Login

'ती'चा संघर्षमय प्रवास भाग १ ६

Struggle Story Of One Woman

'ती'चा संघर्षमय प्रवास भाग १६


आपण मागील भागात बघितलं की, प्रकाशच्या मावशीने त्याला समजावून सांगितल्यावर तो चांगलं वागायला लागला होता. मित्रांची संगत सोडून कामधंदा करायला लागला होता. सगळं काही सुरळीत चालू असताना अचानक प्रकाश दोन ते तीन महिने कुठेतरी निघून गेला. प्रकाशला पुन्हा दारुचे व्यसन लागले होते. पुण्यात एका लग्नासाठी गेल्यावर नर्मदाच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता, ती जीव देण्यासाठी रेल्वेस्टेशनवर जाऊन उभी राहिली होती, पण तिला एका अपंग आजीने अडवले.


आता बघूया पुढे….


नर्मदा एका लोकलमध्ये बसून आपल्या माहेरच्या दिशेने गेली. रेल्वेस्टेशनवर उतरुन ती चालत आपल्या माहेरी पोहोचली. नर्मदाला असं अचानक आलेलं बघून तिच्या आईबाबांना खूप आनंद झाला होता, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून नर्मदा मनातल्या मनात म्हणाली,


"मी जर काही वेळापूर्वी माझा जीव दिला असता तर, आईबाबांच्या चेहऱ्यावरील हा आनंद मला कधीच बघायला मिळाला नसता."


त्या दिवशी रात्री नर्मदा तिथेच राहिली. नर्मदाने आपल्या भावंडांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या. नर्मदाच्या आईने तिच्या आवडीचा स्वयंपाक बनवला होता.


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नर्मदा प्रकाशच्या मावशीकडे गेली, तेथून नर्मदा व प्रकाश हे दोघेजण गावी परत गेले. नर्मदाला आठवा महिना चालू असताना नर्मदाच्या बहिणीचे म्हणजे रमाचे लग्न जमले होते. नर्मदाचं बाळंतपण आणि रमाचे लग्न एकत्र आल्यामुळे तिच्या आई बाबांची चांगलीच धांदल उडाली होती. नर्मदा आठव्या महिन्यातच बाळंतपणासाठी म्हणून माहेरी गेली होती. 


रमाचे लग्न एकदम साध्या पद्धतीने करण्यात आले होते. रमाचे लग्न झाल्यावर काही दिवसांतच नर्मदाला मुलगा झाला. नर्मदाचे बाळंतपण घरीच करण्यात आले होते. प्रकाश बाळाला बघण्यासाठी आला तेव्हाही तो खूप दारु प्यायलेला होता. 


आईकडे एक महिना राहिल्यानंतर नर्मदा आपल्या सासरी निघून गेली, कारण रमाच्या लग्नासाठी व नर्मदाच्या बाळंतपणात बरेच पैसे खर्च झाले होते. नर्मदाच्या बाबांनी नातेवाईकांकडून पैसे उसने घेतले होते, ते त्यांना वेळेत परत करावे लागणार होते, म्हणून तिच्या आईला सुद्धा कामाला जावे लागणार होते. नर्मदा माहेरी राहिली असती तर तिच्या आईला कामाला जाता आले नसते.


सासरी गेल्यावर नर्मदाला तिच्या सासूबाईंनी बरीच मदत लाभली. प्रकाश काही सुधारायचं नाव घेत नव्हता. एके दिवशी दुपारच्या वेळी प्रकाश शुद्धीत होता, तेव्हा नर्मदा म्हणाली,


"अहो मला तुमच्यासोबत थोडं बोलायचं आहे."


"बोल ना" प्रकाशने उत्तर दिले.


नर्मदा म्हणाली,

"आपल्याला आता एक मुलगा झाला आहे. असं कामधंदा न करता किती दिवस काढायचे? इकडे गावात मलाही फारसं काम मिळत नाही आणि शिवाय पैसेही कमी मिळतात. आपण मावशींच्या एरियात रहायला जाऊयात, म्हणजे त्यांच्या ओळखीने मलाही काम मिळेल."


नर्मदाला प्रकाश कडून ज्या उत्तराची अपेक्षा नव्हती, तेच उत्तर मिळाले,

"नर्मदा तु म्हणते ते खरे आहे. आपल्याला सुरजच्या भवितव्याचा विचार करावा लागेल. आपण मावशीकडे रहायला गेलो तर माझी दारु सुटायलाही मदत होईल. माझा भाऊ आणि वडील पण आपल्या संसाराकडे बघत नाहीयेत. मी मावशीकडे जाऊन तिला आपल्यासाठी खोली बघायला सांगतो, मग मी तुला आणि सुरजला येथून घेऊन जाईल."


नर्मदा हसून म्हणाली,

"चालेल." 


प्रकाश दुसऱ्या दिवशी लगेच आपल्या गावावरुन मावशीकडे गेला, तिथे जाऊन त्याने मावशीच्या मदतीने एक खोली शोधली. स्वतःसाठी एका ठिकाणी काम सुद्धा बघून ठेवलं. गावी जाऊन तो नर्मदा व सुरजला प्रकाश घेऊन आला. नर्मदाला आपला संसार आता मार्गी लागेल असं वाटायला लागलं होतं. गावावरुन येताना आपल्यासोबत आणलेली थोडीफार भांडी नर्मदाने त्या खोलीत लावली होती.


काही वेळाने प्रकाशची मावशी तिथे येऊन म्हणाली,

"प्रकाश तुझं काम उद्यापासून सुरु होईल. वेळेवर कामाला जात जा, मन लावून काम करत जा, म्हणजे मालक तुझ्यावर खुश होईल."


नर्मदा म्हणाली,

"मावशी माझ्यासाठी पण एखादं काम शोधा ना?"


प्रकाशची मावशी म्हणाली,

"तु कामावर गेल्यावर सुरजला कोण सांभाळेल? त्यापेक्षा तु घरीच राहत जा."


प्रकाश म्हणाला,

"नर्मदा मावशी म्हणते ते बरोबर आहे. मी काम करुन पैसे कमवतो, तु घर आणि सुरजला सांभाळण्याचं काम कर."


नर्मदा म्हणाली,

"ठीक आहे."


दररोज प्रकाश लवकर उठून कामाला जाऊ लागला. नर्मदा त्याला डबा बनवून द्यायची. प्रकाश निघून गेल्यावर नर्मदा घरातील कामं आवरुन घ्यायची. दिवसभर सुरज आणि ती असे दोघेच घरात रहायचे. दुपारच्या वेळी आजूबाजूच्या बायकांसोबत बोलण्यात नर्मदाचा वेळ निघून जायचा. नर्मदाचा स्वभाव चांगला असल्याने तिच्यासोबत आजूबाजूच्या बायका स्वतःहून बोलायला यायच्या.


महिनाभर सगळं सुरळीत चालू होतं. प्रकाशच्या पगाराचा दिवस होता, त्यादिवशी प्रकाश लवकर घरी न परतल्याने नर्मदाला प्रकाशची काळजी वाटू लागली होती. प्रकाशची मावशी नर्मदाच्या सोबत तिच्या खोलीत येऊन बसली होती. काही वेळानंतर प्रकाश दारु पिऊन घरी परतला होता. प्रकाशला दारुच्या नशेत बघून नर्मदाचा जीव संतापला होता, तिला प्रकाशचा खूप राग आला होता. नर्मदाने त्याच्याकडचे पैसे मोजले तर निम्मा पगार घेऊन तो आला होता.


नर्मदा प्रकाशच्या मावशीकडे बघून म्हणाली,

"मावशी बघितलं, हा माणूस निम्मा पगार दारुत उडवून आला आहे, ह्याला कुठेही घेऊन जा, हा दारु काही सोडणार नाही. मी कुठल्या जन्मात एवढं पाप केलं होतं की, ह्या जन्मात असा नवरा पदरी पडला आहे."


प्रकाशची मावशी म्हणाली,

"नर्मदा आत्ता ह्याला काही बोलून उपयोग होणार नाही. उद्या शुद्धीत आल्यावर मी याची चांगलीच खरडपट्टी काढते."


दुसऱ्या दिवशी प्रकाश दुपारी झोपेतून उठला, झोपेतून उठल्यावर त्याने बघितलं तर, नर्मदा घरात नव्हती. प्रकाशने घराबाहेर बघितलं तरी नर्मदा त्याला दिसली नाही, म्हणून तो त्याच्या मावशीच्या घरी गेला तर, त्याची मावशी घरी नव्हती. नर्मदा अचानक कुठे निघून गेली? हे प्रकाशला समजत नव्हते. 


संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान नर्मदा सुरजला घेऊन घरी आली, ती आल्यावर प्रकाश रागाने म्हणाला,

"दिवसभर कुठं तोंड काळ केलं होतं? मला काही सांगून जाण्याची पद्धत आहे की नाही?"


नर्मदा म्हणाली,

"तुम्ही माझ्यासोबत व्यवस्थित बोला. एक दिवस मी न सांगता बाहेर गेले तर तुम्हाला इतका राग आला. तुम्ही तर नेहमीच असे न सांगता बाहेर निघून जातात."


प्रकाश स्वतःला शांत करत म्हणाला,

"पण तु गेली कुठे होतीस? आणि तेही सुरजला बरोबर घेऊन गेलीस."


नर्मदा म्हणाली,

"मला एका पाळणाघरात काम मिळालं आहे. मी दररोज तिथे कामाला जात जाणार आहे. सुरजला घेऊन मी या पाळणाघरात जाऊ शकते."


प्रकाश म्हणाला,

"मी कमवून आणलेलं तुला पुरतं नाही का?"


नर्मदा म्हणाली,

"तुम्ही निम्मा पगार दारुत उडवला तर आपल्या तिघांचा खर्च कसा काय भागेल? तुम्ही कितीही म्हणालात, तरी मी कामाला जाणार आहे. तुम्ही मला अडवू शकत नाही."


नर्मदाने कामाला जावं असं प्रकाशला अजिबात वाटत नव्हतं. नर्मदाचा कामाला जाण्याचा निश्चय ठाम असल्याने प्रकाश काही करु शकला नाही. नर्मदा कामाला जायला लागल्यापासून प्रकाशने कामावर जाणे सोडून दिले होते. नर्मदा कडून दारु पिण्यासाठी भांडून प्रकाश पैसे घ्यायचा. घरात तमाशा नको म्हणून नर्मदा त्याला पैसे देऊन टाकायची.


पुढील दोन तीन महिने सगळं सुरळीत चालू होतं. अचानक एके दिवशी नर्मदाची सासूबाई वारल्याचा निरोप गावावरुन आला,म्हणून प्रकाश व नर्मदा गावाकडे गेले. सासूबाईंच्या क्रियाकर्म करण्यासाठी लागणारे पैसे एका बचत गटाकडून घेतले होते, ते कर्ज नर्मदाच्याच माथी मारले गेले. बचतगटाचं पूर्ण कर्ज फेडल्याशिवाय गावातून जायचे नाही, अशी ताकीद तिच्या जाऊबाईने नर्मदाला दिली. नाईलाजाने नर्मदाला गावीच रहावे लागले.


नर्मदा दररोज शेतात मोलमजुरी करुन थोडेफार पैसे जमवत होती. बचत गटात दरमहिन्याला पैसे भरल्यावर नर्मदाकडे फारसे पैसे शिल्लक राहत नव्हते. जेवढे पैसे रहायचे ते प्रकाश तिच्याकडून भांडून घ्यायचा. नर्मदाच्या घरापासून दहा किलोमीटर अंतरावर एक संस्था होती, ती संस्था गोरगरीब लोकांना दर महिन्याला ५किलो तांदूळ आणि १० किलो गव्हाचे पीठ वाटप करायची. नर्मदा तिथपर्यंत पायी जाऊन तांदूळ आणि गव्हाचे पीठ घेऊन यायची, त्यातच एक महिना काढायची.


नर्मदाच्या आयुष्यात पुढे काय झाले असेल? हे बघूया पुढील भागात…


©®Dr Supriya Dighe




0

🎭 Series Post

View all