Login

'ती'चा संघर्षमय प्रवास भाग १७

Real Struggle Story Of One woman

'ती'चा संघर्षमय प्रवास भाग १७

आपण मागील भागात बघितले की, नर्मदाला मुलगा झाला, तिचे बाळंतपण माहेरीच झाले होते. दरम्यान तिच्या लहान बहिणीचं म्हणजेच रमाचं लग्न झालं. दोन महिन्यांच्या लहान बाळाला घेऊन नर्मदा आपल्या सासरी गेली. आपल्या बाळाच्या भवितव्यासाठी नर्मदाने प्रकाशला पुण्यात जाऊन काम करण्याचा सल्ला दिला. प्रकाशने नर्मदाचे ऐकले. काही दिवसांत ते दोघेजण पुण्यात शिफ्ट झाले. प्रकाश वेळेवर कामाला जायला लागला होता, तसेच त्याने दारु पिणे सोडून दिले होते.काही दिवसांनी प्रकाश पुन्हा दारु प्यायला लागला. मग नर्मदाने आपल्या बाळाला सोबत घेऊन कामाला जाणे सुरु केले. काही महिन्यांनी नर्मदाची सासू वारल्याने त्या दोघांना पुन्हा गावी जावे लागले.

आता बघूया पुढे…..

बचत गटाचे कर्ज फेडण्यासाठी नर्मदा दररोज कामाला जाऊन पैसे जमवू लागली होती, पण तिच्या विराहित प्रकाश घरातील पैसे दारुमध्ये उधळून यायचा. नर्मदा प्रकाशची तक्रार घेऊन तिच्या दिराकडे गेली तर त्याने नर्मदाला सल्ला दिला की, तुझ्या आईवडिलांकडून पैसे घेऊन ये आणि कर्ज फेड, म्हणजे तुम्हाला पुण्यात परत जाता येईल. प्रकाशच्या दारुड्या वृत्तीला आम्ही काहीच करु शकत नाही.

नर्मदाच्या सासूबाई असत्या तर त्यांनी प्रकाशला चार गोष्टी समजावून सांगितल्या असत्या. नर्मदाचे सासरे तर कोणाला काहीच बोलत नव्हते. नर्मदाला माहेरुन पैसे घेऊन ये म्हणून प्रकाशने तगादा लावणे सुरु केले नव्हते. आपल्या माहेरी किती गरिबी आहे? याची कल्पना नर्मदाला होती, म्हणून नर्मदाने माहेरी जाऊन पैसे न मागणे स्विकारले होते.

सुरज दीड वर्षांचा असताना नर्मदाला दिवस गेले होते. प्रकाश सुधारण्याचं नाव काही घेत नव्हता. प्रकाश काहीच कामधंदा करायला तयार नव्हता. नर्मदाला या सगळ्याचा प्रचंड मनस्ताप व्हायला लागला होता. नर्मदा या सगळ्याला वैतागून काही दिवसांसाठी माहेरी गेली होती, तेव्हा तिने तिच्या आईवडीलांना प्रकाशच्या व्यसनाबद्दल सांगितलं.

नर्मदा म्हणाली,

"आई मी या सगळ्याला जाम वैतागली आहे. मी पोरांना सांभाळू, काम करु की कर्ज फेडू. प्रकाश कशालाच हातभार लावत नाही. दिवसभर दारुच्या नशेत इकडं तिकडं पडलेला असतो."

यावर तिची आई म्हणाली,

"हे बघ पोरी, हे सगळे तुझ्या नशिबाचे भोग आहेत. त्याला आपण काहीच करु शकत नाही. तुला जे आहे ते स्विकारावं लागेल. तुझ्या पदरात एक मुलं आहे आणि पोटात पण एक वाढतंय, त्यांच्यासाठी का होईना? तुला नवऱ्याच्या घरी नांदावचं लागेल."

नर्मदा वैतागून म्हणाली,

"आई तुला मला नेहमी एवढंच सांग. मला ह्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न मात्र करु नकोस. नशिबाचे भोग म्हणून पूर्ण आयुष्य असंच काढायचं का?"

नर्मदाची आई म्हणाली,

"अग पोरी तुला माझ्या बोलण्याचा राग जरी आला तरी मी यापलीकडे काहीच करु शकत नाही. तुला मी माझ्या घरी कायमची ठेऊन घेऊ शकत नाही."

नर्मदा पुढे तिच्या आईसोबत काही बोललीच नाही. दुसऱ्या दिवशी नर्मदा रागारागात आपल्या घरी निघून गेली. नर्मदाने पुढील काही महिन्यांत एकेक पैसा जमवून बचत गटाचे संपूर्ण कर्ज फेडले होते. त्यावेळी नर्मदाला आठवा महिना होता. नर्मदा यावेळी पण बाळंतपणासाठी माहेरी गेली. माहेरी जाताना नर्मदाने प्रकाशला बजावून सांगितले होते की," मी आता या गावात येणार नाही. आपण पुण्यात पुन्हा कामधंदा शोधू आणि तिकडेच राहू."

नर्मदा दुसराही मुलगाच झाला. नर्मदाला मुलीची खूप हौस होती. आपल्या जीवाचं जाणायला आपल्याला एक तरी मुलगी व्हावी अशी नर्मदाची मनापासून इच्छा होती. पण नर्मदाची ही इच्छा काही पूर्ण झाली नाही.

नर्मदाचा दुसरा मुलगा दोन महिन्यांचा झाल्यावर प्रकाश नर्मदाला घेण्यासाठी आला. नर्मदा व प्रकाश आपल्या दोन्ही मुलांना घेऊन प्रकाशच्या मावशीच्या शेजारी रहायला गेले. प्रकाश एका ठिकाणी कामाला जायला लागला होता. नर्मदाचा दुसरा मुलगा लहान असल्याने ती कुठेच कामाला जाऊ शकत नव्हती. 

प्रकाश निम्मा पगार दारुमध्ये उडवायचा. नर्मदा निम्म्या पगारात कसेतरी दिवस काढत होती. दोन तीन महिन्यांनी गावाकडे दुष्काळ पडल्याने नर्मदाचे दिर आणि जाऊ त्यांच्याकडे रहायला आले. एका एवढ्याश्या खोलीत एवढे सगळेजण राहत होती. आधीच प्रकाश पूर्ण पगार हातात देत नव्हता आणि त्यात खायला एवढी तोंड वाढल्याने पैश्यांचं गणित कसं बसवावं? हे नर्मदाला समजत नव्हते.

एक दिवस नर्मदा तिच्या जाऊबाईला म्हणाली,

"ताई दिवसभर आपण दोघी घरातच असतो. तुमची मुलंही मोठी झाली आहेत. सुरज मोठा आहे, पण त्याच्याकडे सतत लक्ष द्यावे लागते. अर्जुन आता सहा महिन्यांचा आहे. तुम्ही आपल्या पोरांचा सांभाळ कराल का? म्हणजे मी दिवसभर बाहेर काहीतरी काम शोधते, तेवढेच आपल्याला चार पैश्यांचा हातभार लागेल. तुम्हाला यांच्या व्यसनाबद्दल तर ठाऊकचं आहे, ते निम्मा पगार दारुत उडवतात. आता आपली खाणारी तोंड पण वाढली आहे. भाऊजी कामाला जातात, पण त्यांना फारसे पैसे मिळत नाही. आपल्या पोरांची खाण्याची आबाळ होण्यापेक्षा मी काहीतरी काम शोधते."

नर्मदाची जाऊबाई म्हणाली,

"सरळ शब्दांत सांग ना की, आम्ही तुला जड झालो आहोत म्हणून. गावाकडे दुष्काळ पडल्याने काही कामधंदा मिळत नाहीये, म्हणून आम्ही आपलं घर समजून इथं आलो होतो."

नर्मदा म्हणाली,

"अहो ताई, तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेत आहात. आपण सगळेचजण हातावरच काम करुन पोट भरणारे आहोत. आपण सर्वांनी मिळून काम केलं, तर दोन वेळेचं जेवण पोटभर खाऊ शकू. दोन महिन्यांपासून घरभाडे थकले आहे. येत्या महिन्यात घरभाडे दिले नाहीतर घरमालक खोली खाली करायला सांगेल, म्हणून माझा जीव चालू आहे. माझे पोरं लहान नसते, तर मी कधीचीच कामाला गेली असती."

तेवढ्यात प्रकाश व त्याचा भाऊ कामावरुन घरी परतले, त्यावेळी नर्मदाची जाऊबाई डोळयात पाणी आणून तिच्या दिराला म्हणाली,

"अहो आपण उद्याच गावाला परत जाऊ. नर्मदाला आपण इथं राहिलेलं आवडत नाही, तिला आपण जड झालो आहोत."

हे ऐकून प्रकाशने नर्मदाच्या जवळ जाऊन जोरात कानफटात मारली. नर्मदा पुढे बोलायला लागली, तर प्रकाशने अजून एक तिच्या कानफटात मारली आणि तो म्हणाला,

"दादा वहिनी कुठेच जाणार नाहीत, ते इथेच राहतील. तुला काही अडचण असेल, तर तु तुझ्या माहेरी निघून जा."

नर्मदाच्या डोळयात पाणी आले तर तिच्या जाऊबाईच्या चेहऱ्यावर हसू उमटले. नर्मदाला तिच्या जाऊबाईचा खूप राग आला होता. नर्मदाने एकदम समजून तिच्या जाऊबाईला पूर्ण परिस्थितीची कल्पना दिली होती, तिने मात्र उलटसुलट प्रकाशच्या मनात काहीतरी भरवून दिले होते.

नर्मदाला स्वतःच्या दुबळेपणाची खूप चीड आली होती. नर्मदाला प्रकाशचा मार खाणे अजिबात आवडत नव्हते. दरवेळी नर्मदा आपल्या पोरांकडे पाहून गप्प बसत होती. आईने सांगितलेली वाक्य तिच्या कानात घुमत होती. 

नर्मदाला त्या रात्री झोप सुद्धा आली नाही. तिचा जीव तळमळत होता. रात्री झोप न लागल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी नर्मदाला जाग आली नव्हती, तर प्रकाशने तिच्या कंबरेत लाथ मारुन तिला उठवले. प्रकाश नर्मदाला इतका मारहाण करायचा, पण तिचे दिर आणि जाऊबाई त्याला कधीच अडवत नव्हते.

नर्मदाने स्वयंपाक बनवला, तिने आपल्या दोन्ही पोरांना जेऊ घातले. स्वतः मात्र काहीच जेवली नाही. नर्मदा आज पूर्णपणे वैतागली होती. नर्मदा विचार करत असतानाच तिला कोपऱ्यात ठेवलेले उंदीर मारण्याचे औषध खाल्ले. नर्मदाने असं काही केलं असेल, हे घरातील कोणालाच ठाऊक नव्हते. नर्मदाने आपल्या दोन्ही पोरांच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला. नर्मदाच्या डोळयात आलेले पाणी सुरजने आपल्या हाताने पुसले, तेव्हा नर्मदाला अजून रडायला आले. आपण उंदराचे औषध खाऊन चूक तर नाही केली ना? हा प्रश्न तिच्या मनात उभा राहिला. नर्मदाला पोटात दुखायला लागले होते, तसेच गरगरायला लागले होते. 

नर्मदा आपल्या दोन्ही पोरांना हाताशी धरुन कशीबशी पीसीओ जवळ गेली, तिथे जाऊन तिने तिच्या वडिलांना फोन केला. नर्मदाने तिची तब्येत बरी नसल्याची कल्पना आपल्या वडिलांना दिली, तसेच घरातील कोणीच तिच्याकडे लक्ष देत नाही, असे सांगितले. नर्मदाचे वडील मग तिला घ्यायला तिच्या घरी गेले, तोपर्यंत नर्मदाची तब्येत खूप बिघडली होती. नर्मदाच्या वडिलांनी नर्मदा व तिच्या दोन्ही पोरांना घेऊन आपल्या घराच्या दिशेने मार्गस्थ झाले. नर्मदाचे वडील येईपर्यंत तिला काय झाले? हे सुद्धा तिच्या घरातील लोकांपैकी कोणीच विचारले नव्हते.

नर्मदाला घरी जाईपर्यंत उलट्या व्हायला लागल्या होत्या. नर्मदाला रक्ताची झालेली उलटी बघून तिचे वडील खूपच घाबरले होते.

नर्मदा वाचेल का? बघूया पुढील भागात…

©® Dr Supriya Dighe