Login

हृदयांतर: एक अतरंगी प्रेमकथा

हृदयांतर: एक अतरंगी प्रेमकथा
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025


हृदयांतर: एक अतरंगी प्रेमकथा


पावसाळ्याचे दिवस त्यात आधीच कॉलेजला जायला खूप उशीर झाला होता. जोपर्यंत हॉस्टेल ची व्यवस्था होत नाही तोपर्यंत हेच होणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. त्यात गेट वर एक मुलगा एका सुंदर मुलीचा हात धरून खेचत तिला छेडत होता. दोघेही पाठमोरे असल्याने कोण होतं ते दिसलंच नाही त्यात आधीच डोकं सटकल होत. जाताच काहीही एक न बघता त्या मुलाला वळवून खाडकन कानामागे लावून दिली. काय एक्सप्रेशन होते त्याचे अहाहा... आणि कावेरीचेही... ती मुलगी अगदी गळ्यात पडून रडूच लागली.कावेरीने तिला जवळ घेऊन डोक्यावर अलवार हात फिरवला.

"तू नितीन भाऊला कानफटात का टाकली ?" अनि शर्टाच्या बाह्य वर करत मधेच हजर झाला.

" एय पावकिलो... चल हो माग..! आला मधेच.." कावेरी जवळजवळ डाफरलीच.

" मी नाही तूच आली, बोलतायत ना ते दोघ." अनि काहीसा घाबरून म्हणाला.

" हे अस बोलणं..! डोळे बघ तिचे किती लाल झालेत, चल निघ नायतर डोक्यात घालीन काही." तो तसाच निमूट कावेरी पासून दूर जाऊन उभा राहिला.

नितीन कावेरी कडे लाल होऊन रागाने बघू लागला. " शट अप नितु... ती माझी स्वीट हार्ट आहे आणि तू दिसलाच नाही तिला... तिला वाटलं दुसरं कुणीतरी आहे." इमा नितीनच्या खतरनाक लूक कडे बघून कावेरीला प्रोटेक्ट करण्यासाठी बहाणा देत म्हणाली.

"ही स्वीट हार्ट..! स्वीट हार्ट नाही..! हार्ट अटॅक आहे ती..!" नितीन कावेरी कडे रागाने बघत म्हणाला पण त्याच्याच जोक वर तो वेडयागत हसू लागला.

नितीन कावेरी शाळेपासून एकत्र पण दोघांचं एक मिनिटं ही जमायच नाही. त्याची छंद होता येता जाता खोड्या काढायचा, इन्सल्ट करायचा आणि अगदी एखाद्या सासूला लाजवेल इतका त्रास तो तिला द्यायचा..!

कावेरीने त्याला बारीक डोळे करून अजून चिडून बघितलं तस त्याने तिला डोळा मारला. तिच्या तर डोक्यात तिडीक गेली अगदी आता त्याचे डोळे काढून गोट्या खेळते की काय.. तिच्या हातात एखादी वस्तू असती तर फेकून मारली असती पण तिच्या एकुलता एक मोबाईल ची तिला दया आली आणि मोबाईल इमाच्या हातात देऊन जोरदार ठोसा नितीन च्या पोटात मारला.

" काय करतीय कावू..!" तिची डिअर फ्रेंड इमा गरजली.

"काही नाही चेक करत होते पोटात दगड तर नाही ना.." एक गोड अशी स्माईल देऊन इमाकडे बघत कावेरी म्हणाली.

नितीनचे एक्सप्रेशन बघता ठोसा बराच जोरात लागलं होतं त्याला.
"माय गॉड ..! किट्टी..! हात आहे की हातोडा तुझा." तो पोटाला धरून कळवळला. दोघी ही एकमेकींकडे बघून हसू लागल्या.

" ओह कमॉन , नीतू..! तिचा जीव केवढासा.. तिचा हात केवढासा..! काहीही नको बोलू..!" इमा कावेरी ची बाजू घेत म्हणाली. तस कावेरीने तिला एक झप्पी आणि पप्पी दिली. तस तर ती नेहमीच कावेरीची बाजू घ्यायची.

" आता कळलं ना तुला , माझ्या पोटात दगड नाहीत ते.." नितीन रागातच म्हणाला.

"आंह...!पोटात नाही डोक्यात आहेत.." कावेरी खिदळत म्हणाली.

" झाली ना इथं काव काव करून, जा आता निलू वाट बघतेय तुझ्या बेंचवर..." अर्थात कावेरी रोज नीलम सोबत बसायची.

ती आणि इमा हातात हात घालून क्लास रूम कडे निघाल्या. नितीन त्यांच्या पाठमोऱ्या बघत कुत्सित पणे वरचा ओठ तिरपा करत हसला.

"दिसायला केवढी नाजूक, पण बुक्का केवढा मारते यार.." नितीन त्याच कपडे नीट करत त्यांच्या मागोमाग निघाला.

तो मागून येताच, इमा आणि नितीन त्यांच्या गुलुगुलु गप्पा सुरु झाल्या मग कावेरी ही पुढे निघून गेली तेही मोबाईल मध्ये बघत उलट चालू लागली.

इमा आणि नितीन कॉलेज च्या पहिल्या वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये होते हे सगळ्या कॉलेजला माहिती होत.

इमा आणि कावेरी एकमेकींच्या बेस्टी, सगळी दुनिया कावेरीचा विरुद्ध असली तरी ही इमा फक्त कावेरीचीच बाजू घेणार. दिसायला अगदी एखाद्या हिरोईनला लाजवेल इतकी सुंदर पण तिला स्वतःच्या सौंदर्याचा गर्व होता ना श्रीमंतीचा. कावेरी वर खूप जीव होता तिचा.

"अग म्हशी पडशील ना..! उगाच कॉलेजच्या कॉरिडॉर मध्ये फरशी तुटतील, आणि तू त्यात रुतून बसशील हे वेगळंच..!" नितीन म्हणाला.

कावेरीने खाऊ की गिळू लूक दिला आणि पुन्हा मोबाईल मध्ये गुंतली. आणि काही अंतर चालून पडणार तोच तिला एका मुलाने पकडलं. तो तिला कधी न पाहिल्यागत तसाच पकडून उभा राहिला. तीही उलट वाकड्यात अवघडून गेली. इमा ही घाईने ती पडणार म्हणून तिला सांभाळायला गेली. आणि कावेरी इमा च्या आधाराने उभी राहिली.

" काय..! पोरगी पहिली नाही का या आधी, की ह्या ग्रहावर पहिल्यांदाच आलाय..?" कावेरी डोळे बारीक करून त्या मुलाकडे बघू लागली. तो मात्र मंत्रमुग्ध होऊन तिला बघत होता. त्याच्या नजरेत तीच बोलणं हालचाली अगदी मंद झाल्या होत्या. सगळंच स्लो मोशन मध्ये सुरू होत.

"देवा हा जो कुणी आहे वाचव रे त्याला..!" नितीन ने मनोमन देवाला काकुळतीने विनवणी केली. कदाचित नितीनला त्या मुलाचे भाव जाणवले होते. कावेरी तशीच पुढे निघून गेली. तो मुलगा मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीला एकटक बघत होता. इमा देखील नितीन सोबत गप्पा मारत क्लासरूमच्या दिशेने निघाली.

कावेरी क्लास रूम मध्ये पोहोचली.

" हे कावू... तुझी गर्लफ्रेंड..?" पल्लवीने इमा सोबत दिसत नाही म्हणून विचारलं.

" तिच्या बॉयफ्रेंड सोबत.." कावेरीने खांदे उडवत उत्तरली. आणि नीलमच्या बाजूला बेंच वर बसली. नीलम आपली काजू चरण्यात बिझी होती.

" यू नो व्हॉट.. इमा डिझेर्व बेटर दॅन हिम." पल्लवीलाही नीतीनच्या मस्तीचा खूप राग यायचा.

" पल्लो तुला आणि मला वाटून काय उपयोग..! हे तिला कळायला हवं ना..!" कावेरी उसासा टाकत म्हणाली.

" हर लाईफ , हर चॉईस..!" प्रणिता नेहमी प्रमाणे दोघींच्या मधेच बोलत नितीनच संवेदन पत्र घेऊन आली.

" तुला आर आय पी करून देतो , स्टिकर बनवून देतो, म्हणून तू कायम त्याच वकील पत्र घेते." कीर्ती त्यांचं संभाषण ऐकून त्यांच्या बेंचला टेकून स्टाईल मध्ये कमरेवर हात ठेवून चुइंगम चघळत उभी राहिली.

" ए अस काही नाही, ही इज नाइस गाय, अँड टॉपर आहे क्लास चा.." प्रणिता ने वकील पत्रातील पहिला आणि महत्वाचा मुद्दा मांडला. अर्थात ते ही तितकंच खरं होत. त्यामुळेच तो सगळ्या टीचर्स चा लाडका होता. थोड्या वेळातच इमा, नितीन, मेघा, त्रिवा, रुद्र, विनय सगळेच क्लास मध्ये हजर झाले. विनय क्लासरूम आत येताच सगळ्या मुली जस कृष्णाच्या गवळणी बनून त्याला ताडत होत्या.

तितक्यात वर्गात सगळ्यात खडूस मॅंम ची एन्ट्री झाली. बेनिवाल मॅम..! नावाप्रमाणेच घंमंडी.. पेशन्स आणि अंडरस्टँडिंग लेव्हल झिरो विथ झिरो टोलरन्स.! वर्गात पाऊल ठेवताच पिन ड्रॉप साइलेन्स.. तिने ही वेळ न दवडता शिकवायला सुरुवात केली आणि बोर्ड वर लिहू लागली आणि मुलांना नोट्स लिहायला सांगितलं.

नीलमने वही उघडताच जोरात किंकाळी फोडली. पुन्हा उभं राहून दोन्ही कानांवर हात ठेवून अजून जोरात ओरडली. तिच्या बाजूलाच बसलेली कावेरीच लक्ष उघड्या नोटबुक कडे गेलं आणि उभी राहून जोरात ओरडली पण ह्यावेळी नीलम नाही तर कावेरी पण जोरात ओरडली होती.

तिने नोटबुक काही एक न बघता बेंच वरून समोर भिरकावून दिली. लहानपणी पासून झुरळाची जाम भीती वाटायची.

"हुश्श..!" निश्वास सोडून खाली बसणार तोच तिच्या चार पण मोठी किंकाळी समोरून ऐकू आली ती दुसरं तिसरं कुणाची नाही तर बेनिवाल मॅम ची होती.

ती उडालेली नोटबुक सरळ मॅम च्या साडीवर धडपडली आणि झुरळ मॅम च्या खांद्यावरच्या पदरावर...

खरतर आज त्या झुरळाच आभार मानायचे होते कावेरीला, पण तिला स्वतःलाच त्याच्या मिशांची भीती वाटायची त्यामुळं तिने ते सर्वस्वी टाळलं.

"रिलॅक्स मॅम..!" शायनिंग मारत नितीन मॅमच्या दिशेने निघाला.

" बावळट कुठला.. थोडावेळ अजून ओरडू द्यायचस की.." कावेरी हळूच पुटपुटली.

त्याने अलगद त्या झुरळाच मिशी धरली आणि कावेरी आणि नीलम कडे कुत्सित पणे हसून बघत खिडकीतून बाहेर फेकलं. आणि पुन्हा मॅम कडे जाऊन कानात काहीतरी कुजबुजला.

तिने नीलमला खुनावल.. मॅम आणि नितीन बोलताना बघून.

"कळेलच थोडा वेळात काय चालू आहे ते.." नीलम हळूच बोलली.

" झुरळाची घर झालीत निलु वही पुस्तकात, कधीतरी उघडत जा अभ्यासाला.." पल्लवी खिसपीस करत म्हणाली, तसे सगळे जोरजोरात हसू लागले.

नीलम ने डोळे मोठे करून गाल
फुगवत मागे वळून पल्लवीला अगदी खाऊ की गिळू नजरेने बघितलं.

कावेरी विचार करू लागली की.. हा असा का हसला.? म्हणजे..! ह्याचाच काहीतरी कांड असणार... कावेरीने त्यावरची नजर फिरवून डोळे मोठे करून मॅम कडे बघितलं पण मॅम मात्र तिच्यावर आणि निलमवर जाळ फेकत होत्या. कारण ते झुरळ नकली होत हे नितीनने मॅडमला सांगितलं. त्यामुळं मॅडम आणखीनच कावल्या. कावेरी आणि नीलमने अक्षरशः निमूटपणे खाली डोकं घातल. मॅडमचे शब्दसुमने फायनली संपली आणि तिने ओरडून दोघीनाही बसायला सांगून शिकवायला सुरुवात केली.

"एक मिनिट, तुझी वही तर नित्या कडे होती ना..!" कावेरीने विचारलं.

"हो थोडावेळपूर्वी गेटवरच दिली मला." नीलम म्हणाली.

"त्याच्या तर..!" कावेरी अजूनच चिडली. नीतीन अजून ही कुत्सितपणे बघून हसून दोघींची मजा घेत होता.

"इतकी मस्ती करूनही तुमच मन भरत नाही. आधी ते नकली झुरळ आणि आता गप्पा मारताय दोघी..! आत्ताच्या आत्ता माझ्या क्लासमधून बाहेर निघा." मॅडम तर आता अगदी पेटल्याच होत्या.

दोघींनी बॅगमध्ये नोटबुक कोंबून वर्गाबाहेर निघून गेल्या. कावेरी आता रिकाम्या वेळात काय करायचं म्हणून विचार करू लागली.

"कॅन्टीनला जाऊ..!" नीलम म्हणाली.

"नाही...! प्रशांत सरांनी बघितलं तर घरी सांगतील. "कावेरी काहीसा शून्यात विचार करत म्हणाली. "चल तू.."

कावेरी चल म्हणल्यावर नीलम तिच्या मागोमाग निघाली. आणि दोघीही टेरेसवर आल्या. एक मुलगा टेरेसच्या कठड्यावर उभा होता. कावेरीला वाटलं तो आत्महत्या करायचा प्रयत्न करतोय त्यामुळं जोरात 'ऐ भेंडी ' ओरडून त्यांना खसकन मागे ओढलं आणि ती खाली पडली नि तो तिच्या वर. आणि दोघ ही एकमेकांना पाहतच राहिले पण आपली धीट कावेरी लगेच त्याला लात मारून अंगावरून दूर केला आणि कपडे झटकून उभी राहिली.

" हाय...sss..! कधी तू माझ्यावर कोसळतेस कधी मी तुझ्यावर... मला अस आयुष्यभर आवडेल..!"

"अय रताळ्या..! कधी मजनू बनतो कधी विरु बनून आत्महत्या करायला जातोस..! तुझा प्रॉब्लेम काय आहे..?" लगेच निलमकडे वळून वैतागून म्हणाली, "आणि सगळे सटकेल लोक माझ्याच राशीला का आलेत..!"

"मी, आणि आत्महत्या..?" तो मुलगा म्हणाला. "ओह, आता समजलं, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी कुणाल.."

"तू कुणी का असेना, मला काय करायचंय, चल निलू.." कावेरी टेरेसवरून कॉरिडॉरच्या दिशेने निघाली.

"अहो मिस, मी कुणाल, आय मीन माझं नाव कुणाल..!"

"मग मी काय करू..?" तुला आवडत नाही का तुझं नाव की पुन्हा बारसं करायचं..!" आणि निलुच्या हातावर टाळी देत कुचकटपणे हसून पुढे निघून गेली. पण ह्या धडपडीत कावेरीची हातातली डायरी मात्र तिथंच पडली होती.

कुणालच्या हातात चुकून कावेरीची वही लागली , अगदी दुग्धशर्करा योगच ! त्यात तिच्या आवडीच्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. कावेरीचं हस्ताक्षर अगदीच काही वाईट नव्हत म्हणजे जर योग्य जुळवाजुळव केली. थोडा विचार केला तर शब्द नक्की लागणार ,याची गॅरंटी! कुणालला पहिलं वाक्य कळायला जवळजवळ तीन तास लागले पण त्याला त्या कोड्याची चावी सापडली. त्यात तिच्या आवडत्या गोष्टींची यादी पण अजबगजब होती.

काय तर आवडती भाजी -पडवळ, आवडता प्राणी- गेंडा, आवडता पक्षी -घुब, आवडता रंग- काळाकुट्ट, आवडती भावना- निपचित पडून राहणे, आवडता पदार्थ -दगड, आवडती वजनदार वस्तू -ओंडका आणि आवडता पिक्चर काय तर ‘प्यासी डायन’. कावेरीच्या चॉईस जबरच होत्या पण उदार मनाच्या कुणालनं तिच्या आवडी-निवडींना वाचता वाचताच मानेने होकार दिला होता आणि एक भन्नाट आयडिया त्याच्या डोक्यात आली. आपण तिला स्पेशल प्रपोज करू म्हणजे जुन्या पद्धतीने पत्र लिहून वगैरे आणि जर या आवडत्या गोष्टी पत्रात टाकल्या तर?

अखेर चार पाच दिवसांनी पत्र पूर्ण झालं आणि कावेरीला समोरासमोर पत्र द्यायचं त्यानं ठरवलं आणि दुसऱ्याच दिवशी तिला जेवणाच्या सुट्टीत क्लास च्या बाहेर गाठायचं ठरवलं. त्याचा कॉन्फिडन्स आता एकदम पिक वर पोहोचला होता.पण काही धीर होईना मग तिची डायरी तिच्या बेंचच्या खालच्या पट्टीवर ठेऊन त्यात पत्र ठेवलं. आणि आपली डायरी अचानक सापडल्याने कावेरी खूपच खुश झाली आणि हातात घेताच त्यातून एक घडी केलेला गुलाबी पेपर खाली पडला. तो तिने वाचला आणि अगदी हर्षवायू झाल्यागत हसू लागली, कारण त्यातला मॅटरच असा भारी होता. कावेरीला वेड लागलय का वाटून नीलम ने तिच्या हातातला तो गुलाबी पेपर हाती घेतला. आणि तीही वेड्यागत हसू लागली. नंतर इमा , नितीन, पल्लवी, रुद्र, विनय, मेघा, प्रणिता, कीर्ती ह्या सगळ्यांनी वाचलं. आधी कावेरीला नीतीनच्या मस्करी वर संशय आला पण नंतर तिच्याच मनाने कौल दिला की नितीन कितीही बावळट असला तरीही तो स्वप्नात सुद्धा इमा शिवाय दुसरा कुणाचा विचार नाही करणार. रुद्र ने हातात घेऊन अजून मोठ्याने वाचू लागला. आणि अगदी लोळून लोळून हसू लागला.

” गेंड्याच्या कातडीची तू , जेव्हा माझ्याकडे घुबडासारखे डोळे करून बघतेस तेव्हा मी काही क्षण दगड होतो. रोज काळ्याकुट्ट रात्री, तू प्यासी डायन सारखी माझ्या स्वप्नात येतेस आणि स्वप्नात जेव्हा तुझे हात जेंव्हा माझ्या मानेभोवती गुंफतेस तेव्हा मला तुझ्या गळ्यात निपचित पडून रहावसं वाटतं. माझ्या ओंडक्या तू माझी होशील का..?

तुझाच पडवळ,
के. आर.

प्रत्येक आवडीच्या गोष्टी खाली अंडरलाईन केलेली होती. आता हे नेमकं कुणी लिहिलं हे मात्र समजत नव्हतं. पण आजचा दिवस ह्यांचा जबरदस्त झाला होता. सगळे कॅन्टीनला बसून विचार करू लागले कि, कुणी लिहिलं असेल हे अतरंगी पत्र..! नितीन आणि प्रणिता मात्र पुन्हा पुन्हा त्या पत्रातील ओळी बोलून कावेरीला चिडवू लागले होते. तीच डोकं तर सपशेल तापलं होत. आणि ठरलं,ह्यांच मिशन म्हणजे तो पत्र लिहिणारा मुलगा शोधायचा.

सगळ्यांनी त्या पत्राचा फोटो काढलं आणि जो सापडेल त्याची वही उचकून अक्षर तपासून बघू लागले पण असलं अतरंगी पत्र लिहिणाऱ्याच हस्ताक्षर पण अँटिक होतं. ते कुणासोबतच मॅच होईना. सगळं कॉलेज धुंडाळल पण कुणीच गावल नाही.

पुन्हा एकदा कॅन्टीन मध्ये मिटिंग भरली. सगळे अगदी शून्यात नजर लावून बसले होते. नितीन इमा तर त्यांच्या वेगळ्याच विश्वात होते तरीही त्यांना कावेरीच टेन्शन बघून खूप टेन्शन आलं होतं. आधी गमतीत घेतलेली गोष्ट आज मात्र त्यांना त्याचा राग येत होता. नीता ने तिची बेस्ट फ्रेन्ड त्रिवा, जी सिनियर ला होती तिला देखील सांगितलं. शेवटी कावेरी आणि पल्लवी दोघीही टेरेसवर निघून गेल्या.

टेरेसवरून संपूर्ण कॉलेज चा मागचा हिरवळीचा भाग बहरून आला होता. आणि काही मुलं माती उकरून तिथे वृक्षारोपण करत होते. त्यात कुणाल देखील होता.

"तो बघ, त्यादिवशी सुसाइड करत होता आणि आज झाड लावतोय.." कावेरी पल्लवीला म्हणाली.

"हा कुणाल आहे, तो आणि सुसाइड.. इम्पोस्सीबल..! तो कॉलेजमध्ये नवीन असला तरीही मी लहानपणीपासून ओळखते. आपल्या त्रिवा दि चा बेस्ट फ्रेन्ड आहे. त्याचे वडील इथं ट्रस्टी आहेत म्हणून इथं ऍडमिशन नाही घेतली त्याने. खूप स्वाभिमानी आहे. त्याच्या कॉलेजला पी एल सुरू आहेत म्हणून इकडे आलाय. आमची पण कोचिंग क्लास मध्ये ओळख झालेली. त्रिवा दी आणि तो सेम इयर आहे आणि सिनियर आहे आपल्याला." पल्लवी सांगू लागली.

त्याच कौतुक ऐकून कावेरीचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. " मालकीचं कॉलेज असून इथं न शिकता बाहेरच्या कॉलेजमध्ये, इंटरेस्टिंग..! आणि कॉलेज आपलं तर झाडं लावण्याच काम पण आपलं आहे तर तो लावतोय आणि आपण काय करतोय तर.. टाईमपास..! चलो, त्याला मदत करू.." कावेरी म्हणाली.

दोघीही बॅग कट्ट्यावर ठेवून हाताच्या बाह्या वर करून जीन्स गूढघ्यापर्यंत वर करून त्यांना जॉईन केलं. त्रिवा ही तिथेच होती. त्यांनी लगेच त्रिवा सोबत गवत काढून कुदळीने खड्डे करायला सुरुवात केली आणि एक एक झाड लावू लागल्या. कुणाल कावेरीला बघून मुद्दाम तिच्यासमोरून गेला , तिने ही चांगली स्माईल दिली त्यानंतर कुणाल काम करत करत त्रिवासोबत गप्पा मारत होता. मधूनच कावेरीला न्याहाळत होता. कुणालला मात्र कावेरी आपल्यावर खुश होऊन आपली साथ द्यायला आली अस वाटलं. पल्लवीच काहीसं लक्ष त्रिवा आणि कुणालकडेच होत. तिला सतत 'पडवळ , पडवळ' ऐकू येत होतं. मग अचानक तिची ट्यूब पेटली की अरे कुणालच आडनाव तर पडवळ नाही, रणधीर आहे पण लेटरच्या मजकुराच्या शेवटी 'तुझाच पडवळ - के आर.' अस लिहिलेल होत. के म्हणजे कुणाल आणि आर म्हणजे रणधीर.. नाही, नाही.. काहीही अंदाज नको लावायला. तरीही तिने ह्यावेळी सबुरीने घेतलं आणि कुणाल सोबत बोलायला गेली.

"हाय, मी पल्लवी, त्रिवादि माझी 'दि' आहे..!" पल्लवी म्हणाली.

"कळलं, त्रिवा दि म्हणालीस तेव्हाच समजलं." कुणाल म्हणाला.

"मला तुझं अक्षर बघायचंय..!" पल्लवी घाईत म्हणाली.

त्रिवाच मात्र लक्षच नव्हतं.

" अरे आता माझे हात खराब आहेत, नंतर दाखवेन, आणि काय करणार बघून..? म्युजियम मध्ये ठेवण्यासारखं बिलकुल नाही माझं अक्षर.." कुणाल स्वतःचीच खिल्ली उडवत म्हणाला आणि हसू लागला, सोबत पल्लवी देखील हसली.

पल्लवी स्वतःला खात्री झाल्याशिवाय कुणालाच सांगणार नव्हती कारण कावेरी अशी गरम डोक्याची मालकीण होती आणि कुणाल शांत, प्रेमळ असला तरीही एक ट्रस्टी चा मुलगा, दोन्हीकडून आग आणि पाण्यासारखा धोका होता.

पण पल्लवी म्हणजे अतिशय चटोर... जोपर्यंत तिच्या पोटातली गोष्ट कुणाला सांगत नाही तोपर्यंत तीच पोट सतत दुखत राहणार..! ह्याच एकमेव कारण म्हणजे तिच्या अतरंगी रेसिपीज..! सगळेच तिच्या टिफिन मधल्या वेगवेगळ्या पदार्थाना वैतागले होते. पण फक्त प्रणिता ही गोष्ट जाणून होती. पल्लवीने तिकडून लवकरात लवकर कल्टी मारली आणि कॅन्टीन मध्ये प्रणिताच्या बाजूला बसली.

"काय ग पल्ले.. कुठं होतीस..? कावू कुठय.." प्रणिताने विचारल.

"इतकं कांड झाल्यावर रागाने उकळत शोधत असेल लेटर देणाऱ्याला.." नितीन जोरजोरात हसत म्हणाला.

"ती वृक्षारोपण करतीये.. त्रिवूदि सोबत. आणि थोडावेळ मला शांत बसू द्यात. भयंकर त्रास होतोय मला." पल्लवी पोट जोरात दाबत कळवळत म्हणाली.

"काय होतंय तुला.? दवाखान्यात जायचं का..?" इमाने विचारले.

"ओह माय गॉड..! लेडीज प्रॉब्लेम गाईज..! मी आलीच. उठ पल्ले..!" प्रणिता घाईने म्हणाली.

"नाही प्लिज बसू दे मला.." पल्लवी कळवळून म्हणाली.

"चल उठ..!" प्रणिता जबरदस्ती तिला ओढत घेऊन बाहेर पडली. दोघीही येऊन बाहेर कट्ट्यावर बसल्या.

"हम्म..!आता सांग काय झालं..!" प्रणिताने बारीक नजर करून विचारलं.

"कुठं काय...? काही नाही." पल्लवी नजर लपवत म्हणाली. "आई.. ग.." पुन्हा पोट धरून बसली.

"मला माहिती होईलच. त्रिवू मला सांगेलंच. पण तुझा त्रास बघ.. किती लपवणार..! जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत दुखत राहणार.!" प्रणिता काहीशी हसतच म्हणाली.
"शुभ बोल नाऱ्या, म्हणे मांडवाला आग लागली."पल्लवी इतकं पोट दुखत असूनही कळवळत म्हणाली.

"नको सांगू.. चल येते मी. बस पोट धरून की टॉयलेटला जायचंय." प्रणिता तिरकसपणे म्हणाली.

"नितु थांब ना.. सांगते मी..!" पल्लवी हळूच म्हणाली.

"मग पल्लवीला माहीत झालेलं सगळं गुपित तिने प्रणिताला सांगितलं आणि काळजीने त्यांच्याकडे येत असणाऱ्या निलमने ते ऐकलं तशी ती आल्या पावली मागे वळली आणि कावेरीला शोधू लागली. कॅन्टीन मागे रिकाम्या जागेत झाडांची रोपटी लावताना तिला दिसली. आणि कावेरी जवळ जाऊन तिच्या कानात कुजबुजली. पण नक्कीच हाच आहे का हे तिला ही कन्फर्म नव्हतं. तिने एक युक्ती योजली. कारण तीच कुणाल बद्दल मत अतिशय चांगल झालं होतं. त्यामुळे तीने तीच गरम डोकं थंड घेऊन सबुरीने घ्यायचं ठरवलं.

"निलू शोधलंस का ग त्याला, कुठं असेल ग तो माझा पडवळ..!" कावेरी मोठयाने म्हणाली.

"हो ना इतकं भारी लव्हलेटर दिल आणि अचानक मिस्टर इंडिया झाला." नीलम तिच्या सुरात सूर मिसळत म्हणाली.

काहीसे शब्द कुणालच्या कानी पडले. पण तरीही त्याला वाटत होतं की काहीतरी गोम आहे. त्रिवुने दिलेल्या माहितीनुसार कावेरी इतक्या सहजासहजी मानणारी नव्हती. खरतर त्रिवू आणि कुणालला बघून कोणालाही ते एकमेकांचे परफेक्ट जोडीदार वाटत होते, त्रिवाला कुणाल आवडायचं पण तिने कधी त्याला बोलून दाखवल नाही. कुणालने ही त्याला कावेरी आवडते ही देखील कल्पना तिला दिली नव्हती पण गप्पा मारत कावेरीबद्दल सगळी माहिती काढून घेतली होती.

पण इकडे प्रणिता मात्र फारशी खुश नव्हती कारण तिला माहिती होत कि तिच्या त्रिवादि ला कुणाल आवडतो. अर्थात दोघी दोन शरीर होत्या पण मन मात्र एकच , दोन वेगवेगळ्या शरीरात एकच हृदय धडधडत होत. तरीही तिने एकदा खात्री करून घ्यायचं ठरवलं आणि लगेच त्रिवाच्या क्लासरूमकडे कूच केलं. बॅग मध्ये कुणालची एखादी नोटबुक असणारच ह्याची तिला खात्री होती. त्यात त्रिवा ही बाहेर असल्याने तीच काम सोपं झालं होतं. तिने त्रिवाची बॅग चेक केली आणि फायनली तिला त्याची बुक सापडली आणि ती शॉक झाली. खरतर अक्षर तंतोतंत मॅच होत होतं. तिच्या डोळ्यातली अडवून ठेवलेली टीप गालाना स्पर्शून खाली कोसळली. पण कुणावर प्रेम हे जबरदस्ती लादता येत नाही हे ही ती जाणून होती.

दुसऱ्या दिवशी लेक्चर ऑफ असताना कावेरीला पुन्हा टेरेसवर जायची हुक्की आली. आणि ती एकटीच सगळ्यांच्या नकळत टेरेसवर आली तर पुन्हा तिला एक मुलगा कठड्यावर उभा दिसला. पण ह्यावेळी तिने त्याला मागे खेचन टाळलं.

"अरे स्वस्त झालंय का जीव..." कावेरी जोरात ओरडली आणि त्याने मागे वळून पाहिलं. तो कुणालच होता. तिला बघून तो खूप खुश झाला.

"हेय कावु, " कुणालने आवाज दिला.

कावेरीने मोठे डोळे केले.

"आय मिन कावेरी" कुणाल घाबरतच म्हणाला. आजूबाजूला कुणी नाही हे बघताच तिने स्वतःचा राग ताब्यात घेऊन त्याला लेटरच विचारायचं ठरवलं.पण तिच्या तोंडून तिची सरस्वती नीट थोडीच वदणार होती. " च्यायला भेंडी, आईच्या गावात, जेव्हा बघावं तेव्हा जीव द्यायच्या पवित्र्यात असतोच..! तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे..?"

"नाही काही, अरे कॉलेजचा परिसर बघत होतो, अजून कुठं कुठं आपल्याला झाड लावता येतील. ही टेरेस उंच असली तरीही समोर पाण्याच्या टाकीमुळे दिसत नाही म्हणून वरती चढतो आणि एकदम सेफ आहे हे. एक मिनिट..? तुला माझी काळजी वाटते ना..? खर बोल..आ आ..?

" न.. नाही.. मी का तुझी काळजी करू, तुला घरचे नाहीत का. !"कावेरी त्याला उडवत उत्तर देत म्हणाली.

"काहीतरी लपवतेस..! तुझे डोळे वेगळंच बोलताय आणि जीभ.. जीभ कसली लवंगी मिरची.. वेगळंच.." शंकीत नजरेने बघत कुणाल म्हणाला.

" तुझं अक्षर बघायचंय, ह्यावर लिहून दाखव." कावेरी विषय डावलत म्हणाली.

"मी.?" कुणालने स्वतःकडे छातीवर बोट करत विचारलं.

"मग इथं दुसरं कुणी आहे?" कावेरी आजूबाजूला बघत कुत्सितपणे म्हणाली.

"नाही, पण का..?"

"असच..!"

त्याने कठड्यावरून आत उडी घेतली आणि तिच्या हातातली वही मागितली. तो लिहिणार तोच ती बोलू लागली.

"हे लेटर तू लिहिलं होतं." आता मात्र तो चपापला. पण खोटं बोलणं वागणं त्याच्या स्वभावातःच नव्हतं त्यामुळे थोडे आढेवेढे घेत हो म्हणाला. त्याच हो ऐकताच कावेरीच्या डोक्यात तिडीक गेली.

" मला टच कर.." कावेरी रागातच म्हणाली तसा कुणाल घाबरला.

" कर.." ती जवळजवळ खेकसलीच त्याच्यावर तसा त्याने घाबरून तिला टच केलं.

"काय गेंड्याची कातडी आहे की मुलीची." तिने रागात भुवया ताणून विचारलं.

"हावू सॉफ्ट यू आर.." त्याच्या तोंडून नकळत बाहेर पडल. तशी ती अजूनच चिडली. दोन चार ठेवून द्याव्यात वाटत होतं पण तिने स्वतःवर कंट्रोल केलं आणि पुढे चालत जाऊन डोक्यावर हात ठेवून तोच हात केसांवर फिरवत भडकली. " कुणी सांगितल होत अशी भंकस करायला."

"मला तू खरंच खूप आवडतेस, अगदी पहिलयंदा पाहिलं त्या दिवसापासून." कुणाल म्हणाला.

"अरे मग अस लेटर लिहायचं का.." कावेरी चिडून म्हणाली.

"तुझ्या आवडत्या प्रत्येक गोष्टीला अंडरलाईन केलं होतं त्याच होत्या सगळ्या." कुणाल निरागसपणे म्हणाला.

"तुला कुणी सांगितलं..?"

" त्या तुझ्या डायरीत..!"

" अरे मंद , ती माझी नाही, माझ्या लहान भावाची नोटबुक होती. दुसरीत आहे तो... चुकून त्यादिवशी माझ्याकडे आली आणि ती तू चोरलीस..?"

"चोरली नाही, इथे पडली होती." कुणाल अस म्हणताच कावेरीने डोक्याला हात मारला. " पण चूक तुझीच होती ना."

"माझी..? नाही, म्हणजे.. हो, म्हणजे नाही, "

"अरे होती की नाही..?"

"पण मी प्रेमात केलं."

"माझी किती इज्जत गेली, तस अशीही काही इज्जत नाहीच म्हणायला.." कावेरी डोळे फिरवून म्हणाली.

"मग काय आवडत तुला..? म्हणजे मी तस लेटर लिहितो."

"अरे माझं काय सुरू, तुझं आपलं भलतंच.."

"भलतंच कसं, माझा रस्ता चुकला तर दुरुस्त नको व्हायला चूक."

"नको करुस नाहीतर भलतंच होऊन बसायचं."

"नाही , फक्त तुझ्या आयुष्यातला थोडा वेळ दे मला. "

"नाही जमायचं."

"का ..? घाबरलीस..? की तुला ही माझ्यावर प्रेम होईल ह्याची भीती वाटते.."

"मी कुणाच्या बापाला भीती नाही."

"दॅट मिन्स यू आर इन्.."

"नॉट ऐट ऑल.."

"बघ एकदा प्रयत्न करून. "

"मला नाही करायचा प्रयत्न...आणि तू कधी बोलावलस तर मी अजिबात येणार नाही पण ह्याचा अर्थ असा नाही की तू मला आवडत नाहीस.."

कुणाल मात्र लाजतच सातव्या आसमंतात पोहोचला आणि कावेरी गोड हसत तिथून निघून गेली. आता मात्र कावेरीला पटवण्याचा प्रयत्न तो नक्कीच सोडणार नव्हता पण भिंतीआड लपून ऐकणारी त्रिवाचे मात्र भरून आलेले डोळे ओसंडून वाहू लागले पण तिने ते लगेच पुसले. तिला तीच प्रेम नाही मिळालं पण तिच्या मित्राला मात्र खुश बघून तिचे डोळे पाणावले.