"तुम्हाला कधी जमेल हो बाकीच्या नवऱ्यांसारखं गिफ्ट देणं, सरप्राईज देणं, बायकोसाठी तिला न सांगता साडी आणणं??"
मुकुंद घाबरून तिच्याकडे बघत होता. त्याला कळेचना त्याचं काय चुकलं! तो बिचारा आपापला ऑफिसमधून आला, शांतपणे सोफ्यावर बसला आणि पायातले मोजे काढत होता.
"का गं काय झालं?"
"वर आणखी विचारा काय झालं.."
मुकुंद अजूनच गोंधळला. एकतर मानसीला स्पष्ट बोलायची सवयच नव्हती. मुकुंदला डोक्याला ताण देऊन अर्थ लावावा लागे.
मुकुंद अत्यंत साधाभोळा, मितभाषी आणि सुस्वभावी मुलगा होता. त्याच्या याच स्वभावाला बघून मानसीच्या आई वडिलांनी त्याची निवड केली होती.
एकदा मुकुंद घरी येत असताना सोसायटीतल्या काही तरुण मुली त्याला म्हणाल्या,
"जीजू, तुम्ही अगदी कॉलेज बॉय दिसता.. वाटतच नाही तुमचं लग्न झालं असेल म्हणून.."
मुकुंदच्या चेहऱ्यावरची माशीही हलली नाही आणि भोळेपणाने तो म्हणाला,
"माझं लग्न झालं आहे, पस्तीस वय आहे माझं..कॉलेजला नाही जात मी, माझं कॉलेज कधीच पूर्ण झालं"
त्या मुली हसत निघून गेल्या. घरी आल्यावर मानसीला कळलं तेव्हा तिला हसावं की रडावं कळेना,
"अहो त्या मुलींनी कौतुक केलं तुमचं आणि वर तुम्ही काय केलं? तर म्हणे मी पस्तीसचा आहे..असं कोणी सांगतं का? त्या कौतुक करत होत्या तुमचं.."
"मग मी काय करू.." मुकुंद निरागस चेहरा करत म्हणाला,
"कठीण आहे या माणसाचं.." मानसी डोकं झोडत निघून गेली.
आज मात्र मानसी जास्तच वैतागली होती आणि आल्या आल्या मुकुंदला तिने ऐकवलं,
"गिफ्ट देता येत नाही, सरप्राईज देता येत नाही.."
बोलता बोलता तिच्या हातून काचेचा ग्लास पडला. मुकुंद शांतपणे बसून राहिला, मानसी बडबड करत काचा उचलू लागली.
"थांब थांब, मी उचलतो...तुला लागेल हाताला.."
"असुद्या, झालं काम.."
मानसीची चिडचिड सुरूच होती.
मानसीच्या आजच्या वागण्याला कारणीभूत म्हणजे ती नुकतीच तिच्या मावसबहिणीकडे जाऊन आली होती. मानसीच्या मावसबहिणीचा नवरा- अजय, सर्वांच्या दृष्टीने "हिरो" होता. चारचौघात तो बायकोवर किती प्रेम आहे दाखवत असायचा. तिला सतत गिफ्ट्स, सरप्राईज द्यायचा. बायकोसाठी सतत काही ना काही करायचा, घोळक्यात असला तरी बायकोच्या खांद्यावर हात ठेवणं, तिचा हात धरून चालणं हे वागणं सर्वांच्या नजरेत जायचं आणि त्यातूनच निष्कर्ष निघायचा- "तिचा नवरा किती प्रेम करतो तिच्यावर".
मग नातेवाईकांमध्ये त्यांच्या लेकींसाठी स्थळ बघताना "मुलगा अजयसारखा हवा" असं प्रमाण बनलं होतं. मुलींनाही आपला नवरा अजय जिजूंसारखा असावा असं वाटत असायचं. पण मानसीचं लग्न झालं तेव्हा मुकुंद मात्र अजयच्या अगदी विरुद्ध असं तिच्या लक्षात आलं आणि तिची चिडचिड व्हायला लागली.
एकदा मावसबहिणीने त्यांना जेवायला बोलावलं, अर्धा दिवस मानसी आणि मुकुंद तिच्याकडे होते, तेव्हा जे पाहिलं ते बघून मानसीच्या भ्रमाचा भोपळा फटकन फुटला..
मानसीच्या मावसबहिणीने मानसी आणि मुकुंदला जेवणासाठी बोलावलं. मानसीला वाटलं, अजय जिजूंकडे बघून मुकुंद काहीतरी शिकेल..
मानसी आणि मुकुंद संध्याकाळी पाच वाजता मावसबहिणीकडे गेले. साडेपाच वाजता अजय जीजू घरी आले आणि आल्या आल्या त्यांनी बायकोला त्यांनी आणलेला गजरा दिला. मावसबहीण खुश झाली, इकडे मानसी रागाने मुकुंदकडे बघू लागली, बिचारा मुकुंद म्हणाला,
"काय झालं.."
"बघा..गजरा आणतात बायकोला.."
"मीही आणला होता की"
"कधी?"
"2018 साली.."
मानसीने डोक्याला हात लावला. अजय जीजू फ्रेश होऊन हॉलमध्ये आले आणि गप्पा मारू लागले,
"काय मग, सगळं ठीक ना?"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा