'ती'चा संघर्षमय प्रवास भाग ९
आपण मागील भागात बघितले की, नर्मदा पहिल्यांदा तिच्या सासरी स्वयंपाक करते, पण तिचं कोणीच कौतुक करत नाही. चहा द्यायला उशीर झाला म्हणून प्रकाशने नर्मदाच्या कानफटात मारलं. प्रकाश काहीच काम करत नाही, हे नर्मदाच्या लक्षात आले होते. प्रकाश दररोज रात्री दारु पिऊन घरी उशिरा यायचा. प्रकाश समोर काहीच बोलण्याची मुभा नर्मदाला नव्हती.
आता बघूया पुढे…
नेहमीप्रमाणे सकाळी नर्मदा स्वयंपाक घरात स्वयंपाक करत होती. नर्मदाची जाऊबाई सुमन तिला येऊन म्हणाली,
"नर्मदा घरातील काम पटपट आवरुन घे. आपल्याला शेजारच्यांच्या शेतात भात लागण करायला जायचं आहे. कामावर जायला थोडा जरी उशीर झाला तरी मुकादम निम्म्या दिवसाचे पैसे छाटून घेतो."
नर्मदा म्हणाली,
"सुमन ताई आपली शेतजमीन असताना आपण दुसऱ्याच्या शेतात कामाला का जायचं?"
सुमन म्हणाली,
"आपल्याला शेतजमीन होती, असं म्हणावं लागेल."
नर्मदा म्हणाली,
"म्हणजे?"
सुमन म्हणाली,
"आप्पांनी आपल्या शेतजमिनीवर कर्ज काढले होते, व्याज व मुद्दल वेळेत जमा न केल्याने सावकाराने आपली जमीन त्यांच्या ताब्यात घेतली आहे. तु तर बघतेच आहे की, प्रकाश भाऊजी व आमचे हे सतत दारुच्या नशेत असतात, त्यांना काम करुन पैसे कमावणे माहीतच नाहीये."
नर्मदा म्हणाली,
"सुमन ताई म्हणजे या सगळयांनी मला फसवले आहे. लग्न करताना शेतजमीन असल्याचे सांगितले होते."
सुमन म्हणाली,
"नर्मदा आत्ता हे बोललीस, पण नंतर कधी बोलू नकोस. ताईंनी ऐकलं तर उगाच प्रकाश भाऊजींचा मार खावा लागेल. पटपट काम आवरुन घे, आपल्याला कामावर जायला उशीर व्हायला नको."
नर्मदाने घरातील काम पटपट आवरुन घेतलं. नर्मदा सुमन सोबत भात लावणीच्या कामाला गेली. नर्मदा भात लावणीचं काम करता येत नव्हतं. सोबतच्या बाया कश्या भातलावणी करत आहेत, याच नर्मदाने निरीक्षण केलं आणि ती हळूहळू भात लावणी करायला शिकली. नर्मदा दररोज घरातील काम आवरुन भात लावणीच्या कामाला जात होती. प्रकाश मात्र दिवसभर गावभर उनाडक्या करत फिरत होता.
नर्मदाच्या वडिलांचा प्रकाशच्या कुटुंबाबतचा पहिला अंदाजचं खरा होता. प्रकाशच्या घरच्यांनी नर्मदा व तिच्या घरच्यांना फसवले होते.
एके दिवशी नर्मदाची काकू अचानक नर्मदाच्या सासरी तिला भेटायला गेली. काकूला आपल्या घरी आलेलं पाहून नर्मदाला खूप आनंद झाला होता. काकूला बघून नर्मदा म्हणाली,
"काकू आज इकडे अचानक कसं काय येणं केलंस?"
काकू म्हणाली,
"इथे गावातच एका लग्नाला आले होते, मग म्हटलं की चला नर्मदाला तरी भेटून येऊयात."
नर्मदा म्हणाली,
"काकू तु आत ये ना, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते."
काकू नर्मदा सोबत स्वयंपाक घरात येऊन बसली. नर्मदाने काकूला पाणी दिले आणि तिच्यासाठी चहा करण्यासाठी चूल पेटवायला लागली, तेव्हा तिची काकू म्हणाली,
"नर्मदा पोरी माझ्यासाठी चहा करु नकोस. मी तुला भेटायला आले आहे, चहा प्यायला नाही."
काकूने नर्मदाला आपल्या जवळ बसण्यास सांगितले.
नर्मदा म्हणाली,
"काकू तु एकटीच लग्नाला आली होतीस का?"
काकू म्हणाली,
"हो, तुझ्या काकांना काम होतं, मग ते म्हणाले की, तु एकटीच लग्नाला जा. तुझ्या घरात कोणीच दिसत नाहीये. सगळे कुठे गेले आहेत?"
नर्मदा म्हणाली,
"ताई आणि आप्पा ह्यांच्या आत्त्याकडे गेले आहेत. सुमन ताई आणि भाऊजी एका लग्नाला गेले आहेत. रात्रीपर्यंत सगळे घरी परततील."
काकू म्हणाली,
"प्रकाशराव कुठे गेलेले आहेत? तेही घरी नाहीयेत का?"
नर्मदा म्हणाली,
"हे कुठे गेलेत? ते मला माहीत नाही. दोन दिवसापासून ते घरी आलेलेच नाहीयेत."
काकू म्हणाली,
"प्रकाशराव कुठे जातात? हे तुला सांगून जात नाहीत का?"
नर्मदा म्हणाली,
"काकू ते मला काही सांगत नाहीत आणि मला त्यांना काही विचारण्याची मुभा नाहीये."
काकू म्हणाली,
"प्रकाशराव तर बोलून चालून चांगले वाटले होते."
नर्मदा डोळयात पाणी आणून म्हणाली,
"काकू आपल्या सगळ्यांची फसवणूक झाली आहे. माझं नशीबचं फुटलं आहे. हे काहीच कामधंदा करत नाहीत. दिवसभर गावभर उनाडक्या करत फिरत असतात. रात्री दारु पिऊन उशिरा घरी येतात. मी काही बोलायला गेले तर लगेच माझ्यावर हात उगारतात. सासू सासरे सुद्धा ह्यांना काहीच बोलत नाहीत. आमची सर्व शेतजमीन सावकाऱ्याच्या ताब्यात आहे. मी व माझी जाऊबाई रोजंदारीने दुसऱ्याच्या शेतात कामाला जातो. दिवसभर घरातील काम करुन पार थकून जाते आणि रात्री हे आल्यावर त्यांचा अत्याचार सहन करावा लागतो. मी केलेल्या कामाचं कोणीचं कौतुक करत नाहीत. थोडं काही जरी चुकलं की सासूबाई ह्यांना सांगतात आणि हे लगेच माझ्यावर हात उचलतात."
नर्मदाला बोलता बोलता भरुन आले होते. काकूने नर्मदाचे डोळे पुसले आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाली,
"हे सगळं तुझ्या आई वडिलांना माहिती आहे का?"
नर्मदा म्हणाली,
"नाही. माझी आणि आई- बाबांची भेटचं झाली नाहीये."
काकू म्हणाली,
"हे बघ पोरी. तुझ्या घरातील लोक वाईट आहेत, नवरा दारुडा आहे, हे फारचं वाईट झालं, पण आपण हे बदलू शकणार नाही. तु माहेरी जाऊन राहिली तर तुझ्या लहान बहिणींची लग्न व्हायला अडचण निर्माण होईल. दोष माणसाचा असला तर लोकं दोष बाईलाचं देतात. मला हे सगळं ऐकून इतका धक्का बसला आहे, तर तुझ्या आई वडिलांना किती मोठा धक्का बसेल. आपल्याकडे सगळेच माणसं दारुडे असतात, त्यात नवीन काहीच नाहीये. तुझ्या आईचं नशीब चांगलं म्हणून तिला निर्व्यसनी नवरा मिळाला."
नर्मदा म्हणाली,
"अग काकू, पण हे सगळं आयुष्यभर सहन करायचं, कसं शक्य आहे ते? हे काही काम करत नाहीत. दररोज दारु पिऊन रात्री उशिरा घरी येतात आणि आपण यावर काही बोलू शकत नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार का सहन करायचा?"
काकू म्हणाली,
"नर्मदा बाईच्या जातीला हे सगळं सहन करावंच लागतं. आता घरात कोणी नाही, म्हणून तु माझ्यासोबत मनमोकळेपणाने बोलू शकत आहेस. घरात कोणी असतं तर तुला एक शब्दही बोलता आला नसता, यालाच सासुरवास म्हणतात. तुझं लग्न होऊन जास्त दिवस झाले नाहीयेत, तेव्हा थोडे दिवस हे सगळं सहन कर. एखादं पोर सोर झालं की तुझा नवरा ध्यानावर येईल, त्याला त्याची जबाबदारी कळेल."
नर्मदा म्हणाली,
"म्हणजे तोपर्यंत मी फक्त वाटचं बघायची का?"
काकू म्हणाली,
"त्याशिवाय आपण काहीच करु शकत नाही."
नर्मदा म्हणाली,
"काकू मला तुमचं सगळं बोलणं कळतं आहे. तु बाबांना मला इथून काही दिवसांसाठी घेऊन जायला सांगशील का? त्यांच्यापर्यंत माझा हा निरोप पोहचवशील का?"
काकू म्हणाली,
"ठीक आहे. मी तुझ्या काकांना तुझ्या बाबांकडं जाऊन तुझा निरोप द्यायला सांगते. माहेरी काही दिवस जाऊन राहिल्यावर तुला सासरी राहण्याची किंमत कळेल. नर्मदा पोरी तु लहान आहेस, तुला हा समाज माहीत नाहीये, तो आपल्याला जगू पण देत नाही आणि मरु पण देत नाही. मी जे काही तुला सांगितलं, ते माझ्या अनुभवाचे बोल होते. बाकी हे आयुष्य तुझं आहे, तुला काय करायचं? हे तुझं तु ठरव."
नर्मदाची काकू तिच्या घरुन निघून गेली,त्यानंतर नर्मदा विचार करत होती की, आपण या अश्या समाजात जन्माला का आलो? जिथे मुलींचे कमी वयात लग्न केले जाते, नवरे दारुडे असले तरी मुलींनीच समजूतदारपणे वागायचे. मुलींना जर त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार नसेल तर त्यांना जन्माला तरी का घालत असतील? हा दोष समाजाचा आहे की लोकांच्या मानसिकतेचा. अशी विचित्र मानसिकता असलेल्या लोकांमध्ये आपण आपल्या मुलाबाळांना जन्म द्यायचा आणि तेही या समाजातील लोकांप्रमाणेच घडतील. मी असं होऊ देणार नाही. माझ्या मुलांना असं घडू देणार नाही. मला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी पाऊल उचलावे लागेल.
नर्मदा काय पाऊल उचलते? ते बघूया पुढील भागात…
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा