Login

हुरहुर ह्या जीवाची (भाग १)

It Is The Full Imaginery Story Of Sanisa And Samir. Both Are Extremely Different Than Each Other But Such Circumstances Happened And They Become One.
हुरहुर ह्या जीवाची (भाग -एक )

“आठ वर्षांचे अंतर? काही काय बोलतेस सानू. शक्यच नाही. हा विषय डोक्यातून काढून टाक.” आईने जरी या विषयाला ना स्वल्पविराम, ना अर्धविराम. सरळ पूर्णविरामच दिला असला तरी सानूच्या डोक्यातलं विचारांचं वादळ शमलेलं नव्हतं.

सानिसा तिच्या आईवडिलांची एकुलती एक कन्या रत्न. लाडोबा एकदम. आजी तर तिला लाड, लाड, लाडोबा, सानु आमची गोडोबा. अशीच हाक मारायची. सानूचे आई वडील दोघेही नोकरदार वर्गातले. घरात एकूणच आर्थिक सुबत्ता. दुःख ,तडजोड, कमतरता हे शब्द व त्यांचे अर्थ सानूच्या शब्दकोशातच नव्हते. सानिसा दिसायला सुंदर. चाफेकळी नाक, गोट्या त्वचेत भर टाकायला गुलाबी,मधाळ ओठ. गालावर खोल खड्डा पाडणारी खळी तर तिच्या हास्यावरुन आरुढ होऊन बसे आणि सर्वात पाणीदार व टपोरे डोळे तर दगडालाही पाझर फुटवतील असे होते. हे तेजस्वी नयन म्हणजे जणू तिच्या मनाचा आरसाच होता आणि या आरशातील तिचं प्रतिबिंब जेवढं आकर्षक दिसत होतं तेवढच तिचं मन एकदम पारदर्शक होतं. सौंदर्य व कर्तबगारी यांची सुरेख सांगड घालणारे व्यक्तिमत्त्व अशी तिची ख्याती होती.
शिक्षण झाल्यावर आर्थिक स्वावलंबी व्हायचं हे तिनं खूप आधीपासूनच ठरवलेलो होतं.
आणि तो दिवस उजाडला. “सानू, आवर. आज तुला इंटरव्ह्यूला जायचं आहे ना?” आईने थोडं दरडावलंच. “हो गं आई. झालंच.” सानू गडबडीतच बोलली. देवबाप्पाला नमस्कार व मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन बंदुकीच्या गोळीप्रमाणे ती धूम पळाली पण.

एव्हाना नोकरीमध्ये रुजू होऊन जवळजवळ सहा महिने झाले होते. त्यातले टार्गेट्स व चॅलेंजेस ला टक्कर देऊन टिकून राहण्यासाठी तिची धडपड चालू होती. सानूच्या करिअरच्या रथाची घौडदौड चांगली चालू असताना तिला एक चॅलेंज मिळालं.तिला हेड ऑफिसमधे समीर सरांसमोर प्रेझेंटेशन सादर करण्यासाठी सिलेक्ट केलं. खरंतर ही खूप मोठी संधी होती. हे प्रेझेंटेशन यशस्वी झालं तर सानुबद्दलचं इम्प्रेशन सकारात्मक तर होणारच होतं पण त्याचबरोबर सानूची हेड ऑफिसला बदली होऊन डायरेक्ट समीरसरांच्या टीममध्ये काम करण्याची सुवर्ण संधी मिळणार होती.

सानू तर या संधीसाठी दिवस रात्र एक करून त्याच्या मागे लागली होती. प्रभावी सादरीकरण एवढा एकच ध्यास त्तिच्या मनी होता. कारणही तसंच होतं समीर सरांच्या टीममध्ये काम करणं म्हणजे ज्ञानार्जनाची पर्वणीच असते.

समीर पाटील हे नाव आयटी सेक्टर मध्ये नावाजलेलं नाव. लहान वयात फार मोठी मजल मारली होती समीरने. त्यांच्या फक्त ऑफिसमध्ये असल्याने भलेभले लोकांची भांबेरी उडत असे. अतिशय शिस्तबद्ध, वक्तशीरपणा, कामातला चोखंदळपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वातील पैलू होते. सहा फूट उंची व करारी बाणा त्या व्यक्तिमत्त्वाचा पैलूपैकी चकाकणारे हीरे होते आणि तोंड व पोट यांची लयबद्ध सुसूत्रता पार पाडण्यासाठी जेवढी आर्थिक सुबत्ता लागेल तेवढीच किंबहूना त्याहून थोडी कमी अशा परिस्थितीतून वर आलेल्या समीरला आर्थिक, सामाजिकतेचे भान पूर्णतः होते. त्यामुळे त्याचे व्यक्तिमत्त्व फणसासारखे वरून काटेरी व आतून रसाळ गर्यासारखे गोड होते.

क्रमशः
प्राजक्ता जोशी सुपेकर

🎭 Series Post

View all