Login

हिशोब चुकता केला- भाग 1

सासूबाईंच्या बहिणीने आल्या आल्या ऋचावर आगपाखड केली, नंतर ऋचाला अशी संधी मिळाली की तिने सगळा हिशोब चुकता केला

"हे काय घातलं आहेस तू? फिरायला जातोय म्हणजे हे असले कपडे घालायलाच हवेत का?"

ऋचाच्या मावससासू कालच त्यांच्याकडे आल्या होत्या, आल्या आल्या त्यांनी आपला स्वभाव ऋचाला दाखवुनच दिला. खरं तर ऋचाच्या सासूबाईंना ऋचा पहिलीच सून, मावससासूच्या सर्व मुलांची लग्न अजून बाकी होती, असं असतानाही सुनेला कसं वागवावं, तिला ताब्यात कसं ठेवावं हे मावससासूबाई आपल्या बहिणीला शिकवत होत्या.

मावशी आली म्हणून ऋचाचा नवरा खुश होता. त्याची लाडकी मावशी होती ती. गावाकडे राहत असल्याने त्याचं बऱ्याचदा गावी जाणं होई आणि मावशीही त्याचे लाड करी. त्या येणार त्याच्या आदल्या दिवशी ऋचाच्या नवऱ्याने ऋचाला रात्री उशिरापर्यंत मावशी आणि गावाकडच्या आठवणी सांगितल्या, साहजिकच ऋचालाही उत्सुकता होती मावशींना भेटायची.

ऋचा शिकलेली आणि आधुनिक विचारांची होती. तिचा पेहरावही तसाच होता. ऋचाच्या नवऱ्याने मावशी आल्यावर तिला शहर दाखवायचा प्लॅन केला. घरातले सर्वजण जाणार होते. सर्वांनी तयारी केली, ऋचाला आवाज दिल्यावर ऋचा बाहेर आली, मावशींनी तिला खालून वर न्याहाळलं आणि त्यांची नजर ऋचाला खटकली. मावशींनी जोरात आवाज चढवला,

"हे काय घातलं आहेस? लग्नानंतर असे कपडे घालतात का? जा आणि साडी नेसून ये.."

ऋचाने फक्त स्लीवलेस कुर्ता घातला होता आणि जराशी ज्वेलरी घातली होती, मावशीचं बोलणं ऐकून ऋचाला खुप वाईट वाटलं. तिने नवऱ्याकडे आणि सासूबाईंकडे पाहिलं..पण त्यांनाही मावशींचा मान ठेवायचा असल्याने ते काहीही बोलले नाही. नाराज मनानेच ऋचा पुढे वावरत होती, तिचा पूर्ण दिवस वाईट गेला.

गावी परतत असतानाही मावशींनी ऋचाला राहण्याबद्दल आणि वागण्याबद्दल खडे बोल सुनावले.

"हे बघ, लग्नाआधी चालत असेल हे सगळं पण आता तू सासरी राहतेस..जरा वागणं बोलणं नीट हवं..कपडे घालताना भान हवं.."

तेव्हापासून ऋचाच्या मनात मावशीबद्दल चांगलाच राग मनात बसला. नवऱ्याला सांगायला गेलं तर तो आपल्या लाडक्या मावशीबद्दल एक शब्द ऐकून घ्यायला तयार नव्हता, उलट त्यांनी किती प्रेमाने सांगितलं हेच तिला पटवून देत होता.

पुढच्याच वर्षी मावशींच्या मोठ्या मुलीचं लग्न झालं. योगायोगाने ती ऋचा आणि कुटुंब ज्या शहरात राहायचं त्याच शहरात तिचं सासर होतं.
त्याच शहरात आपली बहीण असल्याने मावशीलाही आधार मिळालेला.

एकदा ऋचाच्या नवऱ्याने फर्मान काढलं, मावशीला घरी बोलवायचं. ऋचाच्या पोटात परत खड्डा पडला.
क्रमशः
0

🎭 Series Post

View all