हृदयी वसंत फुलताना- भाग 3

मैत्रीचं रुपांतर हळुहळु कधी प्रेमात झालं...
भाग 3

         मैत्रीचं रुपांतर हळुहळु कधी प्रेमात झालं दोघांना देखिल कळालं नाही. कार्तिक दुर्वा चा श्वास तर दुर्वा कार्तिक चा जीव होती. पुर्ण कॉलेज मध्ये त्यांची मैत्री रंगली होती... पण दोघांनाही या गोष्टीची म्हणजेच प्रेमाची जाणीव अजूनही झाली नव्हती... त्यांच्या नजरेत दोघांचं नातं मैत्रीइतपतच मर्यादित होत.. पण नाही... दोघांनाही एकमेकांची काळजी, ओढ होती... अन् हाच तर होता प्रेमाचा बहरून आलेला वसंत... एखाद्या गोष्टीची जाणीवच नसेल तर त्या गोष्टीचा काय अर्थ? असच दोघांच्याही बाबतीत झालेलं... ..

            जवळजवळ वर्ष होत आलं पण दोघांनाही त्यांच्या प्रेमाची भनक नव्हती. कार्तिकच कॉलेज पुर्ण होणार होत तर अजुन एक वर्ष दुर्वाला करावं लागणार होत. आज लास्ट डे होता. एक्झाम संपून सगळे कॅन्टीन ला बसले होते. दुर्वा, कार्तिक, सोहम, सायली, आरती सगळे एकाच गोलाकार टेबल भोवती जमलेले. दुर्वा च्या चेहऱ्यावर नाराजगी, उदासी स्पष्ट दिसतं होती... जेव्हापासून दोघांची मैत्री झालेली तेव्हापासून ती आनंदी हसती खेळती झालेली. पण आज ती जराशी नर्व्हस दिसत होती कारणही तसचं होत... वर्षभर तीला आता कार्तिक दिसणार नव्हता..

        "दुर्वा?.... नाराज आहेस?" कार्तिक ने तिच्या हातावर हात ठेवला. तशी तिने होकारार्थी मन हलवली.

          "अरे! असा कायमचा थोडीच जाणार आहे कूठे? भेटत राहू ना अधून मधून..." कार्तिक

          "हो... पण मला नाही जमणार ना? कॉलेज ते घर नुसत..." दुर्वा ओठ मुडपत म्हणाली

           "हम्म... मग तुझं कॉलेज सुटलं की मी पीक अप करायला येतं जाईन... चालतंय ना?..."

          "काय? अरे पण बरं दिसेल का ते?" दुर्वा घाबरुन म्हणाली

          "रिलॅक्स दुर्वा आपणं तर फ्रेंड्स आहोत... जर समजा उद्या तुला प्रेम झालच कोणावर तर? तर काय करशील? की अशीच घाबरुन बसणार?" कार्तिक

           "हम्म बरोबर बोलतोय.... पण मेन गोष्ट अशी की मी प्रेम करणारच नाही... डायरेक्ट अरेंज मॅरेज... भारीय ना?" दुर्वा डोळे मिचकावत म्हणाली. तसा सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला पण कार्तिकला मात्र काहीतरी वेगळचं फिल झालं. का कुणास ठाऊक पण तिच बोलणं त्याच्या जिव्हारी लागलं...

         "बर जाऊ द्या गायज.... प्रेम लग्न नंतर बघा... या सुट्ट्यात पिकनिक प्लान करायचा का? तेवढंच सोबत टाईम स्पेंड करता येईल." सोहम सायलीकडे तिरका कटाक्ष टाकत म्हणाला.

         "आयडिया छान आहे रे... पण हीची ती खडूस आई पाठवेल का हिला?..." कार्तिक

         "हम्म प्लॅनिंग तर करावं लागेल... काय आरती रेडी ना?"... सायली ने हसुन आरतीला टाळी दिली तसे सर्वजण रिलॅक्स झाले.
***

              कसं बसं तीन तेरा नऊ अठरा करुन सायली अन् आरतीने मिळून सुमित्राला म्हणजेच दुर्वाच्या आईला मनवल होत... बुध्दीचा बराच कस लागला तिला मनवायला पण शेवटी तिने होकार दिला. दुर्वाच्या बाबांची कधीचं कोणत्या गोष्टीला ना नव्हती... बस् दुर्वा खुश राहावी एवढंच त्यांना वाटायचं.

           ट्रिंग ट्रिंग... ट्रिंग ट्रिंग... दुर्वा च्या घरातला फोन वाजला. सुट्ट्या असल्यानं दुर्वा घरीच होती उद्या पिकनिकला जाण्याच्या तयारीत व्यस्त... तिनेच फोन उचलला.
           "हॅलो... कोण?"

        "अ... हॅलो मी कार्तिक..."

       "तुला कसा मिळाला नंबर घरच्या टेलिफोनचा?"...

          "सायली ने दिला... तुझा फोन लागत नव्हता ना म्हणून"

      "अच्छा...चार्जिंग ला लावलाय स्विच ऑफ करुन"

       "बर आई हो बोलली ना तुझी? तेचं विचारायला केला होता कॉल"

      "हो... पण हे सायली ने पण तुला सांगितल असेल ना? मग अजुन का केला तू कॉल"...

        यावर कार्तिकला काय बोलावं सुचेना... खरचं का केला होता त्यानें फोन... फक्तं तिचा आवाज ऐकायला?....

        "मॉम आली.... मी ठेवतो... भेटू उद्या... बाय "

     "अरे पण?".... तोवर फोन ठेवला होता... दुर्वाला मात्र हसू आवरत नव्हत.
***

           "व्यवस्थित जा रे... अन् पोहोचल्यावर कॉल कर" सुविधा म्हणजे कार्तिक ची मॉम म्हणाली

        "हो लक्षांत असू दे... आम्ही ही आहोत... नाहीतर कोणाकडे लक्ष देता देता आम्हाला विसरायचा तू..." रश्मी त्याला टोमणा देत म्हणाली तसा त्याने एक लूक दिला अन् निघून गेला...

          "काय ग रश्मी? अशी का बोलली तू? नाही म्हणजे त्याच्या मनात कोणी मुलगी आहे का? असेल ठाऊक तुला तर सांगून टाक... म्हणजे सून शोधण्याचं वांद नको... त्याच्या बाबांना तर बिजनेस मधून डोक वर काढता येत नाही... मीच ठरवते भविष्यातल... म्हणजे आताच तरतूद करुन ठेऊ सुनेची" सुविधा

          तश्या दोघी मायलेकी खळखळून हसू लागल्या...

क्रमशः......
  

         

              


🎭 Series Post

View all