ही वाट दूर आहे... स्वप्नामधील गावा भाग ४

एका मुलीची कथा
ही वाट दूर जाते …स्वप्नामधील गावा भाग ४

मागील भागात आपण बघीतलं की सुनील वनीताला वेडंवाकडं बोलला आणि सकाळी तिच्या वडिलांचा फोन आला काय आणि कशी बोलेल वनिता? बघू


थरथरत्या हाताने फोन घेत वनिताने फोन कानाला लावला.

" हॅलो" एवढंच बोलून वनिताला हुंदका फुटला.

" वने काऊन रडून राहिली?"

" बा तुझी आणि मायची याद येते."

" आमालेबी तुझी याद येते.कसं वाटून राहिलं?"

संजयने हा प्रश्न विचारताच तिला एकदम रडू फुटलं. रात्रीचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहिला. तिचं रडणं थांबतच नव्हतं.फोनवर पलीकडून संजय वनिताला समजावत होता. शेवटी सरोजने संजयच्या हातून फोन घेतला.

" वने बाय ग रडू नगं. माझं बी जेवा लगीन जालं व्हतं तेव्हा मले बी माज्या माय बापाची आठवण यायची. समजलं हळूहळू सगळं साजरं व्हतं. नको फार इचार करू. सासू सास-यांची मर्जी सांभाळ.जाव अन् भासरे दोघं बी मोठे हाय मान दे जो त्यांनला. शानी हाय माजी पोर. रदन थांबव बाई. नाहीतर माज्या जीवाला घोर लागल."

सरोजच्या या बोलण्याने वनिता सावरली.म्हणाली.

" माय तुम्ही दोघं छान -हावा.माजी काळजी करू नका.मी इथे सुकात हाय.ठेवते."

वनिताने चटकन फोन ठेवला.तिला आणखी खोटं बोलणं कठीण झालं.

फोन ठेवल्या ठेवल्या सासू बोलली.

" जा अन् नाश्ता बनव. सगळ्यांची कामाला जायची वेळ झाली."

वनिता दुख-या अंगानीच स्वयंपाक घरात शिरली. वनीताला सकाळचा चहा घे असही कोणी म्हटलं नाही. वनिता स्वयंपाकाला लागली. नाश्ता करून तिचे सासरे,दीर आणि जाऊ कामाला गेले. सुनील मात्र खोलीतच लोळत पडला होता.

***
नाश्ता तयार करताना वनिताने जावेला विचारलं,

"वैनी मले एक विचारायचं हाय विचारू"

" विचार नं"

"तुम्ही सगळे कामाले जाऊन राहिले पन हे तर अजून झोपून हाय. हे नाय जानार कामाले?"

"वनिता आज तुले खरं सांगते . सुनील कधीच कामाला जात नाही. "

"नाय! मंग माझ्या मायबापाला खरं काऊन नाय सांगीतलं?"

"तो काही कामधाम करत नाही.आपल्या मायबापाच्या उरावर बसून खातो.खरं सांगीतलं असतं तर तुझ्या मायबापानं तुला दिलं असतं का सुनीलला?

"म्हनून खोटं सांगितलं?" वनिताच्या आवाजात चीड होती.

"व्हय.इथं नागपूरला कोनी भेटना म्हनून तर तू खेडेगावातली हाय तरी तुला पसंत केली."

"मंग ते करतात काय दिवसभर?"
या वनिताच्या प्रशनावर वनिताची जाऊ हसली.

"का झाले हसाले?"
वनिताने गोंधळून प्रश्न केला.

"थो दिवसभर का करते थे त्येलाच विचार. बायको हाय न तू?"

वनिता गप्पं बसली. तिच्या मनात विचारांचा कोलाहल माजला. आपल्या आयुष्याबद्दल आणि संसाराबद्दल शंका निर्माण झाली. काही न बोलता तिने पोहे केले.

सगळेजण नाश्ता करून कामावर गेले. जावेने जाताना सांगितले की तिची मुलगी शाळेतून येईल तेव्हा तिला जेवायला वाढ. ही जबादारी आपोआपच वानिताच्या गळ्यात पडली कारण वनिता घरीच राहणार होती.ती कुठे कामावर जाते ? ती कुठे दमते?मग तिने एवढं काम केलच पाहिजे. हा वनिताच्या जावेच्या विचार. वानिताने निमूट मान हलवली.

सगळे गेले त्या दिशेने वनिता बराच वेळ बघत होती. तिची तंद्री लागली होती तेवढ्यात तिला मागून ओरडण्याचा आवाज आला. तिने दचकून मागे बघितलं.

"नाश्ता बनवला की नाही?का ठेवनार उपासी?"
सुनील ओरडून म्हणाला.

"बनवला. पोहे बनवले हाय."
वनिताच्या आवाजात दबलेपणा होता.

"मंग कधी देणार? मी मसणात गेल्यावर?"

"असं काउन बोलता जी?"

"नाहीतर का बोलू? आन लवकर."

वनिताला तिचे वडील अशा पद्धतीने कधी बोलल्याच आठवत नाही.

वनिता सुनील साठी पोहे आणायला आत गेली.जाताना तिच्या मनात आलं काय म्हणावं या माणसाला? स्वतः झोपून होता आता माझ्यावर आवाज चढवतो. हेच करणार का हा आयुष्यभर? घरच्या लोकांवर अवलंबून रहाव लागेल तर कठीण आहे.

सुनीलला पोहे दिल्यावर खूप हिम्मत करून वनिता त्याला म्हणाली,

"तुमी काऊंन नाई कामाले जात?"

वनिताने हा प्रश्न विचारताच त्याने हातातील पोह्यांची प्लेट खाली फेकली.

"प्लेट काऊन फेकली?"

" खायच्या वेळी तू फालतूचे प्रश्न विचारून राहिली. तुज्या मयबापाने हे नाय शिकविल की कोणी खात असेल तर असे प्रश्न विचारायचे नाही."

"माज्या मायबापले काऊन नाव ठेवते? मिनी काही फालतू प्रश्न नाय इचारला?"

वनिताने असं उत्तर देताच सुनीलने तिच्या गालात लगावली.

"माझ्याशी मुजोरी नाय करायची. या घरात राहायचं असेल तर चुपचाप रहा. समजलं?"

सुनील डोळे वटारून बोलला. अंगात शर्ट चढवून पायात चपला अडकवून घराबाहेर पडला.

वनिता सुन्नपणे जमिनीवर सांडलेल्या पोह्याकडे बघत होती. तिच्या घरात अस कोणी वागत नव्हतं. तिचा बाप किती समजदार आहे. त्याच्यासारखं सुनीलच्या स्वभावात तिला काहीच दिसलं नाही. पुन्हा तिच्या मनात प्रश्न आला. नवरा असा असतो? तिचा बाप तिच्या आईबरोबर असा कधीच वागत नाही.

वनिताने हळूच सगळे पोहे गोळा केले. पोहे गोळा करतानाच तिच्या लक्षात आलं की या माणसाबरोबर आपलं आयुष्य असच खाली सांडलेल्या पोह्यांसारख विखुरणार आहे.

पुढे काहीतरी लवकर करायला पाहिजे. नाहीतर खाली सांडलेले पोहे गोळा करता येतील सांडलेले आयुष्य कसं सावरणार.

तिने मनाशी ठरवलं. काय करावं यावर तिचं विचार सुरू झाला.
__________________________________
वनिता पुढे काय विचार केला ते बघू पुढील भागात.

🎭 Series Post

View all