ही वाट दूर आहे... स्वप्नामधील गावा भाग ९

एका मुलीची कथा
ही वाट दूर आहे…स्वप्नामधील गावा भाग ९

मागील भागात आपण बघीतलं की वनीता आपल्या आईवडिलांना सगळी खरी परिस्थिती सांगते आता पुढे बघू.

त्यादिवशी सकाळी सगळं आवरून शेतावर जाताना संजय वनीताला म्हणाला,

" वने इकडं ये."

चुली समोर वनिता स्वयंपाक करत होती. नुकताच तिने भाजी भाकरीचा डबा आईवडलांसाठी बांधून दिला होता.

" काय बा? काय जालं?"

पदराला हात पुसत वनीताने विचारलं.

" पोरी मी आज सुनीलच्या बापासंग बोलतो. तू काळजी नग करू. आज ते काय बोलतात ते पाहू मंग आपन ठरवू का कराचं ते.कळलं नं?"

"हो" वनीताने मान हलवली.

" तुले वाटलं तर घरचं बाकी काम करजो. नायतर राहू दे मी आलो का करीन."

सरोज वनिताच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली.

आताही वनीताने फक्त मान हलवली. आपली किती काळजी करतात आपले आईवडील हे बघून तिचा गळा दाटून आला होता.ती काहीच बोलू शकली नाही.

वनिताच्या उतरलेल्या चेहे-याकडे बघून सरोजच्या पाय घरातून बाहेर निघत नव्हता. संजय सरोज घरातून बाहेर पडले. वनीता दारात उभी राहून त्यांच्याकडे बघत होती.तेवढ्यात अचानक संजय भाग वळला आणि घाई घाईने वनिताकडे आला आणि म्हणाला,

"वने तू जिवाचं काई वंगाळ करायचं नाय पोरी. तुज्यापेक्षा आम्हाला दुसरं काई नाय पायजेल. थू आमाले जड नाय. थो सुनील जर कामधंदा नाय करत म्हनला तर आपन काडीमोड करू त्येच्यानंतर पन पोरी जीव देयाचा नाय."

संजयने रडतच वनितासमोर हात जोडले. संजयने हात जोडतात वनिता बावरली. संजयचे हात पकडून म्हणाली,

" नाय बा मी असं काही बी नाय करनार. म्या तुमची लेक हावो. म्या असी डरनारी नाय. तुमी बीनघोर कामाले जावा."

वनीताने अलगद संजयच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आपल्या ममतापूर्ण हाताने पुसले.

लांबून सरोज हे बघत होती. तिचं मन भरून आलं. आपल्या पोरीचं सोन्यासारखं मन का कुणाला दिसत नाही याचं तिला फार वाईट वाटलं.

सरोज आणि संजय जडशीळ पावलाने शेतावर जायला निघाले. जाताना कितीदा तरी मागे वळून बघत होते. वनिता दारातच उभी होती. तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. ब-याच वेळाने वनीता घरात शिरली.

***

रोज शेतावर जाताना गप्पा करणारे संजय,सरोज आज गप्प होते.दोघांच्याही मनात प्रचंड वादळ घोंघावत होतं. त्याचा वेग प्रत्येक सेकंदाला वाढत होता. त्यात सुनील बद्दल आणि त्याच्या कुटूंबा बद्दलचा प्रचंड राग भरलेला होता.

"सरोज आपून आपल्या लेकराला वा-यावर नाय सोडायचं. तिले सासरी नाय जायचं असलं तर -हाईल आपल्या घरी. आपून फुलासारक जपली तिले. तिले नाय त्या मुर्दाड सुनीलच्या हातात द्यायची."

"खरं हाय तुमी बोलता ते. माजा बी जीव लागत नाय. पन … वनिता खूप दीस इकडं -हाली का सवाल करलच कोनी ना कोनी."

"करु दे.तुले त्या संवालाचं भेव वाटते. आपली पोरगी महत्वाची नाय का? मी तुले सांगतो सरोज या समाजाले घाबरून आपून आपल्या पोरीच्या जिंदगीचं वाटोळं नाय कराच.समजली?"

"व्हय. आपून वनीच्या पाठी -हायच."


आज दोघंही सैरभैर मनस्थितीत शेतात पोचले.

"सुनीलच्या बा ला कदी फोन करता तुम्ही?

"जेवनाची सुट्टी जाली का करतो. चाल आदीच येळ जाला हाय तो पाटील वरडेल."

"हं"

म्हणत सरोज शेतात कामाला शिरली. पाठोपाठ संजय शेतात शिरला.

****


जेवणाची सुट्टी झाली तशी घाईने संजयने हातपाय धुतले आणि त्याने फोन हातात घेतला. शेतातले सगळे कामगार नेहमीच्या ठिकाणी जेवायला बसले. सरोजचं सगळं लक्ष संजय कडे होतं.

"हॅलो"

सुनीलच्या वडिलांनी फोन उचलला.

"रामरामजी"

"रामराम आज एवढ्या सकाळी कसंकाय फोन केला.आमची सूनबाई बरी आहे नं?"

"नाय. थी बरी नाय म्हूनच फोन केल्ता."

"काय झालं? इकडून गेली तर हसतच माहेरला गेली.एकदम काय झालं?"

"मले सांगा तुमी म्हनलं व्हतं मले हे लगन ठरवताना का सुनील कामाला जाते पन आमची वनी सांगुन -हाली का ते काईच काम करत नाय. घरामंदी नुसता लोळत पडते. मायबापाच्या जीवावर जगते."

"काही बोलता. काम जसं भेटते तसा जातो तो कामाला."

"वनीचं लगन होऊन सहा मईने जाले. या सहा मइन्यात एकदाबी काम भेटलं नाय यावर कोनाचा इस्वास बसलं?" संजयच्या आवाजात राग होता.

आता सुनीलच्या वडिलांची धांदल उडाली. त्यांना संजय इतका थेट प्रश्न विचारेल अशी अपेक्षाच नव्हती. ते काहीच बोलले नाही.

"मी का इचारून राहिलो.जवाब द्या."

"तुमचा काही तरी गैरसमज झाला आहे."

"नाय जी. माजा काईबी गैरसमज नाय झाला. माजी पोरगी खोटं बोलत नाय. तुमच्या पोराने तिला सांगतल का तुमी वनीताले कामवाली बाई पायजेल म्हून लग्न करून घेऊन गेले. तुमची मोटी सूनबी हेच बोल्ली वनीताले. हे पाय माजी पोरगी तुमच्या मुलांबरोबर त्याची बायको म्हनून संसार करल यासाठी तिचं लगन तुमच्या प्वोरा बरोबर आमी लावून दिलं.
तुमचा पोरगा जर कामधंदा करनार असलं तर माज्या पोरीला थिकडं पाठवू. माजी पोरगी कामवाली म्हून थिकडं येनार नाय. मले सीदं बोलता येते जी. म्या तुमच्या पेक्षा गरीब हावो पन लाचार नाय. माजी पोरगी शयरातील पोरीवानी दिसत नाय पन ते मूर्ख नाय.तिला तिचा मान समजतो.
सगळ्याचा इचार करा आन मंगच मले फोन करजा. ठेऊन राहिलो फोन"

फोन ठेवल्यावर संजयचं मन शांत झालं. तिकडे सुनीलच्या वडिलांचं मात्र बीपी वाढलं. सुनील त्यांच्या साठी डोकेदुखी होता. आता काय करावं त्यांना सुचत नव्हतं.

खेड्यात राहणारा हा माणूस इतका हुशार आणि विचार करणारा असेल असं त्यांना वाटलच नव्हतं. त्यांच्या हातून फोन कधी गळून पडला त्यांनाच कळलं नाही.
_________________________________
पुढे काय होईल ते बघू पुढील भागात.

🎭 Series Post

View all