'ती'चा संघर्षमय प्रवास भाग १२
आपण मागील भागात बघितले की, प्रकाश सोबत बोलण्यासाठी त्याची मावशी तयार होऊन बसली होती. नर्मदाचे वडील अचानक तिच्या सासरी गेले, त्यामुळे प्रकाशची मावशी प्रकाश सोबत बोलू शकली नाही. नर्मदाचे वडील तिला काही दिवसांसाठी आपल्या घरी घेऊन जायला आले होते. नर्मदा आपल्या वडिलांसमोर जाणार असल्याने तिच्या अपरोक्ष प्रकाशच्या मावशीला बोलायचे नव्हते, म्हणून ती पण त्यांच्या सोबत आपल्या घरी गेली. नर्मदाच्या चेहऱ्यावरुन ती खुश नाहीये, हे तिच्या वडिलांना जाणवले होते. नर्मदाच्या आईने नर्मदाला कशी आहे? हे विचारले असता, नर्मदाने निवांत सांगेल असं सांगितलं.
आता बघूया पुढे….
नर्मदाला चक्कर येत होती, तसेच तिला कोरड्या उलट्या चालू होत्या. नर्मदाची आई तिला घेऊन आशाताईंकडे गेली. आशाताई ह्या सरकारी दवाखान्यात नर्स म्हणून काम करत होत्या.
"आशाताई घरात आहात का?" नर्मदाच्या आईने दरवाजाची कडी वाजवत विचारलं.
आशाताई दारात येऊन म्हणाल्या,
"अग शांता आज तु इकडे कशी काय आलीस?"
नर्मदाची आई म्हणाली,
"आशाताई ही माझी मुलगी नर्मदा, आजचं तिचे वडील तिला सासरी जाऊन घेऊन आले. घरी आली तेव्हा बरी होती, जेवण करुन जरावेळ ती झोपली होती, झोपेतून उठल्यावर तिला चक्कर यायला सुरुवात झाली आणि कोरड्या उलट्या होत आहेत."
आशाताई म्हणाल्या,
"नर्मदा, शांता घरात येऊन बसा, मग आपण बोलू."
नर्मदा व शांता आशाताईंच्या घरात जाऊन बसल्या. आशाताईंनी नर्मदाला पाणी पिण्यास दिले.
आशाताई म्हणाल्या,
"नर्मदा या महिन्यात पाळी आली होती का?"
नर्मदा आईकडे बघून म्हणाली,
"नाही."
आशाताई म्हणाल्या,
"पाळी किती तारखेला येते हे लक्षात आहे का?"
नर्मदा म्हणाली,
"हो."
आशाताई म्हणाल्या,
"तुमच्या गल्लीतील बऱ्याच मुलींना पाळी कधी येते? हे लक्षात राहत नाही. आम्ही किती वेळेस तारीख लक्षात ठेवण्याचे महत्त्व सांगत असतो, पण त्यांना ते समजतचं नाही."
नर्मदाची आई म्हणाली,
"नर्मदाला दिवस गेले आहेत का?"
आशाताई म्हणाल्या,
"अजून आठ दिवस पाळी आली नाही आणि अश्याच कोरड्या उलट्या चालू राहिल्या, तर ती गरोदर आहे असं आपण नक्की सांगू शकतो."
नर्मदा म्हणाली,
"आशाताई सरकारी दवाखान्यातील डॉक्टर नीट तपासून सांगू शकतील ना?"
आशाताई म्हणाल्या,
"हो डॉक्टर सगळं काही नीट सांगतील, पण तुझं वय १८ पेक्षा कमी आहे, त्यामुळे तुला ते तपासणार नाहीत, उलट इतक्या कमी वयात गरोदर झाल्याने तुझ्या आई वडिलांवर अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याची पोलीस केस होऊ शकेल. हल्ली कायदा खूप कडक झालेला आहे."
नर्मदाची आई म्हणाली,
"आशाताई आमच्या वेळी आम्ही कुठं दवाखाने केले होते.नर्मदा व रमाच्या वेळी मी दवाखान्यात गेले नव्हते. रमेशच्या वेळी जरा त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात गेले होते."
आशाताई म्हणाल्या,
"शांता मी हल्ली कोणाला काही सल्ला देणेच सोडून दिले आहे. आमचं बोलणं तुमच्या सारखे लोकं अजिबात मनावर घेत नाही. एवढंच सांगेल की नर्मदाला चांगलं खाऊ पिऊ घाल, म्हणजे तिला जास्त त्रास होणार नाही."
नर्मदाच्या आईने मान हलवून होकार दिला. नर्मदा व तिची आई आशाताईंच्या घरातून बाहेर पडल्या. नर्मदा व तिची आई आपल्या घराच्या दिशेने वाटचाल करत होत्या. रस्त्यात चंपा सुईणीने नर्मदा व तिच्या आईला आवाज देऊन थांबवले.
चंपा सुईण म्हणाली,
"शांता पोरीला घेऊन कुठं गेली होती ग?"
नर्मदाची आई म्हणाली,
"नर्मदाला जरा बरं वाटतं नव्हतं, म्हणून आशाताईंकडे गेले होते."
चंपा सुईण नर्मदाकडे बघून म्हणाली,
"शांता तुझ्या अंगावर काही दिवसांनी नातवंडं खेळणार आहे."
नर्मदाची आई चंपाकडे आश्चर्याने बघत म्हणाली,
"तुला कसं कळलं ग?"
चंपा सुईण म्हणाली,
"तुझ्या पोरीचा चेहरा जे सांगत आहे, ते मी सांगितलं."
नर्मदाची आई म्हणाली,
"खरंच का?"
चंपा सुईण म्हणाली,
"शांता अनुभवाचे बोल आहे हे. तुझ्या पोरीचं बाळंतपण करायला मला बोलावं, मी येते आता."
चंपा सुईण तिच्या रस्त्याला निघून गेली. चंपा सुईणीने नर्मदा गरोदर असल्याचा शिक्का मोर्तब केला होता. नर्मदाची आई खूप खुश झाली होती. नर्मदाचे वडील ह्या दोघींची वाट बघत घराबाहेर ओट्यावर बसलेले होते. नर्मदा व तिच्या आईला बघून नर्मदाचे वडील म्हणाले,
"आशाताई काय म्हणाल्या?"
नर्मदाच्या आईने घडलेली सर्व हकीकत नर्मदाच्या वडिलांना सांगितली. घरातील सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता, मात्र नर्मदाच्या चेहऱ्यावर आनंदाची एक छटाही नव्हती. नर्मदा शांत एका कोपऱ्यात जाऊन बसली होती. नर्मदाचे वडील तिच्या जवळ जाऊन म्हणाले,
"पोरी काय झालं? तु एवढी शांत का? तुला बरं वाटतं नाहीये का?"
नर्मदाच्या डोळयात पाणी आले. नर्मदाची आई तिच्या जवळ येऊन म्हणाली,
"नर्मदा पोरी काय झालं? तुझ्या डोळयात पाणी का? हा तर तुझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे."
नर्मदा काहीच बोलत नव्हती, म्हणून तिचे वडील म्हणाले,
"नर्मदा तु काही बोलली नाहीस, तर तुला काय झालं आहे? हे आम्हाला कसं काय कळेल?"
नर्मदा म्हणाली,
"बाबा काय सांगू? आणि कसं? हेच मला कळत नाहीये. नवरा काही कामधंदा करत नाही, दिवसभर गावभर उंडारत असतो, रात्री दारु पिऊन उशीरा घरी येतो, त्याची मिजास तर एवढी मोठी आहे की, सगळया वस्तू हातात लागतात. आपण काही बोललेलं त्याला आवडत नाही. गेल्या आठ दहा दिवसापासून कोणालाही न सांगता कुठेतरी निघून गेला होता. घरी जनावराप्रमाणे राबावं लागतं. कामाचं कोणी कौतुक करत नाही. सगळे सतत टोमणे मारत असतात. माझ्यासोबत कोणीच प्रेमाने बोलत नाही.
माझी सासूबाई उलट सुलट काहीतरी बोलत असते. माझ्या मावस सासूबाईने हे सगळं बघितलं, यावरुन ती सासूबाईला खूप बोलली, तिची चूक तिच्या लक्षात आणून दिली. मावशी ह्यांना अश्या वागण्याचा जाब विचारण्यासाठी थांबल्या होत्या, पण तुमच्या समोर मावशींना ह्यांच्यासोबत बोलता आले नाही. बाबा आपली खूप मोठी फसवणूक झाली आहे. हे सगळं असं असतांना आता मी गरोदर आहे म्हटल्यावर मला त्या नरकात जाऊन त्या राक्षसी प्रवृत्तीच्या माणसासोबत रहावे लागेल."
नर्मदाचं बोलणं ऐकून तिच्या आई वडिलांच्या डोळ्यांत पाणी आलं.
नर्मदाची आई म्हणाली,
"मला हेच दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये असं वाटतं होतं आणि तेच झालं. अहो आपण पाहुण्यांसोबत बोलूयात का?"
नर्मदाचे वडील म्हणाले,
" आपली खूप मोठी फसवणूक झाली आहे. मी उद्याचं हरीला बोलावून घेतो आणि त्याच्या कानावर हे सगळं घालतो."
नर्मदाची आई म्हणाली,
"आपल्याला अजून दोन मुलींची लग्न उरकायची आहेत. आपण असं वागून चालणार नाही. नर्मदाला घ्यायला प्रकाशराव आले की आपण त्यांना समजावून सांगू. एका मुलाची जबाबदारी अंगावर पडल्यावर प्रकाशराव आपोआप सुधारतील."
नर्मदाचे वडील म्हणाले,
"तु काहीही म्हटली तरी चालेल. मी एकदा हरीशी ह्या विषयावर बोलणार आहे. हरीनेच मुलाचं आणि त्याच्या घरच्यांचं कौतुक केलं होतं ना?"
नर्मदाची आई म्हणाली,
"अहो असं वागणं बरोबर नाही. हरी भाऊजी जर नर्मदाच्या सासरच्यांना काही बोलले तर ते आपल्या पोरीला कायमचं इथेच ठेऊन जातील."
नर्मदाचे वडील काही न बोलता बाहेर निघून गेले. नर्मदाची आई तिच्या केसावरुन हात फिरवत म्हणाली,
"पोरी रडू नकोस. रडून काही होणार नाही. प्रत्येकाच्या नशिबाचे भोग असतात. लग्न झालं तेव्हाच तु ह्या घरची पाहुणी झाली होतीस. आता तेच तुझं हक्काचं घर आहे, त्या घराला नरक म्हणू नकोस, त्याच घराला स्वर्ग मानून तुला तिथे रहायचे आहे. तु जर इथे थोड्या जास्त दिवस राहिलीस तर आजूबाजूचे लोकं उलट सुलट चर्चा करतील. एकट्या बाईचे जीवन सोपे नाही. डोक्यात काही विचार असतील तर ते काढून टाक. तुला सासरी परत जावेच लागेल. तु जर नवऱ्याला सोडून राहिलीस तर तुझ्या लहान बहिणींचे लग्न होणार नाही. तु जो काही निर्णय घेशील, तेव्हा तुझ्या बहिणींचा थोडा विचार करशील."
नर्मदा काही न बोलता खोलीत निघून गेली. नर्मदाच्या आयुष्यात अजून काय घडेल? बघूया पुढील भागात….
©®Dr Supriya Dighe