भाग-53
"राणी अगं प्लीज ये ना. इतकाही भाव खाणं बरं नाही. नाहीतर त्या फिल्ममधल्या गाण्यासारखं मलाही म्हणावं लागेल." हरी म्हणाला.
राणी रागातच टेबलजवळच्या खुर्चीवर जाऊन बसली. आणि ती म्हणाली,"कोणतं गाणं ?" आता तू म्हणतेस तर गावचं लागेल मला ते गाणं. असं म्हणत हरी हळू आवाजातच पण खूप गोड आवाजात गाणं गाऊ लागला.
"ये ये रानी, तु लगती है नानी...
ज्यूस की दुकान में तु पिती है पानी...।
वो वो रानी, ये ये रानी.. आता इथेच थांबतो नाहीतर लोक येऊन पैसे देऊन जातील मला." हरीच्या या वाक्याने राणीला मात्र हसू अनावर झालं.
"पण मी ज्यूसच्या दुकानात नेहमी ज्यूसच पिते हा. बाकी आवाज छान आहे तुझा." राणी म्हणाली.
" वेटर ,ह्या प्लेट्स घेऊन जा." हरी हात वर करून मोठ्या आवाजात वेटरला म्हणाला.
राणीच्या कपाळावर आठ्या उमटल्या. वेटर येऊन उभा राहिला. हरी म्हणाला, " सॉरी, पण या प्लेट्समधील पुऱ्या ह्या मॅडमची वाट पाहत पार भिजून गेल्या आहेत. प्लीज, याचही बील पेड करेन मी. पण आता दुसऱ्या प्लेट्स घेऊन या."
"हो सर, माहितीय मला रुसलेल्या गर्ल फ्रेंड्चा राग घालवणं वाटतं तितकं सोपं नसतं. आणि हे नेहमीच घडतं आमच्या स्टॉलवर. त्यामुळे त्यात काहीही नवीन नाही." वेटर म्हणाला.
"गर्लफ्रेंड कोणाला म्हणाला रे तू ? मी आणि याची गर्लफ्रेंड. ड्रायव्हर आहे तो माझा." राणी वेटरला रागाने म्हणाली.
"हो, हो. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी ड्रायव्हर आहे यांच्या गाडीचा." हरी नम्रपणे वेटरला म्हणाला.
"बघितलंस लोकं असा विचार करतात, म्हणून मला नव्हतं यायचं तुझ्यासोबत तुझ्या गाडीत." राणी म्हणाली.
"सॉरी हरी, तू मॅडमचा ड्रायव्हर आहेस, पण सध्या मला ड्रॉप करतोस म्हणून माझा ड्रायव्हर झालास ना. आणि मी डॉक्टर झाल्यावर तुलाच माझा ड्रायव्हर म्हणून ठेवेन नक्की." राणी म्हणाली.
'किती बिनधास्त बोलते ही.' हरी मनात विचार करत होता.
मनसोक्त पाणीपुरी खाल्ल्यावर हरी म्हणाला, "चला निघूया, आई घरी वाट बघत असेल."
"कोणाची आई ? नाही म्हणजे माझी तर आई इथे नाही. आणि तू तर अनाथ आहेस म्हणून तुला ड्रायव्हर म्हणून ठेवले आहे ना मॅडमनी त्यांच्या घरी." राणी म्हणाली.
"असं कोणी सांगितलं तुला?" हरी म्हणाला.
" कोणी म्हणजे ?आश्रमात स्वयंपाक करणाऱ्या मावशींनी." राणी म्हणाली.
हरीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले.
"काय झालं ?" राणी म्हणाली.
"काही नाही. काहीतरी गेलं वाटतं डोळ्यात." हरी म्हणाला.
राणीला आपल्या बोलण्याने हरी दुखावला आहे हे समजले तेव्हा राणी म्हणाली, "सॉरी हरी, पण अरे मी नेहमी स्पष्ट बोलते. तू दुखावला असशील तर पुन्हा सॉरी." राणी म्हणाली.
"ठीक आहे मी. चल गाडीत बस पटकन." हरी म्हणाला.
"अरे पण गाडी तर बंद पडलीय ना?" राणी म्हणाली.
" नाही म्हणजे आता मलाच तुझी माफी मागावी लागेल, मला माफ कर. पण मघाशी तू खूप नाराज वाटत होतीस म्हणून तुझा मुड ठीक करण्यासाठी मी गाडी बंद पडली असं तुला खोटं बोललो. आणि म्हणूनच तुझा मुड ठीक करण्यासाठी मी मुद्दाम गाडी पार्कजवळ थांबवली होती." हरी म्हणाला.
मानेनेच बरं म्हणत राणी गाडीत बसली. राणी गाडीत बसल्यावर तिचं विचारचक्र सुरू झालं.
'खरचं आता माझं असं झालंय का ? ते म्हणतात ना- दुध पोळलं की, माणूस ताकही फुंकून पितो अगदी तसं. मयुरेश माझ्याशी चुकीचं वागला पण त्याची शिक्षा मी हरीला विनाकारण देतीय. म्हणजे हरीने माझ्याशी बोलूच नये यासाठी सतत मी त्याच्याशी उद्धटपणे वागतेय. पण तो बिचारा, खरचं दुसऱ्यांच्या भावनांचा खूप आदर करतो. मनापासून सॉरी हरी.' हा मनात विचार करताना राणीचेही डोळे पाणावले होते.
तेवढ्यात राणीच्या मोबाईलची रिंग वाजली. आणि "बापरे ! दीपा मावशीचा फोन." म्हणून राणीने चटकन फोन उचलला. "हॅलो दीपा मावशी बोल ना." राणी म्हणाली.
"पोहोचलीस घरी ?" दीपा म्हणाली.
"नाही अजून." राणी म्हणाली.
"का गं काय झालं ? एक्स्ट्रा लेक्चर वगैरे होतं का ?" दीपा म्हणाली.
"नाही म्हणजे... हो." राणी म्हणाली.
"काय अडचण आहे का राणी तुला ? का अशी बोलतेस? आणि रोज कशी जातेस तू कॉलेजला ?" दीपा म्हणाली.
"काही अडचण नाही मावशी. हरी येतो मला रोज सोडायला." राणी म्हणाली.
"हरी आहे म्हणजे काही चिंता नाही. बरं शिकवलेलं समजतयं ना ?" दीपा म्हणाली.
"हो बाकी कसली अडचण नसली तरी, इथला अभ्यासक्रम थोडासा पुढे असल्यामुळे मला थोडंस टेन्शन आलं होतं. पण ते कुठच्या कुठे पळालं." राणी पटकन बोलून गेली.
"हरीमुळे का ?" दीपा म्हणाली.
"अं.." आता मावशीला कसं कळालं ? हाच विचार करत राणी शांत बसली.
"अगं, सुरूवातीला मॅडमच्या नंबरमुळे घोळ झाला आणि खास मॅडमच्या शोधात आलेला हरी माझ्याकडेच आला. आणि चक्क ड्रायव्हर बनला माझा. खरचं खूप कमी लोक असतील हरीसारखे उपकाराची जाणीव ठेवणारे.(दीपा भावनिक होऊन बोलत होती.) अरे विषय कुठल्या कुठे गेला. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं हरी सोबतच्या प्रवासात त्याने मला कधीच दिवसभरातील कामाचा ताण येऊ दिला नव्हता. खूप गुणी मुलगा आहे हरी." दीपा म्हणाली.
"हो मावशी, अगदी खरंय!" राणी म्हणाली.
"बरं तु व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास कर. आणि या रविवारी तुम्ही सगळेच या इकडे. मी करेन मॅडमना फोन." दीपा म्हणाली.
"हो मावशी." राणी म्हणाली. आणि "ठेवू फोन." म्हणून दीपाने फोन ठेवला.
राणीला मात्र आश्चर्यच वाटले, 'मॅडमनी हरीला नाही ठेवलय कामावर, तर हरी त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवून आलाय इथे. आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी पूर्ण माहिती नसेल तर आपले तोंड उघडू नये असं म्हणतात तेच खरं. उगाच कोणाच्या तरी बोलण्यावर विश्वास ठेवून मी हरीला दुखावले. किती नाराज दिसतोय तो. पण मला तर कोणाची नाराजी कशी दूर करतात ? हेही माहीत नाही. आई म्हणते, तेच खरंय. राणी, बोलताना विचार करून बोलावे बोलून विचारात पडू नये.' राणी मनात विचार करत होती. गाडी बंगल्याजवळ येऊन थांबली. हरी आज पटकन उतरून भरभर आत निघून गेला. राणीही गाडीतून आपली बॅग आणि मैत्रीणीच्या , राणी जॉइन होण्यापूर्वीच्या शिक्षकांनी दिलेल्या नोट्स घेऊन पटकन खाली उतरली. हरीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून राणी मनातच 'सॉरी' म्हणत होती.
नेहमी वाऱ्याच्या वेगाने चालणारी राणी आज अगदी पाऊल टाकू की नको ? हाच विचार करत होती.
हे पाहून आबा राणीला म्हणाले, काय झालंय राणी तुला ? कोण काय बोललंय का ? नवीन अभ्यास झेपतंय नव्हं तुला?" आबा काळजीने म्हणाले.
"हो आबा झेपतोय मला अभ्यास आणि मला काहीही नाही झालं बघा." राणी म्हणाली.
"बरं बाई ,चल." म्हणून आबा राणीसोबत आत आले.
आजीने सगळ्यांसाठीच चहा केला. राणी फ्रेश व्हायला तिच्या रूममध्ये गेली. ती फ्रेश होऊन रूमच्या बाहेर आली पाहते तर काय! नेहमी राणीकडे हसून बघणारा हरी आज मात्र चहा घेऊन पटकन बाहेर निघून गेला. राणी हिरमुसली. आजीने राणीला चहा दिला. मॅडम आणि राणीच्या आजी सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होत्या.
"कसा होता क्लासचा पहिला दिवस राणी ? उशीर झाला का तुला यायला आज?" मॅडम म्हणाल्या .
"खूप छान होता. हो झाला आज मला जरा उशीर. पण उद्यापासून नाही होणार उशीर." राणी म्हणाली.
"अगं तसं नाही. तुझे कधीकधी एक्स्ट्रा लेक्चर असू शकतात ना. मग त्यामुळेही उशीर होऊ शकतो. आणि एकदा का आपण पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवायचं ठरवलं की, ते पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र एक करावा लागतो तुझ्या दीपा मावशीसारखा. आणि मला, तु ही नक्की यशस्वी होणार याची पूर्ण खात्री आहे ." मॅडम म्हणाल्या.
"हो मॅडम, दीपा मावशीसारखा मी ही खूप अभ्यास करेन." म्हणून चहाचा कप स्वयंपाक घरात ठेवून राणी खोलीत जायला निघाली.
खोलीत गेल्यावर तिने नोट्स हातात घेतल्या. त्यात तिला सगळ्यात खाली एक वेगळी फाईल दिसली. तिने ती सर्वप्रथम उघडली. डॉक्टर हरीश हर्षवर्धन यादव. (एमबीबीएस. एमडी.) आणि हा फोटो हरीचा कसा काय? काय आहे हे सर्व ?
राणीला सत्य कळल्यावर काय होईल ? पाहूया पुढील भागात क्रमशः
सौ. प्राजक्ता पाटील.
कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा.
कथा प्रकाशित करण्याचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
# साहित्यचोरी करणे हा गुन्हा आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा