शीर्षक:-हिस्सा
भाग:- २
मागील भागात वसंतरावाने जावई संतोषला फोन करून घरी येण्याचा आग्रह केला. त्याच कारण तिथे आल्यावर सांगतो म्हणाले. त्याचे काय कारण असेल याचा विचार संतोषला पडला.
आता पुढे:-
खूप वेळ विचार करूनही संतोषला त्यांच्या फोन करून बोलवण्याचे प्रयोजन लक्षात आले नाही. तेव्हा त्याने त्याची बायको हेमाला फोन केला.
"हॅलो हेमे, तू परवा माहेरी गेली होतीस, तेव्हा काही कांड तर नाही ना करून आलीस? " त्याने सरळ मुद्द्याला हात घातला.
"ओ, तुम्ही शेतात आहात की कुठं ढोसत बसलात? काहीही काय बरळत आहात. शुध्दीत तर आहात ना." पलिकडून हेमाचा नेहमीचा चिडका स्वर त्याच्या कानी आला.
"मी पूर्ण शुद्धीत शेतातच आहे. जेवढ विचारतोय ना त्याचं खरं खरं उत्तर दे तू पहिले ! फालुतेचे प्रश्न विचारू नकोस." त्याने थोडा आवाज चढवून स्पष्ट शब्दांत विचारले.
त्याच्या चढ्या आवाजाने ती थोडी वरमून म्हणाली,"खरंच हो मी काही नाही केले. प्रत्येक वेळी मी कांड करून येते का? दुसरे काही काम नसते का मला? ते जाऊ द्या. तुम्ही असे का विचारत आहात मला? काय झालं? " ती त्याला विचारण्याचा प्रयत्न करत सौम्य आवाजात म्हणाली.
"काही नाही. मामांचा फोन आलेला. उद्या आपल्याला दोघांना बोलावलं आहे म्हणून विचारलं." त्याने वसंतरावांच्या फोन बद्दल तिला सांगितले.
"काय! बाबांनी फोन केला होता? पण कशासाठी? " कशासाठी बोलावले असेल याचा तिला थोडाफार अंदाज आला होता, त्यामुळे तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या होत्या. पण तरीही ती त्याच्याकडून काढून घेण्यासाठी त्याला विचारले.
"हो, कशासाठी ते त्यांनी सांगितले नाही. तिथे गेल्यावर कळेल. तेच तुला काही अंदाज आहे का म्हणून मी विचारले." तो म्हणाला.
"नाही, मला नाही माहिती काही." काहीच माहिती नाही या आविर्भावात ती म्हणाली.
ठीक आहे म्हणत त्याने काॅल कट केला. मोबाईलवर पुन्हा झाडाच्या फांदीवर ठेवून त्या विचारात काम करू लागला.
इकडे हेमाला मात्र खूप आनंद झाला, ती गालात हसत मनात म्हणाली,"शेवटी बाबा त्या गोष्टीसाठी तयार झाले. ह्यांना कळले तर ह्यांनाही किती आनंद होईल. चला माझ्या भांडण्याचं सार्थक होऊन काही तरी फायदा झाला म्हणायचा. हेमा, छान काम केलेस."
तिने स्वतःच स्वतःची पाठ थोपटत आनंदाने स्वतः भोवती हात उंचावत गिरकी घेतली.
दुसऱ्या दिवशी दोघेही वसंतरावाकडे गेले. नेहमी प्रमाणे त्यांनी त्यांचा छान पाहुणचार केला.
संतोष त्यांना म्हणाला,"आता सांगा मामा, का बोलावले तुम्ही आम्हाला?"
क्रमशः
का बोलावले असेल त्यांनी? हेमाने कशासाठी भांडण केले असेल?
जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा