मागील भागात आपण बघितले..
"भाऊ सांगताय ना मग? हे आणि बाबा घरी यायचा आत आपलं बोलून झालं पाहिजे." राधा घाईत बोलली.
"हो सांगतो. वहिनी ही काही एक घटना नाही. दादा आणि माझ्या वागण्यामागे अनेक वर्षांचे विविध घटना क्रम आहेत." माधव बोलला.
आता पुढे…
"थांब माधव मी सांगते सगळं, अगदी सुरुवातीपासून. राधा माझं लग्नं झालं तेव्हा मी सून म्हणून एका मोठ्या वाड्यात आले. चार भावांच एकत्र कुटुंब होतं. मी सगळ्यात मोठी सून. त्यामुळे अपेक्षांचा भार साहजिकच माझ्यावर होता. त्यात मामांजिंचा स्वभाव म्हणजे दुसरे जमदग्नीऋषीच. आत्त्याबाई पण तापट स्वभावाच्या. कामात एखादी बाईक चूक देखील त्या खपवून घेत नसत." मीनाक्षी बोलत होती.
"सून म्हणजे फुकटची नोकर असं समजणारी होती आमची आजी." माधव मध्येच बोलला.
"माधवा थांब जरा. त्यात आत्त्याबईंचा काही दोष नव्हता रे. तुझे आजोबा जरादेखील समजून घेत नसत. काही चूक झाली, कशात काही कमी राहिली, तर त्यांचा सगळा राग सासूबाईंना सहन करावा लागत असे. त्यामुळे त्यांचा स्वभाव देखील तसाच झाला होता. अर्थात ही गोष्ट माझ्या देखील खूप उशिरा लक्षात आली.
थोरली सून आणि मुलगा म्हंटल्यावर कामाची, आर्थिक, इतर कुटुंबाची सगळी जबाबदारी आम्हा दोघांवर होती." मीनाक्षी भूतकाळात आठवत होती.
"आई, जबाबदारी कसली गं ती? ते तर बंधन होतं. लहान भावांसाठी मोठ्या भावाने आणि सुनेने सगळा त्याग करायचा. त्यांच्या सुखाचा, त्यांच्या स्वप्नांचा सगळा त्याग. हे कोणतं शहाणपण आहे? म्हणजे बाकीच्यांच्या सुखासाठी एकाच्याच सुखाचा बळी घ्यायचा, कशासाठी? आणि इतकं करून काय मिळालं तुम्हाला?" माधव जरा वैतागून बोलला.
राधा नीट लक्ष देऊन ऐकत होती.
"मग पुढे काय झालं?" राधा.
"ह्यांच्या तीनही भावांच्या शिक्षणाची जबाबदारी मामांजिंनी ह्यांच्यावर टाकली. आधीच नवीन नोकरी, त्यात पगार कमी. पण आई वडिलांच्या समोर बोलण्याची बिशाद नव्हती ह्यांची, त्यामुळे मन मारून त्यानी पै पै जोडत तिघांचे शिक्षण केले.
बाहेर ते मर मर करत होते आणि घरात माझे हाल होत होते.
पहाटे चारला उठून सडापाणी, रांगोळी घालायची. अंघोळीला बाराही महिने थंडच पाणी मिळत असे. त्यामळे थंडीत माझी तब्बेत खराब होत असे." मीनाक्षीच्या डोळ्यात बोलताना पाणी आले.
"आई मग तुम्ही काहीच का बोलला नाहीत? एवढ्या मोठ्या वाड्यात नोकर नव्हते का? आणि गरम पाण्याला सरपण नसेल इतक्या मोठ्या वाड्यात, तर ते शक्य नाही. तुम्ही का सहन केलं? आणि बाबा काहीच बोलले नाही?" राधा चक्रावून बोलली.
"त्याचंच तर दुःख आहे ना वहिनी! बाबा कधी काहीच बोलले नाही." माधव रागावून बोलला.
"राधा तुला ती म्हण माहीत आहे का? \" गरजवंताला अक्कल थोडी \" तशीच काहीशी माझी परिस्थिती होती.
घरात नोकर चाकर सगळे होते. पण घरातील मोठ्या सुनेने नाही केले काम, तर धाकट्या सूना काय शिकतील तिच्या कडून. शेवटी सगळ्यांना वळण लावण्याची जबाबदारी माझी आहे. असे म्हणून कामाची जबाबदारी माझ्यावर लादण्यात आली. त्यात मी गरीबा घरची मुलगी. कमी शिकलेली, अडाणी नव्हते पण शिक्षण जेमतेम सातवी होते. आर्थिक परिस्थिती नसताना देखील बाबांनी मला सातवी पर्यंत शिकवली. पुढे काही शिकता आले नाही. त्यात सोळाव्या वर्षी ह्यांचे स्थळ सांगून आले. हुंडा न घेता लग्नं करतो म्हणाले. आई बाबांना वाटले पोरगी मोठ्या घरात जाईल आणि आपली पण जबाबदारी कमी होईल म्हणू दिले लावून लग्नं. साठच्या दशकात मुलीची इच्छा फारशी विचारात घेत नसतं. त्यात गरीब घरातल्या मुलींची तर मुळीच नाही.
माझी गरिबी माझी लाचारी ठरली, मला हे जमत नाही, ते जमणार नाही असं बोलून मला चालणार नव्हते. आई वडिलांची परिस्थिती आधीच नाजूक. माझ्या मागे अजून चार बहिणी लग्नाच्या होत्या. वर्ष भरातच पदरात मुकुंद देखील होता. आता अशा स्थितीत मी माहेरी परत गेले असते तर, त्यांची लग्न झाली नसती. मग माझ्या आई वडिलांकडे आत्महत्या करण्या वाचून गत्यंतर नव्हते हे मी जाणून होते. म्हणून मग सहन करणे हाच एक मार्ग होता माझ्या समोर." मीनाक्षी सांगत होती पण तिच्या समोर त्या घटना तिला परत दिसत होत्या.
"पण बाबा तर बोलू शकत होते ना?" माधव रागात बोलला.
बोलले असतील का प्रकाशराव? की नाही? अजून काय झाले असेल? इतकंच करणं असेल का मुकुंद, माधव आणि प्रकाशरावांमधील भांडणाचे? वाचत रहा घर असावे घरासारखे..
क्रमशः
©वर्षाराज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा