Login

हिस्सा (भाग:-१)

प्राॅपर्टीच्या हिस्सापेक्षा प्रेम माया महत्त्वाची असते हे सांगणारी कथा

शीर्षक:- हिस्सा

भाग:- १

शेतात काम करणाऱ्या संतोषचा मोबाईल खणखणला. बांधावर असलेल्या एका झाडाच्या फांदीवर त्याने मोबाईल ठेवला होता.

"आता एवढ्या सकाळी कोणी फोन केला असेल? हेमाने तर‌ केला नसेल, काही विसरलो का मी? अम्म.." तो डोकं खाजवत विचार करू लागला.

पुन्हा मोबाईल वाजला, तसा तो हातातलं काम ठेवून मोबाईल घेण्यासाठी त्या झाडाजवळ आला. त्याने मोबाईल हातात घेऊन पाहिला तर त्याच्या सासरेबुवांचा काॅल असल्याने त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. कारण ते कधीच सकाळचं फोन करत नव्हते.

"मामांचा फोन‌ ! ते ही इतक्या सकाळी? काय झालं असेल? " असा विचार करत त्याने काॅल उचलून कानाला लावत म्हणाला,"नमस्कार मामा, आज सकाळी सकाळी कशी काय आठवण काढली माझी? "

"नमस्कार जावईबापू, आली आठवण म्हणून फोन केला. कामात होता काय?" पलिकडून त्याचे सासरे वसंतराव म्हणाले.

त्यांच्या आवाज आज काहीसा त्याला वेगळा वाटला.

"हो, शेतात आहे, काम करत होतो. बोला की कसे आहात? काही काम होतं का?" तो काळजीने त्यांना म्हणाला.

"मी बरा आहे. काम.. काम असं काही नाही. लय दिवस झाले, आपली गाठ भेट झाली नाही. एखादं दिवस येऊन गेला तर‌ बरं होईल." ते थोडे अडखळलेल्या स्वरात म्हणाले.

त्यांचे बोलणे त्याच्या पथ्यावर पडले नाही. असे अचानक बोलवण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल हे त्याच्या लक्षात आले.

तो त्यांना म्हणाला,"मामा, काही झालंय का? हेमी, परवा आली होती, तेव्हा तिने काही गोंधळ घातला का? की तुमची तब्येत ठीक नाही."

हेमाचा भांडखोर स्वभाव त्याला या चार वर्षात चांगलाच कळला होता. ती माहेरी गेली की कशावरूनही तिचा माहेरच्या मंडळींशी वाद होत असे. आणि त्यात त्यांच्या तब्येतीच्या तक्रारीही सुरू होत्या. त्यामुळे त्याला ह्या दोन्ही पैकी कोणते तरी एक कारण असेल असे त्याला वाटले.

"माझी तब्येत ठीक आहे, हो‌ जावईबापू.‌ देवाच्या दयेने सगळे ठीक आहे. फक्त तुम्ही एकदा येऊन जावा. खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. फोनवर नाही सांगू शकत सगळं. भेटून सविस्तर बोलू. हेमीला बी घेऊन या. चांगला पाहुणचारपण होईल आणि गाठभेट होऊन बोलणं बी होईल. कधी येता ते सांगा." वसंतराव त्याला येण्याचा आग्रह करत म्हणाले.

"मामा, मी येतो तिकडे. पण हेमीने नाही ना काही गोंधळ घातला? ते सांगा आधी. बघतोच तिच्याकडे." हेमावर चिडत त्याने त्यांना विचारले.

"नाही, ती काही नाही बोलली. जमलं तर उद्याच या." वसंतराव म्हणाले.

"बरं, येतो उद्या. ठेवतो फोन." असे म्हणत त्याने फोन ठेवला.

"असं काय महत्त्वाचं बोलायचं असेल मामांना की लगेच उद्या या म्हणाले? नक्कीच काहीतरी घडले असेल त्यांचा आवाजही गंभीर वाटत होता." तो कमरेवर हात मोबाईलकडे पाहत विचार करू लागला.

क्रमशः

का बोलवले असेल वसंतरावाने संतोषला?

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.

0

🎭 Series Post

View all