Login

असे किती वार पाळायाचे..?

उपवासाचा अतिरेक सुद्धा घातक ठरू शकतो.
"आपल्या घरात सोमवारी कुणीही अंड खात नाही. माझा आणि यांचा उपवास असतो. तुला हे नवीन सांगायला हवे का कावेरी?"

"अहो आई, मला डॉक्टरांनी रोज खायला सांगितले आहे. तुम्हाला मागच्याच आठवड्यात म्हणाले होते मी."

"अगं त्यांच काय जातंय सांगायला. घरातल पावित्र्य नष्ट करायच का? आणि एक दिवस खाल्लं नाही तर काही बिघडत नाही. टाकून दे ते आणि त्याची भांडी स्वच्छ धुवून ठेव. " सासुबाई चिडून म्हणाल्या.

कावेरी रडवेली झाली, पण गप्प उठून तिने सर्व भांडी धुवून ठेवली. कावेरीला स्नायू कमजोर झाल्याने रात्री हाडे दुखून येत. उठायचे चालायचे अवघड होई. स्नायूंच्या बळकटीसाठी डॉक्टरांनी तिला रोज दोन तीन अंडी खायला सांगितली होती. आणि नियमित व्यायाम सांगितला होता.
घरात अंडी चालत नव्हती , अशातला भाग नव्हता, पण तिच्या सासूबाईंचे 'हा वार शंकराचा, हा वार दत्ताचा, हा वार देवीचा' असे फार असायचे. याव्यतिरिक्त एकादशी, संकष्टी पाळायच्या ते वेगळेच.
कावेरी धार्मिक नव्हती असे नाही, पण आजपर्यंत तिनेही त्यांच्यानुसार सर्व पाळले होते. पण आता तिच्या आरोग्याचा प्रश्न होता. तसा तिला डॉक्टरांनी प्रोटिन पावडर आणि गोळ्यांचा पर्याय दिला होता, पण त्याचे इतर दुष्परिणाम असल्याने कावेरीने त्यास नकार देऊन घरगुती अंड्याचा पर्याय स्विकारला होता.

पण सासूबाईंचे वार पाळत पाळत तिचे एका आठवड्यात फक्त दोन तीन दिवसच अंडे खाणे होई. रोज व्यायाम करून सुद्धा रात्री हाडे दुखून येत. तिच्या नवर्‍याला यातले काही माहीत नव्हते.

एके रात्री तिचे बेडवरून हालणे अवघड झाले, तेव्हा नवर्‍याने घाबरून दवाखाना गाठला. डॉक्टरांनी बेसिक विचारपूस केली. तेव्हा कळाले की , कावेरी व्यायाम करतेय पण म्हणावा तसा आहार नाही आहे.

डॉक्टर म्हणाले, मॅडम तुम्ही जो व्यायाम करता त्यातून शरीरातील ताठरपणा निघून जातो आणि स्थूलता पण कमी होते. पण त्याचबरोबर स्नायूंना ताण येतो. स्नायूंची झीज व्हायला सुरू होते. आणि ती होऊ नये, म्हणून आपण आहारातून प्रथिने घेतो. शाकाहारी आहारात म्हणावी तशी त्याची मात्रा नसते, म्हणून प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हणून आपण अंडे खातो. तसा आपल्याकडे प्रोटिन पावडर हा पर्याय आहे, पण तुमच्या इतर मेडिकल कंडिशन बघता तो पर्याय मला योग्य वाटत नाही. पण एक सांगतो, योग्य आहार नाही घेतला तर तुमच्या स्नायूंची झीज वाढणार, आणि पुढे तुम्हाला असह्य त्रास होणार.

ते ऐकून कावेरीचा नवरा घाबरतो ,
'कावेरी जर तुला डॉक्टरांनी आधीच आहार सांगितला आहे तर तू का घेत नाही आहेस ?"

"तुम्हाला घरातली परिस्थिती माहित नाही का? सासुबाई आठवड्यातून चार दिवस उपवास ठेवतात, आणि मलाही काही खाऊ देत नाहीत. काय बोलू मी त्यांना ?"

"मी समजावतो आईला." असे म्हणत तिच्या नवर्‍याने घरी आल्यावर आईला समोर बसवले आणि डॉक्टरांनी जे सांगितले ते सांगून पुढे म्हणाला,

" अग आई देवाचा एकच असा कोणता वार नसतो, तसे बघितले तर सगळेच वार त्याचे असतात, देवाने आपापसात वार वाटून घेतलेले नाहीत, हे सर्व मानवनिर्मित आहे, माझे म्हणणे आहे की ज्याला पटत नाही त्याने कधीच खाऊ नये. पण ज्याला खायचे आहे त्याने रोज खावे, एकदा खाऊन, एकदा उपवास करून अर्धवट मनाचे समाधान करू नये.

कावेरीला संधिवात झालाय. तिचे हे सर्व रोज खाणे आवश्यक आहे. आपल्या शरीरापेक्षा कोणता वार कोणत्या देवाचा हे जास्त महत्वाचे आहे का? तू तुझ्या पुरता उपवास कर पण तिला खाऊ दे."

"बास, माझ्या घरात हे चालणार नाही म्हणजे नाही. इतक्या वर्षाची परंपरा मी मोडणार नाही म्हणजे नाही. तिला पर्याय शोधायला सांग." असे म्हणून त्या आत निघून गेल्या.

कावेरीच्या नवर्‍याला राग येत होता. पण तो काहीतरी विचार करू लागला. पुढच्याच महिन्यात त्याची बहीण येणार होती, आणि आई वडिलांना काही दिवस तिच्याकडे घेऊन जाणार होती. तोपर्यंत त्याने कावेरीला कळ काढायला सांगितले.

"एक महिना थांब, तोपर्यंत मी तुला गुपचूप रूममध्ये अंडी आणून देतो. कोणाला कळून देऊ नको."

कावेरीला कळतच नव्हते की एक महिन्याने हा काय करणार आहे..

क्रमशः....


सदर कथा कोणत्याही शाकाहारी किंवा धार्मिक लोकांच्या भावना दुखावण्याचा हेतूने लिहलेली नसून स्वअनुभवावरुन आरोग्यविषयक जागृतीसाठी लिहिलेली आहे. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व.

0

🎭 Series Post

View all