हिशोब 2

कोण खरं कोण खोटं
रेश्मा आपल्या नवऱ्याने ढाल बनून केलेलं आपलं रक्षण बघून समाधानी होती..त्याच्या या वागण्यामुळे तिचं त्याच्यावरचं प्रेम आणि त्याच्या बद्दलचा आदर अजूनच वाढत चाललेला..

मकरंद आणि त्याची बायको सिनेमाला गेले, इकडे आईची रडारड सुरू..

"काय बाई माझ्या नशिबात सुनेचं सुखच नाही..एक होती ती गेली सोडून..दुसरीही तशीच.."

"आई बंद कर आता.."

परेशचे डोळे लाल झाले होते, त्याला पाच वर्षांपूर्वीचा सेम असाच प्रसंग आठवला..

दोघेही सिनेमाला निघाले होते, परेशच्या बायकोने संध्याकाळी आपण नाही म्हणून स्वयंपाक आधीच करून ठेवलेला..ते बघून सासूबाईंनी नाक मुरडलं.. त्यांना जाऊ द्यायचं नव्हतं, पण आता कारण काय काढणार?? त्यांनी सुरू केलं..

"फ्रीज साफ करायला सांगितलेलं हिला..ती कामं नकोत, फक्त भटकायला हवं.."

"अहो आई तुम्हाला म्हटलं ना की उद्या सुट्टी आहे तर आवरेल मी.."

"कधी बोललेलीस गं? मला तर म्हटली की ही असली कामं करायला इतकी शिकलीये का मी??"

हे ऐकून परेशच्या बायकोला जबरदस्त धक्का बसला..आपण हे कधी बोललो? सासूबाई धडधडीत खोटं बोलताय..

"अहो मी असं काहीही म्हटलेलं नाहीये..विश्वास ठेवा.."

परेश मात्र हे ऐकून त्याच्या बायकोवरच चिडला..

"तुझी हिम्मत कशी झाली आईला असं बोलायची? विसर आता सिनेमा..गपचूप कपडे बदल आणि फ्रीज साफ करायला घे.."

सासूबाईंच्या चेहऱ्यावर अनामिक आनंद दिसत होता..परेशची बायको मात्र मुकाट्याने फ्रीज साफ करायला लागली, फ्रीज आवरताना तिच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हतं..

हे असं नेहमीच सुरू असायचं, परेशच्या आईने दोघांना कधी जवळ येऊच दिलं नाही, कायम दोघांमध्ये फूट पडेल याची काळजी घेतली,

परिणाम, परेशच्या बायकोचा संयम सुटला..तिने सरळ घर सोडलं आणि त्यालाही सोडचिट्ठी दिली..

🎭 Series Post

View all