Login

हुग्गी

हुग्गी ही एक पारंपारिक पक्वान्न आहे. आरोग्याच्या दृष्टीने देखील फार चांगली आहे.
रेसीपी : हुग्गी

नुकतेच ग्रुपवर हुग्गी म्हणजे कसं बनवायचं ? हे विचारण्यात आले. येथूनच कल्पना आली की आमच्याकडे सतत बनणारी हुग्गी जी बालपणापासून पाहिली होती आणि आता स्वतः बनविते.
रेसीपी पाहूया
साहित्य
खपली गहू ( पाव कि )
गूळ ( पाव कि)
वेलची पावडर ( चवी नुसार)
जायफळ ( आवडत असल्यास चिमूटभर )
पार्लेजी बिस्कीट ( एक पाकीट छोटा)
पाणी ( पाऊण लिटर / गरजेनुसार कमी जास्त )
तूप
खोबरा उभा चिरून

वरील दिलेले सर्व साहित्य हे अंदाजे माप दिलेले आहेत मी स्वतः घरी करताना माझ्याकडे लहान ग्लास आहे त्याचे माप पाव किलो इतके भरते त्यानुसार दिलं आहे.

कृती :
१)सर्वप्रथम आपण खपली गहू थोडसं पाणी शिंपडून ओखलीत कुटून घ्यावे व त्यावरील साल काढून टाकाव्यात.
२)सध्याच्या घडीला डी मार्ट मध्ये किंवा किराणा दुकानात खपली गहू हे खिरीचे गहू या नावाने सहज उपलब्ध आहेत. आपण ते देखील वापरू शकतो.
३)दुकानात मिळणारे खिरीचे गहू आणले असल्यास त्याला दीड ते दोन तास भिजत घालावे. भिजत घालण्यापूर्वी दोन पाण्याने धुऊन नंतर भिजवावे.
४) बहुतेक लोक रात्रभर देखील गहू भिजवतात पण मी कधी रात्रभर भिजत घातले नाहीत म्हणून याची कल्पना नाही. ते लवकर शिजतील एवढी खात्री.
५) भिजत घातलेले गहू त्याच पाण्यासोबत कुकरला शिट्या काढून घ्यावे.
एक ग्लास गहू करिता मी जवळपास दोन ते अडीच तांबे पाणी घालते. पाच-सहा शिट्या झाल्यानंतर एकदा गहू शिजलेत का हे पहावे.
६)चुलीवर शिजवले असता एक तासाच्या वर वेळ लागतो पण चव अप्रतिम असते.

७) गहू हे चांगले शिजलेत का हे पाहून जर शिजले नसतील तर अजून पाणी घालून पुन्हा तीन ते चार शिट्ट्या घ्याव्यात.

८) गहू शिजल्यानंतर रवीने घोटून घ्या .
यामध्ये गुळ किसून घालावे थोडीशी वेलची / जायफळ पावडर टाकावी
पुन्हा शिजवून घ्यावे. या वेळेस झाकण न लावताच चांगले ढवळत राहा ५ मि.
९) झाकण न लावता गूळ विरघळू द्या.
१०) पार्ले बिस्कीट चुरा करून या मधे टाकावे. ( ही स्टेप पूर्णतः ऐच्छिक आहे)

११) ढवळत खीर छान एकजीव झाल्यानंतर गॅस ( विस्तव ) बंद करावे.

१२) एका पातेल्यात तूप गरम करून खोबऱ्याचे उभे काप घालावे. जास्त भाजू नये याची काळजी घ्यावी. मग थोडी वेलची पूड घालावी.
१३) शिजवलेली खीर या फोडणीत घालावी.

सुका मेवा मी स्वतः नाही घालत म्हणून लिहिला नाही.

छान एकजीव करून १-२ मिनीट शिजू द्या.
वाढताना दूध व तुपासोबत वाढा.

( या मधे आवडत असल्यास बडिशेप ची पूड घालावी )

नक्की ट्राय करा
धन्यवाद !

लेखिका : अहाना कौसर