Login

'ती'चा संघर्षमय प्रवास भाग ६

Narmada Is Getting Married

'ती'चा संघर्षमय प्रवास भाग ६


आपण मागील भागात बघितले की, नर्मदासाठी तिच्या आजोबांनी एक स्थळ आणलं होतं, ते स्थळ तिच्या वडिलांना पसंत नव्हते. नर्मदाच्या आईला मात्र ते स्थळ नर्मदाच्या योग्य वाटले होते.


आता बघूया पुढे…


नर्मदाने सुचविल्याप्रमाणे तिच्या आईने हरी काकांना दुसऱ्याच दिवशी फोन करुन घरी बोलावून घेतले. हरी काका घरी आले, तेव्हा नर्मदाचे वडील घरी नव्हते. या संधीचा फायदा घेऊन नर्मदाच्या आईने हरी काकांना घडलेल्या प्रसंगाची इतमभूत माहिती दिली. सगळं काही ऐकून घेतल्यावर हरी काका म्हणाले,

"शांता तु ज्या मुलाबद्दल मला सांगितलंस, त्या घरात माझ्या एका दूरच्या मावस भावाची मुलगी दिलेली आहे. लोकं तसे चांगले आहेत, पण एकदा नजरेखालून घातल्याशिवाय आपण ठोस निर्णय घेऊ शकत नाही."


नर्मदाची आई म्हणाली,

"हरी भाऊजी माझंही हेच म्हणणं आहे, पण हे अजिबात ऐकायला तयार नाहीये, ते ह्या स्थळाला नाहीच म्हणत आहेत."


हरी काका म्हणाले,

"मी राजाराम सोबत बोलून बघतो."


हरी काका व नर्मदाच्या आईचं बोलणं चालू असतानाच नर्मदाचे वडील घरी येतात. हरी काकांना आपल्या घरी आलेलं बघून ते म्हणाले,

"अरे हरी, असं अचानक कसं काय येणं केलंस? येण्याआधी काही कळवलं सुद्धा नाहीस."


यावर हरी काका म्हणाले,

"एका नातेवाईकाकडे याच एरियात आलो होतो. बऱ्याच दिवसापासून आपली भेट झाली नव्हती, म्हणून म्हटलं चला आज राजारामला भेटून येऊयात."


नर्मदा कामावरुन परत आली होती, तिला बघून हरी काका म्हणाले,

"राजाराम मुलगी वयात आली म्हणायचं. माझ्या नजरेत एक दोन स्थळ आहेत, बघूयात का?"


नर्मदाचे वडील म्हणाले,

"हरी अजून एखादं वर्ष थांबावं, असा माझा विचार आहे."


हरी काका पुढे म्हणाले,

"अरे राजाराम अजून एखादं वर्ष थांबलास, तर हातातील चांगली स्थळं निघून जातील. आपल्यात एवढ्या दिवस थांबत नाहीत."


नर्मदाचे वडील म्हणाले,

"हरी तुझं म्हणणं खर आहे. तुझ्या नात्यातील आणि पाहण्यातील एखादा मुलगा असेल, तर बघूयात मग. दोन तीन दिवसांपूर्वी नर्मदाच्या आजोबांनी पण एक स्थळ आणलं होतं. आता तुम्ही सगळेच नर्मदाचं लग्न करुयात असं म्हणताय, तर मी एकटाच नाही का म्हणू? पुढच्या वर्षी जर चांगलं स्थळ भेटलं नाही, तर उगाच माझ्यावर सगळेजण मोडता घालतील."


हरी काका म्हणाले,

"तु येण्याआधी माझं आणि शांताचं हेच बोलणं चालू होतं, त्यावरुन मला समजलं की जे स्थळ नर्मदाच्या आजोबांनी आणले आहे, त्याच घरात माझ्या एका दूरच्या मावस भावाची मुलगी दिलेली आहे. लोक चांगली आहेत. आपण दोघे जाऊन एकदा त्या मुलाला नजरेखालून घालून घेऊ, मग पुढचं ठरवूयात."


यावर नर्मदाचे वडील म्हणाले,

"तु जसं म्हणशील तसं. आपण उद्याच मुलाच्या घरी जाऊयात."


नर्मदाची आई म्हणाली,

"हरी भाऊजींची भाषा तुम्हाला बरोबर कळली. मी हेच तुम्हाला जीव तोडून सांगायचा प्रयत्न करत होते, तर तुम्हाला काही माझं म्हणणं पटतं नव्हतं."


हरी काका हसून म्हणाले,

"शांता सोनाराने कान टोचावे लागतात, ही म्हण काही खोटी नाही."


दुसऱ्या दिवशी नर्मदाचे वडील, आजोबा आणि हरी काका नर्मदासाठी मुलगा बघायला गेले. नर्मदाच्या वडिलांनी स्वतः मुलाच्या घरच्यांना अनेक प्रश्न विचारुन स्वतःच्या शंकांचे निरसन करुन घेतले. मुलाच्या घरुन परत आल्यावर नर्मदाची आई म्हणाली,

"मुलाकडची मंडळी तुम्हाला कशी वाटली?"


नर्मदाचे वडील म्हणाले,

"मुलाकडच्या माणसांना माणुसकी आहे. आपल्यासारखेच साधे सरळ लोकं आहेत. हरीने गावात चार दोन लोकांजवळ चौकशी केली, तर त्यांनी पण त्या मुलाच्या घरच्यांबद्दल चांगलंच सांगितलं. मुलगा चेहऱ्यावरुन निर्व्यसनी वाटला.दोन दिवसांनी ते लोकं नर्मदाला बघायला येणार आहेत. मग बघू पुढे काय होईल?"


नर्मदाची आई हसून म्हणाली,

"तुमचा होकार आहे म्हणायचं."


नर्मदाचे वडील म्हणाले,

"हो, मला एक दोन जणांनी त्या मुलाबद्दल खूपच वाईट साईट सांगितलं होतं. स्वतःच्या डोळयांनी बघितल्यावर मला खरं काय ते कळालं. हे लग्न जमलं तर आपल्या नर्मदाचं भाग्य उजळेल, यात शंकाच नाही."


पुढील दोन दिवसांनी मुलाकडचे येऊन नर्मदाला बघून गेले. नर्मदा त्यांना खूप आवडली होती, त्यांनी लगेच आपला होकार सांगून टाकला.मुलाकडची मंडळी निघून गेल्यावर नर्मदाचे वडील नर्मदाला म्हणाले,

"नर्मदा पोरी तुला नवरा मुलगा कसा वाटला? तुला पसंत असेल तरच आपण पुढे जाऊयात."


नर्मदा लाजून म्हणाली,

"बाबा ते माझ्यापेक्षा दिसायला खूप उजवे आहेत, त्यांना मी कशी काय पसंत पडले? हाच मला प्रश्न पडला आहे. तुम्हाला जर ते पसंत असतील तर मलाही पसंत आहेत."


नर्मदाचे वडील म्हणाले,

"अग पोरी सगळेच लोक रुप पाहत नाहीत, त्यांनी तुझे गुण पाहिले असतील. तु माझ्या गुणाची लेक आहेस."


नर्मदाची आई म्हणाली,

"बरं मग त्यांना आपला होकार कळवून टाकायचा ना?"


नर्मदाचे वडील म्हणाले,

"हो मग."


अश्या रीतीने शेवटी नर्मदाचे लग्न प्रकाश सोबत जमले. प्रकाश दिसायला नर्मदापेक्षा खूप चांगला होता. प्रकाशच्या घरच्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा नर्मदाच्या घरच्यांपेक्षा चांगली होती. नर्मदाचे वडील सुरवातीला प्रकाशला नाही म्हणत होते, पण काही दिवसांनी ते या लग्नासाठी स्व:खुशीने तयार झाले होते.


नर्मदा व प्रकाशच्या लग्नाचा खर्च दोन्ही कडच्यांनी अर्धा अर्धा करण्याचे ठरवले होते. आता लग्न झाल्यावर आपल्याला दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करावी लागणार नाही, या विचाराने नर्मदा खूप जास्त खुश झाली होती, तिला वाटतं होतं की, प्रकाश सोबत लग्न झाल्यावर तिचं आयुष्य झळाळून निघेल. 


नर्मदा ज्या घरी इतक्या वर्ष काम करत होती, त्यांनी नर्मदाला लग्नाची भेट म्हणून सोन्याचे कानातले दिले होते. नर्मदाने आजवर प्रामाणिकपणे काम केल्याचं बक्षिस तिला मिळालं होतं.


नर्मदाचं लग्न महिन्यावर येऊन ठेपलं असताना आजूबाजूच्या लोकांनी, नातेवाईकांनी तिला केळवणासाठी आपल्या घरी बोलावून फुल नाहीतर फुलाची पाकळी दिली. नर्मदाच्या लग्नाच्या निमित्ताने तिची आत्या, काकू त्यांच्या घरी आल्या. नर्मदाची बहीण रमा, सरिता आणि भाऊ रमेश खूप आनंदात होते. नर्मदाच्या घरी त्यांचे सर्व नातेवाईक लग्नासाठी गोळा झाले होते. नर्मदाच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघायला मिळत होता. 


नर्मदाच्या वडिलांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे नर्मदाचं लग्न प्रकाश सोबत थाटामाटात करुन दिलं. नर्मदा सासरी जाताना तिच्या लहान बहीण भावाच्या डोळयात पाणी तरळले होते. नर्मदाची पाठवणी करताना तिचे वडील सगळयात जास्त रडले होते. 


सासरी गेल्यावर सासरचे घर बघून नर्मदा मनोमन खुश झाली होती. सासरच्या घरी नर्मदा व प्रकाशला रहाण्यासाठी स्वतंत्र खोली होती. लग्नानंतरच्या दुसऱ्या दिवशी प्रकाशने नर्मदाला एक साडी भेट म्हणून दिली होती. साडी बघून नर्मदाला खूप आनंद झाला होता, कारण आजवर तिला अशी भेट कोणीच दिली नव्हती. 


नर्मदाची सासू, जाऊबाई नर्मदासोबत अतिशय प्रेमाने वागत, बोलत होत्या. पहिल्या मुळासाठी नर्मदाला घ्यायला तिचे काका गेले होते. नर्मदा घरी आल्यावर तिच्या चेहऱ्यावरील आनंद बघून नर्मदाचे वडील सुखावले होते. नर्मदासाठी प्रकाशला निवडून आपण काहीच चूक केली नाहीये, हा विश्वास तिच्या वडिलांना पटला होता.


पुढील दोन तीन दिवसांनी नर्मदा सासरी गेली. नर्मदाच्या सासूबाईने प्रकाश व तिला त्यांच्या कुलदैवताच्या दर्शनाला पाठवले, त्यांचं कुलदैवत बऱ्याच लांब होतं. दोन तीन दिवसांचा प्रवास होता. नर्मदा असा प्रवास तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच करत होती. संपूर्ण प्रवासात प्रकाशने नर्मदाची पुरेपूर काळजी घेतली. नर्मदा प्रकाशच्या प्रेमात पडली होती. नर्मदाला जे पाहिजे ते प्रकाश विकत घेऊन देत होता. प्रकाशने नर्मदाला हॉटेल मधील वेगवेगळे पदार्थ खाऊ घातले.


कुलदैवताच्या दर्शनावरुन परतल्यावर नर्मदा माहेरी गेली होती. माहेरी गेल्यावर तिने प्रकाशचं भरभरुन कौतुक केलं. प्रकाशने घेतलेल्या सर्व वस्तू नर्मदाने आपल्या बहिणींना दाखवल्या, तिच्याकडील वस्तू बघून रमा म्हणाली,

"बाबा मला पण लग्न करायचं. नर्मदा आक्काची किती मजा होत आहे."


यावर नर्मदाचे वडील हसून म्हणाले,

"हो, आपण तुझ्यासाठी नवरदेव बघायला सुरुवात करुयात."


नर्मदाच्या सुखाला कोणाची नजर तर लागणार नाही ना? बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe







0

🎭 Series Post

View all