ही वाट दूर आहे...स्वप्नामधील गावा भाग १

एका मुलीची कथा
ही वाट दूर आहे…स्वप्नातील गावा..भाग १


वनिता एक साधी सरळ मुलगी होती .खेड्यात जन्मली तिथेच लहानाची मोठी झाली. संजय आणि सरोज या सर्व सामान्य दांपत्याच्या पोटी जन्माला आली. पहिली मुलगी झाली म्हणून संजय आणि सरोज नाराज झाले नाही. त्यांच्या आजूबाजूला थोडा नाराजीचा सूर उमटला पण तो ऐकूनही दोघांनी त्याला किंमत दिली नाही. त्यांच्या शेजारी राहणारे वृद्ध आबाजी संजयला म्हणाले,

" पयली मुलगी झाली तवा दुस-यांदी प्रयत्न करा जी.

"काऊन आबाजी.माह्यी लेक किती साजरी हाय."

"बाबा ती पोरगी हाय."

"मंग? का झालं?"

"अरं आपल्या चितेला जाळ कोन देनार? स्सर्गात कोन पाठवनार?"

यावर संजय हसला

"काऊन हसते तू?"

"आबाजी सर्ग कोन बघीतला?"

"आपले आदीचे ल्योक म्हनतात त्ये खोटं हाय व्हय?"

"मी मानत नाही.मी आत्ता जिता हावं थोच माया सर्ग हाय. मेल्यानंतर कोनाला कळते वो? आपन कुटं गेलो ते?"

"तू वाद घाल फकस्त. थू ऐकू नको. थुले तेच जमते."

एवढं बोलून आबाजी रागा रागाने निघून गेले.

ते गेले त्या दिशेने बघून हसत संजय आत जायला वळला तर दारात सरोज खूप चिंतेत दिसली.

" काय वो काय झालं?
"थ्ये आबाजी असं काऊन म्हनते?'

"तू काऊन लक्षं देते. या लोकांच्या डोसक्यात सगळा कचरा भरलाय. थू नको काळजी करू. आपली पोरगी लक्षुमी हाय. चल आत. तू अजून बाळत होऊन महिना बी नाय झाला. थ्ये डाकदरीन मले म्हनाली बाळ तीन महिन्यांची होइल तवापोतर बायकोला जास्त डोकेदुखी नको द्या. "

संजय सारखा समजुतदार नवरा मिळाला म्हणून पुन्हा एकदा सरोजने देवाचे आभार मानले.

दोघं आत आले. खाटल्यावर गोधडीवर ते तान्हूला बाळ शांत झोपली होतं.

सरोजला जसे दिवस राहिले तसे संजयने जवळचा थोडा पैसा खर्चून ही खाट पाटलाच्या वाड्यातून खरेदी केली होती. संजयने सरोजला पूर्ण नऊ महिने खाटेवर झोपायला लावलं. स्वत: जमीनीवर झोपला.

सुरवातीला आपण खाटेवर झोपायला सरोज अवघायची. ते बघून एक दिवस संजय सरोजला म्हणाला,

"सरोज तू दोन जीवांची हाय. खालतं जमीनीवर नको झोपू. तू चांगली राहशील तर थे पोटातलं बाळ बी छान राहील नं. आपलं पयलं बाळ हाय. त्याची परवरीश चांगली झाली पायजेल."

आपल्या नव-याचे एवढे जगावेगळे विचार ऐकून सरोज मनातल्या मनात अचंबित झाली. त्यांच्या लग्नाला फक्त दोन वर्ष झाली होती. संजयचा स्वभाव तिला आता हळूहळू कळू लागला होता. आताही सरोज एकदा खाटेवर शांत झोपलेल्या मुलीकडे बघायची एकदा संजय कडे बघायची. तिला असं बघताना बघून संजय म्हणाला,
" काऊन बघून राहिली अशी?

"काय नाय.आपली पोरगी तुमच्याच सारखी शानी व्हाया पायजे असं मले वाटून राहिलं." सरोज हसत म्हणाली.

यावर मस्त हसत संजयने सरोजला आपल्या मिठीत घेतलं.

***

हळुहळू बाळ वनिता मोठी होऊ लागली. वनिता आपल्या वडलांसारखीच खूप शहाणी आणि समजूतदार आहे हे सरोजच्या लक्षात आलं.

यथावकाश त्या छोट्या गावातील शाळेत संजयने वनिताचं नाव टाकलं.

शाळेतही वनिता हूशार आहे असं तिचे मास्तर संजयला म्हणाले तेव्हा संजयला मनोमन आनंद झाला.वनिताची शिक्षणाची ओळख झाली पण फार काळ ती शिकू शकली नाही कारण एक दिवस संजय तिला म्हणाला,

" वने आता शिकू नको."

"काऊन बा ? मले आवडते शिकाले.ते आमचे सर बी छान शिकविते."

"ते सगळं ठीक हाय पोरी.तुले साळा आवडते हे मला मालूम हाय पन तू आमच्या संगट चाल शेतात कामाला. तुझे हात येतील तुज्या मायसंगट तर जल्दी होईल नं काम!"

यावर तिची आई म्हणाली

"मी काय म्हन्तो वनीचे बा. आपल्या गावात साळा सातवी पोतर हाय. जाऊदे नं तिले शिकाची आवड हाय तर. नंतर लांब नाही पाठवू."

"असं म्हनतीस. ठीक जाय मंग साळत."

"अन् ते साळेतून घरला आली की घरचे कामं बी बघतेनं. मले नाय घरचं काम बघा लागत. मी करीन शेतात डबल कामं" सरोज म्हणाली.

"सरोज तुझं बी अंग दुखतया, कमर बी लय दुखते तुझी. मालूम हाय मले. तसं बी सिकून हिला कोणी मडमीण बनवायची हाय?"

"बा मी सातवीपोतर सिकते नंतर नाय मी हट्ट करनार.जाऊ दे नं मले साळत."

वनीताच्या वडिलांनी तिच्या पाठीवर थोपटत हसून होकार दिला.

अशी ही वनिता. समंजस मुलगी होती. आईवडिलांच्या डोळ्यात पाणी आलेलं तिला बघवत नसे.
कशी बशी वनिता सातवी झाली आणि तिचा शिक्षणाशी असलेला धागा तुटला.

***

बरेच दिवस वनिता शाळेसमोरून जाताना आसुसलेल्या नजरेने शाळेकडे बघायची. तिला मनातून शिकावसं वाटत होतं. वनिता खूप समंजस असल्याने आपल्या परिस्थितीची जाण ठेवून वडील म्हणाले तसं तिने वागायचं ठरवलं आणि शिक्षणाला रामराम ठोकला.

***

एक दिवस संध्याकाळी वनीताचा बा संजय घरी जरा उशीराने आला. आला तो आनंदात होता. त्यांचा आनंदी चेहरा बघून सरोजने विचारलं,

" बाप्पा ! आज एवढा आनंद कशापायी झाला?"

"अरं बातमीच तशी हाय. वनि कुटं गेली?"

"थे बसली हाय शेजारच्या रजनीसंगट."

"मले आज पाटील वाड्यातल्या राजेशचा फोन आला व्हता. मी म्हनलं नाय का थो भेटायला ये म्हनला. तर तेला भेटून आलो. थेनं मला वनिसाठी पोरगा सांगितला.'

"काय म्हनतय!" आश्चर्याने सरोजने विचारलं.

"व्हय नागपूरले राह्यते त्यो." संजयने स्पष्टीकरण दिलं.

"काय! नागपूरले?" सरोज चे डोळे विस्फारले.

"व्हय"

"मंग शिरीमंत असतील परवडन का आपल्यास्नी?"

"राजेश म्हने त्यांना हुंडा नको घर सांभाळणारी पोरगी सून म्हून पायजेल. त्येनला पैशाची काय कमी नाय. आपली वनी छान घर सांभाळलं."

"राजेश वळखते का त्या पोराला,पोराच्या घरच्यांना?"
मुलीच्या काळजी पोटी सरोजने प्रश्न केला.

"व्हय राजेशचा साडभाऊ नागपूरले या पोराच्या घराशेजारी राह्यते. राजेश चा साडभाऊ हाय ना बारा वर्स झाली त्येंच्या घराशेजारी राह्यते. पोराला शाळेत असल्यापासून वळखते थ्यो. राजेश म्हनला पोरगं शानं हाय. "

"तुमी का बोलले?"

"मी म्हनलं घरी विचारून सांगतो."

यावर दोघांची अजून साधक बाधक चर्चा झाली आणि पुढे जायचा निर्णय घेतला गेला.

***

बघता बघता वनिताला मुलगा बघायला आला त्याला वनिता पसंत पडली आणि लग्नाचा बार देखील उडाला.

साध्याश्या कपड्यात, काचेच्या हिरव्या बांगड्यात वनिता सुनीलची बायको म्हणून सासरी गेली. सगळं व-हाड गेलं आणि सरोज,संजय उदास होऊन जमीनीवर बसले.

आपल्या पोरींची वेळेवर चांगल्या घरी लग्न ठरलंय म्हणून आनंदात असणारी दोघं घरातील सगळं चैतन्य हरवल्याची भावना जाणवून वनिताच्या आठवणीने कासावीस झाली.

"सरोज आपल्या वनिशी सगळे चांगले लागतील नव्ह?"

"हं समजल सगळं हळूहळू." सरोज वनिताच्या आठवणीने कासावीस झाली.

त्या दिवशी दोघांनाही जेवण गेलं नाही.

_______________________________
खेड्यातील वनिता सून होऊन शहरात गेली.पुढे काय होईल बघू पुढील भागात.


🎭 Series Post

View all