Login

'ती'चा संघर्षमय प्रवास भाग ११

Real Struggle Story Of One Woman
'ती'चा संघर्षमय प्रवास भाग ११

आपण मागील भागात बघितले की, नर्मदाची मावस सासूबाई तिच्या घरी आली होती, त्यावेळी प्रकाश घरात नसल्याने तिने त्याची चौकशी केली असता, नर्मदाची सासू नर्मदावर प्रकाश बिघडल्याचे खापर फोडू लागली, तेव्हा नर्मदाच्या मावस सासूबाईने खडसावून सांगितले की, या सगळयात नर्मदाची काहीच चूक नाही. नर्मदाच्या सासूला तिच्या बहिणीने तिची चूक समजावून सांगितली. प्रकाश घरी येईपर्यंत त्याची मावशी त्याच्या घरीच थांबून राहिली होती. पुढील दोन दिवसांनी रात्री प्रकाश घरी आला.

आता बघूया पुढे….

प्रकाश अंघोळ करुन येईपर्यंत त्याची मावशी प्रकाशच्या बाबांना म्हणाली,
"दाजी मी प्रकाश सोबत बोलत असताना तुम्ही काहीच बोलायचं नाही. प्रकाशला तुमचा आधार लागला की, तो माझ्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही."

प्रकाशचे वडील म्हणाले,
"तुझ्या बोलण्याने माझा पोरगा सुधारणार असेल, तर मी काहीच बोलणार नाही."

प्रकाशचे वडील बोलत असतानाच नर्मदाचे वडील येऊन म्हणाले,
"येऊ का पाव्हणे?"

प्रकाशच्या वडिलांनी मागे वळून बघितलं आणि ते म्हणाले,
"अहो या ना."

प्रकाशच्या वडिलांनी नर्मदाच्या वडिलांना आत येऊन बसण्यास सांगितले, प्रकाशच्या मावशी सोबत त्यांनी त्यांची ओळख करुन दिली. नर्मदाने आपल्या वडिलांना पाणी आणून दिलं. आपल्या वडिलांना बघून तिला खूप आनंद झाला होता. 

प्रकाशचे वडील म्हणाले,
"आज इकडची वाट कशी काय चुकलातं?"

नर्मदाचे वडील म्हणाले,
"नर्मदाची भेट होऊन भरपूर दिवस झाले होते, तिच्या आईला तिची आठवण येत होती. आज कामाला सुट्टी होती, तर म्हटलं चार दिवस नर्मदाला घरी घेऊन जावं."

नर्मदाची सासू म्हणाली,
"बरं झालं तुम्ही नर्मदाला घ्यायला आले, नाहीतर मीच तिला दोन दिवसांनी प्रकाश बरोबर तुमच्याकडे पाठवून देणार होते. नवीन नवीन पोरीला माहेरची आठवण येत असेल. तुम्ही नर्मदाला घेऊन जा."

एवढ्यात प्रकाश तिथे आला, नर्मदाच्या वडिलांना बघून तो म्हणाला,
"मामा कधी आलात?"

नर्मदाचे वडील म्हणाले,
"हे काय आत्ताच आलो."

नर्मदाची सासूबाई म्हणाली,
"नर्मदा मी सुमनला चहा करायला सांगते, तोपर्यंत तु तुझ्या सामानाची बांधाबांध कर."

नर्मदाचे वडील आल्यामुळे प्रकाशच्या मावशीला काही बोलता येत नव्हते. प्रकाशला भीती वाटत होती, कारण त्याला वाटत होते की, त्याच्या मावशीनेच नर्मदाच्या वडिलांना बोलावून घेतले आहे की काय?

प्रकाश म्हणाला,
"मामा घरी सगळे बरे आहेत ना?"

नर्मदाचे वडील म्हणाले,
"हो सगळे बरे आहेत. तुम्ही नर्मदाला घ्यायला याल, तेव्हा तुमची भेट होईलच."

प्रकाश हसून म्हणाला,
"हो. मी जरा कामाच्या निमित्ताने दोन चार दिवस बाहेर गेलो होतो. काल रात्रीच परत आलो."

नर्मदाचे वडील म्हणाले,
"हो का? मग मी नर्मदाला घ्यायला चुकीच्या वेळेला आलो का?"

प्रकाश म्हणाला,
"तसं नाही. तुम्हाला काही अडचण नसलं तर मी नर्मदाला दोन दिवसांनी तुमच्याकडे आणून सोडतो."

प्रकाशची आई म्हणाली,
"प्रकाश ते एवढ्या लांबून त्यांच्या पोरीला घ्यायला आले आहेत. नर्मदाला आज त्यांच्या सोबत जाऊदेत. तु आठ दिवसांनी जाऊन तिला घेऊन ये."

आई बोलल्यामुळे प्रकाशला काही बोलता आलं नाही. सुमनने नर्मदाच्या वडिलांना चहा आणून दिला. 

प्रकाशची मावशी म्हणाली,
"मी पाहुण्यांसोबत जाते. वाटेत माळवाडीला उतरुन घेईल. प्रकाश नर्मदाला घेऊन माझ्याकडे मुक्कामाला ये. नर्मदा अजून माझ्या घरी आली नाहीये."

प्रकाशने मान हलवून होकार दिला. नर्मदा आपलं सामान घेऊन तयार होती. नर्मदाचे वडील प्रकाशच्या घरच्यांचा निरोप घेऊन निघाले. नर्मदा, नर्मदाचे वडील आणि प्रकाशची मावस सासूबाई एका टमटम मध्ये बसून निघाले.

नर्मदाने सुटकेचा श्वास घेतला. नर्मदाने मनापासून ठरवले होते की, पुन्हा आपल्याला या नरकात यायचे नाही. नर्मदाने घरातून निघाल्यावर तिने एकदाही मागे वळून पाहिले नाही.

माळवाडी आल्यावर प्रकाशची मावशी टमटम मधून उतरली. नर्मदाच्या घराचा स्टॉप आल्यावर ती व तिचे वडील उतरले. घरापर्यंत थोडं पायी चालावं लागणार होतं. नर्मदाचा उतरलेला चेहरा तिच्या वडिलांना खूप काही सांगून गेला होता. नर्मदाचे वडील घरापर्यंत जाईपर्यंत तिच्यासोबत एक शब्दही बोलले नाही. घरी पोहोचल्यावर नर्मदाच्या भावंडांनी तिच्या भोवती गराडा घातला. पोरांचा आरडाओरडा नर्मदाच्या वडिलांना काही सहन झाला नाही, म्हणून ते जोरात म्हणाले,
"अरे पोरांनो तिला घरात तर येऊद्यात. प्रवासातून आलेलं माणूस थकून भागून येतं. एवढं साधं तुमच्या लक्षात येत नाही."

वडिलांचा आवाज ऐकून पोरं शांत झाले. नर्मदाला प्रश्न पडला होता की, 'कधी न चिडणारे, ओरडणारे बाबा, एवढे ओरडून का बोलले?'

नर्मदाने हातपाय धुतले. साडी बदलून लग्नाच्या आधी जसे पंजाबी ड्रेस घालत होती, तसाच एक ड्रेस घातला. नर्मदाच्या आईने तिला गरमागरम भाकरी आणि ठेचा वाढला. जेवण करता करता नर्मदा म्हणाली,
"आई तुझ्या हातच्या ठेच्याची मला खूप आठवण येत होती."

नर्मदाचं हे बोलणं ऐकून तिच्या आईच्या डोळयात पाणी आलं.
नर्मदाची आई म्हणाली,
"नर्मदा पोरी तु बरी आहेस ना?"

नर्मदाला जेवताना तो विषय काढायचा नव्हता, म्हणून ती म्हणाली,
"आई खूप दिवसांनी असं गरमागरम जेवण करतं आहे. मी कशी आहे? यावर आपण नंतर बोलू."

नर्मदाचं हे बोलणं ऐकल्यावर तिच्या आई वडिलांनी एकमेकांकडे बघितलं. नर्मदाचे आई वडील नर्मदाचं जेवण होण्याची वाट पाहत होते. जेवण झाल्यावर नर्मदा म्हणाली,
"आई मी थोड्यावेळ झोपू का?"

नर्मदाची आई म्हणाली,
"हो, एका खोलीत जाऊन झोप, म्हणजे तुझी निवांत झोप होईल."

नर्मदा झोपायला निघून गेल्यावर नर्मदाची आई तिच्या वडिलांना म्हणाली,
"नर्मदाच्या घरी सगळं व्यवस्थित वाटतं होतं का?"

यावर नर्मदाचे वडील म्हणाले,
"प्रकाशराव जरा दबकत बोलताना दिसले. घरातील इतर मंडळी नेहमीप्रमाणेच होते. मात्र नर्मदाच्या चेहऱ्यावर जो आनंद मागच्या वेळी दिसत होता, तो यावेळी नव्हता. नर्मदाने घरातून निघताना प्रकाश रावांकडे बघितलं पण नाही.नर्मदाने तिच्या काकूकडे मला बोलावून घेण्याचा काय हेतू असेल? नर्मदाला तिच्या सासरी काही त्रास होतं असेल का?"

नर्मदाची आई म्हणाली,
"या सगळया प्रश्नांची उत्तरे नर्मदाकडूनच आपल्याला समजतील."

काही वेळानंतर नर्मदा झोपेतून उठून आली. नर्मदाची आई स्वयंपाक घरात काम करत होती, तिला रमा मदत करत होती. नर्मदाचे वडील बाहेर ओट्यावर बसलेले होते. रमेश व सरिता घराबाहेर काहीतरी खेळ खेळत होते. नर्मदाला बघून तिची आई म्हणाली,

"नर्मदा एवढ्यात तुझी झोप झाली पण का?"

नर्मदा म्हणाली,
"आई मला कसंतरी होत आहे."

नर्मदाची आई म्हणाली,
"नेमकं काय होतं आहे?"

नर्मदा म्हणाली,
"आई मला मळमळ होतं आहे आणि डोकं गरगरगरल्यासारखं वाटतं आहे."

नर्मदाच्या आईने नर्मदाचा हात धरुन तिला एका जागेवर बसवले. रमाला पाणी आणण्यास सांगितले. तेवढ्यात नर्मदाचे वडील घरात येऊन म्हणाले,
"नर्मदाला काय झालं? तिला बरं वाटतं नाहीये का?"

नर्मदाची आई म्हणाली,
"मघाशी अधाश्यासारख्या दोन भाकरी खाल्ल्या, मग आता मळमळ होत असेल."

नर्मदाचे वडील म्हणाले,
"नर्मदाला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे का?"

नर्मदाची आई म्हणाली,
"नाही नको. मी तिला लिंबू सरबत प्यायला देते, तिला उलटी झाली की, सगळं पित्त बाहेर पडेल आणि तिला बरं वाटून जाईल."

नर्मदाच्या आईने तिला लिंबू सरबत प्यायला दिले. लिंबू सरबत पिण्याच्या आत नर्मदाला उलटी आल्यासारखे वाटल्याने ती घराच्या बाहेर उलटी करायला गेली, पण नर्मदाला उलटी होतंच नव्हती. नर्मदाच्या कोरड्या उलट्या बघून तिच्या शेजारी राहणारी एक बाई म्हणाली,

"नर्मदा पोरी काही गोड बातमी आहे का?"

नर्मदा काही न बोलता घरात निघून गेली. नर्मदाच्या आई वडिलांनी शेजारच्या बाईचे बोलणे ऐकले होते. नर्मदाचे वडील तिच्या आईला म्हणाले,
"शांता तुला काय वाटतं? नर्मदा गोडबातमी देणार आहे का?"

नर्मदाची आई म्हणाली,
"सरकारी दवाखान्यात त्या आशाताई काम करतात ना, त्यांच्याकडे मी नर्मदाला घेऊन जाते, त्याचं खरं काय ते सांगतील?"