Login

मी पुरेशी मजसाठी भाग 34

अंबिकाची नवीन सुरवात घटस्फोटीत स्त्रियांना जगायला शिकवण्याची


अंकुर आणि सई वॉशिंगटनला गेले. अंबिकाने स्वतःला ऑफिस आणि सामाजिक कार्यात झोकून दिलं. दिवस छान व्यस्त जायचा पण रात्रीला बिछान्यात पडताच भूतकाळात मन गोते खायचं आणि डोळ्यात झोप मावेनाशी होऊनही ती जागीच असे. वयोमान आणि मेनोपॉज मुळे आपल्याला असं होतंय हे तिला कळायचं म्हणून ती आला दिवस होईल तितक्या चांगल्याने घालवू पाही.
"अंबिका अगं ये चहा घ्यायला घरी." एका संध्याकाळी ऑफिस मधून आलेल्या अंबिकाला दारातच थांबवून पांडे काकू म्हणाल्या.

"फ्रेश होऊन येते मी." अंबिका.

"नको गं. अशीच ये." पांडे काकू तिचा हात धरून म्हणाल्या, "आमच्या कडे कोण आहे तिसरे? तिकडेच हो फ्रेश."

"बापरे, इतकं काय अर्जंट बोलायचं आहे तुम्हाला? परत काका सोबत भांडण केलंय का तुम्ही?" अंबिकाने विचारलं.

"नाही गं. आम्ही दोघे आणि आपल्या सोसायटीची बारा तेरा कुटुंबं चारधाम यात्रेला जातोय. तुही ये आमच्या सोबत." पांडे काकू

"अरे वा ! कधी जाताय तुम्ही ?" अंबिकाने त्यांना विचारलं.

"में मधे. आणखी दोन महिने बाकी आहेत. तु आरामात रजा घेऊन येऊ शकतेस. म्हणून लवकरात लवकर सांगते म्हटलं तुला." पांडे काकू उत्साहाने म्हणाल्या.

"काकू आधी कळवावे लागते ऑफिसला. मग सुट्टी मिळेल. मी उद्या नक्की सांगते तुम्हाला." अंबिका

"ते काही नाही. तो अंकुर गेलाय तेव्हा पासून रोडावलीस बघ. चल आमच्या सोबत. तितकाच हवा पालट होईल." पांडे काकू.

"सांगते उद्या. चला येते मी थालीपीठ घेऊन \"तुला पाहते रे \" बघायला." अंबिका उठून म्हणाली.

"हो हो नक्की ये. मी स्वयंपाक करते. आपण सोबत जेवु." पांडे काकू

अंबिका झोपायला बिछाण्यात पहुडली तसें तिचे विचार चक्र सुरु झाले, "काय करणार मी चारधाम यात्रेला जाऊन? काय होईल त्यानं? माझ्या भूतकाळातील आठवणी स्वप्न बनून जागवतात मला. ते बंद होईल का?

पण जायला पाहिजे मी. स्वतःला या विचार चक्रातून मुक्ती द्यायला हवी आणि काही क्षण विश्रांती घ्यायला हवी मी. तसेही किती वर्ष झाले, कुठेच नाही गेली घर, ऑफिस आणि आता सामाजिक संस्था, याशिवाय. अंकुरला सांगितलं तर तोही आनंदी होईल कि त्याच्या मागे मी एकटी घरात बसून कुढत नाहीये. तर स्वतःची कंपनी एंजॉय करतेय."

अंबिकाने दुसऱ्या दिवशी पांडे काकूला होकार कळवला. तसेच ट्रॅव्हल्स कंपनीत आणखी किती सीट बाकी आहेत त्याबद्दल विचारपूस केली. मग समिधाच्या (ती सांभाळत असलेल्या डिव्होर्सी महिलांचा ग्रुप) सर्व सदस्यांना तिने यात्रेला यायचं आमंत्रण दिलं.

आधीतर ग्रुप मधे यावर वाद झाला कि चारधाम यात्रेला जायला का आपण म्हाताऱ्या झालोय? मग अंबिकाने त्यांना समजावलं कि,
"या यात्रेत आपण छान ट्रेकिंग करणार आहोत, त्यासोबतच ज्यांना देव दर्शनाची ओढ आहे त्यांचं देव दर्शनही होईल. खास म्हणजे चारधाम यात्रा म्हटलं कि कोणाच्याही घरून शक्यतो नकार येणार नाही आणि सर्वांना आपलं स्वतंत्र जगायला पंधरा दिवस मिळतील. मन मोकळं वातावरण राहणार. आयुष्यात एकदा तरी असं एकट्याने जायला हवं कुठेतरी. स्वत्वाची जाणीव होते म्हणतात. स्वतःचा स्वतःशीच संवाद साधल्या जातो आणि स्वतःला कळतं की काय हवं होतं? काय मिळालं आणि काय हवं आहे?"

समिधा गटातील सर्व वयोगटातील अठरा स्त्रिया चारधाम यात्रेला यायला तयार झाल्या आणि हो नाही करता करता अंबिका पोहोचली दिल्लीत. दिल्ली वरून हरिद्वार. हरिद्वारच्या गंगा आरती सोहळ्याने तिचे डोळे दिपून गेले. तिने पांडे काकूचे खूप खूप आभार मानले तिला चारधाम यात्रेला यायला उत्साहीत केल्या बद्दल. पण पांडे काकू रुसल्या कारण अंबिका त्यांना सोडून जास्त वेळ तिच्या समिधाच्या स्त्रियांना देत होती.

यमुनोत्रीला जायला निघाले आणि चारधाम यात्रेला प्रारंभ झाला. इतर सह यात्रींनी हवं ते करावं पण तिने स्वतः पायदळ वारीच करायची असा अंबिकाचा निश्चय. यमुनोत्रीचा रस्ता तसा छान, मधे मधे \"हर हर महादेव\" \"जय गंगा मैय्या, जय यमुना मैय्या\" असे गजर होत होते. त्याने उत्साह वाढत होता. निसर्गरम्य, डोळयांची पारणं फिटवणारे नजारे बघून सारा थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. पण काही काही ठिकाणी चढाव खूपच थकवणारा. मग अंबिका आणि तिच्या सोबत असलेल्या पूर्वा, जया आणि वर्षा थांबून, घोटभर पाणी पिऊन, बोलत बोलत परत चालू लागायच्या. असंच एका ठिकाणी थांबलं असतांना जया अंबिकाला म्हणाली,

"आपण आता अशी सहल दर वर्षी काढत जाऊ."

"हो हो. मला तर आताच इतकं बरं वाटतंय त्या बोरिंग लाईफ मधून इथे आलेय तर." वर्षाने दुजोरा दिला.

"हो रे आपण स्वतःला काय आवडतं ते करायलाच हवं पण त्यातही स्वतःसाठी काय चांगलं आहे याचा शोध घेऊन तेही करायला हवं." अंबिका

"तु म्हणजे ना आमच्यासाठी वरदानच ठरली आहेस बाई. किती विचार करतेस आमचा." वर्षा म्हणाली.

"चढली मी हरबऱ्याच्या झाडावर." अंबिका हसून म्हणाली, "पण अजून यमुनोत्री नाही आलं बरं का. आणखी 2-3 किलोमीटर चालायचं आहे."

"हो हे शेवटचे दोन किलोमीटर खूपच थकवणारे आहेत. मी वाचलं होतं गुगल वर." पंचविशीतली पूर्वा म्हणाली.

"हे छान आहे तुम्हा आजच्या जनरेशनचं. हवं ते गुगल बाबाला विचारून मोकळं व्हायचं. इकडे तिकडे भटकून, याला त्याला विचारून डोकं खराब करायची गरज नाही." जया म्हणाली.

"हो." पूर्वा खजिल हसली, "पण आयुष्य तितकंच कठीण आहे. तुमच्या खाजगी गोष्टींबद्दल घर बसल्याच शोध लावू शकतात लोकं या गुगल बाबा मुळे आणि एक चूक तुम्हाला आयुष्यातून उठवून द्यायला पुरेशी ठरते."

सर्व गंभीर झाले. पूर्वाचा लग्न झाल्यावर दोनच महिन्यात घटस्फोट झालेला. झालं असं कि लग्न ठरण्या आधीच तिने बॉयफ्रेंड खूपच कंट्रोल करू पाहतो म्हणून सर्व संबंध तोडलेले. तो तिच्यावर राग धरून बसलेला. इकडे तिच्या आई बाबांनी चांगला मुलगा बघून, हिला भेटवून, दोघांच्या संमतीने लग्न लावून दिलं. हिने स्वतः कुठेच काही फोटो टाकले नाहीत पण हिच्या आणि बॉयफ्रेंडच्या कॉमन फ्रेंडने फेसबुक वर हिच्या लग्नाचे फोटो टाकले. मग काय हे हनिमून वरून येत नाही तो बॉयफ्रेंड हिच्या सासरी पोहोचला आणि त्याने नको ते फोटो, मेसेजेस हिच्या सासू सासऱ्याला दाखवले. त्यांनी मुलाला घटस्फोट घ्यायला सांगितलं.

सर्व फॅमिली कॉऊन्सलर कडे गेले. बैठकी झाल्या. पण पूर्वाच्या बॉयफ्रेंडने त्यांच्या डोक्यात इतकं काही भरून दिलं होतं कि त्यांना ती घरात आणि मुलाच्या आयुष्यात नकोच होती.

पूर्वाचा नवरा तसा समजदार. तो म्हणाला,
"पूर्वा मी समजू शकतो कि प्रत्येकाला एक भूतकाळ असतो. मलाही आहे. पण तो अशाप्रकारे समोर यायला नको गं. आता मी तुझी बाजू घेतली तर आई बाबाचा त्रागा होईल. त्यांनी मला खूप काही दिलं आहे. त्यांना म्हातारपणात असं वाऱ्यावर सोडणं मला पटत नाही. पण तु तर माझ्या आयुष्यात आताच आली आहेस. म्हणून मला माफ कर आणि घटस्फोटच्या पेपर वर सही कर. तुला हवं ते सर्व देतो मी आणि संपर्कात राहूच आपण. होऊ शकतं परत आपल्याच वाटा एकत्र येतील."

"पूर्वा नको विचार करू त्या गोष्टींचा." अंबिका एका हाताने काठी टेकवत चालत पूर्वाला म्हणाली.

"हो प्रयत्न करतेय." पूर्वा म्हणाली.

"मग कसं वाटतंय समिधाला जॉईन केल्यावर?" अंबिकाने विचारलं.

"खूप छान वाटतंय. आपण खरंच छान काम हाती घेतलंय. मी नाही गं. तूझ्या सारख्याच माझ्या एका मित्रानं सुरवात करून दिली आहे. पुढल्या बैठकीला बोलावेल त्याला." अंबिका.
"ओके !" पूर्वा विचार करून म्हणाली, "समिधाची आपण आणखी जाहिरात करू. म्हणजे माझ्या सारख्या जास्तीत जास्त तरुण मुली जोडल्या जातील."

"हो हो नक्कीच. समिधाचं धैय्यच आहे ते." अंबिका म्हणाली.

त्यांच्याच मागे मागे चालणारी आणि त्यांचं पुसटसं बोलणं ऐकत असणारी एक गोड, चुणचुणीत, विशीतली तरुणी अंबिकाच्या समोर येऊन उभी झाली.

"तुम्हाला माझ्या मम्माने पाठवलं ना माझ्या मागे मागे?" तिने अंबिकाला प्रश्न केला.
"तु तूझ्या मम्मीशी भांडून एकटीच आलीस का यात्रेला ?" अंबिकाने तिला उलट प्रश्न केला.

"आधी प्रश्न मी विचारला हं. तेव्हा आधी उत्तर तुम्ही द्यायला हवं." ती चिडून अंबिकाला म्हणाली.

"नाही गं परी." अंबिकाच्या तोंडून निघालं. तिला तरुणपणी परी हे नाव खूप आवडायचे. मुलगी झाली तर परीच ठेऊ तिचं नाव, असं तिला मनोमन वाटे.

"मग तुम्ही तेव्हापासून 2-3 वेळा माझं नाव कसं घेतलं?" तरुणीने चिडून विचारलं.

"तुझं नाव? आम्ही कोणीच नाही घेतलं गं आणि ही काय पद्धत मोठ्या लोकांशी बोलायची?" वर्षा म्हणाली.

"हो ना, असं यात्रेच्या मधात थांबवून वाद घालते का कोणी?" जया म्हणाली.

"हे बघा मीही यात्रेलाच आली आहे. तुम्ही माझं नाव घेतलं म्हणून मी विचारलं." ती तरुणी परत त्यांच्याकडे बोट दाखवून बोलली. तशी जया आणि वर्षा तिच्याशी वाद घालायला पुढे सरसावल्या.

"अरे शांत व्हा." अंबिका त्यांना थांबवत म्हणाली, "तुझं नाव सांग."

"समिधा ! तुम्ही घेतलं ना माझं नाव दोन तीन वेळा आताच बोलतांना?"

"अच्छा ते होय." अंबिका म्हणाली तशा चौघीही एकमेकींकडे बघून हसल्या.

"मी किती सिरीयस आहे आणि तुम्ही हसत आहे होय." ती बिचारी काहीच न समजून बोलली.

"अगं बाळ चल तिथे बसून पाणी पिऊ आणि बोलू. पाय दुखत आहेत उभं राहून. दहा मिनिट ब्रेक घेऊन परत चालणं सुरु करू." अंबिका समिधाचा हात पकडून म्हणाली. ती विचार करू लागली,

\"अशी कशी बाई ही, ओळख ना पाळख चक्क माझा हात पकडून स्वतःच्या मुलीसारखी मला घेऊन जातेय?\"

दोन तीन घोट पाणी पिऊन अंबिकाने त्यांच्या \"समिधा\" असं नामकरण केलेल्या घटस्फोटित महिलांच्या गटा बद्दल सांगितलं. तेव्हा समिधाचा चेहरा पाहण्याजोगा झाला.

"ओह, असं आहे ते. I am very much sorry. मी सोलो ट्रिपवर आली आहे. मम्माला सांगितलं आहे. पण ती नकोच म्हणत होती म्हणून मला गैरसमज झाला कि तुम्हाला तिने माझ्यावर नजर ठेवायला पाठवलं आहे." समिधाने त्यांना माफी मागितली.

"ठीक आहे गं. तुझा गैरसमज दूर झाला ना झालं." अंबिका तिच्या चेहऱ्यावर हात फिरवून म्हणाली. चला आणखी एक किलोमीटर जायचे आहे. ते सवारीने गेलेले पोहचले असतील मंदिरात." पूर्वा रस्त्यावर अंतर मार्क केलेला दगड बघून म्हणाली.

आता समिधाही त्यांच्या सोबतच चालू लागली. पोहोचले एकदाचे मंदिरा जवळ. तिथे गरम पाण्याच्या कुंडात हातपाय धुवून सर्वांनी दर्शन घेतले. अंबिका \"समिधा\" गटाच्या सर्व स्त्रिया सोबत आहेत कि नाही बघत होती तो तिच्या लक्षात आलं कि आतापर्यंत तिच्या आजूबाजूलाच असलेली समिधा आता गायब झाली आहे.

"अचानक कुठे गायब झाली असेल ही पोर? त्यात एकटीच फिरतेय. एखाद्या संकटात सापडली तर? असे कसे आई वडील पाठवतात एकटं?" तिच्या मनात आलं. मग लगेच तिला तिचं तरुणपन आठवलं, "किती वाटत होतं. एकटं जावं कुठेतरी. स्वतःच सगळं बघावं. कोणाची रोक टोक नकोय. आपल्यात हिम्मत नव्हती आई बाबा विरुद्ध जायची. हिने केली. म्हणून ही आली. तसंही आता मुलं त्यांच्या पालकांना घाबरत नाहीत आणि पालकांनाही मुलांना मोकळीक द्यायला आवडतं. बरंच नाही का हे? असो पण असं न सांगता बोलता कुठे गेली असेल ही मुलगी?"

धन्यवाद !

तळटीप :
या कथेचा लेखिकेच्या आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.

लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून
0

🎭 Series Post

View all