Login

मी पुरेशी मजसाठी भाग 32

अंबिकाच्या आयुष्याला आलंय एक नवीन वळण. कुठे घेऊन जाणार हे वळण तिला?
डॉक्टर नीताने अंकुरला नीट समजावून सर्व सत्य सांगितलं. आधी त्याला खूप वाईट वाटलं कि त्याचे बाबा नेहमी साठी त्याच्या आणि त्याच्या आई पासून दूर झाले आहेत. ते कधीच त्यांच्या सोबत राहायला येणार नाहीत. आपली आई आपल्याशी खोटी बोलली म्हणून त्याला खूप रडू आलं. अंबिकाला त्याला असं बघून खूप भीती वाटली.

"मला माफ कर बाळा. मी तुझ्याशी खोटं नको बोलायला हवं होतं. पण तुझं मन दुखेल, तु मनात राग धरून बसणार आणि तुझी प्रगती खुंटणार, म्हणून मी खरं नाही सांगू शकली. प्लिज माझा राग नको करू." अंबिका त्याला म्हणाली.

"तु नको गं रडू. मीही आता परत कधीच बाबाबद्दल नाही विचारणार. तूच माझी आई आणि बाबा आहेस. आय लव्ह यु." अंकुर तिला बिलगून म्हणाला, "तु टेंशन नको घेऊ. मी खूप अभ्यास करणार. मोठा ऑफिसर बनणार. You will proud of me. आणि नेहमी तुझ्या सोबत राहणार. तुला कधीच सोडून जाणार नाही."

डॉक्टर नीताला त्यांना असं बघून आनंद झाला. त्यांनी अंबिकाला तिचं मन रितं करता यावं म्हणून घटस्फोटित महिलांचा सेल्फ हेल्प ग्रुप जॉईन करायला सांगितलं. त्यात दर आठवड्याला घटस्फोटित महिला मेंबर्स गार्डन, रेस्टॉरंट किंवा सर्व एकमताने ठरवलेल्या जागी भेटून आपापले अनुभव शेयर करायच्या, एकमेकांना मार्गदर्शन करायच्या. पण कोणतीही आशा अपेक्षा न बाळगता. डॉक्टर नीताच्या फ्रेंड्स सर्कल मधील एक पंचविशीतिल चुणचुणीत तरुण, समुपदेशकची प्रॅक्टिस करत असलेला सायकोलॉजिस्ट, शशिकांत हा ग्रुप मॉनिटर करायचा. त्याला प्रेमाने सर्व शशी म्हणायचे.

शशीच्या बाबाचा त्यांच्या वैज्ञानिक संशोधनवर अति जीव. त्यांचा दिवस रात्र त्यातच जाई. आईला खूप एकटं वाटायचं. पण करणार काय त्यांचं प्रोफेशनच असं होतं. ज्याला आपल्यासाठी वेळच नाही त्याच्या सोबत राहायचं नाही. असं म्हणून आईने घटस्फोटची मागणी केलेली. शशीचे बाबा जणू याचीच वाट बघत होते. त्यांनीही घटस्फोट दिला आणि मुलाला हवं ते सगळंही दिलं. शशीच्या आई बाबाचा घटस्फोट झाल्यावर त्याची आई काही महिने छान जगली. आनंदी होती. पण लगेच तिच्या लक्षात आलं कि तिने घटस्फोट घेऊन खूप मोठी चूक केली आणि ती डिप्रेशनमधे गेली.

झालं असं कि घटस्फोट घेतल्यावर नातेवाईक तिच्या दुसऱ्या लग्नाच्या मागे लागले. तिने होकार दिला पण दुसरपणी लग्नासाठी खूपच विचित्र अनुभव तिला आले. ती तिशीतली असूनही पन्नाशीतील विधुर, घटस्फोटीत स्थळ तिला यायची. तिने दुसऱ्या लग्नाचा विषय मनातून काढला. पण नातेवाईक परत परत त्याच त्याच गोष्टींचा उल्लेख करत, माहेरी भाऊ आणि वाहिनीला ही आपल्या उरावर येऊन बसते कि काय अशी भीती वाटायची म्हणून त्यांनी विचारणं बंद केलं. ती एकाकी पडली. सोबत काम करणाऱ्या एका मित्रा जवळ तिने मन मोकळं केलं. ते भेटू लागले. त्याने तिला आधार आणि तिचा फायदाही उचलला. ती पुरती त्याच्या आहारी गेली. हे समजताच त्याला हवं असेल तेव्हा भेटायचा, बोलायचा नाहीतर तिच्याकडे बघतही नव्हता. एकदा ही त्याच्या घरीच जाऊन धडकली. तर त्याची बायको हिच्यावर स्वार होऊन म्हणाली,

"मला माझ्या नवऱ्याने तु त्याला कसं गंडवलेस ते सगळं सांगितलं आहे. आधी स्वतःच्या नवऱ्याला धुडकावून लावलं आणि आता इतर बायकांना त्रास देतेय. अगं पोराचा तरी विचार कर. मोठा झाल्यावर काय सांगशील त्याला?"

शशीच्या आईच्या मनाला खूप लागलं हे. ती परत डिप्रेशन मधे गेली आणि सहज झालीच नाही. त्यातच तिने स्वतःला संपवून टाकले. म्हणून शशीची ही धडपड. आपल्या आई सारखं कोणी एकटं पडलं म्हणून जिवाने जाऊ नये यासाठी हा प्रयत्न. अल्कोहॉलीक ऍनॉनिमस वरून त्याला घटस्फोटीत महिलांचाही असाच एकमेकींना मदत होईल असा ग्रुप बनवावा ही कल्पना सुचली. त्याने माणसशास्त्रात पारंगत पदवीला दाखला घेताच मित्र मंडळ सोबत मिळून हा ग्रुप बनवला. माणसशास्त्र क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ मोठ्या डॉक्टर्स, समुपदेशक लोकांना आपल्या कामाची माहिती दिली. मग असे डॉक्टर्स घटस्फोटित महिलांना शशीच्या या ग्रुपची माहिती देऊ लागले.

यावेळेसचे सत्र कात्रजच्या पार्कमधे भरवलं गेलं. पुणे, मुंबई, नाशिक व औरंगाबाद या शहरांमधील बेचाळीस घटस्फोटित बायकांनी हजेरी लावली.

अंबिकाला इतक्या घटस्फोटित स्त्रिया येतिल असं वाटलं नव्हतं. काहींनी जेवायला घरून डबे आणले होते तर काहींनी हॉटेलात ऑर्डर दिलेली होती.

ज्या नवीन आल्या त्यांचं अभिवादन झालं. त्यांना थोडक्यात स्वतः बद्दल माहिती द्यायला सांगितली गेली तसेच त्यांना घटस्फोट झाल्यावर कोणकोणत्या मानसिक तणावातून जावं लागलं तेही बोलायला सांगितलं. कारण सामाजिक आणि दिसणाऱ्या गोष्टी सर्वांना माहित होत्या पण मानसिक दुःख प्रत्येकाचे वेगवेगळे होते. अंबिकानेही स्वतःची माहिती दिली. इतरांना ऐकलं. त्यांच्या व्यथा तिला स्वतः पेक्षा जास्त दुःखद वाटल्या.

अंबिका तशीही एकाकी पडली होती. नको त्या गोष्टीच्या आहारी जाऊन एकटेपणा घालवायचा प्रयत्न केल्यापेक्षा डॉक्टर नीता, शशिकांत करतात तसं काहीतरी सामाजिक कार्य करण्यात स्वतःला गुंतवायचं तिने ठरवलं.

ती दर महिन्याला न चुकता घटस्फोटित महिलांच्या या मिटिंगला हजेरी लावायची. इतर स्त्रियांसोबत बोलून त्यांचं मन हलकं होई स्तोवर त्यांचं ऐकून घ्यायची, त्यांना त्यांच्या कोषातून, डिप्रेशन मधून बाहेर पाडण्यासाठी मदत करू लागली. तिचा हा इंटरेस्ट बघून शशिकांतने तिला समुपदेशनचा एक वर्षाचा कोर्स करायला सुचवलं. आधी घर, ऑफिस, अंकुर सगळं सांभाळून कोर्स करणं अवघड वाटलं. पण विचार केल्यावर तिला पटलं. तिने संध्याकाळच्या वर्गात दाखला घेतला.

ती मानसिक आरोग्याशी संबंधित वेगवेगळी पुस्तकं वाचू लागली. आपल्या सोबत नक्की काय होतंय याची जाणीव तिला झाली. ती आता स्वतः विषयी अधिकाधिक जागृत पने विचार करू लागली. आपण ज्या मानसिक त्रासा मधून गेलोय तो त्रास इतर बायकांना व्हायला नको म्हणून तिने वृत्तपत्रात लेख देने सुरु केले.

अंबिका स्वतःला खूप व्यस्त ठेवायची. तरीही कधी कधी तिला मिस्टर आनंद जाईची आठवण आल्या शिवाय राहत नसे. पण नशिबात नसलेलं कितीही हवं म्हटलं तरीही मिळत नाही हेच खरं पण प्रार्थने पुढे नशीब हात टेकवतं आणि अंबिकाने तर त्यांना कधी मागितलंच नव्हतं.

अंबिकाची शशिकांत सोबत छान मैत्री झाली. ती दिसली रे दिसली कि शशिकांतचे मित्र त्याला चिडवायला लागायचे. तो बिचारा लाजून गोरा मोरा व्हायचा. त्याला अंबिकामधे त्याच्या गेलेल्या आईची छबी दिसायची त्यामुळे तो तिच्याकडे आकर्षित झाला. तिच्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू लागला.

अंबिकाला मात्र त्याच्यात मोठा झालेला अंकुर दिसायचा. अंकुरही असाच समंजस, स्त्रियांना आदराने बघणारा, मोठयांना मान देणारा आणि अभ्यासू तरीही प्रसन्न व्यक्तीमत्वाचा होईल असं तिला शशिकांतला बघून वाटायचं. म्हणून ती आई पणाच्या हक्काने त्याला बोलायची. त्याचं काही चुकलं तर ती सांगायची. त्याच्या पांचट मुंगी आणि हत्तीच्या जोकवर खळखळून हसायची. तिला असं बघून तो मात्र घायाळ व्हायचा. पस्तिशीच्या वाटेवर असली तरीही खूप आकर्षक वाटायची ती. तिच्या मनात काहीच नव्हतं ह्याच्या बद्दल, हा मात्र तिच्यात गुंतत चालला होता. ती एखाद्या संध्याकाळी क्लासला आली नाही याला कसंतरी व्हायचं. काय करू, कुठे जाऊ, कोणाला सांगू? अशी परिस्थिती व्हायची. त्याच्या मनात यायचं,

"सांगून टाकावं का तिला? मला आवडतेस तु. मी तयार आहे तुझी आणि तुझ्या मुलाची पूर्ण जबाबदारी घ्यायला. मी समर्थ आहे तुझं एकटेपण दूर करायला."

पण मग लगेच दुसरं मन म्हणायचं,

"नको रे इतक्यातच घाई करू. आणखी थोडा वेळ घे, थोडा वेळ तिलाही दे." आणि त्याच्यात जन्म घेतलेलं वादळ काही काळासाठी शांत व्हायचं.

एका संध्याकाळी अंकुरला बरं नव्हतं म्हणून ही गेली नाही तर तो कॉलेजच्या ऑफिस मधून तिचा पत्ता घेऊन तिच्या घरीच गेला. अंबिकाला हे खटकलं. त्याची भेटण्याची ओढ बघून अंबिकाला तो तिच्यात गुंतत आहे हे जाणवलं. तिने तेव्हा अंकुर समोर काहीच दाखवलं नाही. त्याला अंकुरची ओळख करून दिली. दोघांना उपमा बनवून दिला. चहापाणी झाल्यावर उद्या क्लासला नक्की या असं सांगून शशिकांत निघून गेला.

अंबिकाने शशिकांतशी थोडं अंतर ठेऊन राहायला सुरु केलं. कधी अंकुरची परीक्षा तर कधी त्याचे क्लासेस वगैरे वगैरे अशी कारणं देऊन त्यांच्यात बसणं उठणं कमी केलं.

मानवी मनाचा ठाव घेणाऱ्या सायकॉलॉजिस्ट शशिकांतने, अंबिका त्याला हळुहळू दूर करतेय हे हेरलं. पण त्याने आस नाही सोडली. तो होईल तितकी कारणं तिच्या सोबत राहता येतील म्हणून शोधू लागला.

धन्यवाद !

तळटीप :
या कथेचा लेखिकेच्या परस्पर आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.

लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून
0

🎭 Series Post

View all