Login

हे वर्ष असं गेलं...

2025 वर्ष अध्यात्मिकरित्या परिपूर्ण होते, त्याबद्दल लेख जरूर वाचा.
हे वर्ष असं गेलं!

नवीन वर्षाची सुरुवात जशी होते ना तशी अगदी उत्साहाने केली. 2025 हा आकडा खूप काही घेऊन आला. यावर्षाने डोळे उघडतील असे अनुभव दिले. चढ उतार ही प्रचंड दाखवले. सागराच्या लाटा जशा वर खाली होतात ना त्याप्रमाणे आयुष्य हेलकावे खातच असते. असं म्हणतात ज्याची नाव मजबूत त्याला सागराची भीती नसते.

अध्यात्मिक म्हणायचं तर हे वर्ष मला अंतरबाह्य बदलणारे होते. अनेक चुका केल्या अनेक नियम मोडले. पण शेवटी एक गोष्ट अत्यंत प्रकर्षाने जाणवली की जे आपण दाखवायचा प्रयत्न करतो ते आपण मुळात नसतोच. मन म्हणजे कचराकुंडी नव्हे, सगळं साचत गेलं की आपल्यालाच दुर्गंधी सहन करावी लागते. मी हल्ली बोलून मोकळं व्हायचं ठरवलं आहे. अर्थात वाचा आहे म्हणून काहीही बोलत सुटणे म्हणजे मूर्खपणा ठरतो म्हणून

नेमके बोलावे
नेमके करावे
नेम हा चुकवू नये
किंचित मात्रे

या वर्षाच्या सावलीत अनेक अनुभव आले, त्यातील एक म्हणजे साक्षात परब्रम्ह दर्शन ( विठ्ठल रुक्मिणी ). सांगायचं असं की ज्याप्रमाणे आपण एखादं वाक्य हायलाईट करतो त्याप्रमाणे हे वर्ष आयुष्यातील सगळ्यात अप्रतिम वर्ष ठरलं. ज्याप्रमाणे तहानलेल्या तुम्ही पाण्याव्यतिरिक्त इतर काहीही द्या त्याला त्याच्यात थोडीही गोडी वाटणार नाही. हिरे, माणके, ब्लॅंक चेक अगदी काहीही द्या... चातकाला एक थेंब पाणीही पुरते. त्याचप्रमाणे पृथ्वीतलावर भरपूर पाणी असून सुद्धा आकाशातून पडलेला पाण्याचा एक थेंब झेलण्यासाठी जशी त्याची तगमग सुरु असते तसं काहीसं माझही झालेलं. मोबाईल मध्ये अनेक वेळा ऑनलाईन दर्शन किंवा अनेक फोटोज वगैरे पाहून सुद्धा माझं मन शांत होत नव्हतं. चरणभेटीची जी आस लागली होती ती यावर्षी पूर्ण होणार याची खात्री नव्हतीचं. पण म्हणतात ना कणभर कमी पडल्याने सुद्धा कमीच म्हणवले जाते. ते कणभर कुठे अडलं होतं ते पूर्ण भरभरून आलं आणि साक्षात श्रीविठ्ठलाच्या चरणी माझी सेवा रुजू झाली. त्यांच्या चरणी मस्तक ठेवून जेव्हा कृपा प्राप्त केली तेंव्हा अनंत जन्म घेतलेल्या देहाच्या उजळणीला विराम मिळाला असं वाटून गेलं. अनेक संतांच्या सानिध्यात करूणरस अनुभवला.

याची देही याची डोळा
पाहिली माऊलीची माया
न्हाऊनी शितल चंद्रभागेत
धन्य होई पामराची काया

सरत्या वर्षाने मला काय दिलं, काय घेतलं याची यादी खूप लांब होते पण भरभरून दिलं आणि ओंजळभर सुखाच्या त्या राशीत कणभर दुःख असलं तरी ते ही माझ्या हक्काचं आहे बरं! मी आवडीने त्याचा स्वीकार केलाय.

*सांसारिक सुख-दुःख अनेक येतात जातात परंतु आंतरिक सुखाचा परम आनंद मात्र या वर्षात कायमस्वरूपी मिळाला.*

थेंब अमृताचा
पडे जिव्हेवरी
क्षणात श्रीहरी
नाम घेता ||

धन्यवाद
उन्नती सावंत
0