Login

घायाळ मी वाघिणी

Its Story Of Tigress
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा फेरी ( संघ कामिनी )

शीर्षक : घायाळ मी वाघिणी...

‘मी अंजली… एक साधी गृहिणी... माझा संसार माझा नवरा राजेशभोवती आणि माझ्या दोन लहान मुलांभोवती फिरत होता. पहाटे उठून घरकाम, मुलांची शाळा, नवऱ्याचा डबा, संध्याकाळी त्यांच्याशी गप्पा. छोटं कुटुंब, सुखी कुटुंब होतं आमचं... बाहेरच्यांना माझं आयुष्य अगदी सुखी समाधानी दिसायचं; पण माझ्या आतील एक वादळ नेहमी माझी झोप उडवत होतं. पूर्वजन्मीचे थरारक अनुभव मला स्वप्नात दिसायचे.

हे सगळं सुरू झालं माझ्या मुलांच्या जन्मानंतर. अक्षित आणि अर्पिता, माझ्या जीवाचे दोन तुकडे! ज्या दिवशी त्यांचा जन्म झाला त्यादिवशीपासून अचानक रात्री मला भयानक स्वप्नं पडायला लागली. त्या स्वप्नांत मी वाघीण व्हायचे आणि माझ्यासोबत दोन बछडे असायचे. आम्ही जंगलात फिरत असायचो, खेळत असायचो; पण अचानक काही शिकारी यायचे. त्यांच्या बंदुकींच्या आवाजांनी सगळं जंगल हादरायचं. मला माहिती असायचं की ते माझ्या बछड्यांना मारणार आहेत. मी त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्यावर झडप घालायचे आणि रक्तबंबाळ होऊन जमिनीवर निपचित पडायचे... स्वप्न नेहमी इथेच थांबायचं. मी धडधडत्या छातीनं, घामाने निथळत जागी व्हायचे, मग राजेश झोपेतून जागे झाले की मी त्यांच्या कुशीत शिरून पुन्हा झोपायचे.

सुरुवातीला मी हे स्वप्न माझ्या नवऱ्याला सांगितलं. तर तो हसला आणि म्हणाला, “अगं, मुलं झाली म्हणून काळजी वाटतेय तुला. त्यामुळेच असली स्वप्नं पडतात.”

पण मला जाणवत होतं की हे साधं स्वप्न नाही. काहीतरी अघटीत नक्की घडलं आहे, काहीतरी दडलेलं आहे माझ्या स्वप्नात...

हळूहळू मला कळू लागलं की हे फक्त स्वप्न नाही, तर माझ्या गतजन्माच्या आठवणी आहेत. हो, मी मागच्या जन्मी वाघीण होते. माझ्या बछड्यांना पाच शिकाऱ्यांनी निर्दयीपणे ठार केलं होतं. मी त्यांना वाचवताना स्वतःचा बळी दिला होता. ती वेदना अजूनही मला त्रास देत होती आणि ती वेदना ह्या जन्मात प्रत्येक रात्री मला झोपेतून जागं करत होती.

मी सुरुवातीला खूप घाबरले होते, ‘मी माणूस आहे, आई आहे, पत्नी आहे… मग वाघिणीच्या आठवणी माझ्यामागे का लागल्या आहेत?’

पण जेव्हा मी माझ्या मुलांना मिठी मारत होते, तेव्हा मला जाणवत होतं की मी पुन्हा त्याच जंगलात जगतेय. जर त्या जन्मात शिकाऱ्यांनी माझ्या बछड्यांना ठार केलं होतं, तर ह्या जन्मात मी का शांत बसू? माझ्या आत्म्याला शांती मिळणार नव्हती, जोपर्यंत त्या पाच शिकाऱ्यांचा मी शोध घेऊन त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा दिली नसती.

सुरुवात झाली रामदासपासून... स्वप्नांत त्याचा चेहरा दिसायचा. मी जुन्या वृत्तपत्रांच्या बातम्या, जुन्या शिकारींच्या फोटोंचा शोध घेतला. महिनोमहिने कागदपत्रं चाळली आणि एकेदिवशी मला त्याचा पत्ता मिळाला! तो एका गावात रिटायर्ड लाईफ जगत होता. लोकांसाठी तो फक्त एक वृद्ध गृहस्थ होता; पण माझ्यासाठी तो माझ्या बछड्यांचा खुनी होता...

त्या रात्री मी घराबाहेर पडले. कुठे, कसं गेले आठवत नाही. डोळे उघडले तेव्हा रामदासच्या शेतात होते. त्याला मी पाहिलं. त्याला पाहून मला खूप राग आलेला, माझ्या अंगात काहीतरी बदल घडायला लागलेला. हात थरथरायला लागले, डोळे लाल झाले, शरीराचं वजन दुप्पट झाल्यासारखं जाणवलं. रामदासने पाहिलं तर मी अंजलीच होते; पण माझ्या आत मात्र घायाळ वाघीण जागी झाली होती आणि बस्स! मी त्याच्यावर झडप घातली, माझ्या पंज्यांनी त्याच्या घशाची पकड घेतली, मी त्याच्या नरड्याचा घोट घेतला!

दुसऱ्या दिवशी बातमी आली –
"रामदासला वन्य प्राण्याने ठार मारलं."

मी शांतपणे गाणी गुणगुणत स्वयंपाकघरात भाजी चिरत होते; पण माझ्या हाताला अजूनही रक्ताचा वास येत होता.

हळूहळू माझं आयुष्य दोन भागात विभागलं गेलं. दिवसा मी अंजली - संसार करणारी, मुलांना शाळेत सोडणारी, नवऱ्याला डबा देणारी.
तर रात्री मी वाघीण — शिकाऱ्यांचा शोध घेणारी, जंगलात फिरणारी...

प्रत्येक शिकारी एकेक करून मला भेटला. कोणी गावातल्या मेळाव्याला आला होता, तर कोणी अजूनही बेकायदेशीर शिकार करत होता. माझ्या नजरेतून ते सुटत नव्हते.

त्यांना दिसायची फक्त काळी सावली, लाल डोळे आणि ऐकायला यायचा गुरगुरण्याचा आवाज... काही क्षणांत त्यांच्या देहाचे मी लचके तोडायचे.

त्यांना संपवून ज्या ज्या वेळी मी घरी परतायचे तेव्हा अंगभर खरचटलेलं, कपड्यांना रक्ताचा वास.

राजेश विचारायचा, “काय झालं?”

तर मी हसत ते टाळायचे.

पाचवा शिकारी मात्र सगळ्यात हुशार होता. त्याने पोलिसांशी हातमिळवणी केली होती.

बातम्यांमध्ये सतत यायचं की, "गावाजवळ वाघीण आली आहे, पाच शिकारींचा बळी घेतलाय." लोकांच्या मनात दहशत पसरली होती.

एक दिवस मला कळलं, शेवटचा शिकारी गावाबाहेरच्या शिकार मोहिमेला निघालाय. त्या रात्री माझं रूप आपोआप बदललं. जंगलात त्याच्या गाडीचा मागोवा घेतला.

तो तयारीत होता, बंदुका घेऊन बसला होता; पण मला पाहून त्याच्या चेहऱ्यावर भीती दाटली. तो ओरडला, “हे अशक्य आहे, तू इथे कशी?”
मी गर्जले, झेपावले… आणि काही सेकंदांत त्याचा शेवट झाला.

पण यावेळी मात्र सगळं वेगळं घडलं. जंगलात मीडिया आणि पोलीस लपून बसलेले होते. त्यांनी मला लाल डोळ्यांनी झेपावताना पाहिलं, माझ्या अंगावर आलेले पिवळे चट्टे पाहिले. काहींनी व्हिडिओ काढले. मी अंजली असूनही, त्या क्षणी वाघीण होते.

दुसऱ्या दिवशी सगळ्या बातम्यामध्ये -
"गावातील अंजली खरंतर वाघीण! पाच शिकाऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार."

पोलीस घरी आले. मुलं रडत होती, राजेशला माझा खूप राग आलेला... मला हत्यांच्या आरोपाखाली अटक झाली.

आज मी ही कहाणी जेलच्या भिंतींआड सांगतेय. लेकरं माझ्या नजरेपासून दूर गेली. राजेश त्यांना सांभाळतोय, मला माहीत आहे तो खूप त्रास सहन करतोय.

लोक म्हणतात मी खुनी आहे; पण माझ्या नजरेत मी फक्त एक आई होते — मागच्या जन्मात बछड्यांना गमावलेली आई! बदला घेणं गरजेचं होतं, नाहीतर माझं आयुष्य अपूर्ण राहिलं असतं.

रात्री अजूनही स्वप्नं पडतात. मी माझ्या बछड्यांना पाहते… ते धावत येतात, माझ्या अंगावर उड्या मारतात. मी त्यांना चाटते, कवटाळते. त्या स्वप्नांत मी पुन्हा आई असते, पुन्हा एक वाघीण असते.’

समाप्त.
©रिषभ कोंडके
0