भाग 3(अंतिम)
राणीने काहीशा काळजी आणि उत्सुकतेने ते पत्र उघडलं. पत्र वाचताना तिचे भाव झरझर बदलत गेले. सुरवातीला वाटत असणारी काळजी नाहीशी झाली, आणि आनंदाने तिचं मन मोहोरलं. त्या पत्रावर राष्ट्रपतिंची मोहोर होती. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकलेल्या सर्व खेळाडूंचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार होता. म्हणूनच निलसह बाकीच्या खेळाडूंना दिल्लीतच थांबवून घेतलं होतं. आणि राणीला त्या समारंभाच आमंत्रण आणि विमानाचं तिकीट त्या पत्रातून मिळालं होतं.
नीलने बंदुकीच्या विविध स्पर्धांमध्ये भारताचा खेळाडू म्हणून भाग घेऊन दोन रुपेरी तर एक सुवर्णपदक जिंकलं होतं. त्याच्या कामगिरीचं देशविदेशातून कौतुक होत होतं. देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या तोंडात आज नीलचं नाव होतं.
ठरल्या दिवशी राणी विमानाने दिल्लीला गेली. विमान जरा हळूच जातंय असं तिला वाटत होतं. मनाने ती केव्हाच दिल्लीला पोहोचली होती. तिला कधी एकदा निलला बघतेय असं झालं होतं. पहिल्यांदाच ती निलपासून एवढे दिवस लांब राहिली होती.
समारंभाच्या ठिकाणी पोहोचल्यावर तिला मानाने आत नेऊन पहिल्या रांगेत बसवलं. तिच्यासारखेच बाकीच्यांची खेळाडूंचे पालक तिथे बसले होते. आनंदाने सगळ्यांचेच चेहरे फुलले होते. बाकीची भरपूर लोकं समारंभ पहायला आलेली होती. टीव्हीच्या प्रत्येक चॅनलवर ह्या खेळाडूंचीच चर्चा होती. त्यांची कामगिरी पुन्हा पुन्हा दाखवली जात होती. पत्रकार पुन्हा पुन्हा खेळाडूंची मुलाखत घेत होते.
सगळे प्रमुख पाहुणे मंचावर बसले होते. कार्यक्रमाला सुरवात झाली. भाषणे झाली, आणि तो क्षण आला, ज्याची सगळे आतुरतेने वाट बघत होते. एक एक खेळाडूंच नाव पुकारल्यावर तो मंचावर येऊन सत्कार स्वीकारत होता.
नीलच नाव पुकारलं तेव्हा राणीच्या डोळ्यात पाणी आलं.. तिचा नील टाळ्यांच्या गजरात राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार घेत होता. निल आभाराचं भाषण करायला उभा राहिला, तेव्हा नीलचा लहानपणापासूनचा सारा प्रवास तिच्या डोळ्यांपुढे तरळून गेला. तिला तो छोटा नील आठवत होता, एकटाच रहाणारा, मित्र नसलेला, शाळांनी नाकारलेला. आणि आजचा नील, जो प्रत्येक भारतीयांचा अभिमान झाला होता. त्याचं स्वप्न जिद्दीने पूर्ण केलेला.
हा सोहळा बघताना मोहरून मोरपीसप्रमाणे झालेलं तीच मन गाणं गुणगुणत होतं,
एके दिनी परंतु पिल्लास त्या कळले,
भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले।
पाण्यात पाहताना चोरुनिया क्षणेक,
त्याचे तया कळाले तो राजहंस एक….
भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले।
पाण्यात पाहताना चोरुनिया क्षणेक,
त्याचे तया कळाले तो राजहंस एक….
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा