Login

हो, ही आहे माझी आई ( भाग-२)

एका अशा आईची गोष्ट जिला समाजात उपेक्षित मानलं गेलं पण तिने एका मुलाला घडवणारी त्या आई व मुलांची गोष्ट
#जलदलेखन स्पर्धा

विषय- देवता

शीर्षक- हो, ही आहे माझी आई..

भाग-२

मागील भागात-

सुदामा लक्ष्मीला आपल्या एका कार्यक्रमात चल म्हणत असते पण ती नकार देते. तिला तिचा भूतकाळ आठवतो. त्यात तिला एक बाळं सापडतं.

आता पुढे:-

"कोण इतका कसा निर्दयी असेल. इतक्या छोट्या बाळाला असं कोणी टाकून जातं का? टाकायचं होतं तर कशाला जन्माला घातलं? नशीब मी आले म्हणून नाहीतर कुत्र्यानी फाडलं असतं. बाप रे! किती भयानक झालं असतं." ती स्वतःशीच बोलत त्या बाळाला घेऊन एका हाॅटेलमध्ये आली. तेथे पैसे देऊन बाळासाठी थोडं दूध देण्याची विनंती केली. हाॅटेल मालकाने तिच्याकडे एक तुच्छ नजर टाकली. पण तिने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले. वेटर वाटीत थोडे दूध घेऊन आला. तिने चमच्याने त्याला पाजले. थोडे दूध पोटाने गेल्याने ते शांत झालं होतं.

नंतर त्याला घेऊन ती रिक्षा करून आधी दवाखान्यात गेली, तिथे त्याच्यावर इलाज झाल्यावर त्याला घरी घेऊन आली. पण त्याच्यासाठी बेकरीतून येता येता एक दूध पिशवी घ्यायला ती विसरली नाही. घरी कोणीचं नव्हते, सर्वजण धंद्याला निघून गेले होते. संध्याकाळ पर्यंत तिने बाळाला तिच्यापासून वेगळं केलं नाही. सगळे आल्यावर काय सांगायच व याच्यासाठी काय निर्णय घ्यावा याचा विचार तिने करून ठेवला होता.

संध्याकाळी तिचे सहकारी घरी आल्यावर तिच्या हातात बाळ पाहून तिच्यावर रागावले. तिची मुख्य दिदी शब्बो जी होती ती तिला रागवू लागली,"लच्ची, इसे कहाँ से उठा लाई? हमारा धंदा क्या पता हैं ना तुझे! फिर भी तू .."

"अरे, दीदी, देखो तो सही, कितना मासूम हैं ये, इसकी हालत मुझ से देखी नहीं गयी. वही छोड आती तो ना जाने क्या होता इसके साथ?" ती हातातल्या बाळाकडे बघून त्या दिदीकडे आशाळभूतपणे नजरेने पाहू लागली.

"कुछ नहीं देखना मुझे, आज ठेवून घे, उद्या सकाळी पोलिसात देऊन टाक. ते बघतील त्याचं काय करायच ते, समजलं." शब्बो एक नजर त्या बाळाकडे बघत करारी आवाजात म्हणत तेथून निघून गेली.

दुसऱ्या दिवशी लक्ष्मी जड अंतःकरणाने त्या बाळाला घेऊन पोलीस स्टेशनचा रस्ता धरला. पण तिचं मन त्या बाळाला स्वतःपासून दूर करायला धजत नव्हतं. एकाच दिवसात त्या बाळाचा तिला खूप लळा लागला होता. ते बाळ तिचा पदर मुठीत गच्च धरून झोपलं होतं. पुन्हा एकदा त्याचा निरागस चेहरा पाहून तिचं मन गलबलून गेलं. मनाशी काहीतरी ठाम निर्णय करुन निम्म्या रस्त्यावरून ती परत फिरून पुन्हा घरी आली.

तिला बाळासहित परत आलेलं पाहून शब्बोचा चेहरा रागाने लाल झाला होता. ती झपझप पावले टाकत तिच्याजवळ गेली आणि तिचा दंड जोरात आवळून तिच्यावर गरजली,"का आणलसं तू याला माघारी? आपण किन्नर आहोत कसं समजत नाही तुला? कसे पोसणार आहेस तू याला? टाळ्या वाजवून किती कमावतो आपण हे तुला चांगलच माहिती ना. मग का नाहीस ऐकत तू?"

सगळे एकदम गुपचूप बसले. तिचा दराराच तसा होता की सगळेच तिला घाबरून असायचे. तरीही हिम्मत करून रजिया पुढे येत चाचरत म्हणाली,"दीदी, रख लेते हैं ना इसे. मासूमसी जान हैं. लच्ची का मन हैं, तो मान जाव ना."

"तुम चुप रहो, रजिया. लच्ची, तुला जर हे बाळं पाहिजे असेल तर दरवाजा उघडा आहे, आली तशीच निघ इथून. या पुढे तू इथे नाही राहू शकतं आणि रजिया तुला जर तिचा पुळका येत असेल तुलाही दरवाजा उघडा आहे." शब्बो रागात दाराकडे बोट दाखवत म्हणाली.

"दीदी, मी तुला हेच सांगायला आले होते की मी या बाळाला कधीच अंतर देणार नाही. याला मी शिकवेन, मोठं करेन, त्यासाठी काहीही करायला तयार आहे मी. तू इतके दिवस मला आसरा दिलास त्यासाठी तुझे खूप आभार. निघते मी." बाळाला एका हातात धरून तिने वाकून शब्बोचा आशीर्वाद घेतला आणि तिथून निघून गेली. तिच्यासोबत रजियापण आली. ती तिची खास मैत्रीण होती.

लक्ष्मीने तिला खूप समजावलं पण तिने ऐकलं नाही. दोघी त्या छोट्या बाळाला घेऊन निघाल्या. तिने आधी एका आश्रमात बाळाला भरती केलं, लवकरच ती त्याला पुन्हा घेऊन जाईल याचा दिलास देऊन तेथून बाहेर पडली. तिने तिच्या धंद्याला फाटा देऊन तिच्या ओळखीच्या काही लोकांकडून थोडी रक्कम जमा करून तिने छोटी चहाची टपरी टाकली. त्यात तिला खूप अडचणी आल्या पण ती मागे हटली नाही. रजिया होतीच तिच्या सोबतीला. चहा सोबत आता ती नाष्टाही देऊ लागली. तिच्या हाताला छान चव होती. त्यामुळे तिची टपरी लवकरच नावारुपाला आली. त्या तिने बाळाचे नाव सुदामा ठेवले. अधूनमधून ती त्याला जाऊन भेटून यायची.

क्रमशः

काय झालं असेल पुढे? सुदामाला तिने कसे संभाळलं? ती त्या कार्यक्रमाला जाईल का?

©️ जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. मनोरंजनातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

🎭 Series Post

View all