ही वाट दूर आहे... स्वप्नामधील गावा भाग १०

एका मुलीची कथा
ही वाट दूर आहे…स्वप्नामधील गावा भाग १०

मागील भागात आपण बघीतलं की संजय सुनीलच्या वडलांशी सरळ सरळ बोलतो.पुढे काय झालं ते बघू.


सुनीलचे वडील हताश बसले होते. वनीताचे वडील जे काही बोलले त्यात चूक काहीच नाही हे त्यांना पटत होतं. आपल्या मुलाचं काय करावं ते त्यांना कळना.

त्यांना तसं बसलेलं बघून सुनीलच्या आईने विचारलं.

"काय झालं?"

" तुमच्या लाडक्या पोरान माझं बीपी वाढवल. तुमच्या लाडापायी वाया गेला आहे."

" काय झालं? एवढं तोंड का सोडुन राह्यले त्याच्यावर?"

" त्याच्या सासुरवाडीकडून फोन होता. वनीताचा बाप बोलला."

" काय बोलला?"

" तुमच्या पोराला पोरगी भेटत नव्हती. एक भेटली तर तिलापन नांदवता येत नाही?"

" का केलं सुनीलने!"

" वनिताला बायको म्हनून नाही तर कामवाली म्हनून आनलिय असं सांगितलं या भायताडाने. त्यानं सांगितलंच वरून तुमच्या मोट्या सुनेनबी सांगितलं."

" बापा! सासरी काम केलं तर कामवाली बनते का? कोनत्या राजाची राजकुमारी लागून गेली?"

"ए बाय होशमदी ये. सुनील कामावर जात नाय हे बी त्यांना कललं. सुनील जवापर्यंत कामाला जात नाय तवापर्यन्त ते वनीताला इकडं पाठवणार नाय म्हनले."

आता सूनीलची आई पण विचारात पडली.

***

"का म्हनलं जी ते?" सरोज ने विचारल.

"मी बोलून दिल्ल का जवापर्यंत सुनील कामाले जात नाय आमी आमची पोरगी तुमच्या घरला पाठवनार नाय. आमची पोरगी कामवाली म्हनून येनार नाय."

"मंग?"

"काय बोलले नाय."

"चाला जी जेवाले. जेवनाची सुट्टी संपत आली. पाटील बी वरडल."

संजय आणि सरोज डबा खायला बसले.

***

सुनीलच्या आई वडलांचं बोलणं चालू होतं तेव्हाच सुनील घरात शिरला.

"आई चाय बनव."

"कोठून आला ?"

सुनील च्या वडिलांनी रागाने विचारलं

"त्या प्रवीण सोबत गेल्तो."

"तो प्रवीण कामाले जाते. तुला काही लाज शरम हाय का नाय?"

"मला कशाची लाज वाटायला पाहिजे?"

सुनील ने गोंधळून विचारलं.

"तुझ्या सास-याचा फोन होता"

"कशासाठी?" सुनीलने

"तू जवापर्यंत कामावर जानार नाय तवापर्यंत ते वनीताला इकडं पाठवनार नाय बोलले. कवापासून जानार तू कामावर?"

"अर पप्पा त्या बावळट मुलीसंग लग्न केलं हे कम हाय का? इतका माज कशापायी आला त्यानला?"

"अर तिनं लग्न केलं तुझ्याशी हे तुज्यावर उपकार हाय. बावळट तू हाय. ती शानी हाय. म्हनूंन तिला बराबर समजलं तूझी औकात का हाय ते."

"काय बोलता तुम्ही? आताच आला नं तो घरी."
सुनीलची आई मध्ये बोलली.

"तू गप्प बस. तो काय लढाई जिंकून आला घरी. कोनी आपल्या घरला त्याला ठेवून घेणार नाही. फुकट्या साला. "

"पप्पा मी फुकट्या नाय."

"तू फुकट्या नाही? किती पगार भेटतो तुला?"

"नोकरी जाऊदे. घरात मदत करतो नं तो. तुमाले दिसत नाय का?"

"कसली मदत ? भाजी आण, चक्कीवर जाऊन पीठ घेऊन ये. प्रकाशच्या पोरीला शाळेत सोड अन् घेऊन यायच ही मदत. मूर्खा ताडमाड वाढला पन बेअक्कल हाय. नोकरी कराले का जात? तुझ्या मायच्या फालतूच्या लाडाने वाया गेला. हे माझं घर हाय म्हनून तुझा मोठा भाऊ प्रकाश काय बोलत नाय. त्येचं घर असतं तर त्येन कवाच हाकलून दिल्ल असतं."

सुनील आणि त्याची आई सुनीलच्या वडिलांचं हे रौद्ररूप बघून दचकले.

"खरं तुज्यापेक्षा तुझी बायको खेड्यात राहते तरी शानी हाय. तिला कळते नोकरीची किंमत. तू एवढा बासाड्या वानी वाढला पन अक्कल नाही काडीची. फुकटाचं खायाला पाहिजेल, चाय पायजेल. दुधाचा भाव माहीत हाय का?काय जवाब देऊन तुझ्या सास-याला? तोंड हाय का मला?"

सुनील खाली मान घालून बसला.मनातल्या मनात वनीतावर चिडला. सुनीलच्या आईला काय बोलावं ते कळना.

" नोकरीचं पाय लवकर. नायतर सोयरीक तोडतील ते मंग दुसरी कोनी भेटनार नाय. मी त्येनला काही बोलनार नाय त्यांनी सोयरीक तोडली तर. राह्य मंग भावाचा नोकर बनून. आमी कवापर्यंत तुला पुरनार. डोसकं उठवलं. "

एवढं बोलून सुनीलचे वडील तरातरा घराबाहेर पडले.

सुनील आणि त्याची आई स्तब्ध बसले.सुनीलच्या आईला त्यांचे वडील जे बोलले ते पटलं पण सुनीलला पटलं असेल का?
_________________________________
बघू पुढील भागात काय होईल.

🎭 Series Post

View all