Login

मी पुरेशी मजसाठी भाग 31

एक आई म्हणून अंबिकाची सत्व परीक्षा.


मिस्टर आणि मिसेस जाई अमेरिकेत गेल्यावर अंबिकाचं आयुष्य तसे खूप सहज झालं. रोज पाळणाघर - ऑफिस - पाळणाघर इतकंच तिच्या जीवनात उरलं. तशी नेहा तिला खूप सपोर्ट करायची. समजवून सांगायची, समजून घ्यायची.
आयुष्य तसे खूप सहज झालं,
पण तरीही तिला कुठेतरी रितं वाटायचं,
काहीच झालेलं नसतांना मन भरून यायचं,
शारीरिक जखमांना वेळ भरून काढत होती,
आंतरिक जखमेला मात्र आणखी ओल येत होती.
रडण्या हसण्याचे सारेच हिशोब चुकत होते,
असेच आयुष्य पुढे पुढे सरकत होते आणि
मन मात्र सतत कुठेतरी भरकट होते.

कधी टीव्ही, कधी मोबाईल, रहस्यमय सिनेमे, सावधान इंडिया, क्राईम पेट्रोल सारख्या सिरीयल पाहण्यात ती स्वतःला गुंतवत गेली. पण ते तरी किती वेळ मनाला बांधून ठेवतील? उलट तश्या सिरीयल बघून तर तिला आणखी असुरक्षित वाटायला लागलं,

\"अंकुरला आपल्या पासून कोणी दूर करेल, कोणी त्याला किडनॅप करेल? कोणी उचलून नेईल, आपल्याला एकटं बघून आपला कोणीतरी फायदा उचलेल, आपण एकटं पडलोय म्हणून समाज आपल्याला हीन बघतोय, आपण लवकरच संपून जाऊ."

अशा नाना प्रकारच्या आणखी भीतीच्या भावना तिच्या अंतःकरनात दाटून येऊ लागल्या.

अंकुर नऊ वर्षांचा झाला तसं त्याचं मन बाबाला आणखी शोधू लागलं. अंबिका मात्र त्याला ललित बद्दल खरं सांगायला कचरत होती. पण अंकुरने बापा बद्दल विचारताच तिचा जीव राग राग करायचा आणि ललितचा सर्व राग अंकुरवर निघायचा.

असंच एके दिवशी काहीतरी झालं आणि अंबिका अंतःकरनातून हादरली. तिला कळत नव्हतं कोणाला सांगावं? आपलं दुःख कोणाला बोलावं? कोणाजवळ आपलं मन रितं करावं?

नेहाला सांगावं तर ती आधीच तिच्या वयात आलेल्या मुलीच्या मित्रांमुळे आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे खूप त्रस्त झालेली. म्हणून आपली गाऱ्हानी ऐकवून तिला आणखी त्रास देणं अंबिका टाळत होती.

पण आता तिला कोणीतरी हवं होतं नाहीतर लवकरच तिच्या हातून काहीतरी भयंकर घडेल अशी भीती तिला वाटू लागली.

तिने इंटरनेटवर तिच्या मनातला प्रश्न टाकला, "How to heal my mind? I have become my own enemy?"

उत्तर आलं, "Meet a psychologist."

"कोणाला कळलं आपण सायकोलॉजिस्ट ला भेटलो तर ते काय म्हणतील? आणखी गॉसिप होईल आपल्या बद्दल?" तिच्या मनात आलं. पण तिने स्वतःला समजावलं,

"कळलं तर कळू दे. आपले प्रॉब्लेम आणि आपलं मानसिक आरोग्य आपली जबाबदारी आहे. त्यांची नाही. म्हणून ते बोलतीलच काही ना काही. तसंही राजेश भाऊ पुष्पा ला म्हणाले होते,

कुछ तो लोग कहेंगे,
लोगोका काम है केहना,
छोडो बेकार कि बातोको,
कही बीत न जाये रैना |"

गुगलवर reviews बघून तिने एका सायकोलॉजिस्टची अपॉइंटमेंट घेतली.

अंबिका, "आत येऊ?"

डॉक्टर नीता, "ये, बस !"
अंबिका, "थँक्यू !"
डॉक्टर नीता, "कशी आहेस?"
अंबिका, "छान आहे."
"कशी आहेस?" डॉक्टर नीताने परत विचारलं. अंबिकाने प्रश्नांकित नजरेनं त्यांना बघितलं.

त्या म्हणाल्या, "अंतःकरण म्हणेल ते उत्तर दे."

अंबिकाचे मन भरून आलं आणि डोळ्यात पाणी साचलं.

"रडावं वाटतंय? होतं कधी कधी. रडून घे. पाणी पी मन हलकं होईल तुझं. तेव्हा पर्यंत मी तुझी हिस्ट्री वाचते ." इतकं बोलून डॉक्टर नीता अंबिकाने भरून दिलेला फॉर्म वाचू लागली.

अंबिकाने रडून घेतलं. वॉशरूम मध्ये गेली. तोंडावर पाणी मारलं. डॉक्टरने असिस्टंटला पाण्याचा ग्लास तिला द्यायला सांगितलं. पाणी पिल्यावर अंबिका बोलू लागली.

"सॉरी डॉक्टर पण सध्या अशा परिस्थितीत आहे मी कि कोणाच्याच समोर मी माझे अश्रू दाखवू नाही शकत या जगात. म्हणून इथे येताच माझा धैर्याचा बाण सुटला." अंबिकाने परत डोळ्याला रुमाल लावला.

"चालेल ! आम्ही मनाचे डॉक्टर. मनातलं दुःख नाही समजू तर आमचा काय फायदा? बोल बाळा काय झालं?" डॉक्टरने विचारलं.

"मला माझ्या स्वतःचीच खूप भीती वाटतेय डॉक्टर. माझं चिड चिड करणं, अंकुरला एखाद दुसरी ठेऊन देणं, छोट्या मोठ्या वस्तू तोडणं. ठीक होतं. एकटं पडलं कि असं होतं असं वाटत होतं. पण दोन दिवसांपूर्वी जे घडलं माझ्या या हातून त्याने हदरली मी. मी ज्या माझ्या बाळाला प्रेमाने, लाडाने लहानाचे मोठे केले, त्याच्या पंखात बळ भरतेय, त्याच्यात प्राण फुंकतेय त्यालाच मी... " अंबिका परत रडू लागली.

डॉक्टर नीता जवळ अशा अनेक केसेस यायच्या त्यामुळे त्या शांत बसून तिचं रडणं बंद व्हायची वाट बघत होत्या.

"अंबिका.. बोल बाळ पुढे. तु सांगणार नाहीस तर मला काय करायचं ते कसं समजणार. बोल... " डॉक्टर तिला म्हणाल्या.

"ज्या मुलाला एक ओरखडा येऊ नये याची मी सतत काळजी घेतली, तळ हातांच्या फोडा सारखं जपलं. त्याला मी..."

"जोरात मारलं?" डॉक्टर

अंबिका मान हलवून बोलली, "मी चक्क त्याचं डोकं पकडून भिंतीवर हाणला."

"तो ठीक आहे ना?" डॉक्टरने खुर्चीतून उठून विचारलं.

"हो, तो ठीक आहे. पण त्याचं वायुसेना पायलट ऑफिसर बनायचं स्वप्न तुटलं माझ्या हातून. मी त्याचं डोकं पकडून भिंतीवर हाणला तेव्हा तो नको नको करत बोलत होता. त्याचं उघडं तोंड भिंतीवर ठेचल्या गेलं आणि त्याचा समोरचा दाताला चांगला मार लागला. क्रॅक आली त्या दाताला आणि मला माहित्येय कि वायुसेना पायलटला दातांचं दुखणं चालत नाही. मी एक दीड वर्ष झाले जेव्हा पासून अंकुरने मला त्याला वायुसेना पायलट बनायचं आहे सांगितलं त्यासाठी काय हवं नको त्याचा अभ्यास करतेय. तरीही मी रागात असं करून बसले. आता मला भीती वाटतेय कि त्यावेळी फोर्स जास्त असता माझ्या हाताचा आणि त्याला आणखी काही मोठी दुखापत झाली असती तर? विचार करून करून माझी झोप उडलीय.

काही वर्ष आधी टीव्ही वर एक बातमी ऐकली होती. पुण्यातच एका घटस्फोटित महिलेने रागा रागात तिच्या पंधरा सोळा वर्षाच्या मुलाला त्याच्याच क्रिकेट खेळायच्या बॅटने त्याला इतकं मारलं कि तो जागीच गेला." अंबिका परत रडू लागली.

"हे खूप भीती दायक म्हणून मी बातम्या ऐकणं सोडलंय. पण मग क्राईम पेट्रोलच्या एका एपिसोड मधे बघितलं कि एका चांगल्या कुटुंबातील नोकरदार सर्वगुण संपन्न वाटणारी बाई तिच्याच दोन तिन वर्षाच्या मुलीला ती रडणं बंद करत नाही म्हणून रागाच्या भरात चक्क वॉशिंग मशीन मधे टाकते आणि जेव्हा तिचा राग शांत होतो तेव्हा पर्यंत मुलीचा जीव गेलेला असतो.
आता मला माझी, माझ्या मेंदूची, या हातांची खूपच भीती वाटतेय. माझ्या हातून असं काही व्हायची भीती वाटतेय मला.

मनात येतंय आत्महत्या करून टाकावं पण मी तेही करू नाही शकत कारण माझ्या बाळाला माझ्या शिवाय दुसरं कोणी नाही. खूपच भोळा आहे तो. त्याला दंगा मस्ती या शिवाय दुसरं सुचत नाही. निर्मळ मनाने त्याने मला, आम्हाला सोडून दुसरं घर बसवलेल्या त्याच्या बाबा विषयी विचारलं. ते परगावी जॉब करतात असं सांगूनही त्याने का, कशाला वगैरे वगैरे प्रश्न विचारणं सुरूच ठेवलं आणि माझ्या रागा वरून ताबा सुटला बघा." अंबिका

"त्याला खरंखरं सांगितलं कधी?" डॉक्टरचा प्रश्न

"नाही." अंबिका

"का?" डॉक्टर

"काय सांगू कि त्याचा बाबा तो सहा सात महिन्याचा असतांना दुसऱ्या बाई सोबत राहायला गेला? त्यानं जबाबदारी निभावतो म्हटलं पण माझा स्वाभिमान जपण्यासाठी मी त्याला नाही म्हटलं आणि एकटीने जगायचं ठरवलं हा विचार न करता कि बाळाची किती फरफट होईल या सगळ्यात? काय काय सांगू नऊ वर्षाच्या मुलाला मी? मला त्याच्या मनात त्याच्या बापा विषयी किंवा आणखी कोणा विषयी विष नाही भरवायचं आहे.

मला फक्त त्यानं त्याच्या आयुष्यात सफल व्हावं, एक चांगला माणूस म्हणून नाव कमवावं, आपल्या देशाला सन्मान मिळवून द्यावं इतकंच वाटतं.

म्हणूनच डिफेंस सर्व्हिसेस मधे त्याला इंटरेस्ट यावा यासाठी प्रयत्नशील राहली आणि तसं झालंही. पण बघा काय करून बसली मी स्वतःच्या हाताने?"

"आता सर्व ठीक होईल आणि कोणी सांगितलं कि फक्त डिफेंस सर्व्हिस मधे जाणं म्हणजेच देशाला सन्मान मिळवून देणं होतं. आपली कर्तव्य पूर्ण करणं, एक चांगला नागरिक बनणं आणि इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करणं. हेही केलं तरीही खूप मदत होते आपल्या देशाला." डॉक्टर नीता तिच्या हाताला हातात घेऊन स्मित हसून म्हणाल्या,
"मी देते ती औषधं घे, काही पुस्तकं सांगते ती वाच. तु खूप खंबीर मनाची आहेस. स्वतःला थोडं सावर आमच्या आणि औषधीच्या मदतीने. झालं ! एका आठवड्याने अंकुरला घेऊन ये. बोलू आपण त्याच्याशी, त्याला सर्व सत्य सांगू."

"पण... " अंबिका

"काळजी करू नको आपण अशा पद्धतीने समजावून सर्व सांगू त्याला कि तो कोणा विषयी राग मनात ठेवणार नाही. पण आधी तु स्वतःला हील करणं खूप महत्वाचं. ओके !" डॉक्टर बोलल्या.

"ओके डॉक्टर ! तुम्हाला भेटून खूप बरं वाटतंय. Cu." अंबिका खुर्चीतून उठून म्हणाली.

"ओके, टेक केयर !" डॉक्टर

क्रमश :

लोकांना वाटतं कि मुलाला जन्म दिला म्हणजे काम संपलं पण असं नसतं हो, मूल पोटात गर्भ रूपात येतं तेव्हापासून तर जन्म होई पर्यंत तिचा जीव धोक्यात असतो आणि पुढे पूर्ण संसार गाड्या सोबतच त्या मुलाला घडवणंही तिचीच जबाबदारी मानली जाते. अशात तिला साथ देणं, तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणं हे तिच्या घरच्यां लोकांचे कर्तव्य असतं. पण सर्वांना नाही समजत, काहींना समजतं पण तरीही दुर्लक्ष करतात आणि काहीतर नसतं थोतांड समजतात. म्हणून अंबिका सारखे तिने स्वतःच स्वतःला सावरावे आणि एक्सपर्टची मदत घ्यावी.
धन्यवाद !

तळटीप :
या कथेचा लेखिकेच्या परस्पर आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.

लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून
0

🎭 Series Post

View all