ही वाट दूर आहे..स्वप्नामधील गावा भाग २

एका मुलीची कथा
ही वाट दूर आहे स्वप्नमधील गावा…भाग २

मागील भागात आपण बघीतलं की खेड्यातील वनिता सून होऊन सासरी आली. आता काय घडतं तिच्या जीवनात बघू.

वनीताचा सून म्हणून सुनीलच्या घरी गृहप्रवेश झाला. सासरी तिला सगळेच अनोळखी. ती भिरभिरत सगळीकडे बघत होती. कोणाशी बोलू तिला कळत नव्हतं. वनिता घरातील समोरच्या खोलीत एका भिंतीला टेकून उभी होती.

" लई साजरं घर हाय यांचं. आपलं घर तर सुरू होते का संपून जाते. यांच्या घराले अजून दोन खोल्या हाय वाटतं. मायाशी हे लोग कसे वागतील. ज्याच्या सोबत लगीन केलं थो तर बोलला बी नाय आपल्या संग. माय तुजी लई आठवन येते ग. काऊन मले इतकं लाम देल्ह."

आपल्याच विचारात बुडलेली वनिता घरातील लोकांची ये जा बघत उभी होती.

अचानक तिची जाऊ आली आणि तिला म्हणाली,

" वनिता सासूबाई बोलाऊन राहील्या."

"हो येते."

असं म्हणत वनिता जावेच्या मागे गेली. कालपासून या सगळ्या लोकांची भाषा ऐकून वनिताला खूप छान वाटत होतं. तिला अशी छान भाषा तिचा गावात कधी ऐकायला मिळायची नाही.

"वनिता ते चांगले कपडे काढ आणि कामाला लाग. स्वयंपाक करायचा हाय सगळ्यांचा. "

वनिता सासूच्या बोलण्याने भानावर आली.

" हो करते."

वनिता कपडे बदलत असताना पुन्हा विचारात बुडली. तिला आश्चर्य वाटलं याचं की आपण आत्ताच या घरात आलो. तीही नवी नवरी म्हणून आणि लगेच आपल्याला कामाला लावलं. असं तर आपल्या गावी कोणी कधी केल्याचं तिने बघितलं नाही. मागच्या वर्षी शेजारच्या रजनीच्या भावाच लग्न झालं तेव्हा तिच्या वहिनीला किती कौतुकाने सगळे बोलत होते. वनिताचा डोक्यात विचारांचा गुंता वाढत चालला होता.

तेवढ्यात बाहेरून जाऊ हाक मारत होती. वनिताने झटपट कपडे बदलले आणि बाहेर आली.

सगळा स्वयंपाक करून झाल्यावर वनिताला दमल्या सारखं झालं. तिला आत्ता पर्यन्त एकटीने एवढ्या लोकांचा स्वयंपाक करण्याची सवय नव्हती. वनिताला स्वयंपाक करताना कोणीही मदतीला आलं नाही. सगळे बाहेर गप्पा मारत होते. हसण्याचे फवारे उडत होते.

आज पहिल्यांदाच वनिताने एवढ्या लोकांचा स्वयंपाक केला. त्यामुळे तिला धाकधूक होती की कसं झालं असेल सगळं? आवडेल का सगळ्यांना?

एवढ्या वेळात तिचा नवरा सुनील एकदाही स्वयंपाक घरात डोकावला नाही वनिताशी बोलायला. तिला आश्चर्य वाटलं. त्याला आपल्याशी बोलायची ओढ वाटत नसेल का?

" वनिता झाला की नाही स्वयंपाक?"

जावेच्या बोलण्याने वनिता भानावर आली.

" झाला मंगाशीच" वनिता म्हणाली.

" मग कधी बोलणार? सगळ्यांची ताट लावायला घ्यावं लागेल."

सगळा स्वयंपाक झाला आहे म्हटल्यावर जाऊ भरभर सगळ्यांसाठी जेवायला वाढू लागली.

वनिता यांत्रिक पणे जाऊ म्हणेल तसं करू लागली.

जेवायला सगळे पुरुष खाली बसले. दुसरीकडे वृद्ध बायका आणि पाहुण्या स्त्रिया बसल्या. जाऊ आणि वनिता वाढू लागल्या. वनिता भाजीचा गंज घेऊन वाढू लागली. वाढता वाढता सुनीलच्या ताटापाशी आली आणि वनिताच्या अंगावर रोमांच उठला. कितीतरी वेळाने तिला त्याचं दर्शन झालं होतं तेही अगदी जवळून. वनिताच्या छातीची धडधड वाढली. तिला हातातील भाजीचा गंज खाली पडतो का असं वाटलं. भानावर येत तिने हळूच वर बघत विचारलं,

" भाजी पायजेल का?"

यावर सुनिल बोलण्या अगोदर सासूच बोलली

" अगं विचारते का? तरणाबांड पोरगं हाय माझं. वाढ. तुज्या घरी असं विचारतात का? बयो आम्हाला उपाशीच मारशील."

सासूला काय उत्तर द्यावं न कळून

" हो" म्हणत वनिताने सुनीलला भाजी वाढली.

वनिताला सुनीलच्या डोळ्यात आपल्या नववधूला बघून काहीच भाव दिसले नाही. वनिताच्या अंगावर जसा रोमांच उठला तसे प्रेमाचे, शृंगाराचे भाव सुनीलच्या डोळ्यात वनिताला दिसले नाही. वनिता सुनीलचं हे रूप बघून खूप निराश झाली. नंतर वाढण्यामध्ये तिचं फार लक्ष नव्हतं.

वनिताच्या गावात मागल्याच वर्षी टिव्ही आला होता. वनिता आणि तिची मैत्रीण रजनी शेजारच्या काकूंच्या घरी बाहेरच्या खोलीत बसून टिव्ही वर सिनेमा बघायच्या. त्यातील हिरो किती छान आपल्या नवीन लग्न झालेल्या बायकोशी वागतो हे तिने बघीतलं होतं. वनिताच वय लहान जेमतेम अठरा वर्षांचं होतं तिच्या निरागस मनावर या हिरोची नवरा म्हणून रोमॅंटिक प्रतिमा कोरल्या गेली होती. सुनिलचं आजचं वागणं यात कुठेच बसत नव्हतं.

वानिता यांत्रिकपणे पंगतीत वाढत होती. पंगतीत सगळे भरपेट जेवले. वानिताच्या स्वयंपाकाची सगळ्यांनी तारीफ केली. वनिता कासनुसं हसत होती तिचे कान सूनीलचे शब्द ऐकायला आतुर झाले होते. पण तिच्या कानाना निराशा सहन करावी लागली.

****

सगळ्यांच्या जेवणानंतर तिथलं सगळं आवरून वनिता आणि तिची जाऊ दोघी जेवायला बसल्या. वनिता जेवायचं म्हणून जेवत होती. तिचा सगळा उत्साह निघून गेला.

" पोटभर जेव ग बाई. या घरात तुझं पहिलं जेवण हाय."

वनिताने काहीच उत्तर दिलं नाही. ती मुकाटपणे जेवत होती. जावेनं एका क्षण तिच्याकडे बघितलं आणि मग पुन्हा विचारण्याच्या भानगडीत न पडता जेऊ लागली.

वनिता जेवायचं म्हणून जेवत होती. तिच्या मनात आलं बहुदा सुनीलला सगळ्यांसमोर आपल्याशी बोलायला अवघडल्या सारखं वाटलं असेल. एकट्यात भेटला की बोलेल अशी तिने मनाची समजूत करून घेतली.

जावेनी आपलं जेवण आटोपलं आणि वनिताला म्हणाली,

" माझं जेवन झालं. तुज झालं का मग हे सगळं आवरून ठेव."

वनिताचं लक्षच नव्हतं. जावेनी वनिताला हलवून म्हटलं,

" कसला विचार करती ग?

"अं !" वनिताने भानावर येत म्हटलं.

" मी म्हणत आहे की माझ जेवन झालं. ये मागचं सगळं आवरून घेशील."

" हो."
वनिताने हो म्हणताच जाऊ चटकन स्वयंपाघरातून बाहेर पडली. एका कंटाळवाण्या जबादारीपासून मुक्तता मिळाल्याचा आनंद तिच्या चेहेऱ्यावर होता. तिचं लग्न झाल्यापसून तिच्यावर स्वयंपाघरातील सगळी कामं तिच्यावर सोपवून तिची सासू निश्चिंतपणे बाहेर पडली होती. आज वानिताची जाऊ बाहेर पडली. वानिताची मात्र आता यातून सुटका नव्हती.

कितीतरी वेळाने वनिता स्वयंपाकघरातील सगळं आवरून बाहेर आली.

समोर सगळे गप्पा मारत होते. त्यात सुनिल पण होता. वनिता स्वयंपाकघराच्या दारातच उभी होती. सगळ्यांनी तिला बघितलं पण कोणी तिला आमच्या इथे येऊन बस असं म्हणालं नाही.

वानिताही इतकी धीट नव्हती की उद्धटपणे सासरी पहिल्याच दिवशी मोठ्या लोकांमध्ये त्यांनी न बोलावता जाऊन बसेल.

सुनीलने एकदोनदा तिच्याकडे बघितलं पण त्याच्या नजरेत वानिता बद्दलची ओढ वनिताला दिसली नाही. त्याचा निर्विकार चेहरा आणि भवशुन्य डोळे बघून वनिताला आपल्या आयुष्याची चिंता वाटायला लागली.

अचानक वनिताला जाणवलं की तिला आता सुनीलच्या पहिल्या स्पर्शाचीपण ओढ वाटेनाशी झाली. वनिता आपला संसार कसा असेल? या विचाराच्या भोवऱ्यात गरगर फिरत राहिली.
__________________________________
कसा असेल वानिताचा संसार? सुनील कसा वागेल वानिताशी. बघू पुढील भागात.

🎭 Series Post

View all