'ती'चा संघर्षमय प्रवास भाग १५
आपण मागील भागात बघितले की, प्रकाश नर्मदाला घेण्यासाठी तिच्या माहेरी गेला होता. नर्मदाच्या आई वडिलांनी प्रकाश चार गोष्टी समजावून सांगितल्या. प्रकाश नर्मदाला घेऊन त्याच्या मावशीच्या घरी गेला, तेव्हा मावशीने त्याला आपली कथा सांगून तो कसा चुकत आहे? हे दाखवून दिले.
आता बघूया पुढे….
मावशीचं संपूर्ण बोलणं ऐकल्यावर प्रकाश म्हणाला,
"मावशी मला तुझं म्हणणं पटत आहे. मला माझ्या जबाबदारीची जाणीव झाली आहे. मावशी लग्न झाल्यावर मला दारु पिण्याची अजिबात इच्छा होत नव्हती, पण मित्रांनी बळजबरीने दारु पाजली."
मावशी म्हणाली,
"अरे बाबा, असे मित्र काय कामाचे? मला असं वाटतं की, तु आमच्या एरियात एखादी खोली बघून तिथं रहायला ये. इथं जवळपास तुला काम मिळेल. तुझ्या मित्रांपासून आणि त्या दारुच्या भट्टीपासून तुझी सुटका होईल."
प्रकाश म्हणाला,
"मावशी तु म्हणते ते खरं आहे. मी घरी जाऊन ताई आणि आण्णांसोबत बोलून घेतो."
प्रकाश व नर्मदा मावशीचा निरोप घेऊन आपल्या घरी निघून गेले. वाटेत प्रकाश नर्मदाची काळजी घेत होता, तिला सामानाची पिशवी उचलू दिली नाही. घरी गेल्यावर प्रकाशच्या आईने नर्मदाचं हसून स्वागत केलं. प्रकाशने मावशीने दिलेला सल्ला त्याच्या आईवडिलांना सांगितला.
तेव्हा त्याचे वडील म्हणाले,
"प्रकाश शहरात जाऊन राहण्यापेक्षा इथे आपल्या गावात काहीतरी कामधंदा कर, तिकडे गेल्यावर नर्मदाची काळजी कोण घेईल?"
प्रकाशला आपल्या वडिलांचे म्हणणे पटले. प्रकाश दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गावात काम शोधायला निघून गेला. प्रकाशने आता दारु पिणं बंद केलं होतं. प्रकाश नर्मदासोबत प्रेमाने वागू लागला होता. प्रकाशच्या वागण्यातील बदल बघून नर्मदा आतून सुखावली होती. नर्मदाची सासू तिच्यासोबत चांगलं वागत होती.
प्रकाश दररोज कामावर जाऊ लागला होता. प्रकाशने त्याच्या मित्रांची संगत सोडून दिली होती. नर्मदाला वाटलं की, आता आपल्याला सुखाचे दिवस बघायला मिळतील, पण नर्मदाच्या पाचीला संघर्षच पुजलेला होता, हे तरी तिला कुठं ठाऊक होतं.
सगळं काही सुरळीत चालू असताना अचानक एके दिवशी प्रकाश आपल्या मित्रांसोबत कुठेतरी निघून गेला होता. पुढील दोन ते तीन महिने प्रकाश घरी परत आला नव्हता. प्रकाश घरी नसताना सावकार घरी येऊन त्याने घेतलेले कर्ज मागत होता. दररोज सावकाराची बडबड ऐकून नर्मदाला कंटाळा आला होता, म्हणून तिने तिच्या लग्नात केलेले कानातले मोडून सावकाराचे पैसे फेडून टाकले.
दोन ते तीन महिन्यांनी प्रकाश घरी परत आला. प्रकाशने पुन्हा दारु पिणे सुरु केले होते. प्रकाश पूर्वीसारखा कामाला जात नव्हता. प्रकाशची रात्र पहाटे व्हायला लागली आणि सकाळ दुपारी उगवत होती. नर्मदाला या सगळ्याचा खूप कंटाळा आला होता. नर्मदा घरातील दररोजच्या वादविवादाला कंटाळली होती. नर्मदाच्या जावेचं म्हणणं होतं की, प्रकाश काहीच कमवत नाही, तर त्याला आणि नर्मदाला आपण फुकटचे का म्हणून पोसायचे?
नर्मदाच्या जाऊबाईची इच्छा होती की, नर्मदा व प्रकाशला वेगळं रहायला काढून देण्यात यावे, म्हणजे प्रकाशला त्याच्या जबाबदारीची जाणीव होईल. प्रकाश सुधारत नसल्याने त्याला व नर्मदाला वेगळं रहाण्यास काढून दिले. कुत्र्याचं शेपूट बाटलीत घालून सरळ केलं तरी ते वाकडंच राहतं, अगदी प्रकाशच्या बाबतीत सुद्धा तसंच झालं. प्रकाश काही सुधारायचं नाव घेत नव्हता.
पाच किलोमीटरवर रेशनचे दुकान होते, तिथे जाऊन नर्मदाला गहू तांदूळ घेऊन यावे लागायचे. प्रकाशला घरात काही आहे, काही नाही, याचं काहीच पडलेलं नसायचं. नर्मदाला ठाऊक होतं की, आपल्याला माहेरी जाऊन राहता येणार नाही. आपल्याला इथेच आयुष्य काढावं लागेल.
एकदा एका नातेवाईकाच्या लग्नासाठी म्हणून प्रकाश व नर्मदा त्याच्या मावशीकडे गेले होते. लग्न झाल्यावर नर्मदा प्रकाशला म्हणाली,
"मी एका दिवसासाठी माझ्या माहेरी जाऊन येते."
प्रकाश म्हणाला,
"तु एकटी टमटमने कशी जाणार?"
नर्मदा म्हणाली,
"मी लोकलने जाते. यावेळी लोकलला फारशी गर्दी राहत नाही."
प्रकाश म्हणाला,
"ठीक आहे, तु उद्या दुपारपर्यंत परत ये. आपल्याला घरी परत जायचं आहे."
नर्मदा सोबत नसल्यावर प्रकाशला बिनधास्त दारु पिऊन लोळता येईल, हा विचार करुन त्याने नर्मदाला एकटीला जाऊ दिले. नर्मदाला त्यावेळी सातवा महिना होता. नर्मदा लोकलची वाट बघत रेल्वेस्टेशनवर बाकड्यावर बसली होती.
नर्मदाच्या डोक्यात विचार आला की, आपल्या मुलालाही आपल्या सारखं संघर्षमय आयुष्य जगावे लागेल, त्याचा बाप फक्त नावाला असेल, तो त्याच्यासाठी काहीच करणार नाही. मी ह्या बाळाला जन्म देऊन त्याला काय देऊ शकणार आहे? पुढे जाऊन दोन वेळची भाकरी सुद्धा त्याला मिळेल की नाही? हे मी सांगू शकत नाही. दररोज भाकरी मिळण्यासाठी मलाच केवढी धडपड करावी लागत आहे. घरी गेलं तर आई सांगते की, तुझं लग्न झालंय आता, समाज नाव ठेवेल म्हणून मला सासरी नादावंच लागेल. दररोज थोडं थोडं मरण्यापेक्षा एकदाचा जीव दिला तर माझी तर या सगळ्यांतून सुटका होईलच, शिवाय माझ्या बाळाला सुद्धा हा त्रास सहन करावा लागणार नाही.
नर्मदाने आत्महत्या करण्याचा पूर्णपणे विचार केला होता. तेवढ्यात नर्मदाच्या समोर एक रेल्वे येवून उभी राहिली. नर्मदा त्या रेल्वेत जाऊन बसली. पुढे दोन तीन स्टेशननंतर नर्मदा रेल्वेतून खाली उतरली. नर्मदाने मनाशी ठाम केलं होतं की, आता जी रेल्वे येईल, तिच्या समोर जाऊन उभं रहायचं आणि आत्महत्या करायची. नर्मदा रेल्वेची वाट बघत रुळापासून जवळ उभी होती, तेवढ्यात एक अपंग आजी येऊन तिला म्हणाली,
"पोरी तु रुळाच्या एवढ्या जवळ का उभी आहेस? अचानक एखादी रेल्वे आली तर तुझा जीव जाईल."
नर्मदा म्हणाली,
"आजी मला जीवचं द्यायचा आहे."
ती आजी म्हणाली,
"पोरी तुला जीव द्यायचा असेल तर खुशाल दे, पण मी काय म्हणते? तेवढं ऐक."
एकही रेल्वे येत नसल्याने नर्मदाला बाजूला येऊन त्या आजीचे बोलणे ऐकावेच लागले. आजी व नर्मदा एका बाकड्यावर बसल्या.
आजी म्हणाली,
"पोरी तुझ्या चेहऱ्यावरुन तु किती दुःखात असशील? ह्याची कल्पना मला आली आहे. मला एक सांग, तु जीव द्यायला आलीस, हे तुझ्या आईला माहीत आहे का?"
नर्मदा म्हणाली,
"आजी माझ्या आईला माहीत असतं, तर तिने मला इकडे येऊ दिलं असतं का? आजी मी माझ्या आयुष्याला खूप वैतागले आहे. नवरा काही कामधंदा करत नाही. दररोज रात्री दारु पिऊन घरी येतो. मी गरोदर असल्याचं सुद्धा त्याला भान नाहीये."
आजी म्हणाली,
"म्हणजे तु तुझ्या बाळाचा आज खून करायला निघाली आहेस, या जगातील कुठलीच आई आपल्या बाळाचा जीव घेत नाही."
नर्मदा वैतागून म्हणाली,
"आजी माझ्या बाळाला जन्माला घालून त्याला मी काहीच देऊ शकणार नाही, त्याला माझ्यासारखंच गरिबीत जगावं लागेल."
आजी म्हणाली,
"तु तुझ्या बाळाची आई आहेस, त्याला जन्म द्यायचा की नाही? हे सर्वस्वी तुला ठरवायचं आहे. पण तुला ज्या बाईने नऊ महिने पोटात वाढवलं, तुला जन्माला घालताना असंख्य वेदना सहन केल्या, त्या बाईला न विचारता तु जीव देऊ शकत नाही. पोरी जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात नसतात, ते सगळं त्याच्या आदेशाने होत असतात. तु धडधाकट दिसत आहेस. माझ्यासारखं अपंगत्व तुझ्या नशिबी नाहीये. बाळाला जन्म दे, नवरा काम करत नसेल, तर स्वतः कष्ट कर. माझ्यासारखी एकटी अपंग बाई जीवाला अजून कंटाळली नाहीये. तु तर धडधाकट आहेस. कष्ट कर, भरपूर काम कर. तुझं बाळ हे तुझ्या आयुष्याचा जगण्याचा धागा असेल. अशी सहजासहजी हार मानू नकोस. अजून तुला खूप आयुष्य जगायचं आहे. आपल्या बाळाचा जीव घेऊन तुला काहीच मिळणार नाही."
नर्मदाला त्या आजीचे बोलणे पटले होते. नर्मदा घरी जाणाऱ्या रेल्वेत बसली आणि निघून गेली.
नर्मदाच्या आयुष्यात पुढे काय घडेल? बघूया पुढील भागात….
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा