असंच एका संध्याकाळी अंबिकाला एका घरी मिटिंगसाठी बोलावण्यात आलं. तिला वाटले नेहमी सारखं मार्गदर्शन करायचं आहे आणि समिधा मधे सहभागी करून घ्यायचं आहे. पण तिथे गेल्यावर कळलं कि मुलीच्या आई बाबाला तिने घटस्फोट घेऊ नये म्हणून अंबिकाला बोलावलं.
"अहो मी घटस्फोट झालेल्या मुलींना मार्गदर्शन करते, त्यांचं पुनर्वसन किंवा त्यांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी प्रयत्न करते." अंबिका म्हणाली.
"अहो मी घटस्फोट झालेल्या मुलींना मार्गदर्शन करते, त्यांचं पुनर्वसन किंवा त्यांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी प्रयत्न करते." अंबिका म्हणाली.
"हो आम्हाला माहित आहे." मुलीचे बाबा म्हणाले.
"तरीही तुम्ही मला इथे बोलावलं."
"हो, कारण आमची स्वतः विचार विनिमय आणि प्रेम करून लग्न केलेली मुलगी अगदी शुल्लक करणा वरून घटस्फोट घ्यायला निघाली आहे आणि आम्हाला हिला समजावून सांगायचं आहे कि घटस्फोटित जीवन वाटतं तितकं सोपं नसतं. म्हणून तुम्हाला बोलावलं आहे." मुलीच्या आईने स्पष्टीकरण दिलं.
"जावई रोज सकाळ संध्याकाळी हिला घ्यायला येतोय पण ही त्याच्याशी बोलायलाही तयार नाही. असं करून चालतं का?" मुलीचे बाबा बोलले.
"काहीही. माझ्या मुलाला हेच आवडतं, माझ्या मुलाला तेच आवडतं, त्याच्यासाठी अशीच राहा, असंच कर, असेच कपडे घाल, आज हीच भाजी बनव, सतत त्या म्हातारीचं कोण ऐकून घेईल? बरं ते जाऊदे, ते आईचं पिल्लूही सतत आईचा धावा करते. आईच्या हातचं किती चविष्ट? आईची चॉईस.... अप्रतिम, आई म्हणजे देवी, आई म्हणजे मान सन्मान, आईने म्हटलं ना मग हीच साडी घाल, तिथेच जा. अरे स्वतःच्या हनिमूनचं डेस्टिनेशनही आईला विचारून ठरवायचं? मी म्हणते ती दोघं इतकी सुखी आहेत एकमेकांत कि तिसरं कोणी नकोच त्यांना. लग्न तर फक्त सामाजिक समाधाना पुरतं केलं आहे." तिथेच बाजूला बसलेली नखशिकांत सौंदर्य लाभलेली, स्लिव्हलेस गाऊन घातलेली मुलगी तावातावात बोलून आत गेली.
"बघा किती शुल्लक कारण आहे. हे असं तर प्रत्येक घरी चालतं. मुलगा असतोच आईच्या जास्त जवळ. बायकोला प्रेमाने त्याला आपल्या जवळ करावं लागतं. पण ही ऐकायलाच तयार नाही." मुलीची आई म्हणाली.
अंबिका त्यांच्याशी काहीच न बोलता मुलीच्या मागे तिच्या खोलीत गेली.
"तुम्ही का आल्या इथे? मला नाही बोलायचं तुमच्याशी. माझा निर्णय पक्का आहे. मला त्या मम्माज बॉय सोबत संबंधच नाही ठेवायचा." ती अंबिकाच्या तोंडावर दार आपटून म्हणाली.
"मला कळत आहे कि त्यांना जे शुल्लक कारण वाटतंय, ते इतकंही शुल्लक नाही. कितीतरी घरात इथूनच मोठ्या वादांना तोंड फुटतं." अंबिका दाराशीच उभी राहून बोलू लागली, "खरंतर लग्न होतांना नवऱ्या मुलाने समजून घ्यायला हवं कि आपण स्वतः एका नवीन मुलीला आपल्या घरात आणतोय. तिला वेळ देऊन, तिच्या आवडी निवडीला लक्षात घेऊन वागावं. तर वर मायनं हळूहळु मुलाला आपल्या बंधनातून मुक्त करावं. पण बऱ्याच आयांना हे जमत नाही आणि घोळ होतो. त्यांना वाटतं सून आपल्या मुलाला दूर नेईल आणि त्या मुलाला अधिकाधिक स्वतःच्या ताब्यात ठेवायचा प्रयत्न करतात.
नवंवधूने लक्षात घ्यावं कि ती ज्या मुलाशी लग्न करतेय तो आधी कोणाचा तरी मुलगा आहे, भाऊ, काका, मामा आणि नंतर तिचा नवरा बनला. या सर्व नात्यांबरोबर तिला नवऱ्याला वाटून घ्यायचं आहे. ती तिचं घर सोडून त्याच्या घरात जाते आणि तो त्याच्याच घरात राहून, सर्व नात्यांना सांभाळून, सर्वात ताळमेळ बसवत तारेवरची कसरत करत बायको नावाची एक नवीन जबाबदारी स्वीकारतो."
"सर्वच नवरे करतात. कारण मुलीही त्याच्यासाठी तिच्या घरच्यांना सोडून येते त्याच्या घरी. मग त्यानेही तिला जास्तीत जास्त वेळ द्यायला हवा, तिला समजून घ्यायला हवं. ना कि आपल्या आईचं पुराण सांगत बसावं." ती म्हणाली.
"दूर, डोळ्याआड असतांना दुर्लक्ष करणं सोपं असतं गं. सोबत राहतांना कठीण जातं मुलांना. समजून घे बाळ." अंबिका म्हणाली. तशी ती दार उघडून भडकली,
"मीच का? तो नाही समजू शकत कि मला एकटं वाटतं, तो सोडून इतर अनोळखी वाटतात तरीही हीही करत दात दाखवत बोलावं लागतं सर्वांशी आणि हे आईच्या पदराशीच इतकं करूनही."
"मीच का? तो नाही समजू शकत कि मला एकटं वाटतं, तो सोडून इतर अनोळखी वाटतात तरीही हीही करत दात दाखवत बोलावं लागतं सर्वांशी आणि हे आईच्या पदराशीच इतकं करूनही."
"तु तयार असशील तर मी त्याच्याशी आणि त्याच्या आईशीही बोलते. त्यांनाही समजावून सांगते." अंबिका तिला म्हणाली, "विचार करून सांग मला, खरंच तो इतका वाईट आहे का? प्रेम करून, एकमेकांना समजून उमजून लग्न केलंत ना. कोणी जबरदस्ती नाही केली तुमच्या दोघांवर. तेव्हा तुम्हीच एकमेकांना समजून घ्यायला हवं. मग असं का वागताय?"
वातावरण शांत झालं.
"मी असं नाही म्हणत की आयुष्य जगण्यासाठी कोणीतरी सोबत हवंच. पण हो कोणी खूप आपलंसं असलं ना सोबत कि सुकर होतो हा मृत्यू पर्यंतचा प्रवास. जगायला एक कारण मिळतं. म्हणून नशीब तुम्हाला असं कोणी देत असेल तर सांभाळून घ्यावं त्याला." इतकं बोलून अंबिका तिथून निघाली.
मुलीच्या डोक्यात प्रकाश पडला. ती तिच्या नवऱ्याला भेटायला तयार झाली. अंबिका मध्यस्थी झाली. तिने दोघांनाही एक एक करून आपापली मतं मांडायला सांगितली आणि त्यांना आठवायला सांगितली ती कारणं ज्यामुळे त्यांना एकमेकांशी लग्न करायची इच्छा झाली.
त्यांना दोघांना आपली चूक कळली. मुलीच्या सासूबाईलाही मुलाचा संसार मोडू नये असंच वाटत होतं. त्यांनीही मुलगा आणि सुनेच्या मधे मधे करणार नाही असं वचन दिलं. तेव्हा अंबिका मुलीला म्हणाली,
"तुझ्या आईला जसं तुला दूर करतांना त्रास झाला तसा सासूबाईनाही इतकी वर्ष आपल्या शब्दात असलेल्या मुलाला सुनेच्या हवाली करणं अवघडतं. तेव्हा थोडं दमानं घे."
मुलगी मान हलवून होकार भरली आणि सासरी गेली. अंबिकाला कधीच वाटलं नव्हतं कि ती हेही कामं करायला लागेल. स्वतः घटस्फोटित असूनही इतरांचा घटस्फोट वाचवू शकेल.
आपल्या संस्थे साठी काम करावं म्हणून तिला इतर सामाजिक संस्थेचे फोन येऊ लागले, वेगवेगळ्या ठिकाणी संबोधनपर भाषण द्यायला निमंत्रण यायचं. आपल्या हातून काही चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून तिने विवाह संस्थेचा आणखी खोलवर अभ्यास सुरु केला.
असंच एका युवा संवाद कार्यक्रमात गेलेली असतांना एक तरुणी तिच्या गळ्यात येऊन पडली,
"हाय अंबिका, कशी आहेस?"
अंबिकाने डोळ्यावरचा चष्मा नीट करत तिला बघितलं, "समिधा, कशी आहेस बाळा?"
"काय बाळा? विसरलीस तु मला काय प्रॉमिस केलं होतं ते? एक महिना वर होऊन गेला. तुझा काहीच अता पता नाही." समिधा लटक्या रागात म्हणाली.
"मग तु करायचा ना फोन. नंबर तर दिला होता मी." अंबिका हसून म्हणाली.
"ते बिझी असशील वाटलं." समिधा बोलली. यावर अंबिकाने अविश्वासाने तिला बघितलं. ती कान पकडून खजिल होऊन म्हणाली, "हा इगो आला मधे की मीच का फोन करून गरज दाखवावी आपली. म्हणून नाही केला. सॉरी !"
"इट्स ओके !" अंबिका तिच्या चेहरा ओंजळीत पकडून म्हणाली.
"कोणाशी बोलतेय समिधा?" समिधाच्या मागून आवाज आला, "चल बाळा आपल्याला तूझ्या डॅड सोबत मुव्हीला जायचं..." अंबिकाला समोर बघून ती व्यक्ती मधेच बोलायचं थांबली. अंबिकाही डोळे विस्फारून त्या दोघींना बघू लागली.
"हे मॉम ही माझी यमुनोत्री आणि गंगोत्रीची मैत्रिण, अंबिका ! तुला सांगितलं होतं ना मला एक खूप गोड मैत्रिण मिळाली म्हणून तिकडे तीच ही. तुला फोटो तर बघ म्हटलं होतं. पण तु आपल्या कामातच बिझी पिझी आणि अंबिका ही माझी मॉम, नाही सुपर मॉम !" समिधा म्हणाली.
"Nice to meet you mam! समिधा मला काम आहे. मी जाते. बाय!" डोळ्यांच्या काठोकाठ आलेल्या अश्रूंना कसंतरी थांबवून आणि हृदयावर दगड ठेऊन अंबिका पलटली.
"एक मिनिट थांबा." मिसेस जाई अंबिकाला त्यांचं व्हिझिटिंग कार्ड देत म्हणाल्या, "हे कार्ड असू द्या माझं. वेळ असेल तेव्हा फोन करून या भेटायला. माझ्या मुलीला खूप आवडल्या तुम्ही. तिची आवड तीच माझीही."
"धन्यवाद !" अंबिका न पलटताच कार्ड घेऊन पुढे चालू लागली.
धन्यवाद !
तळटीप :
या कथेचा लेखिकेच्या आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.
या कथेचा लेखिकेच्या आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.
लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून
फोटो : साभार गुगल वरून
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा