मागील भागात आपण बघितले…
"हे असे का वागतात? म्हणजे आमच्या लग्नाला पाच वर्ष झालीत पण मी बाबा आणि ह्यांना कधीच नीट बोलताना बघितलं नाही. ह्यांना विचारायची सोय नाही. म्हणून तुम्हाला विचारलं आज." राधा एका दमात बोलली.
आता पुढे…
राधाच्या ह्या प्रश्नावर, मीनाक्षीताई काहीही न बोलता निघून गेल्या. राधा त्यांना जाताना बघत होती. मनातून ती उदास झाली होती.
"असं काय असेल की, माझ्या प्रश्नाचे उत्तर कोणीच देत नाही." राधाच्या मनात असलेल्या प्रश्नांची चिन्हे तिच्या चेहऱ्यावर दिसत होती.
"तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो तुला." इतकावेळ दारा मागून सगळं ऐकणारा माधव बाहेर येत बोलला. माधव म्हणजे मुकुंदचा लहान भाऊ.
"माधव भाऊ तुम्ही?" राधा त्याच्याकडे बघत बोलली.
"वहिनी पाच वर्षांपासून तुम्ही जे बघत आहात. ते मी मला समज आली तेव्हापासून बघतो आहे. खरं तर मला सुद्धा बाबांबद्दल काहीच प्रेम वाटतं नाही. फरक फक्त इतकाच आहे की, दादा बोलतो, भांडतो, पण मी बोलत नाही." माधव बाजूच्या खुर्चीत बसत बोलला.
"भाऊ खरं सांगू? आज विचारलेला प्रश्न माझ्या मनात पाच वर्षांपासून रेंगाळतो आहे. पण कधी विचारलं नाही मी काही. सुरुवातीला तुमच्या दादांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काही बोलणे टाळले. मग मी वाद नको म्हणून विचाराने सोडले."
"मग आज का विचारलं आईला?" माधव बोलला.
"भाऊ, आपण म्हणजे बाबा सोडून, आपणच असलो की, घर आनंदात असतं. पण बाबा आले की, दुधात मिठाचा खडा पडल्या सारखे तुम्ही आणि तुमचे भाऊ उठून निघून जातात. आजपर्यंत तुमची भाची म्हणजे अनघा लहान होती, पण आता ती चार वर्षांची झाली आहे. आता ती देखील तुमचे असे वागणे पाहते आहे. तिला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडेच नाहीत, मी कसं समजावून सांगू तिला? आणि शेवटी ती जे बघते, तेच संस्कार तिच्या बाल मनावर होत आहेत. त्याचे ठसे तिच्या ओल्या मातीवर उमटत आहेत. जे तिच्या भविष्यासाठी घातक आहे. भाऊ खरं सांगू तर माझ्या मुलीला असे वातावरण दाखवण्याची अजिबात इच्छा नाही. हे सगळं कुठे तरी थांबलं पाहिजे.
भाऊ प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. माझं पण असच स्वप्नं आहे अगदी \" विमल लिमये \" ह्यांच्या त्या कविते सारखं.
घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती
त्या शब्दांना अर्थ असावा
नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे
नकोत नुसती गाणी
नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे
नकोत नुसती गाणी
भाऊ तुम्हीच सांगा खरंच आहे का आपलं घर असं? मोठेच एकमेकांशी नीट वागत नाहीत. तर आपण लहान मुलांना काय शिकवणार? काय संस्कार करणार त्यांच्यावर?" राधा मनमोकळे बोलली.
"वहिनी हाच प्रश्न गेल्या काही दिवसांपासून माझ्या मनात घर करून आहे. आज तू विषय काढला म्हणून म्हटलं आपणही बोलावं. तुझं बोलणं अगदी योग्य आहे. जर पायाच कच्चा असेल तर, त्यावर भक्कम इमारत बांधली जाऊच शकत नाही." माधव बोलला.
"चला म्हणजे तुम्हाला पटतं आहे माझं बोलणं. मग भाऊ सांगा ना काय घडलं होतं त्यामुळे तुम्हा दोघांमध्ये आणि बाबांमध्ये असे क्लेश निर्माण झाले. बोललात तर कदाचित आपण दोघे मिळून त्यातून काही मार्ग काढू शकू." राधा जरा खुश होत बोलली.
"दोघे नाही, तिघे मिळून."
"आई तू?" माधव बोलला.
"हो, तुम्हा दोघांचे बोलणे ऐकले आहे मी. राधा बरोबर बोलते आहे. आपल्या भूतकाळामुळे आपण लेकरांचे भविष्य पणाला नाही लावू शकत. शेवटी जे घडून गेले आहे, ते तर आपण बदलू शकत नाही. पण भविष्य तर आपल्या हातात आहे." मीनाक्षी, राधाच्या पाठीवर हात ठेवत बोलली.
तसा राधाचा चेहरा आनंदाने खुलला.
"भाऊ सांगताय ना मग? हे आणि बाबा घरी यायचा आत आपलं बोलून झालं पाहिजे." राधा घाईत बोलली.
"हो सांगतो. वहिनी ही काही एक घटना नाही. दादा आणि माझ्या वागण्यामागे अनेक वर्षांचे विविध घटना क्रम आहेत." माधव बोलला.
काय असेल तो घटना क्रम? राधा ला सांगू शकेल का माधव? त्यासाठी वाचत रहा घर असावे घरासारखे.
क्रमशः
©वर्षाराज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा