ही वाट दूर आहे... स्वप्नामधील गावा भाग ३

एका मुलीची कथा
ही वाट दूर आहे …स्वप्नामधील गावा भाग ३

आज रात्री वनिता आणि सुनीलची पहिली भेट होणार होती. वनिताच्या अंगावर रोमांच उठले नाही कारण तिला काल या घरात आल्यापासून सगळंच विचित्र वाटत होतं.

वनिता आणि सुनीलची भेट त्याच्या मोठ्या भावाच्या खोलीत होणार होती. वनिताला जावेनं खोली दाखवली आणि ती गेली. वनिताला वाटलं आपली जाऊ आपली चेष्टा मस्करी करेल.पण असं काही घडलं नाही. वनिताने टिव्ही वर आलेल्या सिनेमामध्ये असच बघीतलं होतं. अशी चिडवाचिडवी झाल्यावर ती हिरोईन कशी लाजते तसं लाजायला वनिताला संधीच मिळाली नाही.

वनिता या घरात आल्यापासून खूप प्रश्न मनात घेऊन वावरत होती पण त्या प्रश्नांची उत्तरं मात्र मिळत नव्हती.
बराच वेळाने सुनिल खोलीत आला आणि त्याने दार लावलं. नव्याने आपल्या आयुष्यात आलेल्या मुलीशी जी त्याची अर्धांगिनी झाली आहे तिच्याशी जसं बोलावं असं काही सुनिल बोलला नाही. शेवटी वनिताने मनात गोंधळ घालणारा प्रश्न विचारला.

" मी तुमाले आवडले नाही का? तुम्ही माझ्या संगट काहीच बोलले नाही."

वनिताच्या या प्रश्नावर सुनील तिच्यावर खेकसून म्हणाला,

" आधी आपली भाषा चांगली ठेव. सिनेमा जादा बघू नको. तू माझी बायको आहे आणि बायकोच रहा.माझ्या प्रेमात पडण्याचा प्रयत्न करू नको. कळलं?"

वनिता सुनिलचं बोलणं ऐकून अचंबित झाली. नवरा असा असतो? याच्याशी आपलं लग्न झालंय आणि हा म्हणतो माझ्या प्रेमात पडू नको. असं असतं नातं नवरा बायकोचं?

वनिताच्या मनात उलथापालथ झाली होती पण सुनीलला वनिताच्या मनात झालेल्या उलथापालथेशी देणंघेणं नव्हतं. तो नवरा म्हणून आपली भूमिका योग्य पद्धतीने व्यक्त करत होता. त्यात आपल्या बरोबर बायकोचा भावनिक सहभाग आहे की नाही हे बघण्याची त्याला गरज वाटली नाही.

वनितासाठी मात्र पहिली रात्र आनंदायी होण्याऐवजी तिचा पार कुस्करा झाला होता. किती तरी गोड स्वप्न डोळ्यात घेऊन तिने खोलीत प्रवेश केला होता. वनीताला वाटलं होतं की सगळ्यांसमोर आपल्याशी बोलायला सुनीलला अवघड वाटत असेल एकांतात पहिल्यांदा भेटेल तेव्हा आपल्याशी छान लागेल पण…सगळंच उलटं घडत होतं.


पहिली रात्र म्हणजे नवदांपत्याच्या वैवाहिक आणि संसारिक आयुष्याची सुरुवात असते. तिचं आकर्षण नवरा बायको दोघांनाही असतं. ही रात्र नवरा किती प्रेमाने आणि शृंगाराने उजळून टाकतो. हे तिने कितीतरी सिनेमांमध्ये बघीतलं होतं. या पहिल्या रात्रीबद्दल आणि शृंगाराबद्दल कोणी वडीलधारी मंडळी थोडी सांगतात. सिनेमात बघूनच सगळी मुलं मुली आपल्या मनाशी त्या पहिल्या रात्रीबद्दलची स्वप्न रंगवतात तशीच स्वप्नं वनितानेही रंगवली होती. प्रत्यक्षात मात्र सगळ्या स्वप्नांचा पापणीच्या आतच कडेलोट झाला.

सुनीलचा तिच्या शरीराला होणारा स्पर्श म्हणजे वनिताला बलात्कार वाटू लागला. नवरा बायको मधील या सुंदर क्षणांना असं धसमुसळेपणाने कोण उपभोगतं?
क्षणात वनिताच्या मनात या सगळ्याबद्दल घृणा निर्माण झाली.

आजपर्यंत वनिताने गरीबीचे खूप चटके सहन केले. त्या गरिबीमुळे तिला शिक्षण पण सोडावं लागलं. त्या गोष्टीने ती दु:खी झाली होती पण त्यातून सावरली कारण ती समजूतदार होती. पण पहिल्याच रात्री जो दु:खाचा कडेलोट झाला त्यातून आपण कसं सावरायचं हा प्रश्न तिच्या मनात आत्ता घोंगावत होता. आपल्या जीवनाचा जोडीदार म्हणून ज्यांच्यावर प्रेम करण्यासाठी ती उत्सूक होती तो या क्षणाला एकदम परका झाल्यासारखा तिला वाटलं.

या परकेपणाच्या सावलीतच आपल्याला आयुष्य घालवावे लागेल का या विचारसरशी वनिता एवढी दचकली की तिने सगळा जोर लावून सुनीलला आपल्या पासून दूर ढकलले. हे इतकं अनपेक्षित होतं की बेसावध सुनील एकदम भेलकांडून पलंगाच्या काठावर आपटला. क्षणभर त्याला काहीच कळलं नाही. वनिता स्वतःचे डोळे पुसत स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती तेवढ्यात कसबसं उठून सुनिलने वनिताच्या कानशिलात लगावली. यामुळे वनिता पलंगावरच आपटली. सुनीलचा पारा प्रचंड चढला होता. तो रागाने लालबुंद झाला होता. तो म्हणाला,

" ए तुझी हिम्मत कशी झाली मला ढकलायची. ?"

वनिता रडायला लागली तसं सुनीलने तिचे केस धरून तिला उठवलं.

"लक्षात ठेव तू माझी फक्त बायको आहे. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुला या घरात आणलय. तुला इथे कामवाली बाई म्हणून आणलय. इथे दोन घास खायचे. गपगुमान पडेल ते काम करायचे आणि माझी सेवा करायची. माझ्यावर प्रेम करायचा प्रयत्न करायचा नाही. नाही वागली असं तर पाठवून देईन बापाच्या घरी."

तांबारलेल्या डोळ्यांनी सुनील वनिताकडे बघत होता.
सुनीलचं बोलणं तप्त शिस्याचा रस होऊन वनिताच्या कानात शिरलं. वनिता या आघाताने पार जमीनदोस्त झाली.

ती रात्र वनिताने रडतच काढली. सकाळी सकाळी वनीताचा थोडा डोळा लागत होता तेवढ्यात तिच्या कमरेत लाथ बसली.वनिता दचकून उठली.समोर सुनील उभा होता.

" काल सांगितलं ते विसरली? ऊठ कामाला लाग.चल ऊठ "

एवढं बोलून त्याने पुन्हा एक लाथ वनिताच्या कमरेत घातली.

दुखावलेले अंग घेऊन स्वतःचे कपडे सावरत मलूल चेहे-याने वनिता खोलीबाहेर आली.

वनिता जशी खोलीबाहेर आली तसं तिची सासू म्हणाली,

" सूनबाई तुझ्या बापाचा फोन आहे बोलून घे."

आपल्या वडलांचा फोन आला आहे म्हटल्यावर

वनिताला एकदम रडू फुटलं. तिला हुंदक्यावर हुंदके येऊ लागले. तिला रडताना बघून सासूला फार आश्चर्य वाटलं नाही कारण मध्यरात्री सुनिलच्या चढलेल्या आवाजाने घरचे सगळेच जागे झाले होते.

" फोन घे." सासूने वनितासमोर फोन धरला फोनवर हात ठेवून सासू म्हणाली,

" पहिले रडणं बंद कर. काल झालं ते तुझ्या बापाला सांगायचं नाही. घे फोन बोल."

वनिताने थरथरत्या हाताने फोन घेतला आणि…
________________________________
वनिता काय बोलली असेल फोनवर वाचूया पुढील भागात.

🎭 Series Post

View all