Login

मी पुरेशी मजसाठी 35

अंबिकाचे समिधा प्रतीचे प्रेम कुठे घेऊन जाईल तिला


अंबिका विचारातच होती समिधा कुठे गेली असेल म्हणून तो जया म्हणाली, "चला यमुनोत्रीचे पाणी घेऊ बॉटलमधे भरून. माझ्या आजीनं आणायला सांगितलं."

त्यांचा ग्रुप मोठ मोठ्या दगडांमधून वाट काढत प्रवाहा जवळ गेला. एका दगडाला पकडून पाण्यातून बाहेर यायचा प्रयत्न करत असलेली समिधा त्यांच्या दृष्टीला पडली. अंबिकाने पटकन पुढे होऊन तिला हात देऊन बाहेर खेचलं. समिधाला सुखरूप बघून तिच्या जीवात जीव आला.

"काय करत होतीस बाई?" पूर्वाने तिला विचारलं.

"मी पाणी भरत होती बॉटलमधे. पण पाय घसरला आणि माझा तोल गेला आतल्या बाजूला. पण मी सावरून पटकन या दगडाला पकडलं." समिधा आनंदाने उत्तरली.

"अगं डोकयावर पडली का तु?" अंबिका म्हणाली.

समिधाला तिच्या बोलण्याचा अर्थबोध झाला नाही. ती निरागसपने उत्तरली, "अजिबात नाही. पायाला खरचटलं फक्त."

"अगं वेडे माझ्या म्हणण्याचा अर्थ म्हणजे. पाण्यात पडली तर मदतीला कोणाला बोलवायचं, ओरडली का नाही?" अंबिका
"नको, सगळीकडे म्हातारी वडीलधारी मंडळी. त्यांनी मला लेक्चर दिलं असतं." समिधा म्हणाली, "आणि मी सोलो ट्रिप वर आहे ना. माझं मीच बघायला हवं."

"तु बिनधास्त सोलो ट्रिप कर. पण आपली सुरक्षितता आपल्याच हातात असते. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि कोण म्हणतं सोलो ट्रिप म्हणजे मदत घ्यायची नाही कोणाची?" अंबिका

"मलाच वाटलं तसं." समिधा

"अगं गधडे बरं झालं हा मे महिना आहे. जास्त पाणी नाही इथे." अंबिकाने तिला गधडे म्हणून संबोधलं तसं तिचं तोंड वाकडं झालं हे बघून अंबिका तिला घेऊन बाजूला बसली.

"बाळ, सोलो ट्रिप ही स्वत्वाची, स्वतःच्या क्षमतेची जाणीव व्हावी, स्वतःला सर्व मॅनेज करता यावं, कोणाच्याही हस्तक्षेपा शिवाय काही क्षण स्व सोबतच घालता यावे म्हणून करतात.

काय होतं कि घरी, आजूबाजूला सर्व आपल्याला ओळखतात. काही झालं कि लगेच मदतीला येतात पण जजही करतात. त्यामुळे आपण सतत दडपणात असतो आणि आपल्याला खरंच काय हवं ही अंतर्मनाची हाक ऐकायला कचरतो. सगळं काही जगासमोर छान दिसेल असंच करतो. म्हणून मग सोलो ट्रिप. कारण तिथे सर्व निर्णय आपले आपल्यालाच घ्यावे लागतात. निर्णय बरोबर आले तर आपला आत्मविश्वास वाढतो, आपल्यासाठी काय योग्य आहे ते आपल्याला समजतं. आणि निर्णय चुकला तर आपल्यासाठी काय अयोग्य आहे याची जाणीव होते. आपली पडतीची बाजू समजून येते. सर्व काही एकट्याने सांभाळून घ्यायचे कसब अंगी जागृत होतात. पण वेळ आली तेव्हा मदत मागता येणं, हेही खूप मोठे कसब आहे बरं. सोलो ट्रिप करतांना ते यायलाच हवे." अंबिकाचे लांब लचक भाषण ऐकून तिला काय वाटलं ती एकदम अंबिकाच्या गळ्यातच पडली आणि मुसुमुसु रडू लागली.

"अगं ए वेडा बाई सॉरी मी जास्त बोलली असेल तर?" अंबिका तिच्या डोकयावर हात थापटत म्हणाली.

"नाही. अजिबात नाही. बरोबर बोलल्या तुम्ही." समिधा.

"मग का रडतेस?" अंबिका.

"मम्माची आठवण झाली. ती कधीच असं समजावून सांगत नाही. नुसती चिडचिड करते. रागवत असते. इथे नको जाऊ, हे नको करू, असं नको करू, असं नको बोलू, असले कपडे नको घालू, हे तूझ्या कामाचं नाही, याचं तु काय करशील? असं बोलते आणि कारण तर सांगतच नाही. आपण विचारलं तर म्हणते, मी तुला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. तु माझी मुलगी आहे, मी नाही. मग मला तिच्या जवळ राहाच वाटत नाही. दिवसभर मी कॉलजला असते किंवा मित्र मैत्रिणीच्या घोळक्यात आणि रात्री आपल्या रूम मधे. मग मला ती म्हणते कि तु माझ्या सोबत बोलत नाही, माझ्या जवळ बसत नाही. माझं ना डोकं हँग होतं. म्हणून तिने नाही म्हटलं तरीही आली मी.

आता तुम्हाला बघून वाटतंय, तुमच्या सारखी किंवा तुम्हीच माझी आई असती तर किती छान झालं असतं." समिधा म्हणाली.

अंबिकालाच्या चेहऱ्यावर पुसट हसू पसरलं.

"मी इतकी रडतेय आणि तुम्ही हसत आहात?" समिधाने तिला विचारलं.

"अगं तुला नाही हसत आहे मी. तुझ्या वयात असतांना माझ्या स्वतःच्या आई सोबत उडालेल्या खटक्यांना आठवून हसू आवरलं नाही मला." अंबिका म्हणाली.

"अच्छा, म्हणजे तुम्हीही आईशी भांडायच्या?" समिधा

"मग काय? होतंच गं थोडं फार आई आणि मुलीत. मी जरी तुझी आई असती ना, आपल्यातही कलकल झालीच असते. कारण मुलांच्या हातून थोडं जरी काही कमी जास्त झालं लोकं आईलाच बोलतात. काय शिकवण दिली मुलाला म्हणून जाब विचारतात. पार चिंतेत जगतात आया. कधी कधी तर मुलांना वळण लावायच्या नादात प्रेम करायचंच विसरून जातात आपल्याच मुलांवर.

त्यात आईला वाटतं आपल्या बद्दल झालेल्या चुका आपल्या मुलीच्या बाबतीत व्हायला नको म्हणून काळजी पोटी सतर्क असते ती. होईल तितकं जपायला बघते तिच्या पिल्लाला.

त्यात वर्किंग आई असली तर कितीतरी जाबदाऱ्या पार पाडायच्या असतात तिला. पण तिचंही चुकतेच म्हणा, तिने का व कशासाठी? हे समजावून सांगायला हवे मुलांना. पण तिच्या स्वतःच्या आईने तिला दिलेली वागणूक, तिच्यावर केलेले संस्कार, मुलांना स्पष्टीकरण देणं किती गरजेचं आहे या जाणिवेचा अभाव आणि टेंशन पायी खूप वेळा तिला नाही समजत हे."

"I am so lucky to meet you. पुण्याला आली कि आईला भेटा माझ्या आणि समजावून सांग बरं हे सगळं. वाईट नाही ती खूप छान आहे. पण तुम्ही म्हटलं ना तसंच झालंय तिच्या बाबतीत." समिधा

"हो नक्कीच भेटेल. पण तुही आईला जास्त टेंशन देऊ नको. स्त्रियांच्या बाबतीत त्यांचं शरीर मनाशी खूप जुळलेलं असतं आणि हार्मोन्स थोडे इकडे तिकडे झाले कि त्यांना त्रास होतो. त्यात आजकाल वेळे आधीच येणारा मेनोपॉज. अशी खूप कारणं असतात गं. त्यांना प्रेमाने वागणूक द्यायला हवी बाळा. आता सकाळ संध्याकाळ तिला फोन करून तुझी खुशाली कळव. समजलं!" अंबिका

"होहो नक्कीच. आता करते फोन आणि बोलते तिच्याशी." ती परत एकदा अंबिकाला बिलगली.

अंबिकाला विस बावीस वर्ष पूर्वी जन्म देताच मिसेस जाईच्या हातात सोपवलेल्या नवजात मुलीची आठवण आली आणि थंड वातावरणातही तिला दररर घाम फुटला. कशी असेल ती? मोठी झाल्यावर आपल्याच सारखी दिसत असेल का? समिधा एवढीच असेल आता.

"तुम्हाला इतका घाम का फुटतोय?" समिधाने विचारलं.

"काही नाही. जीव घाबरून आला. पाणीच नाही पिलं खूप वेळचं." अंबिका बोलली आणि जया कडून साखर मिठ पाणी असलेली बॉटल घेऊन पाणी पिलं. तिला खूप बरं वाटलं.

सर्व परतीच्या मार्गाला लागले. वाटेतील छोट्या छोट्या धबधब्या जवळ फोटोशूट झालं.

दुसऱ्या दिवशी गंगोत्री झालं. समिधाने गंगोत्री वरून गोमुख ट्रेकिंगला जायचं प्लॅनिंग केलं होतं त्यामुळे ती तिथेच इतर ट्रेकर्स सोबत थांबली. समिधाने आठवणीने समिधाचा मोबाईल नंबर घेतला.

अंबिका तिच्या ग्रुप सोबत केदारनाथच्या वाटेला लागली.
आधी मनात आलं यमुनोत्री चढून थकलोय आपण, आता पालखी किंवा घोडा/खच्चर वर बसून जावं. पण यात्रेकरूंचा उत्साह बघून तिला हुरूप आला. इथेही ती थांबत, विश्रांती घेत पायीच मंदिरात गेली. मुक्काम केदारनाथ मंदिर जवळ झाला.

रात्री दिव्यांच्या आरासने मंदिर काही औरच दिसत होते. स्वर्ग म्हणजे हेच असावं ! तिच्या मनात आलं. शिवपुराण वाचण्यात आलं. सकाळी पहाटे उठून अंघोळ वगैरे आटपून, पांढरा शुभ्र कुर्ता पायजमा घालून अंबिका परत एकदा मंदिरात गेली. समिधाच्या सर्व मेंबर्स आणि पांडे काकूला ला सोबत घेऊन आवारात ध्यानाला बसली. तो अनुभव शब्दात सांगणं कठीण. आजूबाजूला हिमालय पर्वताची रांग आणि मधे यांचा मुक्काम. यावर तिने पुण्याला गेल्यावर लिहायचं ठरवलं.

मन प्रसन्न झालं. चेहऱ्यावर तेज आलं. वाटलं इथेच राहावं घर करून. पण मनात आलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होईलच असं गरजेचं नाही ना. परतीच्या मार्गाला लागायची वेळ झाली. अंबिकाने महादेवाला हात जोडले,

"चूक भूल माफ. सर्वांना जेजे हवं आणि योग्य असेल तेते सर्व मिळो."

धन्यवाद !

तळटीप :
या कथेचा लेखिकेच्या आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.

लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून
0

🎭 Series Post

View all