Login

शिकारी... भाग ६

"नमस्कार साहेब. हो साहेब पण आज माझा ऑफ आहे तिथे हवलदार माने आणि साठे आहेत आज." हावलदार कदम इन्स्पेक्टर विशालला नमस्कार करत बोलला.


मागील भागात आपण बघितले…

"परी ऐक माझं. मी काही केलं नाहीये. ते मूल माझं नाही. ऐक ना.!" कबिर ओरडत होता. पण प्रज्ञाने मागे वळून बघितले नाही. डोळे पुसत ती निघून गेली.


हवलदारने कबिरला ओढत नेत लॉकअपमध्ये बंद केले.


अक्षय सुद्धा तिथून निघून गेला आणि जाताना कबिरकडे बघून एक भुवई उंचावून हसला. ज्याने कबिर अजूनच चिडला.


आता पुढे…



प्रज्ञा तिच्या रूमवर गेली तेव्हा तिथे पोलिसांची चौकशी आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे लोक पुरावे गोळा करत होते. प्रज्ञा तिथेच एका बाजूला बसून होती. सगळ कसं होत्याच नव्हत झाल क्षणात. कोण खरा? कोण खोटा? कोणावर विश्वास ठेवावा हे तिला कळत नव्हते. डोळ्यातून पाणी वाहने थांबत नव्हते. रडून रडून तिचे डोळे सुजले होते.
प्रज्ञाच्या मागोमाग अक्षय सुद्धा तिथे आला. त्यानंतर तो त्याच्या हॉटेलच्या रूमवर निघून गेला. पण प्रज्ञाला त्याच्या वागण्याचा संशय येत होता.

दिवसभर पोलिसांची ये जा झाल्यावर संध्याकाळी सगळे शांत झाले होते. प्रज्ञा रूम मध्ये एकटीच होती. खोलीतील प्रत्येक गोष्ट तिला अर्पिताची आठवण करून देत होती. राहून राहून तिला अर्पिताची शेवटची किंचाळी आठवत होती. प्रज्ञाने कानावर हात ठेवले आणि जोरात ओरडली. इतक्यावेळचा साठवून ठेवलेला बांध आता फुटला होता. प्रज्ञा रडली तर होती, पण मनातला असंतोष बाहेर आला नव्हता.


"का काही क्षण आधी मी आले नाही? आले असते तर कदाचित असं काही घडलं नसतं किंवा तिला वाचवता आले असते." असा मनातच विचार करत ती स्वतःला कोसत होती.


तितक्यात तिला खिडकी बाहेर हलचाल जाणवली. ती धावत खिडकी जवळ गेली. बाहेर कोणीच नव्हते. पण तिला ती पांढरी सिडान कार जाताना दिसली. तिला लगेच आठवले की, कबिरला देखील अशी एक कार जाताना दिसली होती.


तिने पटकन खिडकी लावली आणि पडदे बंद करून घेतले. तिच्या मनात भीतीने थरकाप होत होता. \"नेक्ट यू\" चा कागद तिच्या डोळ्यांसमोर उभा राहत होता.

*****

कबिरला अटक होऊन आठवडा झाला होता. पोलिस कबिरची चांगलीच खातरदारी करत होते. कितीही मारले तरी त्याच्या तोंडून गुन्हा कबूल होत नव्हता. इन्स्पेक्टर विशाल जातीने लक्ष देत होता.


दुसरीकडे प्रज्ञाला सतत जिवेमारण्याच्या धमक्या येत होत्या. पोलिसांकडून तपास सुरू होता. पण हातात काही लागत नव्हते.

प्रज्ञा घरा बाहेर पडत नसे. प्रज्ञाने नोकरी देखील सोडली.
एक दिवस प्रज्ञा घरात असताना अचानक कोणीतरी दार वाजवले. प्रज्ञाने दार उघडले तर बाहेर कोणीच नव्हते पण खाली एक बॉक्स होता त्यात एक कागद होता. प्रज्ञा ने थरथरत्या हाताने तो कागद हातात घेतला. त्यात लिहिले होते,

"किती दिवस घरात बसून राहशील? तुला काय वाटतं की तू घरात लपून राहशील तर तू जिवंत राहशील? भ्रमात राहू नकोस. तुझ्या घरात घुसून तुला मारायला वेळ लागणार नाही आम्हाला. बऱ्या बोलाणे सांगतो ते कर. आम्ही सांगतो ते केलेस तर, मारताना कमी यातना देऊ तुला."


ते वाचून प्रज्ञा खूप घाबरली. तिने पटकन दार बंद केले आणि घरात एका कोपऱ्यात लपून बसली. थोड्यावेळाने शांत झाल्यावर प्रज्ञाने इन्स्पेक्टर विशालला सगळी हकीकत सांगितली. त्याने लगेच प्रज्ञाच्या घराबाहेर हवलदार तैनात केले.


ह्या गोष्टीला आता एक आठवडा झाला होता.


"हवलदार कदम. त्या प्रज्ञाच्या घरी ड्युटी आहे ना तुमची?" इन्स्पेक्टर विशाल रस्त्याने जाणाऱ्या हवलदार कदमला बघून गाडी थांबवत विचारले.


"नमस्कार साहेब. हो साहेब पण आज माझा ऑफ आहे तिथे हवलदार माने आणि साठे आहेत आज." हावलदार कदम इन्स्पेक्टर विशालला नमस्कार करत बोलला.


"कदम बसा गाडीत जरा बोलायचे आहे." विशाल गंभीर होत बोलला.

हवलदार कदम आदेशाचे पालन करत, हातातील बाजाराच्या पिशव्या गाडीत ठेवत, गाडीत जाऊन बसला.


"काय झालं साहेब? काही गंभीर?" साहेबांना बोलायचे आहे म्हणजे कदम जरा टेन्शनमध्ये होता. विशालच्या चेहेऱ्यावरचे गंभीर भाग टिपत तो बोलला.


काय बोलायचे असेल विशालला? प्रज्ञाला धमकी देणारा पकडला जाईल? की, त्या आधी प्रज्ञाच्या जीवाचे काही बरे वाईट होईल? बघूया पुढील भागात