ही वाट दूर आहे... स्वप्नामधील गावा भाग ८

एका मुलीची कथा
ही वाट दूर आहे… स्वप्नामधील गावा भाग ८

मागील भागात आपण बघीतलं की सरोजला वनिता सुखी नाही असं वाटतं.ती जेव्हा सरोजला गच्च मिठी मारून रडू लागते तेव्हा सरोजच्या मनातील संशय पक्का होतो.आता पुढे बघू काय होईल ते.

सरोजने हळूच वनीताला आपल्या पासून दूर करत खाली बसवलं आणि सरोजही शेजारी बसली. वनीताचा ऊतरलेला चेहरा बघून सरोज म्हणाली,

" वने मला कळून राहिलं तू सुकात नाय. का झालं ते सांग. माय व्हय तुजी मी"

सरोजने वनिताच्या पाठीवरून हात फिरवत म्हटलं.

" पोरी तुज्यावर काय परिस्थिती हाय ती सांग.सोताच्या मनाले जाळत बसू नग.माय बाप हावो नं आमी तुजे?"

संजय पण वनिताच्या शेजारी बसत म्हणाला.

" माय थो सुनील काम नाय करत."

"म्हंजी?"
संजय आणि सरोजनी दोघांनी एकदमच विचारलं

"तुमी दोग कसे कामाले जाता तसं तो काईच कामधंदा नाय करत."

"असं कस होईल? त्याच्या बा नं तर तो करतो सांगटलं."

"खोटं बोल्ले ते लोग आपल्याशी"

"खोटं बोल्ले? काऊन?"

"थेंना सुनीलसाठी कोनी पोरगी मिलत नव्हती. माजी जावं म्हने नागपूरमंदी कोनी मुलगी भेटत नवती म्हून तर तुज्या सारखी खेड्यातली पोरगी केली."

"ओ माय हे तर फशीवलं आपल्याले.!"

"सरोज आपून इचारपूस समदी केली होती मंग असं कसं जालं.वनीताला तरास होऊन राहिला."
संजयच्या आवाजात अपराधीपणाची भावना होती.

"बा सुनीलची बायको म्हून ते कोनी बघत नाय माज्याकडे. त्यांनी मला कामवाली बाई म्हून नेली हाय."

"का सांगते तू.?"

"व्हय.हे माजी जावं म्हनाली मले.आन तो सुनील बी म्हनला पहिल्याच रात्री."

"आता बया.हा तर जुलुम हाय.ओजी आता आपल्याले कायतरी इचार करावा लागन."

"माय मी पुन्यांदा थ्या घरी जानार नाय.रजनी मले काल म्हनाली थुले अजून प्वार झालं नाय तर आताच ठरीव त्या घरी पुनः जायचं की नाय.माय मी नाय जानार तिकडं."

"वने आपुन बोलू सुनीलच्या बा शी. एकदम तू नाय जानार म्हनते ते बराबर व्हईन का?"
संजयने काळजीने म्हटले.

"वने तुजा बा म्हन्तो ते बराबर हाय. एकदम कोनत्या फैसला नको करू.एक चानस देवू थ्या सुनीलले. त्येच्यानंतर बी तो तसाच वागला तर तू हिकडं ये.आमची प्वार आमाले जड नाय."

सरोज वनिताला धीर देत म्हणाली.

"माय थ्यो सुनील सुधारनारा नाय. माजी सासू लईच लाड करते एवढा मोठा बाप्या जाला तिचा पोरगा तरी. हातातला चायचा कप नाय ठेवत धुवाले. दिसभर घरात लोळत पडते अन् धा वेळा चाय मांगते. मीनी त्येला म्हनलं तुमी काऊन नाय जात कामाले तर हातातली पोह्यांची पलेट फेकली माय त्येन. इतका माजोरडा हाय."

"हे चांगलं नाय. अन्नाचा कदीबी अपमान नाय कराले पायजे."
संजयच्या आवाजात राग होता.

थोडावेळ तिघही बोलले नाही.काय करावं पुढे त्यांना कळेना.

बराच वेळाने सरोज म्हणाली,

"आवो तुमी ऊद्या सुनीलच्या बा ला फोन लावा.म्हना तुम्ही सांगटलं होतं का सुनील नोकरी करत हाय.पन तो तर काम धंदाच करत नाय. आमी आमची पोरगी लगन करून तुमची सून म्हून पाठवली हाय कामवाली म्हून नाय पाठवली. तुमचा सुनील कामधंदा करनार असन तेव्हा माजी मुलगी म्यां तिकडं पाठवन. असं सपष्ट बोला.

"व्हय तसंच बोलतो. माजी लेक माज कालीज हाय मले जड नाय. वने तू बेफिकर राय. आमी तुले कामवाली व्हायले नाय पाटवनार."
संजयने वनिताच्या पाठीवर थोपटलं.

हे ऐकल्यावर वनिताच्या मनाला शांती मिळाली.

संजय सरोज पण विचारात पडले. सरोज उठली . उठताना तिला आपलं गळून गेलय असं वाटलं. एक मोठा पेचप्रसंग तिच्या लेकीच्या आयुष्यात उभा होता तो अलगदपणे कसा सोडवता येईल याचा ती विचार करत होती.

वनिता दिसायला साधारण होती. रंगाने सावळी होती. पटकन कोणाच्या नजरेस पडणारी नव्हती पण वनिता धीट होती. कुठल्याही प्रसंगात डगमगणारी नव्हती. प्रत्येक प्रसंगाला धीराने तोंड देत असे. सरोजला आपल्या मुलीतील हे चांगले गूण माहिती होते.जे प्रथमदर्शनी कोणाला कळत नसत. प्रथम दर्शनी तर सगळे सुंदर रूपाला आणि गो-या रंगाला प्राधान्य देणारे असतात. पण संजय आणि सरोजच्या दृष्टीने या बाह्य रंगरूप आला फार महत्व नव्हते.

जगासाठी अशिक्षीत असणारं हे जोडपं वैचारिक दृष्ट्या खूप वरच्या पातळीवर होतं. याचमुळे त्यांनी वनीताला जबरदस्तीने सासरी पाठवण्या ऐवजी जावयाच्या वडिलांशी बोलण्याचा मार्ग निवडला.यानंतर पुढे काय करायचं हे ठरवण्याचं निश्चित केलं.

सरोजने कसातरी स्वयंपाक केला.रोजच्यासारखं मन आनंदी नव्हतं. संजय पण जरा विचारात गढला होता. वनिताला तिच्या आयुष्याला आता कसं वळण मिळणार आहे यावर विचार करण्यात गुंतली होती.

__________________________________
संजय सुनीलच्या वडलांशी बोलल्यावर काय होईल ते बघू पुढील भागात.

🎭 Series Post

View all