भाग-55
राणीला आजीने रात्रीच सांगितलं होतं की, " उदया तिला आणि आबांना रिक्षानेच क्लासला जावे लागणार आहे. कारण हरीही मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून जॉइन झाला आहे. त्यामुळे उदया लवकर उठून दिवसभर त्याला लेक्चर द्यावे लागतील म्हणूनच त्याला मॅडमनी लवकर नाही उठलास तरी चालेल असे सांगितले आहे."
सकाळ झाली. राणी लवकर उठून तयार झाली. राणी खाली आली आणि तिने आजीला विचारले, "आजी, आबा कुठे दिसत नाहीत?"
आजी म्हणाल्या, "अगं आबा शेतात गेलेत."
"अगं कसे गेले आबा शेतात ? मला क्लासला जायचं होत ना. अरे बापरे ! चला निघते मी." आजी मात्र काहीच बोलत नाही म्हटल्यावर राणीने आजीकडे आश्चर्याने पाहिले तर आजी चक्क स्मितहास्य करत होती.
"काय आजी, मी किती सिरियसली बोलतीये आणि तुला हसू येतेय." राणी म्हणाली.
"अगं राणी, ते बघ तिकडे." (राणी ने मागे वळून पाहिले तर काय आश्चर्य! हरी अगदी सुंदर लाईट रंगाचा ड्रेस घालून सोफ्यावर तयार होऊन बसला होता.)
"तो का उठला लवकर?" राणी म्हणाली.
"का म्हणजे ? तुला सोडायला. तू त्याचं मन जरी दुखावलं असलं तरीही मोठ्या मनानं तुझी चुक माफ करत हरी लवकर उठून तुला सोडायला जातो म्हणाला." आजी म्हणाल्या.
राणीच्या चेहऱ्यावरुन आनंद ओसंडून वाहत होता. हरी सोडायला येणार म्हणून नव्हे, तर हरीने राणीला समजून घेतले म्हणून. तिला तिची चूक सुधारण्याची एक तरी संधी त्याने दिली म्हणून. राणी धावत जाऊन हरीला "थँक्यू" म्हणाली. पण हरीने मात्र नुसतीच मान हलवली आणि "चला" म्हणून हरी गाडीकडे गेला.
गाडीत बसल्यावर ही राणी सतत हरिला बोलण्याचा प्रयत्न करत होती पण घरी मात्र केवळ श्रोता बनवून राणीच्या हो मध्ये हो मिसळत होता.
"एक विचारू ?" राणी म्हणाली.
"हं." हरी म्हणाला.
"मी ना आजपासून तुला डॉ. हरीश असचं म्हणणार. चालेल ना ?" राणी म्हणाली.
"राणी मी ही मराठी मिडीयममधला विद्यार्थी आहे. मला वाक्यांचे प्रकार चांगलेच ठाऊक आहेत." हरीश म्हणाला.
"म्हणजे ? आणि त्याचा आता काय संबंध?" राणी म्हणाली.
"म्हणजे एक विचारू का ? ही तू विनंती केलीस आणि लगेच मी उद्यापासून हरीश म्हणेन हा हुकूम सोडलास." स्मितहास्य करत हरीश पुढे म्हणाला, "तुला हवे ते म्हण."
राणीलाही हरीशचे म्हणणे पटले म्हणून तिच्याही चेहऱ्यावर हास्य उमटले.
"हरीश अजून एक विचारायचं होतं, विचारू ?" राणी म्हणाली.
"हो विचार." हरीश म्हणाला.
"मला अभ्यासात कोणताही प्रॉब्लेम आला तर तो तू दूर करायला मदत करशील ना ? अरे, इथला सिल्याबस खूप पुढे गेला आहे आणि सध्या तो माझ्या डोक्यावरून जात आहे." राणी म्हणाली.
"तुला काहीही प्रॉब्लेम येऊ देत, तू मला बिनधास्तपणे विचार. पण पहिल्या प्रयत्नात चांगल्या मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळवायचं हे लक्षात असू दे." हरी म्हणाला.
"हो सगळ्यांच्या खूपच अपेक्षा आहेत माझ्याकडून आणि त्या पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न करीन." असे म्हणून राणी क्लासजवळ गाडी थांबली म्हणून गाडीतून खाली उतरली.
आज मात्र राणीने मागे वळून हरीकडे पाहिले आणि राणी हरीला "पहिल्या सगळ्या गोष्टींसाठी सॉरी आणि आज तिला वेळात वेळ काढून क्लासला सोडले म्हणून थँक्यू." म्हणाली. हरीला आज खूप छान वाटत होतं. रोज तो राणीने मागे वळून पाहावे म्हणून वाट पाहत होता आणि आज तो दिवस त्याने अनुभवला. फक्त स्माईल देऊन हरी घरी गेला.
मॅडम हरीला गाडीतून उतरताना पाहून अचंबित झाल्या.
"अरे हे काय ? कुठे गेला होतास सकाळी सकाळी ?" मॅडम हरीला म्हणाल्या.
"अगं आई, मी राणीला सोडायला क्लासमध्ये गेलो होतो." हरी म्हणाला.
"म्हणजे राणीला सोडण्यासाठी इतक्या सकाळी उठलास आज तू?" मॅडम फिरकी घेत म्हणाल्या.
"काय गं आई !" म्हणून हरी निघून गेला. मॅडमला मात्र हरीच्या डोळ्यात राणीबद्दलची काळजी कालच दिसली होती आणि आज खात्रीही पटली.
'हरी तुझी आवड मलाही आवडली बरं.' हा मनात विचार करून मॅडम हसत होत्या.
थोड्यावेळाने हरी कॉलेजला जायला निघाला आणि मॅडमच्या चेहऱ्यावर आपसुकच हास्याची लकेर उमटली. "आई, तु मला पाहून अशी का हसतेयस?" हरी मॅडमला म्हणाला.
"अरे काही नाही रे, असाच एक प्रसंग आठवला आणि हसू आलं बघ." मॅडम म्हणाल्या.
"मग ठीक आहे. मला वाटलं चुकून पावडर वगैरे जास्त लागली की काय?" हरी म्हणाला.
"तेव्हा सांगितलं असतं अरे मी तुला. अशी हसले असते थोडीच?" मॅडम म्हणाल्या.
मॅडमना "ओके. बाय" म्हणून हरी गाडीत बसला. कॉलेजला गेला. त्याला आज कितीतरी दिवसांनी त्याची पूर्वीची डॉक्टर हरीश ही ओळख मिळाली होती. आपल्या विषयावर प्रभुत्व असणाऱ्या हरीशने अगदी पूर्ण अभ्यास करून विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिकवले. नवीन आलेले हे प्रोफेसर सर्वांच्या मनात आदराचे स्थान मिळवून गेले.
राणीच्या क्लासमध्ये सकाळी सरांचे लेक्चर्स झाले आणि दुपारनंतर महिला दिनाचा कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला. आता कॉलेज सुटलं होतं पण राणीच्या पोटात मात्र कावळे काव-काव करू लागले होते. कारण सकाळी आणलेल्या टिफिनमध्ये तिच्या दोन जिवलग सख्या सहभागी झाल्या होत्या आणि तिघींनी मिळून दुपारच्या सुट्टीत टिफीन संपवला होता. आता कॉलेज सुटलं आणि राणी हरीशची वाट पाहत गेटजवळ थांबली होती. हरी आला आणि त्याला कसं कळलं कोण जाणे ? त्याने गाडी एका हॉटेलमध्ये नेऊन पार्क केली.
"हॅप्पी वुमन्स डे." म्हणत हरीने दरवाजा उघडला.
"किती छान सजवलय हे हॉटेल! आणि तुला कसं कळलं मला भूक लागली आहे ते ?" राणी म्हणाली.
"म्हणजे तुला भूक लागलीय म्हणून मी हे हॉटेल सजवलयं असा तुझा गोड गैरसमज झाला असेल तर तो दूर कर. आणि चल माझ्यासोबत. माझ्या कॉलेजतर्फे फस्ट इअरला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी जागतिक महिला दिनानिमित्त पार्टी आयोजित करण्यात आली आहे. पण पार्टीत अट अशी होती की, पार्टीत एका स्टाफ मेम्बरसोबत एकच घरातला सदस्य हवा. म्हणून आईला फोन केल्यावर तिने तुलाच पार्टीला सोबत घेऊन जायला सांगितले. म्हणूनच घेऊन आलोय तुला." हरी हसून म्हणाला.
"पण मी काहीच आवरलं नाही आणि तिथे सगळेजण…" राणी बोलता-बोलता मध्येच थांबली.
"काही नाही होत. आहे अशीच खूप छान दिसतेस !" हरी सहजच बोलून गेला. पण राणीने मात्र हरीचे ते वाक्य अगदी हृदयात साठवून ठेवले.
हॉटेलच्या आत गेल्यावर मिनीस्कर्ट घातलेल्या मुलींनी हरीभोवती घेराव घातला. राणी मात्र मागेच राहिली. "सर, सर " करून मुली हरीशी बोलत असतानाच हरीची नजर फक्त राणीलाच पाहत होती. राणीला मनापासून खूप वाईट वाटत होतं, पण तिला हरीला मुली बोलतायेत तर मला का वाईट वाटतय ? मला का राग येतोय? हेच कळत नव्हतं.
पार्टी सुरू झाली. मुली कार्यक्रमाच्या गेस्ट आल्या म्हणून त्यांची बैठक व्यवस्था करण्यासाठी तिकडे गेल्या.
हरीशने राणीला नजरेनेच त्या खुर्चीवर बस म्हणून खुणावले.
हरीही कार्यक्रमाचे नियोजन करण्यात गुंतला. कार्यक्रम चालू असताना येणारे स्टार्टरसही राणी घेत नाही हे हरी लांबूनच पाहत होता. थोड्यावेळाने सर्व विद्यार्थिनींचे गेस्ट आणि स्टाफ सोबत फोटो सेशन सुरू झाले. हरीच्या अगदीच जवळ जाऊन फोटोज काढणाऱ्या मुलींना न पाहता राणी दुसरीकडे तोंड करून पाहू लागली. हरीला राणीचे काहीतरी बिनसलंय याची पक्की खात्री झाली. कार्यक्रम संपल्यानंतर जेवण घेण्यासाठी प्लेट्स घेऊन सर्वजण रांगेत उभे होते. पण राणी तिथेच बसून आहे हे पाहून हरी राणीजवळ आला आणि राणीला म्हणाला, "अगं भूक लागलीय ना तुला? मग घे ना तिथली प्लेट."
"तू , नाही का जेवणार?" राणी म्हणाली.
"बरं चल आपण दोघेही घेऊया." म्हणून हरीने प्लेट उचलली. पण तेवढ्यात काही विद्यार्थिनी पटकन येऊन म्हणाल्या, "सर तुम्ही नका असे प्लेट घेऊन उभे राहू. आम्ही आणतोय प्लेट रेडीकरून तुमच्यासाठी. तुम्ही आमच्यासोबतच जेवण करणार आहात हे फायनल." राणीचा पारा चांगलाच चढला होता. तिने पटापट प्लेट रेडी केली आणि एका टेबलाजवळील खुर्चीवर जाऊन ती एकटीच बसली. हरीलाही मनापासून वाईट वाटत होतं.
पण काय करणार तो ?
पाहूया पुढील भागात क्रमशः
सौ. प्राजक्ता पाटील.
कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा आणि मला फॉलो पण करा.
कथा प्रकाशित करण्याचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
साहित्यचोरी करणे हा गुन्हा आहे.
कथा मनापासून वाचलीत म्हणून आभार.