Login

हवी होती ती चौकट

Hvi Hoti Ti Chaukt


हवी होती ती चौकट..

आईला घाबरून समिधा रात्रीच्या अंधारात त्या मुलासोबत सगळे डाग दागिने आणि पैसे घेऊन पळाली होती.

तो काल भेटलेला मुलगा तिचा प्रियकर ,प्रेमी ज्याला ती फार नीटसे ओळखत ही नव्हती... त्याच्या बद्दल फारशी माहिती ही तिने घेणे जरुरी नाही समजले....

त्याच्यावर तिला जन्म दात्या आईपेक्षा ही खूप विश्वास होता... त्याने थोडे तिच्या सौंदर्याचे कौतुक काय केले आणि तिला सिनेमात काम करण्याचे स्वप्न काय दाखवले ती तर त्याच्या बोलण्यावर भाळली....

आईने कधी ही माझे कौतुक केले नाही पण ह्याला माझ्यात ते सगळे गुण दिसले आणि त्याने माझ्या गुणांची आणि माझ्या सौंदर्याची खरी पारख केली...ह्या भ्रमात समिधा फसायची होती आणि नेमकी ती ह्या खोट्या स्तुतीला भाळली.. समिधाला घर आणि आईने आखून दिलेली मर्यादा म्हणजे एक कैद वाटत होती ,एक चौकट ज्यात जीव नकोसा झाला होता.

त्याने एक डाव आखला होता, तिला ह्या चौकटीतून बाहेर काढण्याचा, त्याचा डाव निशाण्यावर लागला..

निशाणा असा लागला की ती आईच्या विरोधात गेलीच.. आणि आईला ती तिची दुष्मन समजू लागली.. तिच्या प्रत्येक गोष्टीत चूक शोधून आईसोबत रोज भांडण वाद करू लागली...इतके की आता ती आईला जीवे मारण्याची धमकी ही देण्यापर्यंत पोहचली होती...पण ह्यात आपलेच नुकसान आहे हे त्या मुलाने समजवल्यावर समिधा आई सोबत गुणाने वागू लागली...

त्याचा हा ही एक प्लॅन होता...आईसोबत भांडण करून फुकट तो समिधाला घेऊन जाणार नव्हता...

आईसोबत गुणाने राहून एक दिवस आईच्या पसंतीच्या मुलांसोबत लग्नाला तयार व्हायला सांगून ,आईला लाडी गोडी लावून आईच्या जवळ असलेले सगळे दागिने आणि लग्नासाठी लागणारे पैसे आईला बँकेतून काढून आणायला सांगितले...

आई लेकीच्या माये पोटी वेडी झाली होती...आपली मुलगी सुधारली आहे आणि आपण शोधलेल्या मुलांसोबत लग्नाला तयार झाली आहे ह्यात आई खुश होती...तिला अजून काय हवे होते...म्हणून तिच्या समिधासाठी काय खरेदी करायचे ते सगळे खरेदी करू...तिला हवे ते दागिने देऊ...कपडे, साड्या घेऊ...म्हणून आधीच पैसे काढून आणले...आणि लॉकर मध्ये ठेऊन चावी समिधाकडे दिली....आणि निवांत झोपी गेली...


आई झोपी गेली आहे ही संधी साधत त्याने तिला फोन केला आणि सगळे पैसे दागिने घेऊन आणि आईला काही न कळू देता पळून यायला सांगितले..

त्याच्या एका इशाऱ्यावर समिधा सगळे घेऊन पाळणार होती...आईला एक शेवटची मिठी मारली आणि निघाली ...

तो वाट बघत होता...ती आली हे पाहून त्याने गाडी तिच्या जवळ घेत तिला गाडीत बसवले ..पुढे जाऊन त्याने तिला दुसऱ्या माणसांसोबत पाठवले आणि तिची बॅग स्वतःकडे ठेवली...


ती त्या माणसाला ओळखत नव्हती पण आपल्या प्रियकराने बस म्हणून सांगितले म्हणजे तो दुसरा माणूस आपल्या मदतीला आला असेल समजून ती निघून गेली...पण तिला माहीत नव्हते की तिच्या प्रियकराने तिला ह्या माणसाला 10 लाखला विकले आहे ,आणि तो तिचे पैसे आणि दागिने घेऊन पसार झाला आहे...

इकडे समिधा घरात नाही हे समजल्यावर आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.. सगळे संपले होते...जे नको घडायला ते घडले होते.... आईची काळजी, माया, ममता, सुरक्षा ह्या चौकटीच्या बाहेर समिधा पडली होती..

ती आता वेश्या व्यवसायत अडकली होती, जी चौकट आईच्या आखलेल्या चौकटीपेक्षा ही विदारक होती...ज्यातून बाहेर पडणे कधीच शक्य नव्हते...

आईने आखलेली ती चौकट मजबूत हवी होती, म्हणजे कोणी ही ती भेदून आत येऊ शकले नसते..ना मी त्यातून बाहेर पडले असते... पण आता कोणी ही मदत करू शकणारे नव्हते..आईचे काय झाले असेल ह्या बाबत ही काही कळायला मार्ग नव्हता... आईला भेटायला जीव तिच्या चौकटीच्या दारावर धाव घेत होता..


खऱ्या अर्थाने काही चौकटी खूप गरजेच्या असतात हे ही समजयला हवे ...हो ना..