Login

तिचा संपलेला प्रवास :भाग 3

तिचा न संपलेला प्रवास
तिचा संपलेला प्रवास :भाग 3


मला मागे पाहायचं धाडस नव्हतं. कसा बसा तो लांबचा प्रवास संपवून मी घरी आले. आठ एक दिवसात मनावर मात्र त्या घटनेचे पडसाद अगदी थोडेसेच राहिले होते. राहून राहून वाटत होतं की तिच्यावर योग्य उपचार होऊ शकतात. मी पूर्वीपासूनच कधी भूत प्रेत, अतृप्त आत्मा वगैरे यांच्यावर विश्वास ठेवला नाही. पण यावेळेस का कोणास ठाऊक किंचितसा विश्वास गाढ झालेला. असं म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यात जे लिहिलं असेल तेच होतं आणि ते सगळं परमेश्वरांनी लिहिलेलं असतं, तेही त्याच्या मनात येईल तसं नाही तर आपल्या कर्मानुसार लिहिलेलं असतं. तेच जेव्हा घडत जातं तेव्हा मात्र आपण आश्चर्याने वेडे होतो.

एक महिना उलटून गेल्यावर मात्र जे कळलं ते ऐकून मी अतिशय हादरून गेले. तिची जीवन यात्रा संपली होती. रात्रीच्या काळ्या अंधारात तिचे श्वास आपोआप शांत झाले होते. असं कळल्यावर सुद्धा मला तिला त्या अवस्थेत पाहण्याची जराही इच्छा नव्हती. मी फक्त माझ्या अहोंना तिच्या अंत्यविधी कार्यासाठी पाठवून दिलं. माझे मिस्टर मात्र बरोबर सगळ्यांच्या तोंडून ऐकू येणारी कुजबूज व्यवस्थित ऐकून आले. त्यांनी जे ऐकलं तसा प्रकार आजपर्यंत पाहिला किंवा ऐकला ही नव्हता. तिच्या घरच्यांसमवेत गावातील लोकांचं म्हणणं हेच होतं की *तिला त्याच्यासोबत जावं लागलं, त्याने तिला जबरदस्ती स्वतः सोबत नेलं.* आता मात्र मी जबरदस्त घाबरून गेले. आमच्या घरात सुद्धा चर्चा सुरू झाली. मी जेव्हा आईला फोन केला तेंव्हा कळलं की तिला याबद्दल सगळंच माहित होतं. मागील तब्बल एक महिना त्या निरागस जीवावर काय काय बेतलं होतं ते सगळं ऐकून माझी शुद्धचं गेली.

माझी आई म्हणाली की, भर लग्नात जेव्हा ती किंचाळली होती तेव्हा कोणाला असं वाटलं नव्हतं की तिची आज अशी अवस्था होईल. तिच्या या अवस्थेला मूळ कारण तिचं लग्न ठरलं. ज्या कुटुंबाशी त्यांनी नाते जोडले होते, त्या कुटुंबाला एक काळा आणि भयानक इतिहास होता. ज्या मुलाशी तिचं लग्न ठरलं होतं त्या मुलाचा सख्खा लहान काका ऐन तारुण्यात त्यांच्या घरातील एका खोलीमध्ये गळफास लावून मरण पावला होता. मरता मरता मात्र तो जे काही बोलला होता ते शब्द श्राप बनून त्या घरात फिरत होते. त्यातल्या त्यात भर म्हणजे ज्या मुलाशी लग्न ठरलं त्याच्या पत्रिकेत काळसर्प दोष अगदी तीव्र होता. माझी आई म्हणाली की ज्या दिवशी त्या मुलाच्या अंगाची उष्टी हळद तिच्या अंगाला लागली त्या दिवशीच तिच्या वागणं खूप विचित्र आणि चिडचिडे झाले होतं. लग्न मंडपात मात्र जेव्हा अंतरपाट दूर झाला तेव्हा तिला त्या नवऱ्या मुलाच्या ऐवजी प्रेतावस्थेत असलेला तो व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला होता आणि हे तिने स्वतः कबूल केलं होतं. मागील महिन्यात अनेक मांत्रिक तांत्रिक, भगत बुवा सगळे प्रकार करून झालेले. देवावर होती नव्हती तेवढी श्रद्धा पणाला लावून आईवडील मुलीच्या आयुष्यासाठी भीक सुद्धा मागून मोकळे झाले होते. सगळे प्रयत्न विफल होऊन शेवटी ती काळाच्या पडद्याआड विलुप्त झाली. ती अनोळखी, अतृप्त आत्मा मात्र तिचा घास घेण्यासाठीच वर्षानुवर्ष तळमळत असल्यासारखा भास झाला. मला तर खूप वेळा असं वाटलं की....नाही हे काहीही खरं नाहीये, हे सगळं खोटं आहे... पण माझं एक मन म्हणायचं गावातल्या हजार लोकांनी जे सांगितले जे अनुभवले.... ते खोटं ठरवणारी मी कोण??? अशा विचारांनीच माझ्या आसवांचा कडेलोट झालेला.

वर्षभरांनी मात्र पुन्हा असं काहीतरी ऐकू येईल असं वाटलं ही नव्हते. ध्यानीमनी नसताना सुद्धा एक अशी विचित्र बातमी ऐकली जी ऐकून काळीज अक्षरशः फाटलं. आणि ती बातमी होती त्या मुलाच्या दुसऱ्या लग्नाची. आणि काय आश्चर्य पहा.... लग्न करून त्या घरात गेलेली ती गोंडस मुलगी काही महिन्यातच गरोदर राहिली आणि शेवटच्या नवव्या महिन्यात मात्र असा काही घात झाला की ते बाळ पोटात जखमी झालं, कुजलं आणि त्या इन्फेक्शनमुळे ती मुलगी सुद्धा जीवानिशी गेली. या प्रकारामुळे त्या कुटुंबाला अनेक दोष देण्यात आले. गावातल्या लोकांनी तर त्यांना ताबडतोब ते घर खाली करण्याचा निर्णय सुनावला. हे सगळं इथे संपत नाही..... त्या मुलाला कुठल्यातरी पवित्र ठिकाणी नेऊन त्याचा कालसर्प दोष, पूजा अर्चना करून नष्ट करण्यात आला. त्या लोकांनी ते घरदार लॉक करून कायमचं सोडून जाणं पसंत केलं. काही दिवसांनी मात्र त्या मुलाचं पुन्हा लग्न लावून देण्यात आलं आणि आत्ता या घडीला ते कुटुंब त्या शापातून पूर्णतः मुक्त झालेलं आहे. या प्रकारात चूक कोणाची? कोण बरोबर? असा विचार करूच नये... कारण ही घटनाच इतकी विचित्र आहे की माझा मेंदू यावर विचार करणं मान्य करत नाही. कारण काहीच धागेदोरे सापडत नाही आहेत. जन्म - मृत्यू आपल्या हातात नसतो, पण कर्माची शिदोरी मात्र अनेकानेक जन्मांपासून आपल्या सोबत घेऊन आपण हा प्रवास चालतच असतो. जो आलेला आहे तो जाण्यासाठीच... पण अशा विक्षिप्त मरणांची गोष्ट मात्र काळासोबत पुढे पुढे चालू राहते, आणि मागे उरतात फक्त आठवणींच्या काळ्या सावल्या.

समाप्त

धन्यवाद : उन्नती सावंत
0

🎭 Series Post

View all