Login

मी पुरेशी मजसाठी भाग 25

अंबिकाची वाटचाल, एक पाऊल आकर्षण मुक्त प्रेमाकडे
मी पुरेशी मजसाठी भाग 25

अंबिका आणि विधीचा फोन रिपेयर होऊन आला. अंबिकाच्या फोनमधे विधीने तिला पाठवलेला व्हॉइस मॅसेज व बबन आणि सिक्योरिटी चंदन यांचे बोलण्याची रेकॉर्डिंग मिळाली ज्यात त्यांनी मिस्टर नारंगचा उल्लेख केलेला होता. पोलिसांनी लगेच नारंगला अटक केली. पण रेकॉर्डिंग व्यतिरिक्त दुसरा काहीच ठोस पुरावा मिळाला नाही म्हणून त्याची काहीच तासात जामिनावर सुटका झाली. बकुळाने टाकलेली केस मात्र सुरूच होती. एक महिन्या नंतर कोर्टात हजर व्हायचे समन्स मिस्टर आनंद जाई, अंबिका आणि विधीला पोस्टाने मिळाले. तसा त्या केस मधेही तितकासा दम नव्हता पण नारंगला मुद्दाम मिस्टर जाई च्या डोक्याला ताप द्यायचा होता.

मिस्टर आनंद जाई बरे झाल्यावर आठ दिवसांनी मिसेस जाई परत अंबिकाला घेऊन डॉक्टरकडे गेल्या. डॉक्टरने मिस्टर आनंद जाईचे स्पर्म तिच्या गर्भ पिशवीत inject केले. अंबिकाने ऑफिस जॉईन केलं होते. सर्व कामं परत आधी सारखी सुरु झाली. पण अंबिका दिसताच सारिका आणि तिच्या चमच्यांसारखी काही मंडळी कुजबुज करायची, मुद्दाम दात काढायची. हे बघून अंबिका सरळ त्यांना म्हणायची,
"मोठ्याने बोला हो. ऐकून मीही हसुन घेते थोडे."

तेव्हा मात्र सर्व आपापल्या कामाला लागायची. कारण नेहाने आधीच सर्वांना मिस्टर आनंद जाई आणि अंबिका विषयी बोलणाऱ्यांना डायरेक्ट मिसेस जाई बघतील असं सर्क्युलरच काढलं होतं.

पंधरा दिवसा नंतर मिस्टर आनंद जाईनीही परत ऑफिसला येणं सुरु केलं. त्यांची पोर्श कार अंबिकाला काचेतूनच दिसली. अंबिकाने डोळे भरून त्यांना बघून घेतलं. त्या घटने नंतर आज पहिल्यांदा तिने त्यांना परत आपल्या पायांवर उभं बघितलं.

"आपण खरंच खूप स्वार्थी आहोत का? आपल्या रक्षण करत्या माणसाला हॉस्पिटलमधे सोडून दूर कुठेतरी निघून जाणार होतो." या विचाराने ती थोडी भावूक झाली.

"अंबिका मॅडम, आज त्या अपघाता नंतर सर पहिल्यांदा ऑफिसला येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी सर्व सज्ज आहेत दारात. तुम्हीही जावा. फोन आला कोणाचा तर बघतो मी." चपराशी अंबिकाला म्हणाला. तशी ती स्वतःला कामात बिझी दाखवायचा प्रयत्न करू लागली. तिने लगेच टेबल वरील एक फाईल हातात घेतली आणि पानं चाळत ती फाईल वाचण्यात अतिशय दंग आहे असं मीस करू लागली.

तिकडे मिस्टर आनंद जाईचे फुलं देऊन जय्यत स्वागत झाले. मिसेस जाई सोबत ते ऑफिसच्या आत आले. मिसेस जाईला सारिकाने काहीतरी बोलायला थांबवलं.

जिग्नेशने केबिनच्या आत जाऊन PC सुरु केला. मिस्टर आनंद जाई आले. केबिनच्या आत जाता जाताच ते थांबले. अंबिका जवळ आले. अंबिका जरी फाईलमधे डोकं खुपसून होती. तिचे कान मिस्टर आनंद जाईच्या पावलांच्या आवाजाच्या दिशेने लागले होते. त्यांना जवळ आलेलं बघून तिच्या हृदयाची स्पंदनं वाढली. इतक्या दिवसांनी परत तोच हवा हवासा वाटणारा रुबाब तिच्या अनुभवास आला.

"मला माहित नव्हतं नाशिकरांना उलटंही वाचता येतं." अंबिकाने घाईत, अनावधानाने उलट्या पकडलेल्या फाईलला सरळ करून मिस्टर आनंद जाई शांतपने म्हणाले. जीव अडकलेल्या पण कोणाला सांगताही न येणाऱ्या त्या व्यक्तीला डोळे भरून बघण्याची संधी आज किती दिवसांनी मिळाली त्यांना. स्वतःशीच हसून ते केबिनच्या आत शिरले.

अंबिकाने डोक्याला हात लावला आणि फाईल टेबलवर ठेवली. तिला खूपच धडधड होत होतं. थ्री इडियट्स च्या आमिर खानला आठवून तिने स्वतःला सांगितलं,

"All is well, all is well !"

पण नजरे समोर फक्त मिस्टर आनंद जाईच दिसत येत होते.

मिस्टर आनंद जाईला माहित होतं आता अंबिका त्यांना टाळायचा अधिकाधीक प्रयत्न करेल व गर्भावस्थेत तिचं दहा वेळ उठून इकडे तिकडे जा ये करणंही ठीक नाही. म्हणून त्यांनी तिला त्यांना आलेले फोन अटेंड करायची आणि एका जागी बसून होतील अशी कामं सोपवली तर जिग्नेशला सर्व धावपळीची आणि त्यांच्यासोबत करायची कामं दिली. हे बघून अंबिकाला हायसं झालं.

अंबिका, मिस्टर आनंद जाई, नेहा आणि इतरही सर्वच होईल तितकं नॉर्मल राहायचा आणि स्वतःला दाखवायचा प्रयत्न करू लागले. पण मिसेस जाईचे वारंवार फोन करून
"काही वाटतं का? काही झालं का? जास्त दगदग करू नको? अंकुरला काखेत उचलू नको, तुला अमुक अमुक खावंसं वाटतं का? डॉक्टरला एकदा दाखवायचं का?" असं विचारणं अंबिकाला त्रासदायक वाटू लागलं.

मिस्टर आनंद जाईचे स्पर्म inject करून झाल्यावर एक महिन्याने डॉक्टरने सोनोग्राफी केली. पण त्यांना विशेष असं काही दिसलं नाही. कधीकधी भ्रूण डेव्हलपमेंटला वेळ लागतो म्हणून पहिल्याच महिन्यात नाही समजून येत बाई गर्भार आहे की नाही. असं बोलून डॉक्टरने अंबिकाला परत काही वाटलं तेव्हा नाहीतर एक महिन्या नंतरच ये असं सांगितलं.

"मिसेस जाई आताच अशा करत आहेत. बाळ राहील तेव्हा काय करतील? श्वास तरी घेऊ देतील का आपल्या मनाने?" या विचाराने अंबिकाला रात्री झोप येईनाशी झाली.

एका सकाळी ती नेहमी प्रमाणेच ऑफिसला तर गेली पण तिला खूपच अजीर्ण व्हायला लागलं. तिने गुपचूप वॉशरूम मधे जाऊन उलटी केली तेव्हा तिला बरं वाटलं. याला त्याला सांगणं म्हणजे गॉसिपिंगला तोंड फोडणे आणि मिसेस जाई तर होत्याच मग परत डॉक्टरचा चक्कर लावायला.

या विचारातच अंबिका तिच्या खुर्चीवर येऊन बसली. मोबाईलची रिंग वाजली. जिग्नेशचा मॅसेज आलेला,
"I am not feeling well, so not coming office today. Please look after my work. Thank you !"

"अरे देवा, हा येणार नाही म्हणजे दिवसभर खडूस टीचरच्या अवती भोवती मलाच करावं लागेल !" अंबिका स्वतःशीच पुटपुटली.

मिस्टर आनंद जाई ऑफिसला आले. सरळ केबिन मधे गेले. बघतात तर PC सुरु नव्हता. त्यांनी जिग्नेशला बोलवायला टेलिफोनचं रिसिव्हर हातात घेतलं. तोच अंबिका आत आली आणि PC ऑन करू लागली.

"बॉसच्या केबिनमधे जातांना, \"may I come in\" सारखे शब्द वापरतात हे विसरलात वाटतं नाशिककर." मिस्टर आनंद जाई अंबिकाला म्हणाले.

"सॉरी सर !" अंबिका डोळे मिटून, ओठ दाबून म्हणाली. एकतर जिग्नेश आला नाही म्हणून मिस्टर आनंद जाईला मनस्ताप होऊ या विचारात ती घाईतच केबिनच्या आत शिरून कामाला लागली अन हे माणूस असं म्हणतंय.

"जिग्नेश कुठे आहे? मी सांगितलं होतं ना केबिनच्या आतलं सगळं तोच बघेल म्हणून." मिस्टर आनंद जाईने अंबिकाला विचारलं.

"मोबाईल अजून बघितला नसेल ना आपण. तो बघा म्हणजे कळेल." अंबिका बोलून गेली. मिस्टर आनंद जाईने अवाक होऊन तिच्याकडे बघितलं. ती असं कसं बोलून गेली? तिचं तिलाच आश्चर्य वाटलं. आणखी काही बोलून घोळ व्हायच्या आधी केबिन मधून बाहेर पडलेलं बरं. तिच्या मनात आलं. तसं ती,
"माझ्या टेबलवर काही कामं पेंडिंग आहेत ते बघते." बोलून केबिन बाहेर पडण्यासाठी पुढे झाली आणि बाजूला असलेल्या खुर्चीला अडखडली. तिला सावरायला मिस्टर आनंद जाई समोर झाले. ते तिला आधार देणार तोच ती म्हणाली,

"Its ok. मी ठीक आहे. मी आहे बाहेर काही असलं तर सांगा." अंबिका चालू लागली. मिस्टर आनंद जाई आपल्या खुर्चीत बसले. तिला परत गरगरल्या सारखं झालं. ती जागीच थबकली.
"रात्री जागरण करण्याचे परिणाम." ती डोक्याला हात लावून स्वतःला म्हणाली, "घ्या टेंशन, जागी राहा अजून रात्री."

मोबाईल मधे गुंग असल्याचं दाखवत खुर्चीत बसलेल्या मिस्टर आनंद जाईनी ते हेरलं. ते खुर्चीतून उठून उभे झाले. पण पुढे होऊन अंबिकाच्या जवळ गेले नाही. कारण त्यांना माहित होतं तिला असं शब्दा शब्दाला आधार घेणं अजिबात आवडत नाही.

दोन क्षण उभी राहून अंबिका केबिन बाहेर तिच्या खुर्चीत जाऊन बसली.

थोडया वेळाने मिस्टर आनंद जाईने नेहाला स्वतः कॉल करून बोलावलं. अंबिकाला बघून तिला आश्चर्य वाटलं की "ही असतांना सरांनी स्वतः मोबाईल वरून फोन का केला असेल?"
कारण खूपच एमरजन्सी असल्या शिवाय मिस्टर आनंद जाई कधीच कोणाला स्वतःच्या मोबाईल वरून फोन लावत नसत.
अंबिका मात्र पार सुस्तावली होती. नेहा कधी आली, तिला बघून मिस्टर आनंद जाईच्या केबिनमधे गेली. तिला कशाचंच भान नव्हतं. ती आपली दोन्ही हाताने तोंड झाकून खुर्चीत बसली होती. नेहाच्या मनात आलं अंबिकाला विचारावं काय झालं पण आधी मिस्टर आनंद जाईशी बोलणं तिला योग्य वाटलं.

"Good morning sir !" नेहा

"Good morning Neha, how are you?" मिस्टर आनंद जाई

"I am good sir." नेहा.

"आपल्या साईट्सची प्रोग्रेस रिपोर्ट मिळाली?"

"हो सर. मी तुम्ही कॉल करताच सर्व प्रोजेक्ट मॅनेजर कडून रिपोर्ट मागवली." नेहा त्यांना फाईल दाखवत म्हणाली.

"हम्म ठीक आहे. उद्या किंवा परवा मिटिंग अरेंज करा सर्व PM सोबत. खूप दिवस झालेत सर्वांना भेटून." मिस्टर आनंद जाई

"सर मिटिंग स्पॉट मुंबई, पुणे की दिल्ली ठेवायचा?" नेहाने विचारलं.

"मुंबई, सर्वांना बरं होईल ते." मिस्टर आनंद जाई म्हणाले. त्यांना आता नेहाचं उठून जाणं अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही म्हणून त्यांनी तिला विचारलं, "आणखी काही नेहा?"

"हो म्हणजे तुम्ही आज स्वतः फोन करून बोलावलं म्हणून जरा आश्चर्य वाटलं आणि अंबिकाही मला बाहेर बसूनच दिसली तोंडावर हात ठेऊन." नेहाने विचारलं.

"हो का?" मिस्टर आनंद जाईने काळजीने विचारलं, "जिग्नेश आज आला नाही. आणि अंबिकाची तब्येतही ठीक वाटत नव्हती. मला वाटतं तिला अजूनही चक्कर येताहेत. म्हणूनच मी स्वतः कॉल केला."

"तिला चक्कर येत आहेत." नेहा स्वतःशीच ओठातल्या ओठात बडबडली आणि गालातच हासली.

"नेहा are you ok?" मिस्टर आनंद जाईने आश्चर्याने विचारलं, "अंबिकाला बरं वाटत नाहीये आणि तुम्ही हसत आहात?"

"सर मी हसत आहे कारण मला वाटतं लवकरच आपल्याला गोड बातमी मिळणार आहे." नेहा आत्मविश्वासाने म्हणाली.

मिस्टर आनंद जाईचा लाईट लागला. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची एक रेष उमटली.

पण खरंच नेहाला वाटतं तसं अंबिकाला दिवस गेले असतील का? की तिला वाटतं तसं झोप न झाल्यामुळे तिला अजीर्ण झालं आहे?

कारण अंकुरच्या वेळी तिला असला काहीच त्रास झाला नव्हता. पूर्ण प्रेग्नेंसी अगदी ठणठणीत पार पडली होती. त्यात तिला ललितच्या विचाराने स्वतःची काळजी करायला वेळच कुठे होता तेव्हा?

क्रमश :
तळटीप :
या कथेचा लेखिकेच्या परस्पर आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.

लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून
0

🎭 Series Post

View all