवढं घेऊन ये बाबा." आई म्हणाली.
संतोषने बाजार ची लिस्ट घेऊन खिशात ठेवली आणि तो अंघोळ आणि न्याहरी करून बाजार भरायला निघून गेला. संतोष बाजार घेऊन आला होता. पाहतो तर काय ! आईने चक्क सगळ्या खोल्या धुऊन काढल्या होत्या. प्रत्येक खोलीचा दरवाजा लोकरीच्या तोरणाने सजवला होता. बेडवर स्वच्छ धुतलेले बेडशीट अंथरले होते. बापरे स्वयंपाक घरातले सर्व डबे तिने पुसून घेतले होते. दारा पुढचे अंगण शेणाने सारवले होते. घराचा कोपरा न कोपरा जणू पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता. संतोष आईला उपहासात्मक म्हणाला, "आई अगं पाहुणे घर बघायला येणार आहेत की जोशना ला. नाही म्हणजे एवढी तयारी पाहुणे बघायला येणार म्हणल्यावर असेल ना, तर लग्नात किती करशील ?"
"मग एकुलती एक लेक हाय माझी. तिची हाऊस बघशील आता लग्नात किती करते ते." आई म्हणाली.
"बरं, बरं जोशना ही पिशव्या ठेव तिकडं निहून." म्हणून संतोष ने जोशना कडे पिशव्या दिल्या आणि संतोषने आईला डबा भरायला सांगितला.
तेवढ्यात आई म्हणाली, "आज शेतावर गेले नाही तर चालणार नाही का रं?" "का गं ? काय काम होतं का?" संतोष म्हणाला.
"म्हणजी आज शालीनीताई येणार हायत ना, नाही म्हणजी त्यांना स्टॅन्ड वरून आणायचं होतं रं." आई म्हणाली.
"आलोच मी, आज लवकर येतो. दुपारूनच येणार असंल ना आत्या." संतोष म्हणाला.
जरा नाराज होऊनच आई म्हणाली, "व्हय, ये मग लवकर."
संतोष गेला आणि येताना आत्याला घेऊनच आला होता. "शालिनी आत्या आली." म्हणून जोशना म्हणते न म्हणते तोच आजी लगेचच "शालिनी, शालिनी." म्हणून आवाज देऊ लागली. जयाला पाहून संतोषची आईही खूप खुश झाली होती. शालिनी आत्या आली ती तडक तिच्या आईच्या खोलीत गेली. जया आणि जोशना गप्पा मारत बसल्या होत्या. आता हळूहळू एकेक विषयावर त्या सगळ्यांच्या चर्चा रंगणार होत्या.
आज दीपाची फर्स्ट सेमिस्टर ची परीक्षा असल्यामुळे दीपा फुल्ल कॉन्फिडन्सने परीक्षेला चालली होती. रोजचा नित्याचा दिनक्रम पार पाडून अगदी वेळेत तयार होऊन दीपा ड्रायवर काकांची वाट पाहात बाहेर उभी होती. सर्वांच्या शुभआशीर्वादामुळे दीपाला पेपर सोपे जाणार यात तिळमात्र शंका नव्हती. अगदी व्यवस्थित परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व साहित्यांनिशी दीपा परीक्षा हॉल मध्ये पोहोचली. दररोजचे वर्गातील प्रेझेन्टेशन आणि आज दीपाच्या चेहऱ्यावर तिच्या सौंदर्यात भर घालणारा आत्मविश्वास पाहून शिक्षकांनाही दीपा परीक्षेत बाजी मारणार हे कळून चुकले होते. पेपर मिळता क्षणी दीपाने पेन उचलला तो पेपर संपण्याच्या आधी दहा मिनिट खाली ठेवला. सगळे पेपर अगदी छान सोडवल्यामुळे दिपाला तिच्या चांगल्या गुणांची निश्चीत खात्री होती. निकालाच्या दिवशी सगळ्यांची उत्सुकता शिगेला ताणली गेली होती. सुरुवातीला कमी गुण मिळवणाऱ्या मुलांची नावे जाहीर झाली. त्यानंतर तृतीय क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि कमी दिवसात कॉलेज अटेंड करून, सर्व विषय चांगल्या पद्धतीने ग्रहण करून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा मिरवणारी पहिल्या क्रमांकाची विद्यार्थिनी म्हणून दीपाच्या नावाची घोषणा करण्यात आली.
'माझ्या संघर्षात माझ्या आई - आबांची आणि मॅडम तुमची साथ नसती तर काय झाले असते माझे ? ' हा मनात विचार करून दीपाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. सारा भूतकाळ सरसर सरसर दीपाच्या डोळ्यासमोरून सरकत होता. "अगं दीपा ऊठ, मॅडम बोलतायेय तुला. जा आणि ते पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी घे." म्हणून दीपाच्या शेजारी बसलेल्या मुलीने दीपाला वर्तमानात परत आणले. "हो." म्हणून दीपा उठली.
मॅडमनी दीपाला तिच्या यशाबद्दल दोन शब्द बोलायला सांगितले. आणि इतरांनाही मार्गदर्शन करायला सांगितले.
तेव्हा दीपा म्हणाली, "मॅडम, मी इतकी तज्ञ व्यक्ती नाही की मी कोणाला तरी मार्गदर्शन करेन ! हा पण मी एवढंच सांगेन की व्यक्ती जीवनात यशस्वी तेव्हाच होतो जेंव्हा त्याच्या पोटाला खरी भूक लागलेली असते, जेंव्हा त्याचा खिसा रिकामा असतो आणि तेव्हा जेव्हा त्याचं हृदय खूप दुखावलेलं असतं. आणि तेव्हाच त्याला काहीतरी बनायचंय ही जिद्द निर्माण होते जसं माझ्या बाबतीत झालयं ! हे माझं यश खूप अल्प आहे, मला खूप मोठा टप्पा पार करायचाय." इतरांना जरी ते प्रेरक शब्द वाटत असले तरी खरोखरच दीपाला या सर्व परिस्थितीतून जावे लागले होते.
दीपाच्या या शब्दांवर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मॅडमनी दीपा चं कौतुक केलं आणि त्या पुढे म्हणाल्या, "कितीही यश मिळवले तरी पाय जमिनीवरच असावे म्हणजेच यशाचा आनंद घेताना आपली माणसं सोबत राहतात आणि आपला आनंद द्विगुणित करतात. खरच दीपा तु आज जे सांगितलं ते मोजकं होतं पण लाखमोलाचं होतं. सर्व विद्यार्थ्यांना इथून पुढच्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा." असं म्हणून मॅडमनी कार्यक्रम संपला असं जाहीर केलं. आज दीपा नेहमीपेक्षा लवकर घरी जाणार होती आणि तिला कधी एकदा घरी जाऊन या यशाचे खरे मानकरी असणारे तिचे आई-आबा आणि मॅडम यांना सांगते असं झालं होतं. ड्रायव्हर काका फाटका जवळ येऊन थांबले होते. दीपा गाडीत बसून सतत तिला मिळालेल्या ट्रॉफी ला न्याहाळत होती.
"दीपा मॅडम, तुम्हाला मिळाली का ही ट्रॉफी?" ड्रायव्हर काका उत्सुकतेने म्हणाले.
"हो काका, मलाच मिळालीय ही ट्रॉफी आणि तुम्ही मला मॅडम म्हणत जाऊ नका बरं, दीपा म्हणलं तरी चालेल मला."
"आता तुम्ही वकील बनणार आहात की नाही म्हणून आदराने तुम्हाला मॅडम म्हणतोय. आणि तुम्ही त्या दिशेने पहिले पाऊल टाकले बघा. मॅडम ला किती आनंद होईल ही ट्रॉफी पाहिल्यावर.आणि गुरु ऋणातून तुम्ही बी मुक्त व्हाल." ड्रायव्हर काका म्हणाले.
"खूप केलेय मॅडम नी माझ्यासाठी काका. त्यांच्या ऋणातून मुक्त होणं या जन्मी तरी शक्य वाटत नाही." दीपा मनापासून म्हणाली. " अगदी खरंय बघा.मॅडम सारखी देव माणसं या जगात खूप कमी आहेत बघा. माझ्यावर बी लय उपकार आहेत बघा मॅडमचचे. माझ्या पोरांची शिक्षणं मॅडममुळच पूर्ण झालीत बघा. आश्रमातल्या सगळ्यांची दुःख आपली दुःख समजून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी मॅडम किती झटतात. आता फक्त शार्दुल सर लवकर भारतात याव आणि मॅडम ची सगळी स्वप्न पूर्ण करावी बगा त्यांनी. हीच देवाकडे प्रार्थना." ड्रायव्हर काका म्हणाले.
"हो येतील तेही परत, एक ना एक दिवस. कारण आपण जे दुसऱ्याला देतो ना ते एक ना एक दिवस आपल्याकडे परत येते हा सृष्टीचा नियम आहे आणि मॅडम तर आनंद वाटण्याच काम करतात त्यामुळे नक्की त्यांच्या जीवनात आनंदाचे पर्व येईल बघा." दीपा आनंदाने म्हणाली.
तेवढ्यात गाडी मॅडम च्या बंगल्या समोर येऊन थांबली. सर्वजण दीपाचा निकाल ऐकण्यासाठी उत्सुक होते. दीपा ही भराभर पावले टाकत आत गेली. सर्वजन हॉलमध्ये सोफ्यावर बसून दीपा कडे पाहुन स्मित हास्य करत होते. दीपाने हातातली ट्रॉफी जरा समोर धरून दाखवली. तोच मॅडमनी कौतुकाची थाप दीपाच्या पाठीवरती दिली आणि परत संतोष साठी सेल्फी चा घाट घातला. मॅडमनी संतोष ला फोटो पाठवून पुन्हा स्टेटसलाही ठेवला. दीपा फ्रेश व्हायला गेली. अगदी शून्य मिनिटात शार्दुल ने तो फोटो पाहिला आणि तसाच मॅडमला घाईघाईने फोनही केला.
"हॅलो शार्दुल, नक्की आईलाच बोलायला फोन केलाय ना ? का आज पुन्हा स्टेटस पाहिला म्हणून फोन केलास?" मॅडम मजेत म्हणाल्या.
"अगं आई, तुला माझ्या मनातलं बरं कळतं ग सगळं." शार्दुल म्हणाला. "अरे, आई आहे मी तुझी." मॅडम हसून म्हणाल्या.
"अगं म्हणजे मी फोन करावा म्हणून तू स्टेटस ठेवला ?" शार्दुल म्हणाला.
"अरे ही विद्यार्थिनी आहे ना माझी दीपा, तिच्या नवऱ्याला आपल्या बायकोचा कौतुक सोहळा पाहता यावा म्हणून फोटो काढते अरे आणि मग मला आवडतं म्हणून ठेवते मी स्टेटस." मॅडम म्हणाल्या.
"अगं मग ती पाठवेल ना तिच्या नवर्याला फोटो. तु का पाठवतेस?" शार्दुल म्हणाला.
" ही दीपाच्या संघर्षाची कथा खूप मोठी आहे रे, त्यासाठी तुला भारतात यावं लागेल ऐकायला." मॅडम म्हणाल्या.
"अरे बापरे! असं आहे होय. बरं आई कशामुळे बक्षीस मिळालं गं तुझ्या त्या प्रिय विद्यार्थिनीला ?" शार्दुल म्हणाला.
"अरे ती \"लॉ\" करते ना. फर्स्ट सेमिस्टर मध्ये फर्स्ट आली ती." मॅडम म्हणाल्या. "अरे वा मॅडम सारख्याच अन्यायाविरुद्ध लढा देणार आहेत वाटतं. बरं. माझ्या कडून आठवणीने अभिनंदन सांग तिला." शार्दुल म्हणाला.
"नक्की सांगते." मॅडम म्हणाल्या.
"आई, मला आज तुझ्या हातच्या पराठ्यांची खुप आठवण येत होती गं. मिस यु मॉम." शार्दुल म्हणाला. मॅडमनही भारतात आल्यावर सगळ्या शार्दुलच्या आवडीच्या डिश करण्याचं प्रॉमिस केलं मस्त गप्पा मारून माय लेकांनी फोन ठेवला.
दीपाने पहिली पायरी यशस्वीरित्या पार पाडलीय आता पुढील प्रगतीचा आलेख कसा वाढतोय ते पाहूया पुढील भागात क्रमशः
सौ. प्राजक्ता पाटील
कथा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि नावासकट शेअर करा. कथा मनापासून वाचणाऱ्या सर्व वाचक वर्गाचे खूप खूप आभार.
#साहित्य चोरी करणे हा गुन्हा आहे. कथा प्रकाशनाचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा