Login

तिचा स्वतःचा वेळ भाग ३

विद्या एक नोकरदार स्त्री,कशी ती सगळ्या व्यापातून स्वतः चा वेळ,स्वतः साठी काढते हे ह्या कथेत तुम्हाला वाचायला मिळेल.
"बाबा खरंच,अजून दोन दिवस आई येणार नाही का ?" आठ वर्षांच्या शाश्वतीने निरागसपणे विचारलं.


"हो,बाबा आज मी माझा कलर बॉक्स घरी विसरलो,म्हणून माझ्या शिक्षकांनी मला ओरडून शिक्षा केली,आई नेहमी माझे वेळापत्रक लक्षात ठेवते." पाच वर्षांचा वरद म्हणाला.


"आईने दिलेले तुम्हा दोघांचे कागद घेऊन या लगेच."बाबांनी सांगितले आणि तेही धावत त्यांच्या खोलीत गेले.

काल त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही.म्हणून त्यांनी पुन्हा वाचायला सुरुवात केली.

"शाशू..आणि वरु आता तुमचा गृहपाठ करायला लागा."
विद्याने त्या पेपरमध्ये लिहिल्याप्रमाणे,त्याने त्यांना सांगितले की,ही त्यांची गृहपाठ करण्याची वेळ आहे.

"आधी आम्हाला काही खायला द्या.आम्हाला खूप भूक लागली आहे." वरद पोटावर हात फिरवत म्हणाला.

सर्वेशने कागद घेतला,संध्याकाळी मुलांसाठी काहीतरी स्नॅक्स आणि गरम बोर्नविटा घातलेले दूध बनवण्याचे लिहिलेले होते.


तो स्वयंपाकघरात गेला आणि त्याआधी ते दोघे शाळेच्या गणवेशात असल्याने त्यांना कपडे बदलायला सांगितले.

दुधात घालण्यासाठी तो बोर्नविटा शोधत होता.५ मिनिटांनी तो मिळाला आणि सोबतच तिने काही दिवस आधी बनवलेला चिवडा शोधला.त्यांना खायला दिले.तोही तेच खात आणि पित होता.

"बाबा,तुम्ही लहान आहात का आमच्यासारखे दूध पिताय?"
वरद आणि शाश्वती त्यांच्‍या बाबांकडे बघून हसू लागले.


"तुझ्या आईने माझ्यासाठी काय पर्याय सोडला आहे का?"
तो स्वतःशी पुटपुटला.

नंतर ते त्यांचे गृहपाठ करू लागले आणि तो स्वयंपाकघरात गेला आणि खिचडी बनवली.


त्यानंतर त्याने सर्व कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकले.तिने कागदामध्ये लिहिल्याप्रमाणे वॉशिंग मशिनमध्ये घालताना रंगाचे कपडे इतर कपड्यांमध्ये मिसळू नका,त्यामुळे त्याने ही खबरदारी घेतली.


तिथे विद्याने फोन सुरू केला आणि तिच्या जुन्या शाळा-कॉलेज मित्रमैत्रिणींना फोन केला.त्यातले जे लोणावळा जवळ होते,ते दुसऱ्या दिवशी भेटायला यायचे ठरवतात.

इकडे घरी भाताची खिचडी बघून दोन्ही मुलांचे तोंड खाली पडले.

"मला हे खायचे नाही." वरदने ताट पुढे सरकवले.

"हो,मलाही हे आवडत नाही." त्याच्या मुलीनेही नाक मुरडले.


"जर तुम्हाला खायचे नसेल,तर ठीक आहे.मी तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही."त्याने खूप मेहनतीने केल्यामुळे त्याच मन खरंच दुखावलं होतं.

"आम्ही बाहेरून जेवण ऑर्डर केले तर?"वरदने त्याचे हुशार डोके चालवले.

"जर तुम्हाला खायचे असेल तर फक्त हेच,तुम्ही दोघे आजारी पडता,बाहेरच्या जेवणाला परवानगी नाही."तो परखडपणे म्हणाला.


दोन्ही मुले हिरमुसली.मग काहीही न खाता झोपी गेले.
सर्वेशलाही वाईट वाटलं,पण त्याची मुलं दिवसेंदिवस हट्टी होत होती आणि तेही त्याच्या लाडामुळे.विद्या त्याला नेहमी काही गोष्टींबाबत कठोर राहण्याचा सल्ला देत असे.पण त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती असं का म्हणायची हे त्याला आता उमगलं.


रात्री अकरानंतर,

"दीदी,मला काहीतरी खायचे आहे.मला झोप येत नाही."खूप भूक लागली,म्हणून छोटा वरद म्हणाला.

"ठीक आहे,चल वरद स्वयंपाकघरामध्ये जाऊया काहीतरी खायला शोधू."

दबक्या पावलांनी दोघेही स्वयंपाकघरामध्ये गेले,पण सगळीकडे शोधून त्यांना काहीच सापडले नाही.ते स्वयंपाकघरातून बाहेर जायला निघाले असताना,लाईट्स चालू झाल्‍या.

"भूक लागली ?"सर्वेशने हाताची घडी घालून त्यांच्याकडे बघत विचारले.

त्यांनी मान हलवली.

"बसा तेथे,मी पुन्हा खिचडी गरम करेन चालेल ना?" त्याने त्यांना विचारले.

"हो,बाबा लवकर करा." न राहून छोटा वरद म्‍हणाला.

तो गालातल्या गालात हसला आणि आत गेला.

ताटात खिचडीचा एक कण न ठेवता ते सर्व खातात.
त्यांचे बाबाही त्यांच्यासोबत जेवले.त्यांनी आधी जेवायला नकार दिल्यावर,त्यानेही काही खाल्ले नव्हते.


दुसऱ्या दिवशी सकाळी उठण्यासाठी घड्याळाला गजर लावून,सगळे वेळेवर उठतात.त्याने पोहे बनवले काही जळले होते,परंतु काल काय झाले त्यावरून त्यांच्या मुलांनी त्याबद्दल तक्रार केली नाही.त्याने जेवणाच्या डब्यात सँडविच आणि काही फळांचे तुकडे कापलेले ठेवले आणि त्यांना दिले.


तसेच तो त्यांच्या दप्तरात शाळेच्या वेळापत्रकानुसार वह्या आणि पुस्तके दोघांनाही ठेवायला शिकवतो.

दुपारच्या जेवणाच्या वेळेत ऑफिसमध्ये तो रात्रीच्या जेवणात,नाश्ता आणि दुपारच्या जेवणात काय काय सहज बनवता येईल,याची यादी बनवण्यात मग्न होता.कारण उद्या सुट्टी असल्याने,दिवसभर त्याची मुलं घरीच असतील आणि काहीतरी खायला मागतील,त्यामुळे तो त्यासाठी मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करत होता.

रात्री तो महिला गृहोद्योगातून फक्त चपाती पार्सल घेतो.
यूट्यूबवर बघून त्याने टोमॅटोची भाजी आणि डाळ-भातासाठी डाळ बनवली.दोन्ही मुलं आज काहीही न बोलता सगळं खातात.

त्यांना स्वतःची ताटं कशी धुवायची ते दाखवली.ते देखील काहीतरी नवीन शिकतात,असे त्यांना वाटले आणि ते दोघे त्यांच्या बाबांचे ऐकतात.


दुसरा दिवस गेला.सर्वेशसाठी कालच्या तुलनेत तो दिवस कमी दमवणूक करणारा होता.आज तो त्याच्या पत्नीलाही त्याच्या मोबाईलमधला तिचा फोटो बघून आठवत होता.


तिसरा दिवस शनिवार होता.सार्वजनिक सुट्टीमुळे तिघे घरीच होते.आता थोडी साफसफाई करण्याची वेळ आली होती.
त्याने सर्व उशांचे कव्हर काढायला सांगितले आणि त्यावर दुसऱ्या उशांचे कव्हर लावण्यास सांगितले.कोण जास्त जलद करेल,जणू अशी स्पर्धा दोन्ही भावंडांच्यामध्ये लागलेली आणि गोड बोलून तो त्यांना ते काम करायला लावतो.

मैत्रिणींसोबत वेळ घालवल्यानंतर आणि त्यांच्या जुन्या आठवणींबद्दल गप्पा मारून विद्यालाही बरे वाटत होते.त्या रिसॉर्टमध्ये असलेल्या काही उपक्रमांमध्येही तिने भाग घेतला.तिला मनात कुठेतरी असे वाटले की,तिने खूप आधी हे करायला पाहिजे होते.

रविवार तिथे राहायचा तिचा शेवटचा दिवस होता.


©® विद्या कुंभार


तुम्हाला कथा आवडली असेल तर त्यावर कमेंट लिहा आणि मला फॉलो नक्की करा.


🎭 Series Post

View all