'ती'चा संघर्षमय प्रवास भाग १३
आपण मागील भागात बघितले की, नर्मदाला कोरड्या उलट्या होत होत्या, तसेच चक्कर पण येत होती, म्हणून नर्मदाची आई तिला घेऊन सरकारी दवाखान्यात काम करणाऱ्या आशाताईंकडे घेऊन गेली होती. आशाताईंनी नर्मदाला काही प्रश्न विचारले आणि त्यानंतर त्यांनी नर्मदाच्या आईला सांगितले की, तुम्ही लोकं मुलींची लग्न कमी वयात करतातच, पण त्यांना कमी वयात मुलं झाल्याने बऱ्याच त्रासांना सामोरे जावे लागते. नर्मदाच्या आईला आशाताईंनी सांगितले की, मुलीला चांगलं खाऊ पिऊ घाल, तिला पौष्टिक अन्नाची आवश्यकता आहे. आशाताईंच्या घरुन निघाल्यावर नर्मदा व तिच्या आईची भेट चंपा सुईणीसोबत होते, तिने नर्मदाच्या चेहऱ्याकडे बघून ती गरोदर असल्याचे सांगितले. नर्मदा गरोदर असल्याचे ऐकून नर्मदाची आई खूप आनंदी झाली होती, पण तो आनंद नर्मदाच्या चेहऱ्यावर दिसून आला नाही, म्हणून घरी गेल्यावर नर्मदाच्या आईने तिच्या वडिलांसमोर नर्मदा दुःखी असल्याचे कारण विचारले, तेव्हा नर्मदाने प्रकाश बद्दल सर्व काही खरं सांगितलं.
आता बघूया पुढे….
नर्मदाचे वडील रात्री उशिरा घरी परतले. नर्मदाच्या वडिलांना नर्मदाचं लग्न प्रकाश सोबत लावून दिल्याचा पश्चाताप झाला होता.
नर्मदाची आई तिच्या वडिलांना म्हणाली,
"अहो इतक्या वेळ कुठे होतात? असा डोक्यात राग घालून कसं चालेल? आपली मुलीची बाजू आहे. आपल्याला थोडं नमत घ्यावं लागेल."
नर्मदाचे वडील म्हणाले,
"आपल्या पोरीला हा त्रास आयुष्यभर सहन करावा लागेल."
नर्मदाची आई म्हणाली,
"आपण हतबल झालो तर, नर्मदा कोणाकडे बघून उभी राहील. नर्मदाला आपण पाठिंबा देऊयात. प्रकाश रावांना चार समजूतीच्या गोष्टी समजावून सांगू. आपलं ते नक्कीच ऐकतील."
नर्मदाचे वडील म्हणाले,
"मी उद्या हरीला घरी बोलावलं आहे, त्याच्या कानावर हे सगळं टाकणं गरजेचे आहे."
नर्मदाची आई म्हणाली,
"आता यावर जास्त विचार करत बसू नका. दोन घास खाऊन घ्या."
नर्मदाचे वडील म्हणाले,
"मला जेवण नको. माझ्या घशाखाली घास उतरणार नाही."
नर्मदाचे वडील जेवण न करता झोपून गेले. आपल्या मुलीच्या काळजीने त्यांना झोपही लागली नाही. रात्रभर या कुशीवरुन त्या कुशीवर ते वळत होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी नर्मदाचे वडील शून्यात बघत ओट्यावर बसलेले होते. नर्मदाची आई घरातील कामं आवरत होती. नर्मदाचे भावंडे आपापले कामं करत होती. नर्मदा एकटीच एका कोपऱ्यात काही तरी विचार करत बसली होती. काही वेळात हरी नर्मदाच्या वडिलांजवळ येऊन म्हणाला,
"राजाराम एवढ्या सकाळी मला का बोलावून घेतलं?"
नर्मदाचे वडील म्हणाले,
"घरात चल, मग सगळं सांगतो."
हरी घरात गेल्यावर रमाने त्याला पाणी दिले. हरी व नर्मदाचे वडील एका ठिकाणी बसले.
हरी पाणी पिऊन झाल्यावर पुन्हा म्हणाला,
"राजाराम अरे काय झालं? मला एवढं घाईघाईने का बोलावून घेतलं?"
नर्मदाच्या वडिलांनी घडलेली सर्व हकीकत हरीला सांगितली.
नर्मदाचे वडील म्हणाले,
"हरी तुझ्यावर विश्वास ठेवून मी माझी पोरगी त्या घरात दिली होती. माझ्या पोरीचं वाटोळं झालं रे."
हरी म्हणाला,
"राजाराम शांत हो. नर्मदाचं वाईट व्हावं, ही माझी इच्छा नव्हती. प्रकाशच्या घरची माणसं आपली एवढी मोठी फसवणूक करतील, असं मला वाटलं नव्हतं."
नर्मदाचे वडील म्हणाले,
"हरी आपल्याला याचा काहीतरी सोक्षमोक्ष लावावा लागेल."
हरी म्हणाला,
"तु याचा काय सोक्षमोक्ष लावणार आहेस?"
नर्मदाचे वडील म्हणाले,
" आपली फसवणूक केल्याबद्दल आपल्याला त्यांना जाब विचारावा लागेल."
हरी म्हणाला,
"जाब विचारुन काय फरक पडेल. राजाराम नर्मदा गरोदर आहे, हे तु लक्षात ठेव. नर्मदाच्या सासरच्यांना आपल्या बोलण्याचा राग आला आणि त्यांनी नर्मदाला नांदवल नाही, तर मग काय करायचं? याचा विचार तु केला आहेस का?
मोठ्या बहिणीला सासरचे नांदवत नाही, हे आपल्या समाजात पसरल्यावर तिच्या लहान दोन बहिणींची लग्न जमतील का?"
नर्मदाचे वडील म्हणाले,
"अरे हरी, मग आपण काहीच करायचं नाही का?"
हरी म्हणाला,
"माझ्या दोन मुलींची लग्न करताना मी जावई साधेसरळ माझ्या ऐपतीप्रमाणे शोधले. माझे दोन्ही जावई कष्टाळू होते. लग्नानंतर काही वर्षे सगळं काही ठीक चालू होतं. दोघींना दोन दोन मुले झाली. जावई निर्व्यसनी मिळाले, म्हणून मला मोठा माज होता. सहा महिन्यांपासून एक जावई दारु प्यायला लागला तर दुसरा जावई बाईच्या नादाला लागला.
आता मला सांग, यावर मी काय निर्णय घ्यायला पाहिजे. दोन्ही पोरी आलटून पालटून घरी महिना महिना येऊन राहत आहेत. माझा प्रपंच तुझ्यासारखा हातावरचा आहे, पोरींना, त्यांच्या पोरांना मी कसं जास्त दिवस सांभाळू शकतो? शेवटी दोन्ही जावयांना घरी बोलावून चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या आणि पोरींना त्यांच्या बरोबर काढून दिलं."
नर्मदाची आई म्हणाली,
"हरी भाऊजी मी कालपासून ह्यांना हेच सांगते आहे की, आपण प्रकाश रावांना थोडं समजावून सांगू. एक पोर झाल्यावर त्यांना त्यांची जबाबदारी कळेल."
नर्मदाचे वडील म्हणाले,
"हरी तुझ्या मुलींच्या बाबतीत जे झालं, ते वाईटच झालं. पण नर्मदाची त्या घरात पुन्हा जाण्याची इच्छा दिसत नाहीये."
हरी म्हणाला,
"राजाराम नर्मदा वयाने लहान आहे, तिला ह्या समाजाची काहीच माहिती नाहीये. आपला हा समाज तिला जगू देणार नाही. नर्मदा गरोदर असल्याने तिला तिच्या होणाऱ्या बाळाचा विचार करावा लागेल. प्रकाश रावांना एकदा सुधारण्याची संधी द्यावी,असं मला वाटतं. नर्मदा अजून पुढील थोडे दिवस जरी माहेरी राहिली तरी, तिला चार आजूबाजूच्या बायांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील. नर्मदा समजदार मुलगी आहे, तिला समाजाची थोडी ओळख करुन दे."
नर्मदाचे वडील म्हणाले,
"हरी तु प्रकाश सोबत बोलशील का?"
हरी म्हणाला,
"नाही. मी काही बोललो तर त्यांचा अहंकार दुखावला जाईल. कितीही नाही म्हटलं तरी मी बाहेचाच पडतो. तु आणि शांता त्याच्या सोबत बोला, थोडाफार का होईना? तो नक्कीच ध्यानावर येईल. राजाराम पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. डोकं शांत ठेवून, विचार करुन निर्णय घे. उद्या काही झालं तरी त्याचा त्रास तुलाच होईल. आमच्यासारख्याना काही फरक पडणार नाही."
नर्मदाची आई म्हणाली,
"हरी भाऊजी, मी तुमच्यासाठी रमाला चहा करायला सांगते."
हरी म्हणाला,
"शांता नर्मदाचं सगळं मार्गी लागल्यावर मी तुझ्या घरी जेवायला थांबेल. आज मला चहा पण नको."
हरी सगळ्यांचा निरोप घेऊन निघून गेला. हरी गेल्यावर नर्मदाची आई म्हणाली,
"हरी भाऊजी आज जरा जास्तच हताश वाटत होते."
नर्मदाचे वडील म्हणाले,
"मुलीचा बाप आहे ना. मनात खूप काही असताना काहीच करु शकत नाही."
नर्मदाची आई म्हणाली,
"तुम्हाला हरी भाऊजींचं म्हणणं पटलं ना?"
नर्मदाचे वडील म्हणाले,
"शांता आपण ज्या समाजात राहतो ना, तिथल्या रूढी, परंपरा ह्या इतक्या विचित्र आहेत की, मला इच्छा असूनही काही करता येत नाहीये. प्रकाशराव नर्मदाला घ्यायला आल्यावर मी त्यांच्या सोबत बोलतो, त्यांना चार गोष्टी सांगून बघतो, मग बघू त्यांच्यात किती सुधारणा होईल ते?
आज हरीच्या मनाची स्थिती आणि माझ्या मनाची स्थिती एकसारखीच आहे."
नर्मदाची आई म्हणाली,
"आशाताई म्हणाल्या होत्या की, नर्मदाला चांगलं पौष्टिक खाऊ घाल. नर्मदा काल रात्रीपासून नीट जेवलेली नाहीये."
नर्मदाचे वडील म्हणाले,
"दुकानात जाऊन मी रवा घेऊन येतो, तिच्यासाठी शिरा बनव आणि आज तिला मनसोक्त शिरा खाऊदेत. इतरवेळी नर्मदाच्या आवडीच्या शिऱ्यात सगळेजण वाटेकरी व्हायचे."
नर्मदाची आई म्हणाली,
"आपल्या नर्मदाला अगदी पहिल्यापासून शिरा खूप आवडतो."
नर्मदाचे वडील म्हणाले,
"हो ना, पण आपण तिला तिच्या आवडीचा शिरा कधीच पोटभर खायला देऊ शकलो नाही. आपल्याला नर्मदाला थोडं समजावून सांगावं लागेल. शिरा बघितल्यावर ती आपलं म्हणणं ऐकून व समजून तरी घेईल."
नर्मदाची आई म्हणाली,
"आपली नर्मदा समजूतदार आहे, ती आपल्याला समजून घेईल."
नर्मदाचे वडील रवा आणण्यासाठी दुकानात निघून गेले.
©®Dr Supriya Dighe